काय भुललासी…

 

रत्नागिरीत सड्यावरचा नंदू हेगेष्टे अस्वस्थपणे घरात फेऱ्या घालत होता. त्याने गुंतविलेल्या फंडाचा दर महिन्याला खात्यात जमा होणारा लाभांश मागील चार महिन्यांपासुन बँक खात्यात जमा झाला नव्हता. गुंतविलेले मुद्दल देखील कमी झाले होते. हे त्याच्या अस्वस्थतेचे कारण होते. नंदूला तो दिवस स्पष्ट आठवला. दोन वर्षांपूर्वी बँकेतील खात्यात जमा झालेल्या पैशाची मुदतठेव करावी असा विचार मनात यायला आणि नंदूला बँकेतून फोन यायला एकच गाठ पडली. नंदूचे बँक खाते रत्नागिरीतील मारुती मंदिरा जवळ असणाऱ्या एका खाजगी बँकेत होते. बँकेतून नंदूची आरएम आर्जवी पण ठाम स्वरात बोलत होती, “सर तुमच्या खात्यात बरेच पैशे शिल्लक आहेत. त्या पैशाची योग्य गुंतवणूक करण्यासाठी मी आपल्याला मदत करू इच्छिते. त्या साठी तुम्हाला बँकेत येऊन ‘केवायसी’ची औपचारिकता पूर्ण करणे गरजेचे आहे. तुम्ही आणि मॅडम जरा बँकेत याल काय?” तिच्या आर्जवाला नंदू नकार देऊ शकला नाही. नंदू तसा जन्माने अस्सल रत्नागिरीकर. त्यांच्या व्यावसायासाठी उघडलेले चालू खाते त्याच्या आजोबांपासून मारुती मंदिरा जवळील स्टेट बँकेत होते. या नवीन खाजगी बँकेने रत्नागिरीत कार्यालय सुरु केले तेव्हा नंदूने बँकेत प्रथम त्याचे बचत खाते आणि नंतर व्यवसायासाठी चालू खाते उघडले होते.

नंदूच्या आजोबांनी ब्रिटीशांच्या काळात डीस्ट्रीक्ट कोर्टाच्या समोर पान तंबाखू विड्या आणि सिगरेट विकणारी एक टपरीवजा दुकान सुरु केले. आलेल्या गिऱ्हाईकाचे स्वागत पिंक मारून करणाऱ्या बापू हेगिष्ट्याच्या पुढील पिढ्यांनी हा पारंपारिक धंदा वाढवला. रत्नागिरीत हेगिष्ट्ये कुटुंबाची गणना तालेवार व्यापारी कुटुंबात होते. तंबाखू जन्य वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या आयटीसीची नंदुकडे रत्नागिरी आणि लांजा तालुक्याची एजन्सी आहे. याशिवाय आयटीसीने ग्राहकोपयोगी वस्तूंचे उत्पादन सुरु केल्यानंतर या उत्पादनांचा वितरक म्हणून नंदूची निवड केली. या व्यतिरिक्त सिमेंट, रंग पीव्हीसीच्या पाण्याच्या टाक्या इत्यादी बांधकाम सामानाच्या विक्रीचे दुकान नंदूचे भाऊबंद सांभाळतात.

एफडीसाठी औपचारिकता पूर्ण करायला बँकेत गेलेल्या नंदूला काऊंटरवरील सुबक ठेंगणीने नंदूला चांगलेच भंडावून सोडले. बँक एफडी ऐवजी बँकेने प्रवर्तित केलेल्या विमा कंपनीची उत्पादने बँकेच्या म्युच्युअल फंडाचे वेगवेगळे फंड, सगळे नंदूला भंडावून सोडणारे होते. ही सुबक ठेंगणी बँकेच्या नव्यानेच वेल्थ विभागात प्रशिक्षण संपून दाखल झाली होती. नंदू तसा बँकेला नवीन नव्हता नंदू बँकेचा ‘प्रिव्हीलेज्ड कस्टमर’ होता. बँकेबरोबर ३० लाखाची रिलेशनशिप असलेल्यांनाच बँक ‘प्रिव्हीलेज्ड कस्टमर’ समजते. ती सुबक ठेंगणी बँकेत नवीनच होती. तिच्या साठी नंदू एक टार्गेट पूर्ण करण्याचे साधन होता. अस्वस्थ नंदूने अखेरीस न राहून अखेर बाबा मलुष्ट्याला दुकानांत चक्कर टाक असा व्होट्सअप मेसेज केला.

मेसेज वाचताच क्षणी बाबाचा उलट मेसेज आला. दुपारी दुकान उघडायच्या सुमारास ४ वाजे पर्यंत येतो. बाबा मलुष्टे आणि नंदू हेगीष्टे हे एकमेकांचे शाळू सोबती दोघे एकाच वर्षी शिर्के हायस्कूलमधून शालांत परीक्षेला बसले आणि उत्तीर्ण झाले. नंदू आणि बाबा आपल्या वैश्यवृत्तीला साजेसे आपापल्या कौटुंबिक व्यावसायात आले आणि मुळच्या व्यवसायाला नवीन व्यवसायाची जोड देत प्रगती केली. नंदू हेगीष्टयाने तंबाखू बरोबर अन्य व्यवसायात पदार्पण केले तर बाबाने आर्थिक सल्लागार होऊन विमा आणि म्युच्युअल फंड व्यवसायात यशाची शिखरे पादाक्रांत केली.

बाबा मलुष्टे आणि नंदू हेगीष्टे एकामेकाला उराउरी भेटले.”बोल काय काम काढलेस?” बाबा मलुष्टेने नंदूला विचारले.” बाबा ! राग मानू नकोस पण आपण वर्ग मित्र असूनही सल्ल्यासाठी मी तुझ्याकडे आलो नाही. माझ्याकडे जमलेले पैसे मी बँकेत एफडी करण्यासाठी गेलो होतो. पण माझ्या बँकेच्या आरएमने एफडी करण्या ऐवजी म्युच्युअल फंडात पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला आणि हा सल्ला मी मानला. दरमहा १ टक्का लाभांश मिळण्याची खात्री दिली होती. मी गुंतविलेल्या फंडापैकी एलअॅडटी हायब्रीड इक्विटीने मागील तीन महिन्यांपासुन लाभांश दिलेला नाही आणि माझ्या मूळ गुंतवणुकीची रक्कमसुद्धा कमी झाली आहे”, नंदू हताश होऊन म्हणाला.

“नंदू! तू माझा शाळेपासून चा मित्र आहेस. तुला माझ्या आणि मला तुझ्या तीन पिढ्या ठाऊक आहेत तरी तू गुंतवणूक बँकेच्या साल्याने केलीस. तुझ्या आरएमची आणि तुझी ओळख महिन्या भराची सुद्धा नाही तरी तू तिच्या सांगण्यावरून गुंतवणूक केलीस. तूच नव्हे तर अनेक लोक आपल्या ओळखीच्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे टाळतात. कारण आपल्या आर्थिक गुंतवणुका ओळखीच्या व्यक्तीस कळातील म्हणून. प्रत्यक्षात तुझ्या आर्थिक आणि मी तुझा सल्लागार नसूनही आरएमपेक्षा तुझ्या कौटुंबिक परिस्थितीची माहिती मला अधिक आहे. तुला तुझ्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या लाभांशाची गरज नव्हती. पण बँकेत एफडी करणारा माणूस जणू मासिक व्याजा साठीच ती रक्कम गुंतवितो असा समज करून तिने तुला मासिक लाभांश देणाऱ्या हायब्रीड इक्विटी फंडांत गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. तुझा गुंतवणूक करण्यामागचा उद्देश चार पैसे बाजूला पडावे हा होता आरएमचा उद्देश तिला असलेले टार्गेट पूर्ण करणे हा होता. तिला तुझ्या वित्तीय ध्येयाशी देणे घेणे नव्हते.” बाबा मलुष्टे म्हणाला.

“राहिला प्रश्न लाभाशांचा , सेबीच्या नियमांनुसार फंडाच्या राखीव निधीतून मागील एका वर्षात कमी झालेल्या एनएव्ही इतकी रक्कम बाजूला काढून उर्वरित रक्कमेचे लाभांशाच्या रूपाने वाटप करता येते. मागील वर्षभरात कमी एनएव्हीत झालेल्या घसरणी इतकी रक्कम राखीव निधीतून बाजूला केल्यास लाभांश वाटप करण्यास वाव नसल्याने या फंडाने लाभांश जाहीर केलेला नाही. लाभांशाचे वाटप फंडाला झालेल्या नफ्यातून करायचे असते. तेव्हा काळजी करण्याचे कारण आहे असे मला वाटत नाही. जेव्हा फंडाची गुंतवणूक असलेल्या समभागांच्या किंमती वर जातील आणि फंडाला नफा होईल तेव्हा फंड व्यवस्थापक संचालक मंडळाला लाभांशाची शिफारस करतील. तेव्हा तू निर्धास्त राहा” बाबा म्हणाला. बापू हेगिष्ट्याला सिगारेट आणि तंबाखू विकतांना “तंबाखू सेवन आरोग्यास हानिकारक आहे अशी पाटी लावावी लागली नाही. आता ती लावावी लागते. तंबाखू सेवन करणारे या वैधानिक इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत धुम्रपान करतात. ‘म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बाजार जोखमींच्या अधीन असते गुंतवणूक करण्यापूर्वी फंडाचे माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचा या सेबीच्या वैधानिक इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून तू गुंतवणूक केलीस म्हणून तू आज असवस्थ झाला आहेस.” बाबा म्हणाला.

म्युच्युअल फंड विषयी अधिक माहितीसाठी खालील Form भरा:

[contact-form-7 id=”22″ title=”Contact Me”]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top