‘एसआयपी’ने करोडपती केलेला फंड
आदित्य बिर्ला सन लाइफ फ्रंटलाइन इक्विटी फंडाने मागील २२ वर्षात (ऑगस्ट २००२ ते फेब्रुवारी २०२५) ₹१०००० च्या एसआयपी गुंतवणूकीच्या २६.४० लाखांचे १.८६ कोटी झाले आहेत. या एसआयपीचा वार्षिक वृद्धीदर १५.४९ टक्के असून, लार्जकॅप फंड गटात २० वर्षे कालावधीत ‘एसआयपी’वर एचडीएफसी लार्जकॅप नंतर (१६.२४ टक्के) दुसऱ्या क्रमांकाचा वृद्धीदर (१६.००) आहे. त्याचप्रमाणे, ₹१००००० एकरकमी गुंतवणूकीचे त्याच कालावधीत १९.४९ टक्क्यांच्या वार्षिक चक्रवाढ वाढीने ४८.५६ लाख करणारा फंड आहे. ५ ऑगस्ट २००२ मध्ये सुरु झालेल्या या लार्जकॅप फंडाचे गेल्या ३ वर्षातील ढिसाळ कामगिरी नंतर कामगिरीत सुधारणा झाल्याचे दिसत आहे. सेबीच्या लार्जकॅप व्याख्येनुसार एकूण मालमत्तेच्या किमान ८० टक्के गुंतवणूक मार्केटकॅपनुसार पहिल्या १०० कंपन्यांत गुंतविणे सक्तीचे आहे. लार्जकॅप मधील मोठ्या घसरणी नंतर लार्जकॅपचे मुल्यांकन नवीन गुंतवणुकीसाठी आवाक्यात आल्याने गुंतवणूकदारांनी लार्जकॅपची कास धरल्याचे ‘अॅम्फी’च्या जानेवारीच्या आकडेवारीत दिसून आले आहे. ७ ते १० वर्षे कालावधीसाठी नव्याने एक रक्कमी गुंतवणूक, किंवा किमान ५ वर्षे ‘एसआयपी’ करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा एक चांगला विकल्प आहे. आदित्य बिर्ला सन लाइफ फ्रंटलाइन इक्विटी फंड हा २२ वर्षांपैकी पहिल्या १०-१५ वर्षे चांगला परतावा देणारा फंड होता. फंडाची कामगिरी २००४ ते २०१५ उत्तम होती. जानेवारी २०१६ पासून कामगिरी घसरायला सुरवात झाली. कोरोनापूर्वी लार्जकॅप फंड गटात फंडाची कामगिरी तळाला होती. सेबीच्या फंड सुसूत्रीकरणानंतर फंडाच्या कामगिरीत अल्प काळ सुधारणा झाल्याचे दिसले. आदित्य बिर्ला सनलाइफ फ्रंटलाइन इक्विटी फंड हा लार्ज कॅप फंड म्हणून ओळखण्यात नेहमीच योग्य फंड होता. कोरोन पश्चात जुलै २०२० ते जून २०२३ दरम्यान हा उत्कृष्ट कामगिरी करणारा फंड होता. जुलै २०२३ ते सप्टेंबर २०२४ दरम्यान फंडाची कामगिरी खालावली. ऑक्टोबर २०२४ पासून फंडाच्या कामगिरी क्रमवारीत मोठी सुधारणा झाल्याचे दिसत आहे. आदित्य बिर्ला सन लाइफ फ्रंटलाइन इक्विटी फंड २८ हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करीत आहे. वैयक्तिक गुंतवणूकदारांमध्ये हा एक अतिशय लोकप्रिय लार्ज कॅप फंड आहे. फंडाचा मानदंड ‘निफ्टी १०० टीआरआय’ आहे. महेश पाटील (आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी) हे १७ नोव्हेंबर २००५ पासून या फंडाचे योजनेचे निधी व्यवस्थापक आहेत.
आदित्य बिर्ला सन लाइफ फ्रंटलाइन इक्विटी फंडाची ‘ग्रोथ अॅट रिझनेबल प्राईस’ ही फंडाची गुंतवणूक रणनीती आहे. ही रणनीती अचरणात आणताना मुख्यत्वे ३ बाबींकडे लक्ष दिले जाते. फंड मानदंड सापेक्ष कोणतेही उद्योग क्षेत्र टाळत नाही. फंड गुंतवणूक करतांना मानदंड सापेक्ष कोणत्याही उद्योग क्षेत्र टाळत नाही किंवा खूप जास्त गुंतवणूक करीत नाही. बाजाराच्या वेगवेगळ्या आवर्तनात मानदंड सापेक्ष सरस कामगिरी करून ‘अल्फा’ निर्मितीसाठी निधी व्यवस्थापक प्रयत्नशील असतात. फंडाच्या पोर्टफ़ोलिओची विभागणी मुख्यत्वे ३ गटात असते ८०-८५ टक्के लार्जकॅप आणि १०-१५ टक्के मिड कॅप असतात. फंडाच्या गुंतवणुकीत त्या त्या उद्योग क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांना स्थान दिले आहे. फंडाच्या गुंतवणुकीत सर्वाधिक गुंतवणूक खाजगी बँकांत असून एचडीएफसीबँक, आयसीआयसीआय बँक, अॅक्सीस बँक आणि कोटक महिंद्र बँक या बँकिंग क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक असलेल्या बँका आहेत. आघाडीच्या गुंतवणुकात इन्फोसिस, रिलायंस इंडस्ट्रीज, लार्सन अॅण्ड टुब्रो, भारती एअर टेल, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा आणि आयटीसी यांचा समावेश आहे. फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये साधारणपणे ७० -८० दरम्यान कंपन्या असतात. आघाडीच्या दहा गुंतवणुका एकूण मालमत्तेच्या ४५-५० टक्क्यांदरम्यान असतात. सध्या फंडाने बँकिंग, वाहन, ग्राहक उपयोगी टिकाऊ वस्तू (कन्झ्युमर ड्युरेबल) अभियांत्रिकी आणि बांधकाम, आणि आरोग्यनिगा या क्षेत्रात मानदंड सेपेक्ष अधिक गुंतवणूक आहे.
आदित्य बिर्ला सन लाइफ फ्रंटलाइन इक्विटी फंडाची मानदंड सापेक्ष कामगिरी तपासली असता, ‘निफ्टी १०० टीआरआय’ सापेक्ष फंडाच्या सुरवातीपासून ३ वर्षांचा रोलीन रिटर्न परतावा, आणि ५ वर्षाचा रोलीन रिटर्न परतावा तपासाला असता २०१८ आणि २०१९ वर्ष वगळता सर्व कालावधीत फंडाने (३ वर्षे आणि ५ वर्षे कालवधीत) मानदंडापेक्षा मोठ्या फरकाने अधिक परतावा मिळविला आहे. फंडाने २०२० पासून पुन्हा कामगिरीत सुधारणा केलेली दिसते. एकंदरीत, आदित्य बिर्ला सन लाइफ फ्रंटलाइन इक्विटी फंड हा दोन तपांचा समृद्ध वारसा लाभलेला फंड असून, किमान पाच वर्षे गुंतवणूक राखून ठेवणाऱ्या गुंतवणूकदरांसाठी योग्य साधन आहे.-
तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:
Financial decisions can be considered in the context of your goals, time horizon and individual circumstances rather than short-term market movements.