कितीदा नव्याने तुला आठवावे
सहा महिन्यांपूर्वी दिनांक ३ मार्च २०२५ रोजी विश्लेषण केलेला आदित्य बिर्ला सन लाईफ लार्जकॅप (जुने नांव आदित्य बिर्ला फ्रंट लाईन इक्विटी) हा फंड आज पुन्हा कशाला, असा वाचकांना कदाचित प्रश्न पडण्याची शक्यता आहे. बदल हा निश्चित आहे. फंडाचा पोर्टफ़ोलिओ, भारतीय बाजार अंतरराष्ट्रीय समष्टी परिस्थिती सगळे बदललेले असल्याने आणि लार्जकॅपचे मुल्यांकन नव्याने गुंतवणूक योग्य पातळीवर आले असल्याने फंडाच्या विश्लेषणाची आवश्यकता भासते. तसेच ६.५ टक्के ‘रिस्क फ्री रेट ऑफ रिटर्न’ निश्चित करून जोखीम सामायोजित परताव्याच्या क्रमवारीत आदित्य बिर्ला सन लाईफ लार्जकॅप फंड तिसऱ्या क्रमांकावर असलेला फंड आहे. भारतात १४ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा देणाऱ्या फंडाची कामगिरी चांगली समजली जाते. कारण असे फंड पाच वर्षात मुळची गुंतवणूक दुप्पट करतात. फंडाने ३० ऑगस्ट २००२ ते २९ ऑगस्ट २०२५ या तेवीस वर्षात वार्षिक १८.७७ टक्के दराने परतावा दिला असून मूळ १ लाख गुंतवणुकीचे बाजार मूल्य ५२.३० लाख आहे. फंडाच्या स्थापने पासून सुरु केलेल्या १००० रुपयांच्या गुंतवणुकीचे २७६ हप्ते गेले असून २.७६ लाख गुंतवणुकीचे २४.१३ लाख रुपये झाले असून वार्षिक परताव्याचा दर १६.०७ टक्के आहे. गुंतवणूकदार कमी अस्थिरता आणि वाजवी मुल्यांकन असलेल्या फंडाच्या शोधात असतील तर आदित्य बिर्ला सनलाईफ लार्जकॅप फंड हा एक आदर्श साधन असण्याची शक्यता आहे. म्हणूनच गेल्या पाच सात वर्षात किमान सहा वेळा या फंडाचे विश्लेषण या सदरातून प्रसिद्ध झाले. म्हणूनच ‘कितीदा तुला नव्याने तुला आठवावे’ असे म्हणावेसे वाटते.
गुंतवणुकीत वाजवी जोखीम घेऊन लार्जकॅप निर्देशांकापेक्षा (‘निफ्टी १०० टीआरआय’) अधिक परताव्याची इच्छा बाळगणाऱ्या गुंतवणूकदरांनी अदित्य बिर्ला सन लाईफ लार्जकॅप फंडाची निवड करावी. शनिवार दिनांक ३० ऑगस्ट २०२०५ रोजी या फंडाने २२ वर्षे पूर्ण करून २३ व्या वर्षात पदार्पण केले. अदित्य बिर्ला सन लाईफ फंड घराण्यात समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडात लार्जकॅप फंड सर्वाधिक मालमत्ता असणारा आहे. मध्यंतरी कामगिरी खालावलेला हा फंड मागील २-३ वर्षांपासून कामगिरीत सुधारणा दाखवत आहे. सध्या बाजाराची स्थिती लक्षात घेता फंडात गुंतवणूक करण्यासाठी एसआयपी मार्गाचा अवलंब करावा. हा फंड ३० ऑगस्ट २००२ रोजी अलायंस फ्रंटलाईन इक्विटी फंड म्हणून हा फंड अस्तित्वात आला. पुढे तात्कालीन बिर्ला म्युच्युअल फंडाने आलायंस म्युच्युअल फंडाचे अधिग्रहण केल्या नंतर हा फंड बिर्ला फ्रंटलाईन इक्विटी फंड म्हणून ओळखला जावू लागला. महेश पाटील यांची २२ नोव्हेंबर २००५ पासून या फंडाचे निधी व्यवस्थापक म्हणून नेमणूक झाली. महेश पाटील हे आदित्य बिर्ला सनलाईफचे मुख्य गुंतवणूक अधिकारी आहेत. ते लार्जकॅप फंड गटातील सर्वात अनुभवी निधी व्यवस्थापक आहेत. ते गुंतवणुकीसाठी कंपन्यांची निवड करण्यात माहीर आहेत आणि बाजाराच्या कठीण काळातही त्यांचे कौशल्य सिद्ध झाले आहे. महेश पाटील यांचे कौशल्य आणि त्यांनी अंमलात आणलेली गुंतवणूक रणनीती, ज्यामुळे दीर्घकालीन परतावा स्थिर राहण्यात निधी व्यवस्थापकांचा मोठा वाटा आहे. महेश पाटील यांची एक वेगळी गुंतवणूक शैली आहे जी त्यांनी विविध बाजार आवर्तनामध्ये यशश्वीपणे अंमलात आणली आहे. गेल्या काही वर्षांत, त्यांच्या मानदंड -जागरूक दृष्टिकोनामुळे, आणि लवचिक गुंतवणूक शैलीमुळे ते मोठ्या पोर्टफोलिओचे संतुलन साधू शकले. तसेच पोर्टफोलिओच्या तळाकडच्या (पोर्टफोलीओ टेल) भागात ते नवनवीन कल्पना पडताळून पहात असतात. त्यांच्या संमिश्र गुंतवणूक शैलीमुळे बाजाराच्या तेजी आणि मंदीच्या काळात तरून जाण्यास आणि तत्कालीन गुंतवणूक संधीचा लाभ घेण्यास सक्षम केले आहे. त्यांच्या गुंतवणूक शैली बाबत म्युच्युअल फंड विश्लेषकात अशी चर्चा असते की, ते परंपरावादी निधी व्यवस्थापक (जोखीम टाळणारे निधी व्यवस्थापक) आहेत. ते सर्वाधिक गुंतवणूक असलेल्या कंपन्यांची निवड ‘बॉटम अप’ रणनीतीनुसार करतात. तर तळाच्या कंपन्यांची निवड टॉप डाऊन पद्धतीने करतात. असेही म्हटले जाते की, गुंतवणूक दृष्टिकोन मानदंड -जागरूक असल्याने, उद्योग क्षेत्र विचलन एका निश्चित पट्ट्यात आखले जाते. हे पोर्टफोलिओमधील मानदंड सापेक्ष जोखीम नियंत्रित करण्यास मदत करते.
साधारण २००७ ते २०१४ पर्यंत हा फंड ‘टॉप क्वार्टाइल’मध्ये होता. २०१४ ते २०१८ दरम्यान फंडाची कामगिरी घसरल्याने फंडाची घासरून ‘लोअर मिडल क्वार्टाइल’ आणि बॉटम क्वार्टाइल’मध्ये झाली. सेबीच्या पुनर्वर्गीकरणानंतर फंडाच्या कामगिरीत सुधारणा होऊन, २०२२ च्या दुसऱ्या तिमाहीत फंडाची कामगिरी शिखरावर होती. पॉइंट-टू-पॉइंट आधारावर मागील १ वर्ष, -०.६४ टक्के (क्रमवारीत २ रा क्रमांक) ३ वर्षे १५ टक्के (क्रमवारीत ८ वा क्रमांक), ५ वर्ष १८ टक्के (क्रमवारीत २ रा क्रमांक आणि १० वर्षे १२.०७ टक्के (क्रमवारीत १२ वा क्रमांक) परतावा दिला आहे. १० वर्षे वगळता इतर कालावधीतील वार्षिक परतावे १४ टक्क्यांपेक्षा अधिक आहेत. या फंडाची त्याच्या मानदंड सापेक्ष कामगिरी चांगली असून फंडाने, ‘निफ्टी १०० टीआरआय’ ला वेगवेगळ्या कालावधीत ०.५०-३.०० टक्क्यांपेक्षा अधिक परतावा मिळविला आहे.
गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत (जून २०२० ते जून २०२५) तीन वर्षांच्या रोलिंग रिटर्नचा विचार केला तर, फंडाने सरासरी १८.१ टक्के परतावा दिला आहे. तुलनात्मकदृष्ट्या, निफ्टी १०० टीआरआयने सरासरी १७.४ टक्के परतावा दिला आहे, लार्ज कॅप फंड गटात बेंचमार्कसापेक्ष सरस कामगिरी करणे कठीण असते. लार्जकॅप गटात ६५ टक्के फंड बेंचमार्कला मागे टाकण्यात अपयशी ठरत असतांना मागील पाच वर्षे सातत्याने बेंचमार्कला मागे टाकणे फंड मॅनेजरचे कौशल्य आणि अनुभवाला अधोरेखित करणारे आहे.
तसेच, वर उल्लेख केलेल्या कालावधीत, ३ वर्षांच्या रोलिंग रिटर्न आधारावर, या फंडाने त्याच्या मानदंड सापेक्ष ‘निफ्टी १०० टीआरआयला’ जवळजवळ ६९ टक्के वेळा मागे टाकले आहे. या कालावधीत ९६ टक्क्यांपेक्षा जास्त वेळेपेक्षा १२ टक्क्यांपेक्षा जास्त आणि ८२ टक्केवेळे पेक्षा जास्त १५ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळविला आहे. गेल्या ५ वर्षांत फंडाचे एसआयपी रिटर्न (एक्सआयआरआर) १८.४ टक्के होते याच कालावधीत निफ्टी १०० टीआरआयमधील एसआयपीने त्याच कालावधीत १७.४ टक्के परतावा दिला आहे.
महेश पाटील यांची पोर्टफोलिओ बांधणी अन्य लार्जकॅप फंडांच्या तुलनेत वेगळी आहे. ते पोर्टफोलिओच्या तळाकडील पोर्टफोलिओत संख्येने जास्त परंतु टक्केवारीने कमी गुंतवणुका राखतात. ते गुंतवणूकीची संधी हुडकून त्यात गुंतवणूक करतात. विशेषतः त्यांच्या पसंतीच्या कंपन्यांत जरी ते त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करू शकत नसले तरीही अशा कंपन्यांत कमी मात्रेची गुंतवणूक राखतात. जोपर्यंत ते अतिरिक्त अल्फा निर्माण करू शकतात. लार्ज-कॅप फंडांना किमान ६५ टक्के मालमत्ता लार्जकॅप मध्ये गुंतवणे सक्तीचे असतांना फंड मॅनेजरने सारासरी ८५ टक्के गुंतवणूक लार्जकॅप ७ ते १० टक्के मिडकॅप आणि ३-४ टक्के स्मॉलकॅप मध्ये केली आहे.पोर्टफोलिओत आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस एसबीआय लाईफ, जीई व्हर्नोव्हा टी अँड डी इंडिया, महिंद्रा अँड महिंद्रा यांचे गुंतवणुकीतील प्रमाण मानदंड सापेक्ष थोडे जास्त आहे.या कंपन्यांनी फंडला चांगला परतावा देण्यात मोठे योगदान दिले आहे. फंडाच्या गुंतवणुकीत बँका आणि सॉफ्टवेअर कंपन्यांना अधिक प्राधान्य देण्याची परंपरा आहे. ही उद्योग क्षेत्रे वगळता या फंडाने अन्य उद्योग क्षेत्रांची निवड निर्देशांकातील त्यांच्या प्रभावानुसार कमी अधिक केलीआहे. गुंतवणुकीत सरासरी ७५ कंपन्यांचा समावेश असला तरी आघाडीच्या दहा कंपन्या पोर्टफोलीओचा ५० टक्के हिस्सा व्यापतात. काही आघाडीच्या कंपन्या वगळता अन्य कंपन्यांतील गुंतवणूक ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. एकंदरीत, सात वर्षांनंतरच्या आर्थिक उद्दिष्टांसाठी संपत्ती निर्मिती करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी अदित्य बिर्ला सन लाईफ लार्जकॅप फंड योग्य आहे. जे किमान सात वर्षांपेक्षा जास्त कालावधीचा दीर्घकालीन गुंतवणूक शोधत आहेत ते एसआयपी मार्गाने गुंतवणुकीचा विचार करू शकतात. काल पायघड्यावरुन घरोघरी गौरींचे आगमन झाले. याच पायघड्यावरुन आणावा असा हा फंड आहे. (सर्व आकडेवारी दिनांक २९ ऑगस्ट २०२५च्या ‘रेग्युलर प्लान-ग्रोथ’ ‘एनएव्ही’ नुसार)
तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:
Keep in Perspective
Financial decisions can be considered in the context of your goals, time horizon and individual circumstances rather than short-term market movements.