श्रेयस आणि प्रेयस
श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यमेतः तौ सम्परीत्य विविनक्ति धीरः ।‘
श्रेयो हि धीरोऽभि प्रेयसो वृणीते प्रेयो मन्दो योगक्षेमाद्वृणीते।।
श्रेयस आणि प्रेयस ही संकल्पनेचा उगम कठोपनिषदाच्या या श्लोकातून झाला आहे. या जोड शब्दांचा अर्थ वाच्यार्थाने आणि लाक्षर्थाने ध्यानात घ्यायचे आहेत. श्रेयस हा शब्द श्री या शब्दापासून आलेला आहे ज्याचा अर्थ झुकणे किंवा विश्रांती घेणे असा होतो. श्री हा शब्द या मूळचा आणखी एक परिचित शब्द आहे ज्याचा अर्थ प्रकाश, तेज, वैभव, कृपा, समृद्धी, श्रीमंती, असा होतो. देवी लक्ष्मीला ‘श्री’ (श्रीसुक्त) म्हणून ओळखले जाते, कारण ती आश्रय आणि आधार आहे सर्व अस्तित्वाचे; ती सौंदर्य आणि सुसंवादाची देवी आहे. प्रत्येकामध्ये चैतन्याचा साक्षात्कार घडवून आणणारे ज्ञान प्राप्त करणे हा श्रीविद्येचा उद्देश आहे.
गुंतवणुकीतील श्रेयस आणि प्रेयस याचे मला अभिप्रेत असणारा वाच्यार्थाने आनंददायक तर लाक्षार्थाने कल्याणकारण असा आहे .उदाहरणद्यायचे तर, स्मॉलकॅप फंडातील गुंतवणूक ही गुंतवणूकदाराला आनंददायक वाटत असली तरी कल्याणकारक नाही. स्मॉलकॅप हे सर्वात अस्थिर आणि म्हणूनच सर्वात जास्त परतावा देणारे आहेत. परंतु १० वर्षातील स्मॉलकॅप आणि लार्जकॅप फंडांनी देलेल्या परताव्याचा विचार केल्यास जोखीम संयोजक परतावा लार्जकॅपपेक्षा खूप जास्त नाही. माणूस अनेकदा आयुष्यात अशा टप्प्यावर उभा असतो जिथून दोन मार्ग फुटतात. माणसाला अनेकदा दोन किंवा अधिक पर्यायातून निवड करावी लागते. अशी निवड करीत असतांना एखादा पर्याय आनंददायक तर दुसरा कल्याणकारक असतात. आनंददायक मार्ग कल्याणकारक असेलच असे नाही. गुंतवणूकदारांना अशा प्रसंगी दोन्हीमधला फरक ध्यानात घेऊन कठीण पण कल्याणकारक मार्ग निवडण्यास सक्षम करणारे हे सदर असेल.
जीवनांत यशस्वी झालेले लोक असा सल्ला देतात की नवउद्योजकाने पहिले हजार दिवस कष्ट केले तर तो त्या व्यवसायात यशस्वी होतो. परंतु जी व्यक्ती या हजार दिवसांत मालकी उपभोगतो त्याला व्यवसायात यशस्वी होण्यात अधिक वेळ लागतो. अधिक कष्टाचा मार्ग निवडल्याने दीर्घकालीन उत्तम फल मिळते तर त्याच वेळी कमी कष्टाचा सुखकर मार्ग स्वीकारल्यास तेच फलित लांबते. गुंतवणूक असो किंवा संपत्तीची निर्मिती करतांना हेच तत्व सगळीकडे लागू होते. तात्विक दृष्ट्या पहायचे झाल्यास प्रेयस हे क्षणिक सुख आहे तर श्रेयस हे अंतिम किंवा शाश्वत सत्य आहे.
तुम्ही म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करत असल्यास, तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये लार्ज, मिड किंवा स्मॉल कॅप फंडांची मात्रा किती निश्चित करता यावर परतावा आणि अस्थिरता यावर बरेच काही अवलंबून असते. अनेक वर्षांच्या अनुभवाने असे सांगता येईल की तुमची जोखीम घेण्याची क्षमता कितीही जास्त असली तरी पोर्टफोलीओ हा लार्जकॅप केंद्रित असावा. वर्ष २०२४ मध्ये लार्ज-कॅप इक्विटी निर्देशांकाने १५.६४ % (‘निफ्टी १०० टीआरआय’) परतावा दिला. तर मिडकॅप निर्देशांकाने ((‘निफ्टी मिडकॅप १५०टीआरआय’) २५.८३ टक्के, तर स्मॉलकॅप निर्देशांकाने (‘निफ्टी स्मॉलकॅप २५० टीआरआय’) ०.०१टक्के परतावा दिला आहे. सरलेल्या वर्षाच्या सुरवातीला असणारा स्मॉलकॅप फंडांचा दबदबा सप्टेंबर २०२४ नंतर ओसरला. अस्थिरता ही बाजाराच्या पाचवीला पुजली आहे. या अस्थिरतेमुळे कंपनीचे मार्केट कॅप वर्गीकरण देखील बदलते. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडिया (अँम्फी) दर सहा महिन्यांनी ‘सेबी’च्यावर्गीकरणानुसार लार्ज-कॅप, मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप कंपन्यांची सुधारित यादी प्रसिद्ध करते. जानेवारी -जून २०२४ च्या यादीनुसार, ५० हजार कोटींपेक्षा अधिक बाजार मूल्य असलेल्या कंपन्या लार्ज-कॅप ४९ हजार कोटी ते १७ हजार कोटींदरम्यान मिडकॅप तर १७हजार कोटीपेक्षा कमी बाजार मूल्य असलेल्या कंपन्या स्मॉल-कॅप गटात मोडतात. मार्केट कॅप हे सूचीबद्ध कंपन्यांचे वर्गीकरण करण्यासाठी एक सोयीस्कर निकष असला तरी, ते व्यवसायाचा आकार, व्यवस्थापनाची गुणवत्ता यांचे मोजमाप नव्हे. तळाच्या लार्ज-कॅप कंपन्यांना आघाडीच्या मिड-कॅप कंपन्या आणि तळाच्या मिडकॅप कंपन्यांना आघाडीच्या स्मॉलकॅप कंपन्या नेहमीच आव्हान देत असतात. , बँकिंग, पोलाद, तेल आणि वायू इत्यादीसारख्या मोठ्या भांडवलाची आवश्यकता असलेल्या कंपन्या लार्जकॅप मध्येच आहेत. तर वाहन पूरक उत्पादने अभियांत्रिकी किंवा रसायने यांसारख्या क्षेत्रातील मोठ्या कंपन्या मिडकॅप आणि स्मॉल-कॅपमध्ये आहेत. स्मॉल-कॅप मध्ये मुख्यत्वे नव्याने विकसित होणारे उद्योग आहेत. मिड आणि स्मॉल-कॅप गटात उत्तम व्यवस्थापन आणि वृद्धीक्षम कंपन्या मिळू शकतात. नवीन सुरु झालेले वर्षाची सर्वाधिक अस्थिर वर्ष अशी नोंद होईल. असे संकेत आहेत. या अस्थिरतेवर मात करण्यासाठी म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी शक्यतो एक रक्कमी गुंतवणूक टाळायला हवी. मोठी रक्कम गुंतवीतांना ‘एसटीपी’चा अवलंब करावा. वर्षभरात १७-१८ मल्टीकॅप आणि फ्लेक्झीकॅप फंड, २-३ लार्जकॅप (फोकस्ड इक्विटी फंड धरून), ४-६ मिडकॅप आणि २-३ स्मॉलकॅप, आणि एखाद दुसरा थीमॅटिक फंड आणि विशेष दखल घेण्याजोगा एनएफओ अशा फंडांचे विश्लेषण वाचकांना देण्याचा प्रयत्न या सदरातून करणार आहे. वाचकांनी गुंतवणुकीसाठी निरक्षीर विवेकानुसार या २२-२३ फंडातून ४-५ फंडांची निवड करावी. वाचकांनी त्यांच्या पसंतीचे फंड जरूर कळवावेत. निकषात बसत असल्यास या फंडांचा नक्कीच विचार केला जाईल.
तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:
Financial decisions can be considered in the context of your goals, time horizon and individual circumstances rather than short-term market movements.