‘सीआरआर’ कपातीचा लाभार्थी
बँकिंग हे असे उद्योगक्षेत्र आहे जे अर्थचक्राशी जवळून जोडले आहे. बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्राचा मागोवा घेणाऱ्या फंडांच्या परताव्याचे चलत सरासरीच्या (रोलिंग रिटर्न्स) आधारावर विश्लेषण केले असता, या फंडाच्या मागील दहा वर्षातील परताव्याचे चित्र फारसे उत्साहवर्धक नाही. कारण ही दहा वर्षे बंकिंग क्षेत्रासाठी संघर्षाची वर्षे होती. अनुत्पादित कर्जे व्याजातील फरक (नेट इंटरेस्ट मर्जीन) या समस्यांशी बँकिंग क्षेत्र झगडत होते. आता परिस्थिती बदलली आहे. मागील वर्षभाराचा विचार केला तर ३१ पैकी ८ फंडांनी ‘निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस टीआरआय’ पेक्षा अधिक परतावा मिळविला आहे. बँकिंग बँकिंग अँण्ड फायनांशिअल सर्व्हिसेस फंडात गुंतवणूक करणे सोपे परंतु नफा काढून घेणे कठीण असते. पुढील दोन वर्षात नफा झालेला नफा ज्यांना योग्य वेळी काढून घेणे जमेल त्यांनी या फंडात एकरक्कमी गुंतवणूक करावी.
भारतात वित्तीय सेवा क्षेत्राचा वेगाने विस्तार होत आहे. विद्यमान वित्तीय सेवा कंपन्या नवनवीन क्षेत्रात पदार्पण करीत आहेत. भारतातील बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्र त्यांच्या जागतिक व्यवसायांच्या तुलनेत स्पर्धात्मक आहेत. कोविड वर्षांनंतर जेव्हा अर्थव्यवस्थेने पुन्हा उभारी घेतली तेव्हा बँकिंग वित्तीय सेवा आणि विमा (बीएफएसआय) क्षेत्र वेगाने पुनरुत्थान केलेले उद्योग क्षेत्र होते. गुंतवणूकदार सामान्यत: वित्तीय सेवा क्षेत्र बँकिंग आणि ‘नॉन-बँकिंग’ वित्तीय कंपन्यांपूरते सीमित राखतात तथापि, वित्तीय सेवा क्षेत्र व्यापक आहे. त्यात सावकारी (लेंडिंग बिझनेसेस) सोबत बिगर सावकारी व्यवसायांचा समावेश आहे. जसे की मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या (एचडीएफसी म्युच्युअल फंड, निप्पॉन म्युच्युअल फंड) , बाजार मंच (बीएससी, एमसीएक्स) , दलाली पेढ्या (एंजल वन, जीओजीत), जीवन विमा (एलआयसी, एसबीआय लाईफ), क्रेडीट रेटिंग्ज कंपन्या (क्रिसिल, केअर) सर्वसाधारण विमा आणि पुनर्विमा कंपन्या (एचडीएफसी अर्गो आयसीआयसीआय लोम्बार्ड जीआयसी आरइ) , फिनटेक कंपन्या (पॉलिसी बझार, कॅम्स, पेटीएम) इत्यादींचा समावेश आहे. भारतात मोठी बँकिंग व्यवस्था आहे. भारतीय बँकिंग प्रणालीमध्ये कर्ज वाटप करणाऱ्या १२ सार्वजनिक क्षेत्रातील बँका, २१ खाजगी क्षेत्रातील बँका, ४४ परदेशी बँका यांच्या सोबत प्रादेशिक ग्रामीण बँका, सहकारी बँका, लघु वित्त बँका आणि पेमेंट बँका यांचा समावेश आहे. बँकांव्यतिरिक्त, ९,३०६ एनबीएफसी आणि २७ मालमत्ता पुनर्बांधणी कंपन्या (एआरसी) आरबीआयकडे नोंदणीकृत आहेत. भारतातील विमा उद्योगात २७ जीवन विमा, ७ आरोग्य विमा आणि २७ सामान्य विमा कंपन्या आहेत. एलआयसी जगातील संख्येने सर्वाधिक पॉलिसी विकणारी कंपनी आहे या व्यतिरिक्त क्रेडीट ब्युरो, अकौंट एग्रीकेटर्स, असे तुलनेने लहान व्यवसाय (स्मॉलकॅप) सुद्धा गुंतवणुक पर्याय उपलब्ध आहेत.भारतातील वित्तीय क्षेत्र हे प्रामुख्याने बँकिंग क्षेत्र असले तरी करोना पश्चात अनेक वित्तीय सेवा क्षेत्रे नव्याने उदयाला आली आहेत. बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील गुंतवणूक संधींचा लाभ घेण्यासाठी महिंद्रा मनूलाईफ बँकिंग अँण्ड फायनांशिअल सर्व्हिसेस फंड उपलब्ध करून दिला असून फंडाचा ’एनएफओ’ २७ जून रोजी सुरु झाला असून ११ जुलै रोजी बंद होईल.
कोणत्याही देशाच्या आर्थिक वाढ आणि विकासात वित्तीय सेवा महत्त्वाची भूमिका बजावतात. उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या दीर्घकालीन विकासासाठी वित्तीय समावेशनावर लक्ष केंद्रित करून कार्यक्षम वित्तीय प्रणाली आवश्यक असते. आर्थिक वृद्धी, रोजगार वाढवणे, समाजातील कमकुवत घटकांचे आर्थिक सक्षमीकरण करणे आणि गरिबी निर्मूलन यासाठी वित्तीय समावेशन महत्त्वाचे आहे. जनधन योजना ही समाजातील बँकिंग कक्षेबाहेरच्या कमकुवत घटकांचे आर्थिक सक्षमीकरणासाठी आखली गेली. जनधन योजनेने जवळजवळ ५५ कोटी भारतीयांचा बँकिंग प्रणालीत समावेश केला गेला. शाखारहित बँकिंग सेवा प्रदान करणारे १३.५५ लाख बँक मित्र कार्यरत आहेत. . भारताने पेमेंटमध्ये, विशेषतः युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (युपीआय) द्वारे मोबाईल पेमेंटमध्ये मोठी प्रगती केली आहे, ‘युपीआय’ हा जगातील सर्वात मोठा प्रदाता मंच (पेमेंट प्लॅटफॉर्म) असून मे २०२५ मध्ये या मंचाद्वारे २५ लाख कोटी व्यवहार झाले. अनुत्पादक मालमत्तेतील वाढ त्यामुळे कराव्या लागणाऱ्या तरतुदींमुळे बँकांची नफा क्षमता कमी झाली होती. करोना पश्चात ही परिथिती वेगाने पालटली. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी विक्रमी नफा कमावला. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा एकूण व्यवसाय आर्थिक वर्ष २४मधील २०३ लाख कोटींवरून २५१ लाख कोटींवर पोहोचला आहे. याच कालावधीत (आर्थिक वर्ष २०२२-२३ ते आर्थिक वर्ष २०२४-२५), सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे निव्वळ एनपीए १.२४% वरून ०.५२% पर्यंत घटले, निव्वळ नफा १.०४ लाख कोटींवरून विक्रमी १.७८ लाख कोटी झाला आणि बँकांनी या नफ्याचे लाभांशाच्या रुपात ३४,९९० कोटी विक्रमी वाटप केले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे पुरेसे भांडवलीकरण झाले असून मार्च २०२५ मध्ये ‘सीआरएआर’ १६.१५% आहे. अनुत्पादित कर्ज समस्येशी जवळ जवळ, एक दशक झुंजल्यानंतर सरलेले वर्ष, बँकांसाठी विशेषतः सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी सर्वात सर्वोत्तम वर्षांपैकी एक होते. कर्ज आणि ठेवींतील वाढ समाधानकारक होती. बँकिंग क्षेत्राच्या व्याज उत्पन्नात २१ टक्क्यांची वाढ नोंदली. अनुत्पादित कर्ज कमी झाले. बँकांच्या मालमत्तेवरील परतावा (रिटर्न ऑन असेटस) वाढला आहे.
रिझर्व्ह बँकेने जून मधील पतधोरण आढावा बैठकीत अर्ध्या टक्क्यांची रेपोदर कपात आणि रोख राखीव प्रमाणात (सीआरआर) सप्टेंबरपासून प्रत्येकी पाव टाक्यांची चार टप्प्यात कपात केली. ‘सीआरआर’ ४ टक्यांवरुन ३ टक्के केल्याने अडीच लाख कोटी बँकांना कर्ज वाटपासाठी उपलब्ध होतील. बँकांसाठी, अधिक मुक्तपणे कर्ज वाटप करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने हा संकेत दिला आहे. यामुळे उद्योगांना खेळते भांडवल, घरे, वाहन खरेदी करण्यासाठी शैक्षणिक, कर्जवाटपासाठी बँकांना अधिक निधी उपलब्ध होईल. सर्व क्षेत्रांना स्वस्त कर्जे मिळतील, आणि अधिक निधी उपलब्ध झाल्याने बँकांची नफा क्षमता वाढेल.
गुंतवणूक करण्यापूर्वी एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. विशेषतः बँकिंग हा एक असा विभाग आहे जो अर्थचक्राशी जवळून जोडलेला आहे. उपलब्ध ‘बीएफएसआय’ फंडांची कामगिरी ही आर्थिक आवर्त्नाशी निगडीत असल्याचे दिसते. या क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी वेळ साधण्याला महत्व आहे. आजच्या घडीला बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्राचा मागोवा घेणारे २४ फंड आहेत. यापैकी ११ फंड पाच वर्षांहून अधिक काळापासून अस्तित्वात आहेत. दहा फंड १० वर्षांहून अधिक काळ उपलब्ध आहेत. या फंडाच्या परताव्याचे सखोल विश्लेषण केले असता, या फंडाच्या चलत सरासरीच्या (रोलिंग रिटर्न्स) आधारावर चित्र फारसे उत्साहवर्धक नाही. जानेवारी २०१४-डिसेंबर २०२४ या कालावधीतील पाच वर्षांच्या रोलिंग रिटर्न्सवरून असे दिसून येते की कोणताही फंड ‘निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस टीआरआय’ पेक्षा अधिक परतावा मिळवू शकला नाही. याचे कारण ही दहा वर्षे बंकिंग क्षेत्रासाठी संघर्षाची वर्षे होती. अनुत्पादित कर्जे व्याजातील फरक (नेट इंटरेस्ट मर्जीन) या समस्यांशी बँकिंग क्षेत्र झगडत होते. आता परिस्थिती बदलली आहे. मागील वर्षभाराचा विचार केला तर ३१ पैकी ८ फंडांनी ‘निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस टीआरआय’ पेक्षा अधिक परतावा मिळविला आहे. बँकिंग बँकिंग अँण्ड फायनांशिअल सर्व्हिसेस फंडात गुंतवणूक करणे सोपे परंतु नफा काढून घेणे कठीण असते. पुढील दोन वर्षात नफा झालेला नफा ज्यांना योग्य वेळी काढून घेणे जमेल त्यांनी या फंडात एकरक्कमी गुंतवणूक करावी, आणि योग्य वेळी नफा काढून घ्यावा.
तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:
Financial decisions can be considered in the context of your goals, time horizon and individual circumstances rather than short-term market movements.