व्यवस्थापन शास्त्रात ‘एटी ट्वेंटी रूल’ या नांवाने ओळखला जाणारा एक सिद्धांत प्रसिद्ध आहे. कोणत्याही संचात (सेट ऑफ पॅरॅमिटर्स) ८० टक्के आणि २० टक्के यांच्यात सहसमंध असतो. जसे एखाद्या कंपनीची ८० टक्के विक्री २० टक्के ग्राहकांना होत असते. हाच नियम म्युच्युअल फंड उद्योगाला लागू पडतो. पहिल्या पाच फंड घराण्यांकडे ६५ टक्के तर शिर्ष १० फंड घराण्यांकडे ८५ टक्के मालमत्तेचे ध्रुवीकरण झालेले दिसते. मागील दहा वर्षात सेबीला चार अध्यक्ष लाभले. या चारही अध्यक्षांनी वेगवेगळ्या मंचावरून या ध्रुवीकरणा बद्दल चिंता व्यक्त केली. सेबीने आखलेल्या वेगवेगळ्या धोरणाच्या मागे कुठेतरी या मालमत्तांचे विकेंद्रीकरण व्हावे हा हेतू होता. प्रत्यक्षात फंड मालमत्ता या पाच फंड घराण्यांच्यात अधिकाधिक केंद्रित झाल्याचे दिसून येते. मागील सात आठ वर्षे या फंड घराण्यांच्या वेगवेगळ्या फंड गटातील फंडांची कामगिरी अत्यंत सुमार राहिली असून या फंड घराण्यांचे फंड मानदांडाइतका परतावा देण्यात अयशस्वी ठरलेले दिसतात. उदाहरणादाखल एचडीएफसी टॉप १०० चे उदाहरण घेऊ. मागील दहा वर्षात एचडीएफसी टॉप १०० हा फंड गुंतवणूकदारांसाठी संपत्ती निर्मिती करण्यात अयशस्वी ठरला आसल्याचे आमच्या अभ्यासात दिसते. हा फंड भारतातील म्युच्युअल फंड जगताच्या बदलत्या क्षितिजाचे प्रतिक आहे.
या फंडात लहान गुंतवणूकदारांचा आवडता फंड असल्याने संकल्पनेच्या विस्तारासाठी या फंडाची निवड केली. या फंडाला दीर्घ इतिहास आहे. या फंडाचे वर्णन ‘वाढता आकार आणि घाटलेला परतावा’ असे करावे लागेल. ऐकीव माहितीवर गुंतवणूक करणाऱ्या नवगुंतवणूकदारांच्या वाढत्या सहभागामुळे फंडाची मालमता वाढत असल्याने लार्जकॅप फंड मालमत्तेनुसार फंड सातव्या क्रमांकावर आहे. आमचे हे विश्लेषण वाचकांना योग्य फंड निवडायला मदत करेल अशी अशा आहे.
या संशोधनाचा उद्देश ‘एचडीएफसी टॉप १००’चे फंड विश्लेषण गुंतवणूकदारांच्या मनावर गारुड केलेल्या फंडाला लागू होते. सातत्याने संपत्तीचा ऱ्हास करणाऱ्या या फंडाच्या विश्लेषणाच्या निमित्ताने लार्ज-कॅप फंडांचा मागोवा नव्याने घेणे गरजेचे आहे हे वाचकांच्या मनावर ठसवणे हा या लेखाचा मुख्य उद्देश आहे.
‘सेबी’च्या फंड सुसूत्रीकरणापूर्वी जो फंड ’एचडीएफसी टॉप २००’ म्हणून ओळखला जाणारा हा फंड आक्रमक गुंतवणूक शैलीमुळे, मानदांडापेक्षा अधिक परतावा (अल्फा) निर्माण करण्यासाठी लार्ज-कॅप समभाग परिघाच्या बाहेर गुंतवणूक करीत असे. कुशल निधी व्यवस्थापक प्रशांत जैन यांचे कौशल्य या फंडाच्या पराताव्यातून १९९५ ते २०१० दरम्यान दिसून आले. गुंतवणूकीसाठी मूल्यभाना बाबत कायम जागरूक असणे,जेथे मूल्य परिपक्व झाले त्या कंपनीतून बाहेर पडणे, मूल्यांकनांशी तडजोड न करणे एका उद्योग क्षेत्रातून दुसऱ्या उद्योग क्षेत्रात (सेक्टर रोटेशन) आणि ‘एफएमसीजी’मध्ये निर्देशांकापेक्षा कमी प्रमाण राखणे ’वाय टू के’ अवास्तव मुल्यांकन असलेल्या माहिती तंत्रज्ञांनक्षेत्रासून आणि २००८ मध्ये स्थावर मालमत्ता आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील अवास्तव मुल्यांकन असलेल्या उद्योग क्षेत्रापासून दूर रहाणे या मुळे प्रशांत जैन यांच्या ‘व्हॅल्यु इंवेस्टमेंट’ शैलीचा बोलबाला होता.
कोष्टक क्रमांक -१
*२४ नोव्हेंबरच्या ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’नुसार
सोबतच्या कोष्टकात दर्शविल्यानुसार फंडाच्या सुरवातीपासूनचा वार्षिक परतावा १७.५२ टक्के तर मागील एका वर्षाचा परतावा -०.८५ टक्के आहे. याचा अर्थ असा की जर तुम्ही या फंडात मागील पंधरा वर्षापासून सुरुवातीच्या गुंतवणूकींपैकी एक असाल तर तुम्हाला या फंडाच्या कामगिरीबद्दल तक्रार करण्याचे काही कारण नसेल. परंतु मागील दहा वर्षांपूर्वी तुम्ही या फंडात गुंतवणूक केली असेल तर एक गुंतवणूकदार म्हणून तुम्ही कमालीची अस्थिरता अनुभवली असेल. विशेषत: २०१० नंतर फंडाची कामगिरी कमालीची खालवली आहे. हा फंड २०१५ पर्यंत अव्वल दावेदारांपैकी एक असूनही निर्देशांक आणि फंड परतावा यांच्यातील दरी सातत्याने विस्तारलेली दिसते. मागील पंचवीस वर्षाच्या कालावधीतील दहा वर्षांचा चलत परतावा फंडाचा गौरवशाली भूतकाळ दर्शवत असला तरी मागील दहा वर्षाच्या कालावधीतील तीन वर्षाचा चालत परतावा सातत्याने धोक्याचा इशारा देत आहे.
मागील पाच वर्षात फंडाच्या गुंतवणुकीत मोठे संक्रमण झालेले दिसते. आर्थिक आवर्तनांची वारंवारता वाढल्याने अर्थव्यवस्थेतील बँका सार्वजनिकक्षेत्रातील कंपन्या वाहन किंवा भांडवली वस्तू उद्योगासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांतील तेजी अल्पजीवी ठरतांना दिसत आहे. निर्देशंकाबाहेरील समभागात गुंतवणूक करण्याची ‘एचडीएफसी टॉप १००’ फंडाची रणनीती निर्देशांकातील धुविकरणामुळे पूर्णत: फसलेली दिसत आहे. ध्रुवीकरण झालेल्या समभागात मोठी गुंतवणूक राखणारे अॅक्सीस ब्लूचीप, कॅनरा रोबेको ब्ल्यूचीप, या सारखे आणि सावधता बाळगणारे मास्टरशेअर सारखे फंड जोखीम परतावा गुणोत्तरात उजवे ठरतांना दिसत आहेत. लार्ज कॅप गटात मालमत्तेच्या क्रमवारीत ‘एचडीएफसी टॉप १००’चे सहाव्या क्रमांकावर असला तरी एक वर्षाच्या कामगिरीच्या क्रमवारीत २९/३० तीन वर्षाच्या क्रमवारीत २१/२९ आणि १० वर्षाच्या क्रमवारीत २१/२६ स्थानावर आहे. मालमत्ता क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या या फंडाचा ‘रेग्युलर प्लान’चा व्यवस्थापन खर्च २.०३ टक्के असून लार्जकॅप फंडाच्या व्यवस्थापन खर्चानुसार अकराव्या क्रमांकावर आहे. कामगिरीच्या क्रमवारीत एचडीएफसी टॉप १००’पेक्षा अव्वल स्थानी असलेल्या अॅक्सीस ब्लूचीप (१.६९%), मिरॅ असेट लार्जकॅप (१.६७%) युटीआय मास्टर शेअर (१.८५%) यांचा व्यवस्थापन खर्च कमी आहे.
कोष्टक क्रमांक -२
*२४ नोव्हेंबरच्या ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’नुसार
गुंतवणुकीत ‘बाय राईट सिट टाईट’ असे नसते. तुम्ही निवडलेल्या फंडाची कामगिरी बदलत्या परिस्थितीनुसार घसरू शकते आणि एखादा अनोळखी फंड सुद्धा चांगला परतावा देऊ शकतो. परंतु सतत सात आठ वर्षे तिमाही मागून तिमाही फंडाची कामगिरी खालवत असेल तर असा फंड वित्तीय ध्येयापर्यंत नेण्यास असमर्थ ठरेल. कमगिरी खालवलेल्या आणि चढा व्यवस्थापन खर्च असलेल्या फंडात गुंतवणूक सुरु ठेवणे म्हणजे तुमच्या वित्तीय ध्येयापासून दूर जाण्यासाठी दिलेली किंमत आहे. निम्मा व्यवस्थापन खर्च असलेल्या रोखे फंडांनी ‘एचडीएफसी टॉप १००’ पेक्षा चांगली कामगिरी केली आहे. याच फंड घराण्याच्या एचडीएफसी शॉर्ट टर्म फंडात १० वर्षे ‘एसआयपी’चा वार्षिक परतावा ९.९८ टक्के आणि ‘रेग्युलर प्लान’चे व्यवस्थापन शुल्क १.१४ टक्के आहे. एखाद्या फंडाची कामगिरी जोखण्यास १० वर्षाचा कालावधी पुरेसा आहे. मागील दहा वर्षाचा आढावा कोष्टक क्रमांक ३ मध्ये दिला आहे.
कोष्टक क्रमांक ३
कर्ते म्युच्युअल फंड यादीचा वार्षिक आढावा घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. गुंतवणूकदार नव्या वर्षात गुंतवणुकीचा आढावा घेतील तेव्हा नाकर्त्यांना वगळणे आणि कर्त्यांचा समावेश करणे हा उद्देश असायला हवा. वास्तवात नकर्त्यांना ओळखणे अधिक क्लिष्ट मुळीच नसते. घसरणीच्या काळात फंड व्यवस्थापक मुद्दलाचे संरक्षण करण्यात किती यशस्वी झाले हे जाणणे गरजेचे असते. एखाद्या फंडाची कामगिरी त्याच्या तोलामोलाच्या दुसऱ्या फंडाच्या तुलनेत तपासणे खूपच सोपे आहे. या व्यतिरिक्त, असे अनेक सांख्यिकीय आधार बिंदू (डाटा पॉइंटस) उपलब्ध असतात जे आपल्या पोर्टफोलिओमधील नाकर्ता फंड सहज शोधता येतो. आपण असे फंड शोधण्याचे कष्ट न घेतल्याने ज्या कारणासाठी आपण एसआयपी करीत आहोत त्या करणाची पूर्तता होणार नाही. आपली गुंतवणूक केवळ ‘टॉप आणि अपर मिडल क्वारटाइल’ मधील फंडात असावी एखाद्या फंडाच्या कामगिरीत घसरण झाल्यास धोक्याचा इशारा ससमजावा. केवळ ‘एचडीएफसी टॉप १००’ नव्हे तर नीप्पॉन इंडिया लार्जकॅप, एसबीआय ब्लूचीप या लार्जकॅप फंडांची परिस्थिती या पेक्षा वेगळी नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की म्हणूनच पोर्टफोलिओचा नियमित आढावा आणि नाकर्त्यांबाबत कठोर निर्णय घेणे इतके तरी गुंतवणूकदारांनी करायला हवे. समर्थ दासबोधाच्या दुसऱ्या समासात “श्रोतां व्हावें सावधान । आतां सांगतों उत्तम गुण । जेणें करितां बाणे खुण । सर्वज्ञपणाची ॥ १ ॥ वाट पुसिल्याविण जाऊं नये । फळ वोळखिल्याविण खाऊं नये । पडिली वस्तु घेऊं नये । येकायेकीं ॥ २ ॥ सुज्ञांना अधिक सांगणे न लगे
म्युच्युअल फंड विषयी अधिक माहितीसाठी खालील Form भरा:
[contact-form-7 id=”22″ title=”Contact Me”]