गंपू पणजोबांची शिकवणी

 

कालच्या रविवारी गंपूची शताब्दी साजरी झाली. आईची वात्सल्य भावना तृप्त करण्यासाठी जन्माला आलेल्या गंपूला या भूतलावर येऊन १०० वर्षे झाली. शुद्ध आगाऊपणाच्या आधारावर त्याचा बुटका शोशिक देह वयानुसार जरी वाकला असला तरी त्याच्या मनाचा ताठा तसाच आहे. पुण्यातील अप्पा बळवंत चौकातला पोटभरेंच्या वाड्यात ‘परोपकारी गंपू’ याच लहानाचा मोठा झाला. गंपूची आपल्या पुढल्या पिढीतील सदस्यांसह या वाड्याच्या ठिकाणी उभ्या राहिलेल्या इमारतीत नांदत आहे. पूर्वी बाजीराव रस्त्यवरून टिळक रस्त्यवर सायकलपारून जाणारऱ्या गंपू पणजोबांना त्यांचा पणतू पार्थ किंवा त्याची पत्नी श्वेता मोटारीतून चक्कर मारून आणते. गंपूने आग्रह केला म्हणून पार्थ आणि श्वेता एकदा टिळक स्मारक मंदिरात झालेल्या लोकसत्ता अर्थसल्ला कार्यक्रमाला उपस्थित राहिले. या कार्यक्रमा नंतर एसआयपी म्हणजे काय असते हे अनुभवावे म्हणून श्वेताने आपल्या शिल्लक रक्कमेच्या गुंतवणुकीसाठी एसआयपी मार्ग निवडला आहे. मागील दोन वर्षांपासून एसआयपीकरून देखील १ लाख २० हजाराच्या मुद्दलावर केवळ ५०० रुपयांची वाढ ही लावण्याचा चिंतेचा विषय बनल्याने श्वेताने आपली चिंता पणजोबांना बोलून दाखविली.

“माझ्या गुंतवणुकीवर मिळालेला नफा १ टक्का सुद्धा नाही. हीच रक्कम बचत खात्यात ठेवली असती तर किमान ४ टक्के तरी व्याज मिळाले असते.”

“आपल्या सर्व प्रश्नांचे एसआयपी हे उत्तर आहे असे वाटणाऱ्या पिढीची तु प्रतिनिधी आहेस. नामो सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर झाला तेव्हा जून २०१४ मध्ये म्युच्युअल फंडात एसआयपीच्या माध्यमातून होणारी गुंतवणूक १२०० कोटीची होती. दुसऱ्या इनिंगसाठी नमो आणि इतर असा सामना सुरु होण्याआधी फेब्रुवारी २०१९ मध्ये म्युच्युअल फंडात एसआयपीच्या माध्यमातून होणारी गुंतवणूकीने ८०९४ कोटींचा टप्पा गाठला आहे. मोदी लाट वैगरे होती आणि ती या निवडणुकीत सुद्धा आहे विरोधकांना ती दिसत नाही, असे कोणी भक्त ५६ इंचाच्या छातीची आण घेऊन सांगो बापडे पण नामोंच्या राज्याभिषेका नंतर सुरु झालेली एसआयपीची लाट मात्र आहे.” गंपू पणजोबांनी श्वेताच्या शंकेचे निरसन केले.

“मतदान वाढावे म्हणून निवडणूक आयोग वेगवेगळे उपक्रम हाती घेतात, पण या उपक्रमाला प्रतिसाद मिळतोच असे नाही. पण ‘अँम्फी’ने म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापना खालील मालमत्तेत वाढ व्हावी म्हणून सुरु केलेल्या ‘म्युच्युअल फंड सही है’ या अर्थ साक्षरता उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद लाभला. म्युच्युअल फंड फ़ोलिओत आणि म्युच्युअल फंड गुंतवणुकीत वाढ दिसून आली. दृक्श्राव्य, छापील आणि श्राव्य माध्यमातून एकाच वेळी चालविलेला हा उपक्रम अपेक्षेपेक्षा कितीतरीपट अधिक यशस्वी झाला.

पण पणजोबा मी मागील दोन वर्षे मी मिडकॅप फंडात एसआयपी करीत आहे पण माझ्या गुंतवणुकीवर २ टक्के परतावा मिळाला आहे. माझे नेमके काय चुकले”?

“देअर यु आर श्वेता, आपण गुंतवणूक करतो ती त्या गुंतवणुकीवर चांगला नफा होण्यासाठी. बचत खात्यात शिल्लक असलेल्या रक्कमेवर मिळणाऱ्या व्याजदरा इतका नफा होत नसेल तर म्युच्युअल फंडात गुंतवणूक का करावी असा तुला पडलेला प्रश्न योग्यच म्हणायला हवा”.

“सध्याच्या निवडणूकपूर्व अस्थिर बाजारपेठेत, जेव्हा अनेक फंडातील एक वर्षापूर्वीच्या गुंतवणुकीवर तोटा होत असल्याची प्रत्येकजण तक्रार करीत आहे. विशेषतः ज्यांना गेल्या दोन वर्षांमध्ये एसआयपी करून देखील माझ्या गुंतवणूकीवर चांगला परतावा का मिळत नाही असा प्रश्न पडला आहे”.

“बाजारात ‘पी हळद अन हो गोरी’ असे नसते. आगामी निवडणुकीनंतर जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्रावर कोण स्वबळावर सत्तेत येतो की नामोंना दूर ठेवण्याइतपत विरोधकांना निवडणूक पश्चात आघाडी करावी इतके तरी खासदार निवडून आणता येतात का हा जगभरातील देशांमध्येही उत्सुकतेचा विषय आहे. निवडणुकीच्या कालावधीत शेअर बाजारात नेहमीच मोठ्या चढउतारांना समोर जातो. आगामी निवडणूकही त्यास अपवाद नाही. त्यामुळे निवडणूक जवळ येईल तशी येत्या दिवसांत भारतीय शेअर बाजारांमधील अस्थिरता नक्कीच वाढेल. या कालावधीत नेमकी कोठे व किती गुंतवणूक करावी की आधीची गुंतवणूक काढून घ्यावे असा प्रश्न तुझ्या सारख्या नवख्या गुंतवणूकदारांना पडणे स्वाभाविक आहे.”

” बाजाराची निवडणूक पश्चात कामगिरी आणि निवडणुका यांचा पाहिला तर केंद्रात सत्तांतर झाल्यानंतर नव्या सरकारने आधीच्या सरकारच्या आर्थिक सुधारणा थांबविल्या किंवा आधीच्या सरकारच्या धोरणांच्या विरुद्ध धोरणे आखली असे दिसत नाही.” प्रधान सेवक मोदी देखील याला अपवाद नाहीत. गुजराथचे मुख्यमंत्री असतांना वस्तू आणि सेवा कर विधेयकाला विरोध करणऱ्या मोदींनी वस्तू आणि सेवा कर विधेयकाचे कायद्यात रुपांतर केले. खड्डे खोदण्यासाठी पैसे देणारी योजना असल्याची ‘मानारेगा’वर टीका करणाऱ्या मोदींनी आज पर्यतच्या कुठल्याही सरकारने केली नसेल इतकी तरतूद ‘मानारेगा’ साठी केली. कुठलेही सरकार आले तरी आर्थिक दिशा व धोरणे यांत फार फरक पडत नाही. जागतिक स्तरावर व्यापार धोरणाच्या आघाडीवर सध्या काही बदल घडत आहेत. या बदलांचा विचार केला तर, केंद्रात येणाऱ्या नव्या सरकारकडून काही लोकानुनयी निर्णय घेतले जातील व त्यामुळे समष्टी अर्थव्यवस्थेवर आणि पर्यायाने भांडवलीबाजारावरील दबाव वाढू शकेल असे अनेकांना वाटणे साहजिक आहे. या स्थितीत संभाव्य चढउतार व अस्थिरतेचा विचार करता विविध उद्योग व्यवसायातील समभाग निवड ही फंडांच्या चांगल्या कामगिरीसाठी कळीची ठरणार आहे. बाजाराची बदलती स्थिती गृहीत धरून योग्य मालमत्ता विभाजन केल्यास निर्देशांकाच्या अस्थिरतेवर मात करता येईल. शेअर बाजारातील गुंतवणूक ही प्रामुख्याने लोभ व भय या दोन घटकांच्या आधारे चालते. मात्र निवडणुकीच्या काळातील बाजारासंबंधी संभाव्य अस्थिरतेचा विचार करता तू लोभ वा भय अशा दोन्ही विचारांना दूर सारून गुंतवणूक तशीच ठेवणे गरजेचे आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही दीर्घकालीन असावी, शिवाय तिला आर्थिक उद्दिष्टाचाही आधार असणे आवश्यक आहे. तेव्हा तुझ्या गुंतवणुकीतील मिडकॅप गुंतवणूक सध्या चांगला परतावा देत नसली तरी तुला त्या बद्दल चिंता वाटण्याचे कारण नाही.

“फेब्रुवारी महिन्यांत मांडलेल्या अंतरिम अर्थसंकल्पानंतर अनेक मिड कॅप निर्देशांकात जवळपास १० टक्क्य़ांनी वाढ झाली आहे. या निर्देशांकांनी मागील दहा वर्षात सरासरी वार्षिक १४.४० टक्के दराने नफा कमावला आहे. हा मानदंड असलेल्या मिडकॅप फंडांनी त्यापेक्षा अधिक नफ्याचे माप गुंतवणूकदारांच्या पदरात टाकले आहे. त्यामुळे या फंडांची अल्पकाळातील कामगिरी अस्थिर असली, तरी या क्षेत्राची दीर्घावधीतील कामगिरी दमदारच राहिली आहे.”

“कालच एका निधी व्यवस्थापकाची मुलाखत मी ऐकत होतो, त्याच्या म्हणण्यानुसार लोक नेहमीच चुकीच्या वेळी गुंतवणुकीतून बाहेर पडतात. जेव्हा एसआयपी वरील परतावा नकारात्मक असतो, तेव्हा लोकांना बाजारातील गुंतवणूक काढावीशी वाटते. आणि एसआयपी वरील परतावा जास्त असतो तेव्हा लोकांना बाजारातील गुंतवणूक वाढवावी असे वाटते. हाच भावनिक मुद्दा गुंतवणूकदारांना त्यांचे एसआयपी थांबविण्यासाठी किंवा रद्द करण्यास उद्युक्त करते. आणि माझ्या सारखे गुंतवणूकदार आर्थिक आवर्तनातून परिपक्व झाले तरी गुंतवणूकदारांची एक पिढी नेहमीच नव्याने डाव खेळण्यास तयार असते गेल्या काही वर्षांमध्ये एसआयपीचे सरासरीने मूल्य आणि सरासरी कालावधीत वाढ झाली आहे. गुंतवणूकदारांसाठी एसआयपीनेच संपत्ती निर्माण झाली आहे. हे विसरू नकोस. आम्हाला हे खूप उशिरा कळले. ‘अँम्फी’च्या आर्थिक साक्षरता समितीच्या कल्पनेतून “म्युच्युअल फंड सही है’ हा उपक्रम राबवला जातो. या समितीत संदीप वाळंजू, कैलाश कुलकर्णी, आशुतोष बिष्णोई, यांच्यासारखे परिचित असल्याने त्यांच्याशी गप्पा मारतांना मला बऱ्याच गोष्टी कळतात. तुला कमावत्या वयात एसआयपीचे महत्व “म्युच्युअल फंड सही है’ च्या माध्यमातून शिकविणाऱ्या या समितीचे तू आभार मानायला हवेत.

म्युच्युअल फंड विषयी अधिक माहितीसाठी खालील Form भरा:

[contact-form-7 id=”22″ title=”Contact Me”]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top