सुखकारक की निराशा?

 

जागतिक वाड्.मयात पत्रवाड्.मयाला अनन्य साधारण महत्व आहे. महाराष्ट्रात आंग्लपूर्व काळात जे महत्व पेशवे दप्तराला आहे तेच महत्व आंग्लोत्तर काळात असल्याने पत्र वाड्.मयाला आहे. सोमण कुलोत्पन्न अजित सोमण (पत्र पंडित रघुनाना सोमणांचे चवथे वंशज) यांनी लिहिलेले पत्र आमच्या हाती पडले. त्याचा मजकूर खालील प्रमाणे…

चि. रुख्मिणीस,

अनेक आशीर्वाद

काल दिल्लीत येऊन पोहचलो. दिल्लीत थंड हवा असली तरी नॉर्थ ब्लॉकच्या आजूबाजूची हवा आगामी अर्थसंकल्पामुळे हळूहळू गरम होऊ लागली आहे. अर्थमंत्री जेटली हे हलवा तयार करण्याच्या कार्यक्रमात सहभागी झाले परंतु त्या नंतर वैद्यकीय उपचारासाठी अमेरिकेला रवाना झाले. येत्या शुक्रवारी अर्थसंकल्प कोण मांडणार या विषयीची अनिश्चितता होती. राष्ट्रपती भवनाने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकामुळे दूर ही अनिश्चितता आता दूर झाली असून   आपले मुंबईकर माटुंगा निवासी पियुष गोयल यांची हंगामी अर्थमंत्री म्हणून नेमणूक झाल्याने येत्या शुक्रवारी ते केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. स्वातंत्रोत्तर काळात पियुष गोयल यांच्या रूपाने पहिला हंगामी आणि पहिला मुंबईकर अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करेल. या आधी ‘सीडी देशमुख’ आणि मधु दंडवते या मुबईकर अर्थमंत्र्यांनी अर्थ संकल्प सादर केले तरी  त्यांचे लोकसभा मतदारसंघ अनुक्रमे कुलाबा आणि राजापूर होते. आगामी अर्थसंकल्प विद्यमान सरकारचा निवडणूक पूर्व शेवटचा अर्थसंकल्प असल्याने हा अर्थसंकल्प मागील चार अर्थसंकल्पांची सुधारित आवृत्ती असेल. या अर्थ संकल्पात ग्रामीण अर्थव्यवस्था शेतकरी आणि पायाभूत सुविधा विकावासावर भर असेल असे नॉर्थ ब्लॉकचा कानोसा घेतल्याने कळले.

एप्रिल नोव्हेंबर २०१८ दरम्यान मागील अर्थसंकल्पानुसार कर संकलनातील अंदाजे वाढ १४.४ टक्के होती. प्रत्यक्षात या काळात  कर संकलनातील वाढ अंदाजित वाढी पेक्षा अधिक म्हणजे १६. टक्के झाली. या उलट अप्रत्यक्ष कर संकालानातील अंदाजित वाढ अर्थसंकल्पात १९.२ टक्के गृहीत धरली होतो, परंतु जीएसटी मध्ये केलेल्या वर्षभरातील बदलांमुळे एप्रिल नोव्हेंबर २०१८ या काळातील वाढ केवळ ५.३ टक्के झाली. या काळात सरकारच्या महासुलातील वाढ ९.३ टक्के होती. सरकारने या कालावधीतील मागील वर्षाच्या तुलनेत बाजारातून ५.५ टक्के अधिक कर्ज घेतले. परंतु सरकारने बाजारातून कर्ज उचल कमी करून राष्ट्रीय अल्प बचत कोशातून अधिक कर्जाऊ रक्कम घेतली. परिणामी २०१९ ची प्रत्यक्ष वित्तीय तुट आणि अंदाजित तुट याच्यात फार फरक दिसला नाही.

केंद्र सरकारच्या महसुलातील वाढ मागील वर्षाच्या ८.४ टक्यांच्या तुलनेत वर्ष २०२० मध्ये अंदाजित वाढ १०.२५ टक्के असेल. सरकारने वस्तू आणि सेवा कराच्या २८ टक्के कर कक्षेतील काही वस्ती १८ टक्के करकक्षेत आणल्याने आणि २८ टक्के करकक्षा भविष्यात रद्द करण्याचे संकेत दिल्याने अप्रत्यक्ष करातील अंदाजित वाढ नगण्य असण्याची शक्यता अधिक दिसते. सरकारचा अंदाज पत्रकात भर गैर कर महसुलातून  उत्पन मिळविण्यावर असल्याचे आगामी अर्थसंकल्पात दिसून येण्याची शक्यता आहे. सरकार ‘5G’ च्या लिलावातून मोठा महासूल मिळविण्याचा प्रयत्न या अर्थ संकल्पात करेल या अर्थसंकल्पात सरकारचा प्रयत्न वर्ष २०२० ची अंदाजित वित्तीय तुट सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ३.३ टक्के म्हणजे मागील वर्षाच्या अंदाजा इतकीच राखण्याचा प्रयत्न असेल. वर्ष २०२० मध्ये सरकारची अंदाजित कर्ज उचल ५.७ लाख कोटी असण्याची शक्यता असेल.

२०१९ च्या अर्थ संकल्पात कृषी आणि ग्रामीण विकासासाठी स्वातंत्रोत्तर काळातील सर्वाधिक तरतूद होती. या अर्थ अर्थसंकल्पानंतर सरकारने निवडक कृषी उत्पन्नांच्या आधारभूत किंमतीत भरघोस वाढ करून आपली ग्रामीण आणि कृषी स्नेही धोरणांची ग्वाही दिली. मागील अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या आयुष्यमान भारत योजनेस चांगला प्रतिसाद लाभला असल्याने हि योजनेसाठी आगामी अर्थ संकल्पात भरघोस तरतूद असेल. सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या करातून मिळणाऱ्या महसुलाशी असलेल्या गुणोत्तर मागील आठ वर्षात सर्वोच्च असल्याने आगामी अर्थसंकल्पात ग्रामीण भागातील रस्ते शेतीसाठी सिंचन आणि राष्ट्रीय महामार्ग, सुखकारक रेल्वे प्रवास, आदी पायाभूत सुविधांसाठी भरघोस तरतूद अपेक्षित आहे. मागील अर्थसंकल्पा प्रमाणे एकही नवीन प्रवासी गाडीची घोषणा नसलेला हा अर्थ संकल्प असेल. निवडणूक पश्चात कोणतेही सरकार आले तरीही इन्फ्रास्ट्रक्चर फंडात केलेली गुंतवणूक लाभदायक ठरेल.

वैयक्तिक आयकराच्या सध्याच्या २.५० लाखां पर्यंतच्या करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेत वाढ आगामी अर्थ संकल्पात संभवत नाही परंतु सध्याची १.५० लाखाच्या करवजावटीच्या मर्यादेत २ लाखापर्यंत वाढ होऊ शकते. नोकरदारांना आणि वैयक्तिक करदात्यांना फारसा दिलासा देणारा हा अर्थ संकल्प नसेल. गोयल यांनी हा अर्थ संकल्प मांडला तरी या अर्थ संकल्पावर जेटलींची छाप असेल. या वेळचा अर्थ संकल्प पंक्तीत वाढल्या जाणाऱ्या जेवण सारखा असेल पंगतीत वाढले जाणारे अन्न ज्या प्रमाणे आचारी शिजवतात आणि वाढपी वाढतात त्या प्रमाणे जेटली यांनी तयार केलेला अर्थ संकल्प गोयल सादर करतील. पंगतीत बसल्यावर वाढपी ओळखीचा हवा. कारण तुम्ही कुठेही कोपऱ्यात बसला असाल तरी वाढपी ओळखीचा असल्यास तुम्हांला हवे ते व्यवस्थित मिळते’ असे पूर्वीचे लोक म्हणत. हा वाढपी ओळखीचा असला तरी पंगतीत वाढायला आल्यावर ओळख न दाखविण्याचीच शक्यता अधिक वाटते. नोकरदार जेष्ठ नागरिकांना वाढपी बघून न वाढताच पुढे जाण्याचा अनुभव येत्या शुक्रवारी येईल.

मुंबईत थंड हवा असल्याने तब्येतीची काळजी घे

तुझा,

बाबा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top