‘एसआयपी’ यशोगाथेचा यात्रिक

 

हभप बाबा महाराज सातारकर, ज्ञानेश्वर महाराजांच्या ‘माझे जीवीचे आवडी पंढरपुरा नेईन गुढी’ या अभंगावर निरूपण करताना एक सुंदर दृष्टांत देतात. आवड आणि इच्छा यांच्यातील फरक सांगताना बाबा महाराज म्हणाले, ‘‘आवड जी जन्मापासून असते आणि इच्छा ही जन्मानंतर निर्माण होते. इच्छेची पूर्ती होऊ शकते. जर एखाद्या गोष्टीची आवड असेल तर आवडीची पूर्तता होऊ शकत नाही. इच्छा होण्यासाठी काही तरी कारण घडावे लागते, तर आवड ही निनिर्मित असते. आता हे पहा, प्रवचनाला बसल्यावर लांबून जरी भजी तळत असल्याचा खमंग वास आला तर प्रवचन सोडून भजी खाण्याची इच्छा होते; परंतु ताटात वर्षांनुवष्रे मसालेभात वाढला तरीही ती आवड तशीच राहते.’’

गुंतवणूक किंवा पोर्टफोलिओ मॅनेजमेंट या विषयाशी दुरान्वये संबंध नसलेल्या घरात जन्मलेली व्यक्ती गुंतवणूक आणि संपत्तीनिर्मितीच्या व्यवसायात केवळ आवड म्हणून आपल्या इच्छेने आली, असे आयडीएफसी म्युच्युअल फंडाचे सीईओ विशाल कपूर यांच्याबाबत म्हणता येईल. कपूर यांचा जन्म अशा कुटुंबात झाला की ज्या कुटुंबात त्यांचे आजोबा इंजिनीयर, वडील आणि काका हेदेखील इंजिनीयर. मोठा भाऊसुद्धा इंजिनीयर. या सर्वानी इंजिनीयिरगचे शिक्षण घेऊन जबाबदारीची पदे भूषविली. विशाल कपूर यांची शैक्षणिक गुणवत्ता उत्तम असल्याने साहजिकच वडिलांची इच्छा मुलाने इंजिनीयिरगचे शिक्षण घ्यावे अशीच होती. कोलकात्याच्या डॉन बॉस्को शाळेतून उत्तम गुणांनी शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. मुलाने मग शास्त्र शाखेत प्रवेश घ्यावा आणि इंजिनीयर व्हावे, असा त्या कुटुंबातील शिरस्ता होता. अन्य विद्या शाखेत प्रवेश घेण्याचा विचार त्यांच्या कुटुंबातील मुलांना शिवतही नसे. अपवाद केवळ हाच. विशाल यांनी कोलकात्याच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयातून बी.कॉम.ची पदवी मिळविली. ज्या काळात पारंपरिक कुटुंबात शेअर बाजाराला सट्टा समजत असत त्या काळात त्यांनी शेअर बाजारात गुंतवणुकीला सुरुवात केली. आपल्या बचतीसाठी बँक मुदत ठेवी आणि एखादी विमा पॉलिसी या गुंतवणूक साधनांची निवड केली जात असे त्या काळात विशाल कपूर यांनी वडिलांचे काही पसे शेअरमध्ये गुंतवून वडिलांना नफा मिळवून दिला.

भारतामध्ये बचतीचा दर अधिक असूनही सेवा निवृत्तीपश्चात एखाद्या व्यक्तीस आपल्या आप्तेष्टांवर का अवलंबून राहावे लागते, हा प्रश्न त्यांना नेहमीच सतावत असे. ते जसे शिक्षित होत गेले तसे तसे त्यांना कळून चुकले की, निवृत्तीपश्चात उदरनिर्वाहासाठी केवळ मोठी बचत पुरेशी नाही तर त्या बचतीवर होणाऱ्या नफ्याची टक्केवारीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. सर्वसामान्य निवडत असलेली बँकेच्या मुदत ठेवी, पीपीएफ, विमा पॉलिसी इत्यादी गुंतवणूक साधने मुख्यत्वे निश्चित उत्पन्न देणाऱ्या वर्गात मोडणारी असल्याने त्यांच्या गुंतवणुकीवर होणारा नफ्याचा दर हा महागाई दराहून कमी असतो. म्हणूनच बचतीचा दर अधिक असूनही निवृत्तीपश्चात आपल्या आप्तेष्टांवर अवलंबून राहावे लागते. नेमक्या याच विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी निधी व्यवस्थापन किंवा गुंतवणूक या विषयात आपले करिअर करण्याचे निश्चित केले. ही संधी त्यांना त्यांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम संपता संपता चालून आली.

आयआयएम किंवा आयआयटीसारख्या संस्थांतून बाहेर पडणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना काही मळलेली वाट पसंत नसते. कोणाला स्वत:च्या पाऊलखुणा पायवाटेवर उमटवण्यात स्वारस्य असते. आयआयएम, अहमदाबादमधून बाहेर पडणारे विशाल कपूर अशा विद्यार्थ्यांपकी एक होते ज्यांना नव्याने सुरू होणाऱ्या एका व्यवसायाची सुरुवात करण्याची संधी मिळाली. आपल्या देशात आर्थिक उदारीकरणानंतर खासगी मालकीच्या म्युच्युअल फंडांनी व्यवसायास सुरुवात केली होती. आयटीसी थ्रेड नीडल नावाचा एक म्युच्युअल फंड या देशात त्या काळी कार्यरत होता. या म्युच्युअल फंडाची मुहूर्तमेढ करणारी जी काही मोजकी मंडळी होती त्यापकी विशाल कपूर एक होते.

‘‘कॉमन अ‍ॅप्लिकेशन फॉर्म, म्युच्युअल फंडाच्या जाहिरातीसाठी करावयाची पोस्टर्स इथपासून ते स्ट्रॅटेजी सगळ्या गोष्टी करायला मिळाल्या. एखाद्या संस्थेच्या सुरुवातीच्या काळात त्या संस्थेबरोबर जोडले जाऊन काम करायला मिळणे हा वेगळाच अनुभव असतो.’’ विशाल कपूर आपल्या जुन्या आठवणीत रमले तर ही गोष्ट आवर्जून सांगतात.

ते या म्युच्युअल फंडाचे हेड ऑफ सेल्स झाले. याच दरम्यान त्यांची पहिल्यांदा भेट झाली. पुढे आयटीसीने वित्तीय सेवा क्षेत्रातून बाहेर पडण्याचे ठरविल्याने हा म्युच्युअल फंड विकण्याचा निर्णय झाला. या फंड घराण्याचे नामकरण ‘झुरीच’ असे झाले. काही वर्षांनी या नव्या मालकांनीसुद्धा त्यांचा व्यवसाय विकण्याचा निर्णय घेतला आणि झुरीचच्या सर्व योजना एचडीएफसीच्या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. दरम्यानच्या काळात विशाल कपूरही म्युच्युअल फंड सोडून अमेरिकन एक्स्प्रेस बँकेत दाखल झाले. याचे कारण बँकेत थेट गुंतवणूकदाराशी संवाद साधता येतो. त्यामुळे ग्राहकाच्या गरजांचे आकलन होते. म्युच्युअल फंडात गुंतवणूकदाराशी थेट संपर्क होत नसतो. पुढे त्यांना बढती मिळाली. बँकेच्या न्यूयॉर्क येथील मुख्यालयात त्यांनी दोन वष्रे डिरेक्टर ग्लोबल प्रोडक्ट मॅनेजमेंट या पदावर काम करून ते भारतात परत आले. भारतात परतल्यावर हेड फायनान्शियल अ‍ॅडव्हायजरी म्हणून ते बँकेत काम पाहू लागले. त्यांनी स्टँडर्ड चार्टर्ड बँकेत २०१० ते २०१६ दरम्यान विविध पदांवर काम केले. ते स्टँडर्ड चार्टर्ड बँकेत व्यवस्थापकीय संचालक आणि वेल्थ मॅनेजमेंट विभागाचे प्रमुख या पदावर होते. या पदावर असतांना बँकेच्या अतिश्रीमंत ग्राहकांना गुंतवणूक सल्ला देणाऱ्या विभागाचे नेतृत्व त्यांनी केले. सप्टेंबर २०१६ पासून ते आयडीएफसी म्युच्युअल फंडाचे सीईओ आहेत.

कुणाच्या जीवनाला चौकट मानवते, कुणाचे जीवन रांगोळीच्या कणांसारखे विस्कटण्यात रमते. रांगोळीतला प्रत्येक कण पडेल तिकडे आपले रंग घेऊन पडतो. तशी ही माणसे जातील तिथे आपले रंग नेतात. घराच्या चौकटीत समाजाच्या शिस्तबद्ध चौकटीत त्या रंगाचा जुळता रंग नाही सापडत त्यांना. तर काही व्यक्तींना कायम चौकटीचे भान असते. सत्ता आणि पद यांच्यामुळे चौकट मोडणे शक्य असले तरी चौकट मोडण्याऐवजी आपल्याला त्या चौकटीत सामावण्यासाठी हे कायम प्रयत्नशील असतात. मग ही चौकट औपचारिक असो किंवा नसो यांच्या आजूबाजूला वावरताना अन्य व्यक्तींना या अदृश्य चौकटीचे कायम भान ठेवावे लागते. विशाल कपूर हे कायम औपचारिक आणि अनौपचारिक चौकटींचा आदर करत आले आहेत. इंग्रजीत ज्याला ‘जंटलमन’ म्हणतात त्या व्याख्येत बसणारे हे व्यक्तिमत्त्व आहे. बहुराष्ट्रीय बँकांतून अधिकाराच्या पदांवर काम केल्यामुळे असेल, पण यांच्या वागण्यातील औपचारिकता कधीच सुटत नाही.

आयडीएफसी म्युच्युअल फंड आघाडीच्या दहा फंड घराण्यातील एक असूनदेखील ‘एनएफओ’च्या माधमातून वारंवार पसे गोळा न करणारे हे अपवादात्मक घराणे आहे. अपवाद वगळता यांनी क्लोज एंडेड फंडसुद्धा आणलेले नाहीत. याबाबत त्यांची मते स्पष्ट आहेत. ‘‘नवीन फंड आणण्याची आमची कधीही तयारी असते. आमचा गृहपाठ कायमच सुरू असतो. मात्र आमच्या सध्याच्या योजना एखाद्या गुंतवणूकदाराच्या गरजांची पूर्तता करण्यास पुरेशा आहेत. उगाचच भारंभार फंड आणून आमच्या वितरकांना आणि गुंतवणूकदारांना गोंधळात टाकण्याची आम्हाला गरज वाटत नाही. ‘सेबी’चा प्रमाणीकरण आणि फंडांचे वर्गीकरणाविषयीचा आदेश येण्याआधी २०१७ मध्ये आम्ही आमच्या फंडांची पुनर्रचना केली. आम्ही आमच्या गुंतवणूकदारांना सध्या जे देत आहोत त्यापेक्षा अधिक काही देऊ शकू, तेव्हा आम्ही नक्कीच नवीन फंडाचा विचार करू. आमची मालमत्ता किती वाढली यापेक्षा आम्ही आमच्या मालमत्तेवर गुंतवणूकदारांना किती परतावा दिला हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे,’’ असे त्यांचे नेहमीच सांगणे असते. हेच विशाल कपूर आणि त्यांच्या फंड घराण्याचे वेगळेपण आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top