समईच्या शुभ्र कळ्या…
रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारीच्या पतधोरण आढावा बैठकीत २५ आधार बिंदूंनी रेपोदरात कपात केली. पुढील पतधोरण आढावा बैठक ७ ते ९ एप्रिल दरम्यान होणार असून या बैठकीत किंवा जून महिन्यांत होणाऱ्या बैठकीत अजून एक पाव टक्क्याच्या दर कपातीची अपेक्षा आहे. उच्च-पत धारण करणाऱ्या आणि ३ ते ५ वर्षे उर्वरित मुदत असलेल्या कर्ज रोख्यांत गुंतवणूक करून भांडवली लाभ होण्याच्या उद्देशाने ५ वर्षाच्या कालावधीसाठी स्थिर उत्पन्न गटात कॉर्पोरेट बॉंड फंड हा गुंतवणुकीसाठी आश्वासक पर्याय आहे. आदित्य बिर्ला सन लाईफ कॉर्पोरेट बॉंड फंड हा कॉर्पोरेट बॉंड फंड गटात तिसऱ्या क्रमांकाची मालमत्ता असलेला फंड आहे. रिझर्व्ह बँकेच्या संभाव्य दर कपाती पश्चात व्यापारी बँका एप्रिल पासून आपल्या मुदत ठेवीच्या व्याज दारात कपात करतील. जे गुंतवणूकदार ५ ते ७ वर्षे मुदतीसाठी पैसे गुंतवू इच्छितात अशा गुंतवणूकदारांनी कॉर्पोरेट बॉंड फंडांचा आवर्जून विचार करावा.
आदित्य बिर्ला सन लाईफ कॉर्पोरेट बाँड फंड का?
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने (फेड) मागील कॅलेंडर वर्ष २०२४ मध्ये दोन वेळा व्याज दर कपात केली. अनेक देशांच्या मध्यवर्ती बँका एकतर व्याजदर कपातीच्या प्रतीक्षेत आहेत, किंवा त्यांनी या आधी अमेरिकेच्या व्याज दर कपाती नंतर भरताच्या रिझर्व्ह बँकेसारखी व्याजदर कपातीस सुरवात केली आहे. २०२३ मध्ये जगभरात व्याजदर शिखरावर पोहोचल्या नंतर चलनवाढीचा वेग, आर्थिक वाढ मंदावणे या कारणांनी जगभरात व्याजदर कपातीस सुरवात झाली आहे. उद्यापासून सुरु होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षात भारतात अर्ध्या टक्क्याची व्याजदर कपात अपेक्षित आहे. रोख्यांच्या किंमती आणि व्याजदर यांच्यात व्यस्त सबंध असल्याने व्याजदर कपाती नंतर मागील दोन वर्षात कर्जदरांनी उच्च व्याज दराच्या विकलेल्या रोख्यांच्या किंमती वर जातील. गुंतवणुकीत उच्च पत असलेले रोख्र असलेल्या या कॉर्पोरेट बॉण्ड फंडाला याचा फायदा होईल. या फंडाच्या गुंतवणुकीत केंद्र सरकारचे रोखे आणि ‘एएए’ (ट्रिपल-ए) पत असलेले रोखे आहेत. समान मुदतीच्या सरकारी रोखे आणि ‘ट्रिपल-ए’ रोख्यांच्या परताव्यातील फरक ३०-४० आधार बिंदूवरुण ८० ते १०० आधार बिंदूंवर गेला आहे. वर्ष अखेर असल्याने केंद्राच्या रोख्यांचा मर्यादित पुरवठा आणि कंपन्यांच्या सुदृढ ताळेबंदामुळे आघाडीच्या कंपन्यांकडून रोखे विक्री फारशी झालेली नाही त्यामुळे उपलब्ध रोख्यांना मागणी वाढल्याने किंमतीत वाढ झाल्याचे दिसत आहे.
आदित्य बिर्ला सन लाईफ कॉर्पोरेट बॉंडफंड हा व्याजदर संबंधीत जोखमीचे सक्रीय व्यवस्थापित फंड आहे. फंडाच्या पोर्टफोलिओत ६८.४४ टक्के रोखे ‘ट्रिपल ए’ पत धारण करणारे आणि केंद्र सरकारच्या रोख्यांचे प्रमाण २८.३१ टक्के असून उर्वरित ०.२७ टक्के मालमत्ता रोकड सुलभ (सीएलओबी) आहे. सक्रिय कालावधी व्यवस्थापनामुळे (ड्युरेशन) कॉर्पोरेट बॉंड फंड गटात पत जोखीम (क्रेडीट रिस्क) टाळणारा फंड आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये, फंडाने आपल्या मालमत्तेपैकी सुमारे २२ टक्के मालमत्ता दीर्घ-मुदतीच्या सरकारी रोख्यांत (वर्ष २०३३,२०३४ आणि २०३७ मध्ये मुदतपूर्ती होणाऱ्या रोख्यांत ) गुंतविली आहे. ज्यामुळे कॉर्पोरेट बाँड फंड गटात तुलनेत अनुकूल जोखीम-लाभ गुणोत्तर तयार केले आहे. भारतीय सरकारी रोख्यांचा जागतिक निर्देशांकांमध्ये समावेश केल्यामुळे. एकूण मालमत्तेचा अंदाजे २२ टक्के भाग सरकारी रोख्यांत आणि २७ टक्के भाग सरकारी मालकीच्या रोख्यांत गुंतविला आहे. फंडाच्या गुंतवणुकीत, आदित्य बिर्ला सनलाईफ लिक्वीड फंड (डायरेक्ट प्लान), युनियन बँक, सिडबी, नाबार्ड, बँक ऑफ बरोडा, बिहार आणि केरळ राज्य सरकारचे रोखे, बजाज हौसिंग फायनांस इत्यादींनी विकलेल्या उच्च पत असलेल्या रोख्यांत गुंतवला आहे.
कौस्तुभ गुप्ता एप्रिल २०१७ पासून या फंडाचे सह निधीव्यवस्थापक होते. एप्रिल २०२१ मध्ये त्यांची नियुक्त व्यवस्थापक म्हणून नेमणूक झाली. गुप्ता आणि सुनैना ‘ड’ कुन्हा यांच्या नेतृत्वाखालील आदित्यबिर्ल्रा सनलाईफ म्युच्युअल फंडाचा निश्चित उत्पन्न गुंतवणूक व्यवस्थापन संघ त्यांचा दीर्घ कार्यकाळ आणि फंड घराण्यातील अनुभव पाहता, आणि मनीष डांगी यांचे संक्रमण चांगले व्यवस्थापित केले गेले. गुंतवणूक संघ एकसंध पद्धतीने कार्य सिद्धीस नेण्यास कटीबद्ध असल्याचे दिसून आले आहे.
सक्रिय कालावधी व्यवस्थापन
व्याजदर कपातीपश्चात रोख्यांच्या किंमती वाढल्या तरी घसरत्या व्याज दरामुळे फंडाचे उत्पन्न कमी होते. घसरत्या व्याज दर आवर्तनांत फंड गटातील अन्य स्पर्धक फंडांपेक्षा चांगला परतावा दिला आहे. फंड गटातील काही फंडांनी २०२१ मध्ये सरासरी परिपक्वता (एव्हरेज मॅच्युरीटी) सक्रियपणे कमी केली. रिझर्व्ह बँकेने मे २०२२ पासून व्याज दर वाढवण्यास सुरवात करण्यापूर्वी, अर्थव्यवस्थेतून अतिरीक्त रोकडसुलभता कमी केली. त्यावेळी मुदतीचे सक्रीय व्यवस्थापन करण्याचे धोरण कामी आले. या सक्रिय व्यवस्थापनामुळे उत्पन्न वाढल्याने संभाव्य बारातिल घसरणीमुळे (मार्क-टू-मार्केट) नुकसान कमी झाले. या कालावधीत, फंडाने ‘ट्रिपल-ए’) रोख्यांमध्ये ८५ टक्के वाटप राखले, ज्यामुळे २०२१-२२ दरम्यान कमी व्याज-दर टप्प्यात आणि मे २०२२ च्या वाढत्या-दर टप्प्यात हा फंड या फंड गटात सर्वोच्च कामगिरी करणाऱ्यां फंडांपैकी पैकी होता. वाढत्या व्याज दर कालावधी नंतर फंडाने सरासरी परिपक्वता फेब्रुवारी २०२३ पासून वाढवला, त्याची सरासरी परिपक्वता साडेपाच वर्षांपर्यंत वाढवली. दरम्यानच्या काळात मानदंड रोख्यांचे उत्पन्न (केंद्र सरकारच्या १० वर्षांच्या रोख्यांचे उत्पन्न) ७.५ टक्क्यांवरून सध्या ६.७३ टक्क्यांपर्यंत घसरले आणि ‘ट्रिपल-ए’ आणि ‘पीएसयु’ रोख्यांचे उत्पन्न ८ टक्क्यांवरून ७.५ टक्क्यांपर्यंत घसरले. सध्या, फंडामध्ये सार्वभौम रोखे आणि उच्च-पत धारण करणाऱ्या रोख्यांचा समतोल साधला आहे. उच्च रोकड सुलभता हे पोर्टफोलिओचे वैशिष्ठ्य आहे. भविष्यात दर कपातीमुळे भांडवली लाभ होणार असला तरी, कमी व्याजदरामुळे फंडाचे उत्पन्न घराणार आहे. अलीकडील जागतिक घडामोडी भारतीय रोख्यांमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी दाखविलेला रस रोखे बाजारात अस्थिरता वाढण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त,रोखे गुंतवणुकीवर मिळालेल्या उत्पन्नावर गुंतवणूकदारांच्या कर कक्षेनुसार कर आकारणी होणार आहे. उच्च-गुणवत्तेच्या मुदत ठेवींच्या तुलनेत रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडातील गुंतवणूक कमी कर कार्यक्षम असली तरी रोकड सुलभता आणि वैविध्यामुळे आणि दीर्घ काळ मुद्दलाच्या चक्रवाढीची संधी साधू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांना हा फंड अजूनही आकर्षक गुंतवणूक आहे.
नियमित योजनेसाठी फंडाचे खर्चाचे प्रमाण ०.५१ टक्के आहे, जे फंड गटाच्या सरासरीच्या ०.७० टक्के खर्चाच्या प्रमाणापेक्षा कमी आहे. फंडाने सुरवातीपासून (३ मार्च १९९७) पासून वार्षिक ८.९१ टक्के दराने परतावा दिला आहे. मागील २० वर्षात फंडाने ८.०४ टक्के एसआयपी परतावा दिला आहे. गेल्या १० वर्षांच्या नक्त मालमत्ता मूल्याच्या (एनएव्ही) विदेवरून मोजलेल्या २० वर्षातील ५ वर्षांच्या चलत सरासरीद्वारे मोजल्या गेलेल्या कामगिरीवरून असे दिसून येते की फंडाने ९५.७६ टक्के वेळा ८ टक्यांपेक्षा अधिक परतावा दिला आहे. सेवानिवृत्त आणि भांडवली बाजारातील अस्थिरतेची जोखीम टाळू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदरांसाठी बँकमुदत ठेवींच्या तुलनेत रोकडसुलभ आणि बँकेच्या मुदत ठेवींपेक्षा अधिक परतावा देणारा हा फंड आहे. गेली २७ वर्षे समईच्या संथ तेवणाऱ्या ज्योतीसारखा हा फंड असून परताव्यात सातत्य राखलेलाहा फंड आहे. ‘१०० वजा वय’ या सूत्राला अनुसरून दीर्घकालीन गुंतवणूक करावी असा हा फंड आहे.
तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:
Financial decisions can be considered in the context of your goals, time horizon and individual circumstances rather than short-term market movements.