अर्थ वल्लभ

आहे मनोहर तरी …

30 Dec 2024 • 1 min read

आहे मनोहर तरी …

कॅनरा रोबेको फ्लेक्झीकॅप फंड हा फंड ‘लोकसत्ता कर्ते म्युच्युअल फंडा’चा समावेश २०१४ पासून पहिल्या आवृत्ती पासून आहे. हा फंड १० फेब्रुवारी २०२१ पर्यंत कॅनरा रोबेको इक्विटी डायव्हार्सीफाइड या नांवाने ओळखला जात असे. या फंडाचा ‘कर्त्या’मध्ये समावेश झाल्यापासून या फंडाचे निधी व्यावस्थापनाची धुरा रवि गोपालकृष्णन, कृष्णा संघवी, मियुश गांधी (२०१६ मध्ये विद्यमान निधी व्यवस्थापक श्रीदत्त भांडवलदार यांची सह निधी व्यवस्थापक पदी नियुक्ती झाली.) या निधी व्यवस्थापकांनी सांभाळली. सध्या निधी व्यवस्थापनाची धुरा श्रीदत्त भांडवलदार आणि प्रणव गोखले हे सांभाळत आहेत. कॅनरा रोबेको फ्लेक्सिकॅप फंडाची कामगिरी मागील तीन तिमाहीपासून खालावली होती. परंतु सद्य तिमाहीत फंडाच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा झाली असून हा फंड नव्याने गुंतवणूक करण्यास सज्ज झाल्याचे दिसत आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये या फंडाची मालमत्ता १२९१३ कोटी होती. फंडाच्या पोर्टफोलीओत अन्य स्पर्धक फंडांच्या पोर्टफोलीओच्या तुलनेत ‘पीएसयु’ आणि स्मॉलकॅप कंपन्यांचे प्रमाण कमी असल्याने कॅनरा रोबेको फ्लेक्झीकॅपची कामगिरी खालावल्याचे दिसत होते. (सोबतचे कोष्टक पहा). जून नंतर (निवडणूक निकालांनंतर) स्मॉलकॅप आणि सार्वजनिक मालकीच्या कंपन्यांत झालेली घसरण या फंडांच्या पथ्यावर पडली असून. तौलनिकदृष्ट्या फंडाच्या कामगिरीत सुधारणा झाल्याचे पहायला मिळते. जेव्हा बाजारातील अनिश्चितता शिगेला पोहचते तेव्हा अनेक गुंतवणूकदार समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडात गुंतवणूक करणे टाळतात. परंतु दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी, बाजारातील अनिश्चितता नव्याने गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून देते. अशा गुंतवणूकदारांसाठी, कॅनरा रोबेको फ्लेक्झीकॅप फंड हा लार्ज कॅप केंद्रित मल्टी-कॅप घाटणीचा फंड असून फंडाच्या पोर्टफोलीओत निवडक मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप कंपन्यांचा समावेश आहे.

कॅनरा रोबेको फ्लेक्झीकॅप फंड त्रैमासिक कामगिरी

फंडाची रणनीती बाजाराच्या वेगवेगळ्या आवर्तनांमध्ये परतावा मिळविण्यास सहाय्य करते. फंडाच्या धोरणामध्ये पोर्टफोलिओचा आधार म्हणून दर्जेदार, स्थिर, दीर्घकालीन वृद्धीदर राखण्याऱ्या कंपन्यांची निवड केली जाते. अशा बहुतांश कंपन्या मूल्यमापनापेक्षा प्रामुख्याने नफ्यातील वृद्धीदराच्या आधारे निवडल्या जातात. फंडाच्या पोर्टफोलिओमधील सर्वाधिक गुंतवणूक बँका आणि वित्तीय सेवा, तंत्रज्ञान, विवेकी वस्तू, औद्योगिक वापराच्या वस्तू, आणि आरोग्य निगा या क्षेत्रात आहेत. फंडाच्या पोर्टफोलीओत आयसीआयसीआय बँक एचडीएफसी बँक, इंफोसीस, भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज, भारत इलेक्ट्रोनिक्स, लार्सन अँण्ड टुब्रो, झोमेटो, स्टेट बँक, एचसीएल टेक या सर्वाधिक गुंतवणूक असलेल्या कंपन्या आहेत. गेल्या दोन वर्षांत फंडाच्या सरासरीपेक्षा अधिक चांगली कामगिरी करण्याला रिलायन्स इंडस्ट्रीज, भारत इलेक्ट्रोनिक्स, लार्सन अँण्ड टुब्रो इंफोसीस कारणीभूत ठरले. फंडाच्या पोर्टफोलिओमधील ६८ ते ७० कंपन्या असतात. आघाडीच्या ५ गुंतवणुका एकूण गुंतवणुकीच्या २४ टक्के तर आघाडीच्या १० गुंतवणुका एकूण गुंतवणुकीच्या ३८ टक्के आहेत. या फंडाच्या ३०-४० टक्के गुंतवणुका अशा कंपन्यात आहे ज्यांच्या नफ्यात पुढील काही वर्षांत मोठी वाढ होऊ शकते. ही वाढ मुख्यत्वे कार्यक्षमतेतील बदल, उत्पादन आणि उद्योग क्षेत्रात व्यापक सुधारणा, ग्राहकांच्या दरडोई उत्पन्नात वाढ, या कारणांमुळे असेल. उदाहरणार्थ, फंडाच्या गुंतवणुकीतील लार्सन अँड टुब्रो, एबीबी व्होल्टास अल्ट्राटेक सिमेंट जीइटी अँण्ड डी इंडिया, यांसारख्या कंपन्या भांडवली वस्तूंच्या बदलत्या आवर्तनाशी तर एचडीएफसी एएमसी, कॅम्स, चोला मंडलम, इंटर ग्लोब एव्हीएशन सारख्या कंपन्या ग्राहकांच्या वाढलेल्या दरडोई उत्पन्नाशी निगडीत आहेत. ताळेबंदात कमी कर्ज, स्थिर कमाई आणि भांडवलावर चांगला परतावा (आरओआय)असलेल्या दर्जेदार कंपन्यांना प्राधान्य देतांना दिसत आहे. गुणवत्ता आणि आणि वाजवी मूल्यांकन असलेल्या कंपन्या गुंतवणुकीत असल्याने हा फंड ‘लोकसत्ता कर्ते म्युच्युअल फंड’ यादीचा प्रदीर्घ काळ भाग राहिला आहे. कॅनरा रोबेको फ्लेक्झीकॅप हा फंड मध्यम जोखीम असलेल्या आणि किमान पाच वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी साठी गुंतवणुक करू इच्छीणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक आदर्श साधन आहे.

तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:

Keep in Perspective

Financial decisions can be considered in the context of your goals, time horizon and individual circumstances rather than short-term market movements.

Have a Financial Question?

Get greater clarity around your financial goals and investment decisions.

Start a Conversation →
Important Information

This article is intended for general informational and educational purposes only. It should not be treated as a guarantee of returns or a recommendation to invest in any particular mutual fund scheme or financial product. Mutual fund and other market-linked investments are subject to market risks. Investment suitability depends on individual goals, circumstances, time horizon and risk considerations. Please read relevant scheme-related documents carefully before investing.

Scroll to Top