अद्वितीय

सध्याच्या भांडवली बाजारातील अस्थिरतेमुळे भारतीय गुंतवणूकदार एक सुरक्षित गुंतवणुकीचा पर्यायाच्या शोधात असतील. अनेकांची गुंतवणुक सरलेल्या मार्च महिन्याच्या तुलनेत नफ्यात असलेली दिसत आहे. अनेक गुंतवणूकदार कडू स्मृती मागे सोडून आपल्या वित्तीय ध्येयांची नव्याने आखणी करतांना दिसत आहेत. अशा परिस्थितीत सुज्ञ गुंतवणूकदार अंतरराष्ट्रीय समभाग गुंतवणूक फंडांचा नक्कीच विचार करीत असतील. भारतीय गुंतवणूकदारांची आंतरराष्ट्रीय गुंतवणूक करणाऱ्या फंडात गुंतवणूक करण्याचा कल वाढत असल्याने अनेक फंड घराणी अशा प्रकारचे फंड भारतीय गुंतवणूकदारांना उपलब्ध करून देत आहेत. अर्थव्यवस्था ६ ते ७ टक्के दराने वाढण्याची शक्यता असणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेतील निवडक समभाग आणि आकाराने जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेतील सर्वात मोठ्या कंपन्यांच्या समभागात गुंतवणूक करणाऱ्या फंडाची प्राथमिक विक्री २८ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. प्रिन्सिपल म्युच्युअल फंडांचा प्रिन्सिपल लार्जकॅप फंडाची प्राथमिक विक्री हा फंड एकूण मालमत्तेच्या कमाल ८५ टक्के मालमत्ता भारतात सूचीबद्ध असलेल्या लार्जकॅप कंपन्यांत तर कमाल १५ टक्के गुंतवणूक अमेरिकेत सूचीबद्ध असलेल्या लार्जकॅप कंपन्यांत गुंतवणूक करण्याचे ‘सेबी’कडे दाखल केलेल्या माहिती पत्रकात नमूद करण्यात आले आहे. भौगोलिक वैविध्य आणि लार्जकॅप गुंतवणूक असलेला या प्रकारचा फंड भारतीय गुंतवणूकदारांना पहिल्यांदाच उपलब्ध झाला आहे. या फंडासारखा दुसरा फंड उपलब्ध नसल्याने एका अर्थी हा फंड अद्वितीय म्हणायला हवा.

प्रिन्सिपल फंड घराण्याकडे एक लार्जकॅप फंड होता. परंतु ‘सेबी’च्या फंड वर्गवारी नंतर या फंडाला फोकस्ड फंडात रुपांतरीत करून फंड घराण्याने या फंडाचे नामकरण ‘प्रिन्सिपल फोकस्ड मल्टीकॅप फंड’ असे केले. ‘सेबी;च्या निकषांनुसार एखाद्या फंडाला लार्जकॅपगटात स्थान मिळविण्यासाठी किमान ८० टक्के गुंतवणूक भारतीय बाजारात सूचीबद्ध असलेल्या भांडवली मूल्यनुसार पहिल्या १०० कंपन्यांत करणे सक्तीचे असते. हा फंड एकूण मालमत्तेच्या कमाल ८० टक्के गुंतवणूक भारतीय लार्जकॅप कंपन्यांच्या समभागात करणार असल्याने हा फंड लार्जकॅप गटात स्थान मिळण्यास पात्र ठरतो. उर्वरित १५ टक्के गुंतवणूक अमेरिकेत सूचीबद्ध असलेल्या आणि ५० अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा अधिक भांडवली मूल्य असलेल्या कंपन्यांतून गुंतविण्यात येईल. प्रिन्सिपल लार्ज कॅप फंड मूलभूत संशोधनावर असेल. उद्योग क्षेत्राबाबत फंड घराणे अज्ञेयवादी दृष्टिकोन बाळगून असून ‘व्हॅल्यू’ पेक्षा ‘ग्रोथ ओरीएंटेड’  समभागांकडे निधी व्यवस्थापकांचा कल असेल असे संकेत निधी व्यवस्थापकांनी दिले आहेत. थोडक्यात समभाग निवड किंमत उत्सर्जन गुणोत्तरावर आधारित मुल्यांकनापेक्षा उत्सर्जनाच्या वृद्धीदरावर ठरेल.

गुंतवणुकीची शिफारस करण्यापूर्वी फंडाबाबत न पटलेल्या गोष्टींची माहिती एक फंड विश्लेषक म्हणून फंडाच्या प्रस्तावित मानदंडाच्या निवडीशी सहमत नाही. ‘निफ्टी १०० टीआरआय’ हा संपूर्णपणे देशी निर्देशांक आहे. जर फंड अमेरिकेतील लार्जकॅप मध्ये गुंतवणूक करणार आहे तर १५ टक्के एसअॅण्डपी १०० आणि ८५ टक्के ‘निफ्टी १०० टीआरआय’ असे प्रमाण योग्य ठरेल असते. भारतात असे अनेक फंड आहेत ज्या फंडाची कामगिरी एकाहून अधिक मानदंडांसोबत निश्चित गुणोत्तरात तपासली जाते. याच न्यायानुसार या फंडासाठी दोन मानदंडाची निवड आणि प्रमाण निश्चित करणे आवश्यक होते. गुंतवणुकीत परदेशी समभाग परंतु मानदंडात परदेशी निर्देशांकाच्या अभावामुळे या फंडाची कामगिरी उजवी दाखवण्याची किमया फंड घराण्याने साधली आहे.

लार्ज कॅप फंड कमी अस्थिर असल्याने हे समभाग मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांच्या तुलनेत अधिक सुरक्षित कंपन्या आहेत. या कंपन्यांचे ताळेबंद सुधृढ असल्याने कोरोन सारख्या प्रसंगाला तोंड देण्यास या कंपन्या समर्थ असतात साहजिकच लार्ज्कॅप गुंतवणूक करणारे फंड तुलनेने अधिक सुरक्षित मानले जातात. लार्जकॅप समभागांचे लाभांश वाटपाचे प्रमाण अधिक असते. परंतु अशा फंडांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी काही जोखमीच्या बाबी विचारात घेतले पाहिजेत. वॉरेन बफे यांनी म्हटल्याप्रमाणे, कोरोनने जगाला नेमकी किती हानी पोहचली हे कळून येण्यास काही काळ जावा लागेल. त्यामुळे अल्प ते मध्यम मुदतीत आपले पैसे दुप्पट किंवा तिप्पट होतील अशी समजूत खात्रीने भ्रम ठरेल. या फंडाला २० टक्क्यांपर्यंत रोखे साधनांत गुंतवणुक करण्याची मुभा असल्याने निधी व्यवस्थापक अनेकदा ‘कॅशकॉल’ घेण्याची शक्यता असून हा ‘कॅशकॉल’ काही काळासाठी परताव्यावर परिणाम करू शकेल. परदेशी गुंतवणूकीला चलन अस्थिरतेला सामोरे जावे लागते. हा धोका विस्थापित करता येणार नाही.

अमेरिकन गुंतवणूक गुंतवणूकदाराला स्थैर्य देते. उदाहरणार्थ, माहितीपत्रकात म्हटल्यानुसार, पोर्टफोलिओमध्ये एसअॅण्डपी ५०० चा समावेश केल्यास (८५ टक्के निफ्टी १०० टीआरआय आणि १५ टक्के  एसअॅण्डपी ५००) एकत्रित निर्देशांकाने ११ वर्षांपैकी ७ कॅलेंडर वर्षे गुंतवणुकीने नफा झाल्याचे दिसते. परंतु मागील दहा वर्षात ‘निफ्टी १०० टीआरआय’ आणि ‘एसअॅण्डपी ५००’ मध्ये बरेच बदल आणि निर्देशांकन ठरविण्याच्या पद्धतीत (फ्री फ्लोट) झालेले बदल लक्षात घेतले तर हा दावा जशाचा तसा स्वीकारता येणार नाही.

 जागतिक बँकेच्या एका अहवालानुसार जगाच्या व्यापारात भारतीय कंपन्यांचा वाट फक्त ३ टक्के आहे. या उलट विकसित अर्थव्यवस्थांमध्ये मोठा वाटा जागतिक ग्राहकांचा आहे (उदाहरणार्थ अमेरिकेच्या कंपन्यांची सरासारी ४१ टक्के विक्री अमेरिकेच्या बाहेरच्या ग्राहकांकडून होते) जगतीककरणाचा वेग लक्षात घेता, भारतीय गुंतवणूकदारांना जागतिक अर्थव्यवस्थांच्या लाभार्थी असणाऱ्या कंपन्यांत गुंतवणूक करण्याची संधी या फंडाच्या गुंतवणुकीतून साधता येईल.

असे अनेक घटक आहेत ज्या कारणांमुळे गुंतवणुकीत जागतिक समभाग गुंतवणूक असणे गरजेचे आहे. सर्वात प्रमुख म्हणजे जागतिकस्तरावर गुंतवणूकीचे विकेंद्रीकरण करून जोखीम कमी होण्यास मदत होते. भिन्न बाजारांच्या जोखीम पातळी भिन्न असते. आमच्या गुंतवणूकीच्या पोर्टफोलिओचा काही भाग वेगवेगळ्या देशांना केल्याने गुंतवणूकदारांना कार्यक्षम पद्धतीने जोखीम कमी करण्यास मदत होते. भारतीय गुंतवणूकदारांना उपलब्ध नसलेल्या जागतिक ग्राहकमान्य आणि तंत्रज्ञान केंद्रित कंपन्या आंतरराष्ट्रीय भांडवली बाजारात सूचीबद्ध आहेत. गुंतवणुकीला थोडीशी विविधता आणल्याने गुंतवणुकीला स्थैर्य मिळते. जेणेकरुन भारतीय बाजारामध्ये चढ-उतार होत असला तरीही विदेशातील गुंतवणूकीचा एक लहान भाग सुरक्षित असतो.

अमेरिकेत अॅपल गुगल कोकाकोला, अमेरीकन एक्स्प्रेस बँक सिटी बँक मायक्रोसॉफ्ट या सारख्या जगातल्या काही सर्वात शक्तिशाली कंपन्या सूचीबद्ध आहेत. तसेच अॅपल मॅकडॉनल्ड नेटफ्लिक्स या सारख्या अतिशय लोकप्रिय नाममुद्रा मालकीच्या असलेल्या कंपन्या भारतात सूचीबद्ध नाहीत. या कंपन्यांच्या नाममुद्रा भारतीयांना परिचित असल्या तरी या कंपन्यांतून गुंतवणूक करण्याची संधी भारतीयांना उपलब्ध नाही. डिजिटल सशक्तीकरणाने  तंत्रज्ञान-सक्षम अॅमेझॉन अलिबाबा सारखे अनेक मंच उदयाला आले आहेत. आणखी एक पैलू ज्याचा आपण विचार केला पाहिजे तंतज्ञानावर आधारित सेवा क्षेत्रात असलेल्या अनेक समभागांत बहुप्रसवा होण्याची क्षमता असते.

भारतातील गुंतवणूकदरांनी या फंडाकडे स्थानिक चलन विनिमयदराच्या अस्थिरतेवर मात करण्यासाठी पाहायला हवे शिवाय परकीय भांडवली बाजारात नोंदलेल्या कंपन्यांचे वित्तीय अनुपालन कठोर असते. दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी गुंतवणूक साधनांत विविधता आणण्यासाठी ही एक चांगली संधी आहे. भूतकाळाकडे पाहिले तर,  ज्या कंपन्यांनी आपल्या कार्यपद्धतीत वेगाने बदल घडवून आणले आहेत. अशाच कंपन्यांकाळाच्या ओघात टिकल्याचे इतिहास साक्षी आहे. या बदलांचा मागोवा घेणाऱ्या कंपन्यांतून आपल्या मालमत्तेचा लहानसा हिस्सा गुंतवविणाऱ्या करणाऱ्या फंडात आपल्या गुंतवणुकीचा सुद्धा लहानसा हिस्सा यासाठी गुंतवायला हवा.

म्युच्युअल फंड विषयी अधिक माहितीसाठी खालील Form भरा:

[contact-form-7 id=”22″ title=”Contact Me”]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top