अर्थ वल्लभ

पान गळल्या तरुला नवी पालवी देईल…..

28 Dec 2025 • 1 min read

पान गळल्या तरुला नवी पालवी देईल…..

जगभरात सर्वाधिक वेगाने बदलणारे क्षेत्र असेल तर ते तंत्रज्ञान. त्यातही गेल्या ४-५ वर्षांत (कोरोन पश्चात) भारतीय तंत्रज्ञान बाजारपेठेत लक्षणीय बदल झाले आहेत. गेल्या तीन चार वर्षात ज्या कंपन्यांनी प्राथमिक विक्री केलेल्या कंपन्यांपैकी मोठ्या संख्येने कंपन्या तंत्रज्ञानाशी संबंधित आहेत किंवा त्यांचे प्रारूप तंत्रज्ञानावर आधारित आहे. त्यामुळे म्युच्युअल फंड निधी व्यवस्थापकांना अनेक नवीन पर्याय उपलब्ध झाले आहेत. पूर्वी टेक्नोलॉजी क्षेत्रात गुंतवणुकीचा परीघात मोजक्या मोठ्या आयटी आणि टेलीकॉम कंपन्या होत्या. भारतीय आयटी, विशेषतः आघाडीच्या टेक कंपन्यांना कंपन्यांना, घटलेली मागणी आणि एआय-संबंधित व्यवसायात आलेला व्यत्यय या सारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. या कंपन्यांच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा डॉलरमध्ये असल्याने कमकुवत रुपया ही दिलासा देणारी बाब ठरली आहे. या पार्श्वभूमीवर, तीन वर्षे पूर्ण केलेले तंत्रज्ञान/डिजिटल क्षेत्रात गुंतवणूक करणारे पाच फंड गुंतवणूकदारांना उपलब्ध आहेत. आदित्य बिर्ला सन लाईफ डिजिटल इंडिया, फ्रँकलिन इंडिया टेक्नॉलॉजी, एसबीआय टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज आणि आयसीआयसीआय प्रुडेन्शियल टेक्नॉलॉजी हे फंड २० वर्षांहून अधिक काळापासून अस्तित्वात आहेत (काहींची नांवे आणि गुंतवणुकीचा उद्देश बदलला आहे) परंतु टाटा डिजिटल इंडियाच्या नांवात किंवा गुंतवणूक उद्दिष्टात बदल झालेला नाही. वर्षपूर्ती निमित्ताने १० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या मोतीलाल ओस्वाल डिजिटल इंडिया फंडाच्या विश्लेषणानिमित्ताने या सर्व फंडाच्या कामगिरीचा आढावा घेतला. या पैकी टाटा डिजिटल इंडिया फंडाने काल १० वर्षे पूर्ण केली. २९ डिसेंबर २०१५ ते २६ डिसेंबर २०२५ या कालावधीत फंडाने वार्षिक २०.५५ टक्के दराने परतावा दिला आहे. फंडाचा पोर्टफोलीओ आणि कमगिरी.
फंडाचा पोर्टफोलीओ ३९ कंपन्यांचा बनलेला आहे. हा फंड लार्जकॅप केंद्रित असल्याने अन्य फंडांच्या तुलनेत कमी अस्थिर फंड आहे. फंडाच्या गुंतवणुकीत लार्जकॅप कंपन्यांचे प्रमाण ७० (अधिक उणे ५ टक्के) आसपास असते. नव्याने सूचीबद्ध झालेल्या कंपन्या मुखत्वे स्मॉलकॅप असल्याने आणि अशा कंपन्यांचा समावेश गुंतवणुकीत असल्याने मिडकॅप पेक्षा स्मॉलकॅपची मात्रा अधिक आहे. फंडाच्या गुंतवणुकीत इन्फोसिस, टीसीएस, टेक महिंद्रा, विप्रो, एचसीएल टेक्नॉलोजीज, या आघाडीच्या गुंतवणुका आहेत. निफ्टी आयटी टीआरआय हा फंडाचा मानदंड आहे या निर्देशांकात इंफोसीस आणि टीसीएस एकत्रीत प्रभाव ५० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने या कंपन्यांना वगळून चालणार नाही. या कंपन्यांबाबत ज्यावेळी निधी व्यवस्थापक आशावादी नसतात त्यावेळी या कंपन्यांचे प्रमाण निर्देशांकाच्या निम्मे म्हणजे २५ टक्क्यांच्या जवळपास असते. वर उल्लेख केलेल्या लार्जकॅप कंपन्यांच्या समभागांचे भाव मागील चार वर्षात अजिबात वाढलेले नाहीत. तरीसुद्धा निर्देशाकात यांचा प्रभाव असल्याने त्यांना पोर्टफोलीओतून वगळता येत नाही. आता आपल्याकडे मिड/स्मॉल कॅप गटात क्विक कॉमर्स कंपन्या (स्वीगी, इटर्नल), डिजिटलमंच (इंडियामार्ट), फिनटेक (पेटीएम, ग्रो, पीबी फिनटेक), अॅफग्रीगेटर्स (इंफोइज) आणि अन्य तत्सम कंपन्यांचे पर्याय फंड व्यवस्थापकांना उपलब्ध आहेत. टेक्नॉलोजी फंड बर्यांचवेळा वेगवेगळ्या उद्योगात गुंतवणूक करतात हे लक्षात घेता, या फंडांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी दोन मानदंड निश्चित केले. निफ्टी आयटी टीआरआय व्यतिरिक्त, कामगिरीची तुलना करण्यासाठी आणि तंत्रज्ञान योजनांची सुसंगतता मोजण्यासाठी व्यापक बाजारपेठ निफ्टी ५०० टीआरआयचा देखील विचार केला. आदित्य बिर्ला सन लाईफ डिजिटल इंडिया, फ्रँकलिन इंडिया टेक्नॉलॉजी, एसबीआय टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज आणि आयसीआयसीआय प्रुडेन्शियल टेक्नॉलॉजीच्या रेग्युलर प्लान फंडांच्या कामगिरीचा १ जानेवारी २०१३ ते ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंतच्या ५ वर्षांच्या रोलिंग रिटर्नचा विचार केला. टाटा डिजिटल इंडिया फंडाचे १ जानेवारी २०१६ ते ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंतच्या ५ वर्षांचे रोलिंग रिटर्न टेक्नॉलोजी फंड गटात सर्वोत्तम असल्याचे दिसून आले. हे विश्लेषण मिता शेट्टी या नि:संशय एक अव्वल निधी व्यवस्थापक असल्याचे शिक्कामोर्तब करणारे आहे.
आदित्य बिर्ला सन लाईफ डिजिटल इंडिया फंडने सर्व वेळ निफ्टी आयटी टीआरआय आणि ९५ टक्के वेळेत निफ्टी ५०० टीआरआयपेक्षा चांगली कामगिरी केली. फ्रँकलिन इंडिया टेक्नॉलॉजी फंड ५३ टक्के वेळेत निफ्टी आयटी टीआरआयपेक्षा पुढे होता आणि ८४ टक्के वेळेत निफ्टी ५०० टीआरआयपेक्षा चांगली कामगिरी केली. जानेवारी २०१३ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत आयसीआयसीआय प्रुडेन्शियल टेक्नॉलॉजीने ९५ टक्के वेळेत निफ्टी आयटी टीआरआयपेक्षा जास्त परतावा दिला आणि ९२ टक्के वेळेत निफ्टी ५०० टीआरआयपेक्षा जास्त परतावा दिला. एसबीआय टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज फंडने ७८ टक्के वेळेत निफ्टी आयटी टीआरआयपेक्षा आणि ८९ टक्के वेळेत निफ्टी ५०० टीआरआयपेक्षा चांगली कामगिरी केली. जानेवारी २०१६ ते नोव्हेंबर २०२५ या काळात ५ वर्षांच्या रोलिंग रिटर्न आधारावर टाटा डिजिटल इंडिया फंडाने निफ्टी आयटी टीआरआयला १०० टक्केवेळा आणि निफ्टी ५०० टीआरआयला ९७ टक्के वेळा मागे टाकले आहे. हे विश्लेषण मिता शेट्टी या नि:संशय एक अव्वल निधी व्यवस्थापक असल्याचे शिक्कामोर्तब करणारे आहे. २९ डिसेंबर २०१५ ते २६ डिसेंबर २०२५ या कालावधीत टाटा डिजिटल इंडियाने मासिक एसआयपीवर २०.७ टक्के परतावा दिला आहे.
गेल्या काही वर्षांत, एआय आणि ग्राहकांच्या माहिती तंत्रज्ञान खर्चात कमालीची कपात झाली आहे साहजिकच इन्फोसिस, टीसीएस, एचसीएल टेक्नॉलॉजीज, विप्रो आणि टेक महिंद्रा यासारख्या आघाडीच्या आयटी कंपन्यांना पूर्वीसारखा नफा कमविणे काम सोपे राहिलेले नाही. कारण अनेक कंपन्यांनी विक्रीत गेल्या अनेक वर्षातील निच्चांकी वाढ नोंदवली आहे. अलिकडच्या वर्षांत मिड-कॅप आयटी/केपीओ आघाडीवर कामगिरी ठिकठाक राहिली आहे. फंडाच्या गुंतवणुकीतील नेटवेब टेक्नोलॉजीज, कोफोर्ज, ईक्लर्क्स सर्व्हिसेस, मास्टेक, एलअँण्डटी टेक्नोलॉजीज, फिजिक्सवाला, यात्रा ऑन लाईन, सोनाटा सॉफ्टवेअर यासारख्या कंपन्यांनी चांगली वाढ नोंदवली आहे आणि बाजारात या कंपन्यांचे समभाग झपाट्याने वाढले आहेत. यापैकी काही कंपन्यांच्या मात्रेत निधी व्यवस्थापकांनी वाढ केली आहे. भारती एअरटेल/टाटा कम्युनिकेशनस या टेलीकॉम क्षेत्रातील गुंतवणुका (टेक्नॉलोजी क्षेत्रा बाहेरील) गुंतवणुका आहेत. डेटा सेंटर ऑपरेशन्समध्ये काही कंपन्यांतून निधी व्यवस्थापकांनी गुंतवणूक केली आहे. स्विगी आणि इटरनल सारख्या ई-कॉमर्स/क्विक कॉमर्स कंपन्यांची मात्रा निकालांनुसार कमी अधिक होत असते.
भारतीय आयटी क्षेत्राचे मूल्यांकन सध्या दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी आहे आणि त्यात सुधारणा होण्याची शक्यता दिसत आहे. बहुतेक गुंतवणूकदारांसाठी आयटी किंवा टेक्नॉलोजी फंडात नव्याने गुंतवणूक करण्याची ही एक संधी आहे. सेक्टर फंडमध्ये गुंतवणूक करण्याची आणि बाहेर पडण्याची वेळ साधावी लागते. जर कोणत्याही गुंतवणूकदाराला टेक फंड आकर्षित वाटत असतील तर त्यांनी एसआयपी मार्गाने गुंतवणूक करणे हिताचे असेल. फंडाचा आढावा घेत असतांना ‘साद कोकीळ घालतो, कधी वसंत येईल पान गळल्या तरुला नवी पालवी देईल…..

तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:

Keep in Perspective

Financial decisions can be considered in the context of your goals, time horizon and individual circumstances rather than short-term market movements.

Have a Financial Question?

Get greater clarity around your financial goals and investment decisions.

Start a Conversation →
Important Information

This article is intended for general informational and educational purposes only. It should not be treated as a guarantee of returns or a recommendation to invest in any particular mutual fund scheme or financial product. Mutual fund and other market-linked investments are subject to market risks. Investment suitability depends on individual goals, circumstances, time horizon and risk considerations. Please read relevant scheme-related documents carefully before investing.

Scroll to Top