विठ्ठला, तू 'शहाणा' कुंभार!
परवा एका (नव) गुंतवणूकदार मित्राचा फोन आला. गडी चांगलाच नाराज होता. कारण निवडक अशा मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप्सचा त्याचा ‘अॅाल स्टार’ पोर्टफोलिओ’ गेल्या वर्षभरापासून तोट्यात आहे. ‘याग्य वेळी’ संपूर्ण पोर्टफोलिओ विकून चांदी आणि सोने न घेतल्याबद्दल तो स्वतःला (पर्यायाने मला) दूषणे देत होता.
शांततेच्या काळी करावी पुढील युद्धाची तयारी!
लष्करी क्षेत्रात एक जुनी म्हण आहे: ‘जे शांततेच्या काळात घाम गाळतात, त्यांना युद्धात कमी रक्त सांडावे लागते.’
गुंतवणूकीच्या क्षेत्रात आजच्या काळात ती तितकीच समर्पक आहे, कारण जागतिक भू-राजकारण अस्थिर होत आहे, राष्ट्रीय हितसंबंध वेगाने बदलत आहेत आणि बाजार अशा शक्तींना प्रतिसाद देत आहेत ज्या बॅलन्स शीटच्या पलीकडे आहेत. अशा वातावरणात, केवळ आशावाद आणि भूतकाळातील चमकदार कामगिरीवर आधारलेले पोर्टफोलिओ मुळातच कमकुवत असतात.
पडझडीसाठी पोर्टफोलिओ डिझाइन करणे म्हणजे नक्की काय?
१. खऱ्या वैविध्यतेचा अर्थच असा आहे की, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये अशा काही गोष्टी असणे ज्या तुम्हाला कधीकधी आवडणार नाहीत.
जर तुमच्या पोर्टफोलिओमधील सर्व घटक एकत्रित वाढत असतील, तर ते एकत्रितपणेच कोसळतील. तेजीच्या काळात जी मालमत्ता ‘काहीही करत नाही’ असे वाटते, तीच मालमत्ता अनेकदा तेजी ओसरल्यावर तुमचे संरक्षण करते (उदाः सोने आणि चांदी).
तेंव्हा गुंतवणूकीच्या मूल्यमापनाचे योग्य एकक ‘पोर्टफोलिओचा एकूण परतावा’ हेच असणे आवश्यक आहे.
२. ‘मी किती परतावा कमवू शकतो?’ याऐवजी ‘मी किती पडझड सहन करू शकतो?’ हा प्रश्न विचारा.
प्रत्येक मालमत्ता कठीण काळातून जाते. इक्विटीमध्ये घसरण होते. महागाईच्या काळात डेट फंड निराश करतात. सोने बराच काळ स्थिर राहू शकते. रीट्स आणि इनवीट्स भांडवली खर्च आणि आर्थिक चक्रांना प्रतिसाद देतात. पडझडीसाठी डिझाइन करणे म्हणजे या वास्तवाचा आधीच स्वीकार करणे आणि हे सुनिश्चित करणे की कोणतीही प्रतिकूल परिस्थिती तुमचा संपूर्ण पोर्टफोलिओ किंवा तुमचे ताळतंत्र बिघडवू शकणार नाही.
३. तुम्ही जास्तीत जास्त किती घसरण सहन करणार (मॅक्सिमम टॉलरेबल ड्रॉडाउन) ते निश्चित करा.
संस्थात्मक पोर्टफोलिओ या संकल्पनेवर आधारित असतात—म्हणजेच तोटा अशा पातळीपर्यंत मर्यादित ठेवणे जिथे गुंतवणूकदाराला त्याचे धोरण किंवा वर्तन बदलण्याची वेळ येणार नाही. जर पोर्टफोलिओ ३०% पडण्याची शक्यता असेल, पण गुंतवणूकदाराची मानसिक स्थिती १५% घसरणीवरच डळमळीत होत असेल, तर तो पोर्टफोलिओ त्या गुंतवणूकदारासाठी योग्य नाही —मग त्याची दीर्घकालीन परतावा देण्याची क्षमता कितीही का असेना.
४. वाढीसाठीचा भाग (ग्रोथ मनी) आणि सुरक्षित राखण्याचा भाग (स्टॅबिलिटी मनी) वेगळा ठेवा.
संपत्ती निर्माण करण्यासाठी ‘ग्रोथ अॅसेट्स’ असतात, तर तुमच्या स्थैर्यासाठी ‘स्टॅबिलिटी अॅसेट्स’ असतात. एका सुदृढ पोर्टफोलिओमध्ये दोघांनाही स्थान असते. जर बाजारातील घसरणीमुळे तुमची झोप उडत असेल, तर तुमचे वय, उत्पन्न किंवा तयारीच्या दृष्टीने तुमचे धोक्याच्या गुंतवणूकीचे वाटप (ॲलोकेशन) खूप जास्त आहे असे समजावे.
५. किमान एक असा ‘आधारवड’ तयार करा जो तुम्हाला ‘काहीही न करता स्वस्थ बसण्या’साठी आश्वस्त करेल.
पडझडीच्या काळात, अनेकदा ‘काहीही न करणे’ हाच सर्वोत्तम निर्णय असतो. हे तेव्हाच शक्य होते जेव्हा पोर्टफोलिओचा काही भाग उत्पन्नाद्वारे, स्थिरतेद्वारे किंवा रोख रकमेद्वारे तुम्हाला आश्वस्त करतो. जे पोर्टफोलिओ वाईट काळात तुम्हाला चुकीचे पाऊल उचलण्यास भाग पाडतात, ते अयोग्यपणे डिझाइन केलेले असतात.
६. अनुभवी गुंतवणूकदार कसे वागतात, यातून धडे घ्या.
तज्ज्ञ गुंतवणूकदार नवीन कल्पनांच्या मागे धावण्यापेक्षा पोर्टफोलिओची रचना व्यवस्थापित करण्यावर जास्त वेळ घालवतात. ते कठीण काळासाठी पोर्टफोलिओची चाचणी (स्ट्रेस टेस्ट) करतात आणि हे सुनिश्चित करतात की आपल्या विविध गुंतवणुकी म्हणजे केवळ वेगवेगळ्या नावाखाली घेतलेली एकसारखीच जोखीम तर नाही.
७. हे स्वीकारा की पडझडीसाठी पोर्टफोलिओ डिझाइन करणे भावनिकदृष्ट्या कठीण असते.
आजूबाजूचे लोक पटापट श्रीमंत होत असल्याचे उघड दिसत असताना (किंवा त्यांनी – बहुधा सोशल मिडियावर- असा आभास निर्माण केलेला असताना) आपण सावधगिरी बाळगणे भावनिकदृष्ट्या अस्वस्थ करणारे असू शकते. ही अस्वस्थता अपरिहार्य परंतु दिर्घकालीन यशासाठी आवश्यक आहे. अशा वेळी (मनाच्या शांततेसाठी का असेना) व्यावसायिक सल्ला मोलाचा ठरतो.
शेवटचेः शीर्षकासाठी मूळ ओळीमध्ये केलेल्या फेरफाराबद्दल माफी मागून मी असे म्हणेन की गुंतवणूकीच्या जगातही ‘घटाघटांचे रुप आगळे आणि प्रत्येकाचे दैव वेगळे’ असल्यामुळे कधी कोणत्या मालमत्ता वर्गाच्या मुखी ‘लोणी’ पडेल आणि कोणाच्या ‘अंगार’ हे सांगता येत नाही. त्यामुळे पोर्टफोलिओमध्ये वेगवेगळी ‘मडकी’ असणे अत्यावश्यक आहे.
किंबहुना ते गुंतवणूकदाराच्या ‘शहाण’पणाचे व्यवच्छेदक लक्षणच आहे.
तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:
Financial decisions can be considered in the context of your goals, time horizon and individual circumstances rather than short-term market movements.