हृदयी होत्या भरल्या खंती .....
एचडीएफसी लार्ज अॅण्ड मिडकॅप फंड कसा आहे ?
‘बाय ऑन रूमर अॅण्ड सेल ऑन न्यूज’ या बाजारातल्या वाक्प्रचाराचा प्रत्यय यावा अशी बाजाराची सध्याची अवस्था आहे. बहुप्रतीक्षित अमेरिकेशी झालेल्या व्यापार कराराच्या घोषणेच्या दिवशी बाजाराने उसळी मारली. आणि करार झाल्यापासून करारा बाबत माहिती समोर आली आणि सरकारने या करारातल्या अनेक गोष्टींबाबत मौन बाळगल्याने आणि इतर जागतिक घडामोडींमुळे निफ्टी-५० निर्देशांकातील घसरण थांबलेली नाही. गेल्या वर्षभराचा विचार केल्यास निफ्टीने २ जानेवारी २०२६ रोजी शिखर गाठले (करार होणार या अफवेवर बाजार वर गेला) आणि हा लेख लिहित असतांना १७ फेब्रुवारी रोजी बाजार बाजार शिखरापासून २.५६ टक्के खाली आहे. बाजाराने मोठी उसळी १६ आणि १७ फेब्रुवारी रोजी मारली. गेल्या वर्षभरात (२० फेब्रुवारी २०२५ ते २० फेब्रुवारी २०२६) दरम्यान निफ्टीत १० टक्के वाढ झाली आहे. विक्रमी उच्चांकापासून २.५६ टक्के खाली आहे. बाजारात वेळ साधण्यापेक्षा विवेकी आणि दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स (एसआयपी) च्या माध्यमातून लार्ज अॅण्ड मिडकॅप फंडात गुंतवणुक करणे हा एक चांगला पर्याय आहे. एचडीएफसी लार्ज अॅण्ड मिडकॅप फंडाने १८ फेब्रुवारी रोजी ३२ वर्षे पूर्ण करून ३३ व्या वर्षात पदार्पण केले. वर्धापनदिनाच्या दिवशी फंडाच्या सुरवातीपासून १००० रुपयांची एसआयपी केलेल्या ३.८४ लाखाच्या गुंतवणुकीचे ५२.३१ लाख झाले असून १३.५६ टक्के वार्षिक परतावा दिला आहे. तर एक रक्कमी १००० गुंतवणुकीचे ३४६२५ झाले असून वार्षिक परताव्याचा दर ११.७१ टक्के आहे. या फंडाचे विद्यमान निधी व्यवस्थापक म्हणून गोपाल अग्रवाल यांची ९ जुलै २०२० रोजी सूत्रे हाती घेतली. ९ जुलै २०२० ते १७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान फंडाने एक रक्कमी गुंतवणुकीवर वार्षिक २४.६२ टक्के तर याच कालावधीतील एसआयपी वर वार्षिक १८.२६ टक्के परतावा मिळविला आहे.
ही आकडेवारी, हा फंड भविष्यातील दीर्घकालीन परताव्यासाठी एक आशादायक फंड असल्याचे सूचित करतो. गोपाल अग्रवाल यांची फंडाची सूत्रे हाती घेतल्यापासून गेल्या साडेपाच वर्षांत फंडाच्या कामगिरीत लक्षणीय बदल झाले आहेत. एचडीएफसी लार्ज अॅण्ड मिडकॅप फंडाने ओळीने चोविसाव्या तिमाहीत फंड गट सरासरीपेक्षा जास्त परतावा मिळविला आहे. लार्ज अॅण्ड मिडकॅप फंड गटात मालमत्ता क्रमवारीत चवथ्या क्रमांकावर असलेला हा फंड दीर्घकालीन संपत्ती निर्मितीत एक सशक्त दावेदार आहे. या फंडाचा ‘निफ्टी लार्ज मिडकॅप २५० टोटल रिटर्न इंडेक्स’ हा फंडाचा मानदंड आहे.
फंडाची कामगिरी
या फंडाच्या बत्तीस वर्षाच्या कारकीर्दीचा विचार केल्यास प्रामुख्याने चार टप्प्यात विचार करावा लागेल. १९९४ ते २००५ (निधी व्यवस्थापक अमेय हत्तंगडी) २००५ ते २०१८ ( २०१४ पासून निधी व्यवस्थापक विनय कुलकर्णी), २०१८ ते विद्यमान (२०२० पासून निधी व्यवस्थापक गोपाल अग्रवाल) दरम्यान फंड सुसूत्रीकरणा नंतर पोर्टफोलिओमध्ये मोठे फेरबदल करूनही, एचडीएफसी लार्ज अँड मिडकॅप फंड फंड गटात एक सशक्त दावेदार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यात यशस्वी झाला आणि फंडाने नव्याने प्रवेश केलेल्या फंड गटात मालमत्ता क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर राहिला. परंतु २०१९ मध्ये बाजारपेठेने वळण घेतल्यावर फंडाची कामगिरी कमालीची खालावली. गोपाल अग्रवाल यांची नेमणूक निधी व्यवस्थापक म्हणून झाल्यावर जुलै २०२० पासून, एचडीएफसी लार्ज अँड मिडकॅप फंडने एक मोठे वळण घेतले. सुधारित कामगिरीच्या बळावर हा फंड २०२१ आणि २०२२ मध्ये ‘टॉप क्वार्टाइल’ मध्ये राहिला. २०२३ मध्ये फंडाची आजपर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली. परिणामी हा फंड सलग ३ वर्षे (२०२१, २०२२ आणि २०२३) टॉप क्वार्टाइलमध्ये राहिला. पॉइंट-टू-पॉइंट रिटर्न आधारावर, फंडाने एक, तीन आणि पाच वर्षांच्या कालावधीत निफ्टी लार्ज मिडकॅप २५० टोटल रिटर्न इंडेक्स’च्या सापेक्ष आणि फंड गट सरासरीसापेक्ष दीड ते साडेपाच टक्के अधिक परतावा मिळविला आहे.
फंडाची बदललेली नांवे
- मॉर्गन स्टॅनले लार्जकॅप फंड
- एचडीएफसी लार्जकॅप फंड
- एचडीएफसी ग्रोथ ऑपोर्च्यूनीटीज फंड
- एचडीएफसी लार्ज अँड मिडकॅप फंड
बाजारातील सध्याची घसरण आणि लार्जकॅप आणि मिडकॅप मूल्यांकनांमध्ये असलेली मोठी तफावत लक्षात घेता गुंतवणूकदारांनी एक रक्कमी गुंतवणूक करणे टाळावे आणि दीर्घ मुदतीसाठी एसआयपी पद्धतीने या फंडात गुंतवणूक करावी. हा फंड परतावा कमी आहे ही हृदयातील खंत नक्कीच दूर करेल.
तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:
Financial decisions can be considered in the context of your goals, time horizon and individual circumstances rather than short-term market movements.