अर्थ वल्लभ

जे वेड मजला लागले…

17 Feb 2025 • 1 min read

जे वेड मजला लागले…

जुन्या आयकर कायद्याच्या कलम ८०(सी) अंतर्गत करपात्र उत्पन्नातून विविध गुंतवणुकांवर कर वजावट मिळत असे.पहिल्यांदा भाजप सत्तेवर आल्यानंतर २०१४ मध्ये ही वजावट एक लाखांवरून दीड लाख करण्यात आली. दुसऱ्या बाजूला एनपीएस गुंतवणुकीवर अतिरिक्त ५० हजाराची वजावट दिली. कर वजावट मर्यादा महागाईला अनुसरून तीनचार वर्षांनी वाढणे अपेखीत होते. मागील अकरा वर्षात सामान्य आयकरदात्यांना सरकारने आयकरात मिळणाऱ्या वाजावटीत वाढ केली नव्हती. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वजावटीची ही अपेक्षा नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पात पूर्ण केली. पगारदार मध्यमवर्गासाठी १२ लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त करून केंद्र सरकारने कर रूपात मिळणाऱ्या १ लाख कोटींवर पाणी सोडल्याचे अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात नमूद केले.अशा प्रकारे अर्थव्यवस्थेतील मंदावलेल्या उपभोगाला (कंझंम्शन) चालना दिल्याचे मानले जाते. मागील वर्षभरात उपभोग या संकल्पनेतील अनेक उद्योग क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात त्यांच्या सप्टेंबर २०२४ मधील उच्चांकी दरा पासून किमान ३५-४० टक्क्यांनी घसरण झाली आहे. फार्मा आणि ‘एफएमसीजी’ बचावात्मक उद्योग क्षेत्रे मानली जात असली तरी या घसरणीचा फटका या उद्योगातील कंपन्यांना बसल्याचे दिसते. मागील पाच सहा महिन्यांत या संकल्पनेतील ‘एफएमसीजी’, किरकोळ विक्री दालने आणि वाहन उद्योगातील कंपन्यांची कामगिरी कमालीची खालावलेली दिसत आहे. अर्थसंकल्पातील घोषणा आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चित करणासाठी आठव्या वेतन आयोगाची घोषणा आणि उपभोग संकल्पनेतील उद्योगांचे घसरणीपश्चातचे आकर्षक मुल्यांकन यामुळे आगामी ५-७ वर्षांच्या कालावधीसाठी कंझंम्शन फंडात गुंतवणूक केल्यास १२ ते १४ टक्के परतावा मिळण्याची अपेक्षा आहे. उपभोग ही संकल्पना अनेक उद्योगक्षेत्रांना व्यापणारी आहे. टिकवू वस्तू, बँका, वाहन उद्योग, गैरबँकिंग कंपन्या, रोजच्या वापरातील वस्तू, किरकोळ साखळी दालने, आरोग्य निगा,माध्यमे आणि मनोरंजन, वस्त्रोद्योग या व अन्य उद्योगांचा समावेश होतो.
कंझंम्शन फंड गटात मालमत्ता क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेला कॅनरा रोबेको कंझ्युमर ट्रेंड्स फंड, कामगिरीत सातत्य राखल्याने नव्याने ‘एसआयपी’ साठी शिफारस करावीशी वाटते. कॅनरा रोबेको कंझ्युमर ट्रेंड्स फंडाला १६ वर्षांचा इतिहास आहे. गेल्या पाच ते सात वर्षांतील या फंडाची कामगिरी लक्षवेधी असली तरी हा थीमॅटिक फंड असल्याने, मध्यम ते उच्च जोखीमांक असलेल्या गुंतवणूकदारांनीच या फंडाचा विचार करावा. सॅटेलाइट पोर्टफोलिओचा एक भाग म्हणून, एकूण मासिक एसआयपचा लहान हिस्सा या फंडात गुंतविण्याचा विचार केल्यास पोर्टफोलिओचा परतावा वाढविण्यास ही एसआयपी मदत करू शकेल. फेब्रुवारी २०२० (कोरोन टाळेबंदी लागण्यापूर्वी) ते जानेवारी २०२५ या पाच वर्षाच्या कालावधीत फंडाने एसआयपी वर १७.९२ टक्के वार्षिक परतावा दिला आहे, तर स्थापनेपासून फंडाचा वार्षिक एसआयपी परतावा १६.४९ टक्के आहे. फंडाच्या १० वर्षाच्या कालावधीतील पाच वर्षाच्या दैनिक चलत सरासरीचा (रोलिंग रिटर्न) विचार केल्यास फंडाने ९२ टक्क्यांपेक्षा अधिक वेळा ‘निफ्टी इंडिया कंझम्पशन टीआरआय’ या मानदंड सापेक्ष सरस कामगिरी केली आहे. या फंडाला एस एन लाहिरी, योगेश पाटील, रवि गोपालकृष्णन, कृष्ण संघवी या सारखे दिग्गज निधी व्यवस्थापक लाभले, जे पुढे दुसऱ्या फंड घराण्याचे मुख्य गुंतवणूक अधिकारी झाले. ऑक्टोबर २०१६ पासून या फंडाची धुरा श्रीदत्त भांडवलदार यांच्या कडे आहे. ऑक्टोबर २०२१ पासून एनेट फर्नांडिस यांची सहनिधी व्यवस्थापक म्हणून नेमणूक झाली आहे.
कॅनरा रोबेको कंझ्युमर ट्रेंड्स फंड, सर्व मार्केटकॅप कंपन्यांत गुंतवणूक करतो. गुंतवणुकीत ५३.१२ टक्के लार्जकॅप ३३.०६ टक्के मिडकॅप आणि ९.४ टक्के स्मॉलकॅप असून उर्वरित मालमत्ता आभासी रोकड रुपात आहे. फंडाच्या गुंतवणुकीत जानेवारी अखेरीस ४७ कंपन्या होत्या या कंपन्यांत सर्वाधिक गुंतवणूक वित्त पुरवठा (बँका आणि गैर बँकिंग कंपन्या-एचडीएफसीबँक, आयसीआयसीआय बँक बजाज फायनांस), एफएमसीजी (ज्योथी लॅब्ज, गोदरेज कंझ्युमर, मिसेस बेक्टर्स फूड स्पेशालिटीज, आयटीसी), वाहन उद्योग (मारुती, महिंद्रा, टाटा मोटर्स बजाज ऑटो) दूरसंचार सेवा (एअरटेल), मद्य (युनायटेड ब्रिवरेजेस), नागरी विमान वाहतूक (इंटरग्लोब एव्हीएशन), साखळी किरकोळ विक्री दालने (ट्रेण्ड, विशाल मेगा मार्ट) आरोग्यसेवा (जेबी केमिकल्स), कृत्रिम पेये (वरुण ब्रेवरेजेस), आदरातिथ्य (इआय हॉटेल्स) मनोरंजन (आयनॉक्स पीव्हीआर), ग्राहकोपयोगी वस्तू (व्हीआयपी इंडस्ट्रीज, केइआय इंडस्ट्रीज, टायटन, व्होल्टास पेज इंडस्ट्रीज)या व्यतिरिक्त सर्वसाधारण विमा, ग्राहकोपयोगी मंच (झोमॅटो) या सारखी कंपन्यांचा समावेश आहे.
पोर्टफोलिओच्या ३ टक्क्यांपेक्षा अधिक असलेल्या वैयक्तिक समभागांची संख्या ९ आहे. पोर्टफ़ोलिओ विकेंद्रित करून जोखीम कमी केली आहे. फंडाच्या गुंतवणुकीसाठी निवडलेल्या कंपन्यांची गुणवत्ता आणि मूल्य यांचा योग्य मिलाफ केला आहे. अर्थ संकल्प जाहीर झाल्या नंतर ‘कंझंम्शन फंडां’ची चर्चा सुरु होती. सखोल माहिती, आणि निधी व्यवस्थापकांची मते जाणून घेण्यासाठी विविध फंड घराण्यांच्या ‘कंझंम्शन फंडां’च्या निधी व्यवस्थापाकांशी चर्चा केली. मागील तीन तिमाहीतपासून मागणीचा कल मंदावला आहे, विशेषत: ग्रामीण मागणी मंदावली आहे. तसेच ग्रामीण आणि शहरी मागणीतील वृद्धी दरांमधील तफावत अधिक रुंदावली आहे. शेती आणि शेतीपूरक उद्योगांतील समाधान कारक नफ्यामुळे ग्रामीण मागणीत वाढ होण्याची अपेक्षा आहे. येत्या काही महिन्यांत ग्रामीण भारतात मागणी वाढण्याची अपेक्षा बहुतेक निधी व्यवस्थापकांना आहे. आणखी दोन ते तीन तिमाही नंतर कंपन्यांच्या नफ्यात वाढ दिसू लागेल. सरकारने १ लाख कोटी ग्राहकांच्या हातात शिल्लक ठेवले म्हणून लगेच मागणी वाढेल अशी शक्यता बिलकुल नाही. मागणी नेहमीच संथ गतीने वाढत असते कारण मागणी ही ग्राहकांच्या सवयीशी निगडीत असते. हातात पैसे उरले म्हणून कोणी उगाचच इंडिगोच्या विमानाने फिरणार नाही किंवा गरज नसतांना मारुती किंवा महिंद्राचे वाहन खरेदी करणार नाही. हातात शिल्लक राहिलेले १ लाख कोटी, कसे खर्च होतात या वर उपभोग वाढेल की बचत कर्ते कर्जफेडीसाठी वापरता की भविष्यातील खर्चासाठी एसआयपी करतात या वर बरेच काही अवलंबून असेल. परंतु या निमित्ताने ‘कंझंम्शन’ फंडांकडे बदलेल्या परीस्थित नव्या दृष्टीकोनातून पहावे या साठी हा अट्टहास केला. जर बचतीच्या शिल्ल्कीतून एसआयपी करायची असेल तर या फंडाचा गुंतवणूकदारांनी जरूर विचार करावा. म्हणूनच विचारावेसे वाटते ‘जे वेड मजला लागले, तुजलाहि ते लागेल का ?

तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:

Keep in Perspective

Financial decisions can be considered in the context of your goals, time horizon and individual circumstances rather than short-term market movements.

Have a Financial Question?

Get greater clarity around your financial goals and investment decisions.

Start a Conversation →
Important Information

This article is intended for general informational and educational purposes only. It should not be treated as a guarantee of returns or a recommendation to invest in any particular mutual fund scheme or financial product. Mutual fund and other market-linked investments are subject to market risks. Investment suitability depends on individual goals, circumstances, time horizon and risk considerations. Please read relevant scheme-related documents carefully before investing.

Scroll to Top