उमदा मिडकॅप : कॅनरा रोबेको मिडकॅप फंड
कॅनरा रोबेको मिडकॅप फंड उद्या ३ वर्ष पूर्ण करीत आहे. गुंतवणूकदार दीर्घकालीन एसआयपीच्या मार्गाने संपत्ती निर्मिती करू इच्छित असेल तर किंवा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये नव्याने एखाद्या मिडकॅप फंडात एसआयपी करू इच्छित असाल तर कॅनरा रोबेको मिडकॅप फंडाचा वाचकांनी जरूर विचार करावा. या फंडाने २ डिसेंबर २०२३ ते २८ नोव्हेंबर २०२५ या तीन वर्षाच्या कालावधीत वार्षिक २०.६५ टक्के दराने परतावा दिलेला असून याच कालावधीतील कामगिरीच्या यादीत हा फंड आठव्या स्थानी आहे. ऑक्टोबर अखेरीस ३८४८ कोटीची मालमत्ता असणाऱ्या या फंडाची शिफारस एनएफओ वेळी केली होती. ज्या वाचकांनी या फंडाने एक रक्कमी किंवा एसआयपी पद्धतीने गुंतवणूक केली असेल त्यांना या फंडाने नक्कीच निराश केले नाही. कॅनरा रोबेको मिडकॅप फंड किमान ५ वर्षांसाठी गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या कोणत्याही गुंतवणूकदारासाठी आदर्श फंड आहे. मॉर्निंगस्टार एखाद्या फंडाला तीन वर्षाच्या कालावधी नंतर त्या फंडाचे ‘स्टार रेटिंग’ ठरते. या फंडाला ‘फोर स्टार रेटिंग’ मिळेल असा अंदाज आहे. तिसऱ्या वर्षपूर्ती नंतर (एप्रिल २०२६) हा फंड ‘लोकसत्ता कर्ते’ म्युच्युअल फंड यादीत समावेश होण्याची आणि दीर्घकालीन एसआयपी शिफारस प्राप्त यादीचा भाग असेल असे वाटते. जर वाचकांची जोखीम घेण्याची क्षमता जास्त असेल, तर आणि तुम्ही ‘मिड-कॅप’प्रेमी गुंतवणूकदार असाल तर हा मिडकॅप फंड नक्कीच तुम्हाला निराश करणार नाही. अर्थात, हा एक मिडकॅप फंड असल्याने, तुमच्या जोखीमांकानुसार या फंडात एकूण पोर्टफोलीच्या १० ते १५ टक्क्यांपेक्षा अधिक गुंतवणूक करणे हिताचे होणार नाही. बाजारातील मोठ्या तेजीतून भांडवली लाभ मिळवू इच्छिणाऱ्या आणि काही प्रमाणात अस्थिरता सहन करण्याची क्षमता असलेल्या गुंतवणूकदारांसाठी, मिड-कॅप फंडात गुंतवणूक करणे हा दीर्घकाळात संपत्ती निर्मितीचा एक फायदेशीर निर्णय असू शकतो. फार कमी वेळा मिडकॅपचे मुल्यांकन वाजवी असते. मूल्यांकन वाजवी असो अथवा नसो प्रत्येक वेळी अनेक संधी उपलब्ध असतात. या संधी हुडकून योग्य कंपनीत देर्घ्कालीन गुंतवणूक करणे हे निधी व्यवस्थापकाचे काम असते. कॅनरा रोबेको हा मिडकॅप फंड गटात सर्वात सुसंगत आणि उच्च दर्जाची कामगिरी असलेला फंड आहे.
मिड-कॅप फंडांची यादी मिडकॅप फंडां सारखी यादी देखी अस्थिर असते. एखादा मिडकॅप फंड क्वचितच या यादीचा (फ्रँकलीन इंडिया आणि निप्पॉन इंडिया ग्रोथ मिडकॅप वगळता) दीर्घकाळ भाग राहिला आहे. फंडाची कामगिरी ‘निफ्टी मिडकॅप १००’ या निर्देशांकाशी तुलना केल्यास सातत्याने मानदंड सापेक्ष अधिक परतावा मिळविणाऱ्या मिड-कॅप फंडांमध्ये अलिकडच्या काळात वाढ झाली आहे. २ डिसेंबर २०२३ ते २८ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत २९ पैकी केवळ १२ फंडांना निर्देशांकापेक्षा अधिक परतावा मिळविणे जमले आहे. कॅनरा रोबेको मिडकॅप फंड या यादीत अकराव्या क्रमांकावर आहे. कॅलेंडर वर्ष २०२३ २०२४ आणि या वर्षात २८ नोव्हेंबर पर्यंत हा फंड नेहमीच अव्वल स्थानावर राहिला नाही. परंतु या तिमाही वर्षात हा फंड मिडकॅप गटाच्या सरासरीपेक्षा अधिक परतावा मिळविणारा फंड राहिला आहे. ‘निफ्टी मिडकॅप १००’ आणि ‘निफ्टी मिडकॅप १५०’ च्या तुलनेत, कॅनरा रोबेको मिडकॅप फंडाने २ ते २.७५ टक्के अधिक परतावा मिळविला आहे. बाजारातील तेजींच्या वेळी कॅनरा रोबेको मिडकॅप फंड नक्कीच सर्वोत्तम नाही. इन्व्हेस्को मिडकॅप मोतीलाल ओस्वाल मिडकॅप आणि एडलवाईज मिडकॅप सारखे मिडकॅप फंड तेजीत जोरदार परतावा देतात परंतु त्यांच्या स्मॉल-कॅप कंपन्यांच्या अधिक मात्रेमुळे ते तुलनेने अधिक अस्थिर आहेत. तथापि, कॅनरा रोबेको मिडकॅप फंडात स्मॉलकॅप कंपन्यांचे प्रमाण मर्यादित राखल्यामुळे कमी अस्थिर तरीही या दोन्ही मानदंडांपेक्षा अधिक परतावा मिळणारा ठरला आहे. परंतु बाजार घसरणीच्या काळात (सप्टेंबर २०२४ ते एप्रिल २०२५) अस्थिरता आणि जोखीम-समायोजित परताव्याची तुलना केली असता भविष्यात हा फंड दीर्घकालीन पोर्टफोलिओसाठी हा फंड आहे.
श्रीदत्त भांडवलदार आणि प्रणव गोखले हे कॅनरा रोबेको मिडकॅप फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये ९५ ते ९८ कंपन्या असतात . कॅनरा रोबेको मिडकॅप फंडाच्या गुंतवणुकीत ७३.५ टक्के मिडकॅप, ६.३५ टक्के स्मॉलकॅप १५.०१ टक्के लार्जकॅप आहेत. त्यांच्या टॉप १० स्टॉकचा वाटा त्यांच्या पोर्टफोलिओच्या ३० टक्के पेक्षा कमी आहे. सर्वाधिक गुंतवणूक असलेला पर्सिस्टंट सिस्टिम्स २.९१ टक्के आहे. कॅनरा रोबेको मिडकॅप अशा दर्जेदार कंपन्यांचा शोध घेते ज्यांनी विक्री, अर्निंगपर शेअर, आणि नफ्यात वाढ नोंदविणाऱ्या कंपन्यांचा समावेश असतो. व्यवसायातून नफा कमाविणाऱ्या आणि चांगले व्यवस्थापन आहे अशाच कंपन्या निधी व्यवस्थापक गुंतवणुकीसाठी निवडतात. मिड-कॅप कंपन्यांत गुणवत्ता शोधणे कठीण असले तरी कॅनरा रोबेकोच्या सर्वच फंडात गुणवत्तेला प्राधान्य दिले आहे. उच्च मूल्यांकन असलेल्या कंपन्यांची जोखीम टाळली आहे. फंडाच्या गुंतवणुकीत बँकिंग आणि आर्थिक सेवा, भांडवली वस्तू, ग्राहकसेवा, वाहन पूरक उद्योग, माहिती तंत्रज्ञान आरोग्यसेवा, रसायने ग्राहकाभिमुक वस्तू, स्थावर मालमत्ता, आणि उर्जा हे सर्वाधिक गुंतवणूक असलेले उद्योग आहेत. फंडाच्या तीन वर्षाच्या कामगिरीवरून हा भविष्यात निप्पॉन इंडिया ग्रोथ मिडकॅप किंवा फ्रँकलीन इंडिया मिडकॅप फंडासारखी गुंतवणूकदारांसाठी संपत्ती निर्माण करणारा फंड असेल असे वाटते.
तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:
Keep in Perspective
Financial decisions can be considered in the context of your goals, time horizon and individual circumstances rather than short-term market movements.