आयसीआयसीआय पृडेंशिअल ब्लूचीप फंड
गेल्या सहा महिन्यांत शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे आणि बाजाराचे निर्देशांक २६ सप्टेंबर २०२४ रोजी शिखराला स्पर्श करून माघारी फिरले. लार्जकॅप निर्देशांकात (बीएसइ १०० निफ्टी वैगरे) १४ टक्यांहून अधिक घसरण झाली आहे. मिडकॅप स्मॉलकॅप आणि काही क्षेत्रीय निर्देशांक त्याहून अधिक घसरले आहेत. बाजारातील ही घसरण जेव्हा कधी कधी थांबेल आणि आणि निर्देशांकात सुधारणा होईल तेव्हा सर्वात आधी लार्जकॅपमध्ये पुन:प्राप्होईल. बाजारातील घसरणीमुळे लार्जकॅपचे मुल्यांकन आकर्षक आणि दीर्घकालीन गुंतवणुकीच्या पातळीवर आले आहे. आयसीआयसीआय पृडेंशिअल ब्लूचीप हा लार्ज कॅप फंड असून लार्जकॅप फंड गटात सर्वाधिक मालमत्ता असलेला फंड आहे. २८ फेब्रुवारी २०२५ रोजी फंडाची मालमत्ता ६०,१७७ कोटी होती. लार्जकॅप फंड गटात ५० हजार कोटींपेक्षा अधिक मालमत्ता असलेला हा एकमेव फंड आहे. या फंडाने मानदंड ‘निफ्टी १०० टीआरआय’ सापेक्ष गेल्या काही वर्षांत सातत्याने चांगली कामगिरी केली असल्याने या फंडाची शिफारस केली आहे. मध्यम जोखिम असलेल्या गुंतवणूकदारांसाठी, लार्ज-कॅप फंड हे दीर्घकालीन दृष्टिकोनातून गुंतवणुकीचे आदर्श साधन असल्याने, उच्च जोखीम न घेता आणि तुलनेने कमी अस्थिर पोर्टफोलिओची निवड करतांना लार्ज-कॅप फंड हे गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओचा मुख्य भाग (कोअर पोर्टफोलिओ) असण्याचे दीर्घकालीन संपत्ती निर्मिती होऊ शकेल. या संदर्भात, आयसीआयसीआय पृडेंशिअल ब्लूचीप हा एक फंड आहे ज्याचा गुंतवणूकदार किमान ५-७ वर्षांच्या दीर्घकालीन दृष्टीकोनातून विचार करू शकतात. मे महिन्यांत हा फंड १७ वर्षे पूर्ण करून १८ व्या वर्षात प्रवेश करेल. या फंडाला दीर्घ कालावधीचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. फंडाने सुरवातीपासून १४.५१ टक्के वार्षिक दराने परतावा दिला आहे.
मजबूत कामगिरी
सर्वसाधारणपणे असे दिसून येते की फार कमी लार्जकॅप फंड त्यांच्या मानदंड सापेक्ष सरस कामगिरी करतात. लार्जकॅप फंडांचे निफ्टी १०० टीआरआय किंवा बीएसइ १०० टीआरआय हे मानदंड आहेत. वेगवेगळ्या कालावधीत उपलब्ध फंड आणि मानदंडापेक्षा अधिक एसआयपी परतावा मिळविणारे फंड यांची तौलनिक आकडेवारी सोबतच्या कोष्टकात दिली आहे.
लार्जकॅप फंड गटाची निफ्टी १०० टीआरआय सापेक्ष कामगिरी
३ वर्षे | ५ वर्षे | १० वर्षे | १५ वर्षे | २० वर्षे | |
मानदंड परतावा | ९.७८ | १३.१६ | १३.२८ | १२.९४ | १२.४८ |
फंड गट सरासरी | १०.७८ | १३.१० | १२.४२ | १२.४९ | ११.८६ |
उपलब्ध फंड | २८ | २५ | २३ | २१ | १२ |
मानदंडापेक्षा चांगली कामगिरी केलेल्या फंडांची संख्या | १४ | १३ | ७ | १० | ९ |
अस्थिर बाजारात मानदंड सापेक्ष चांगली कामगिरी करणाऱ्या फंडांची संख्या कमी आहे. विशेषत: एप्रिल २०१९ नंतर बाजार नियामक सेबीने फंडांचे सुसूत्रीकारण आणि गुंतवणूक नियमनाची अंमलबजावणी केल्यानंतर. मानदंड सापेक्ष चांगली कामगिरी करणाऱ्या फंडांनां कडवा संघर्ष करावा लागत असल्याचे दिसते. तथापि आयसीआयसीआय पृडेंशिअल ब्लूचीप फंडाला गेल्या दशकभरात निफ्टी १०० टीआरआय सापेक्षा सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. फंडाची पॉइंट टू पॉइंट आधारावर कामगिरी खालील कोष्टकात दाखविली आहे.
कालावधी (वर्षे) | फंड (वार्षिक टक्केवारी ) | मानदंड (वार्षिक टक्केवारी) |
१ | ४.२१ | ३.१२ |
३ | १५.७६ | १३.९१ |
५ | २१.७० | १८.८९ |
१० | १२.४६ | ९.०९ |
१५ | १३.८६ | ११.९१ |
या फंडाची विविध कलावधीतील कामगिरी मानदंड सापेक्ष २-३ टक्क्यांनी अधिक आहे. फेब्रुवारी २०१४ ते जानेवारी २०१५ या कालावधीतील पाच वर्षांच्या रोलिंग रिटर्न्सचा विचार केला असता, फंडाने १३.६९ टक्के सरासरी परतावा दिला आहे. तुलनेसाठी, निफ्टी १०० टीआरआयने सरासरी ९.०९ टक्के परतावा दिला. तसेच, वर नमूद केलेल्या १० वर्षाच्या कालावधीत, ५ वर्षांच्या रोलिंग आधारावर, फंडाने आपला मानदंड ‘निफ्टी १०० टीआरआय’ला ९६.७२ टक्क्यांपेक्षा जास्त वेळा अधिक परतावा मिळविला आहे. या कालावधीत ३४ टक्के वेळा १५ ते २० टक्क्यांदरम्यान आणि ४.६५ टक्के वेळा २० टक्क्यांहून अधिक परतावा मिळविला आहे. गेल्या १५ वर्षांतील फंडाचा एसआयपी परतावा १४.४३ टक्के आहे. सर्व परताव्याचे आकडे फंडाच्या ‘रेग्युलर ग्रोथ’ ‘एनएव्ही’ शी निगडीत आहेत.
आयसीआयसीआय पृडेंशिअल ब्लूचीप फंड पोर्टफोलिओच्या ८० ते ८५ टक्के मालमत्ता लार्ज-कॅप कंपन्यांतून गुत्वतो. लार्ज-कॅप फंडांच्या मुल्यांकनानुसार ५-१० टक्के गुंतवणूक मिडकॅप कंपन्यांत आहेत. या फंडाच्या पोर्टफोलीओचे वैशिष्ठ्य असे की फंडाच्या गुंतवणुकीत १० ते १२ उद्योग क्षेत्रे असून प्रत्येक उद्योग क्षेत्राचे नैतृत्व करणाऱ्या आघाडीच्या दोन किंवा तीन कंपन्यांना पोर्टफोलिओमध्ये स्थान दिले आहे. या कंपन्या मूल्यांकना नुसार ठरत असतात. फंडाच्या गुंतवणुकीचा मोठा हिस्सा ‘व्हॅल्यू स्टॉक्स’नी व्यापलेला आहे. फंडाच्या पोर्टफोलीओत सर्वाधिक गुंतवणूक बँकांत असून त्या खालोखाल वाहन, माहिती तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर, बांधकाम, आणि पेट्रोलियम उत्पादने हे आहेत.
अलिकडच्या काही महिन्यांत, वाहन आणि वाहन पूरक उत्पादने यांचा हिस्सा वाढविला आहे, तर ग्राहक उत्पादने (एफएमसीजी) आणि सिमेंट उद्योगातील गुंतवणूक कमी केली आहे. बँका वगळता, इतर सर्व क्षेत्रातील गुंतवणूक ९ टक्क्यांपेक्षा कमी आहे. फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये साधारणपणे सुमारे ७० ते ७२ कंपन्यांचा समावेश असतो. आयसीआयसीआय पृडेंशिअल ब्लूचीप फंडाच्या पोर्टफोलिओच्या ७-ते १० टक्के रोख रक्कम आहे. अवाजवी जोखीम न घेता सातत्याने सरासरीपेक्षा जास्त परतावा शोधणाऱ्या संपूर्ण मंडळातील गुंतवणूकदारांसाठी हा फंड आदर्श साधन आहे.
तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:
Financial decisions can be considered in the context of your goals, time horizon and individual circumstances rather than short-term market movements.