निधी व्यवस्थापकांची पोपटपंची

‘‘ज्यांनी कधी जनतेतून निवडणूक लढवली नाही, ते नेते बारामती लोकसभा जिंकण्याची भाषा करत आहेत. त्यामुळे अशा लोकांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने काही गडबड केली आहे का, ही शंका अनेकांना वाटत आहे. बारामतीची जागा भाजपने जिंकल्यास लोकांचा निवडणुकांवरून विश्वास उडेल..’’ असं विधान राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान केले. दुसऱ्या दिवशी सर्व वर्तमानपत्रांनी या विधानाची ठळक बातमी केली. बातमीतील या विधानाचे दोन अन्वयार्थ काढता येतील. पहिला, लोकांचा निवडणुकांवर विश्वास खरेच आहे काय आणि समजा बारामती लोकसभा भाजपने जिंकली तर लोकांचा निवडणुकांवरून विश्वास उडेल काय? १९५२ सालच्या पहिल्या निवडणुकांपासून लोकांना हवा असलेला उमेदवार निवडून आला असे नाही. पहिल्या निवडणुकीपासून ते आतापर्यंत सत्त्वहीन व्यक्तींनी अनेक सत्त्वशील व्यक्तींचा पराभव केला आहे. तरी अजूनही लोकांचा निवडणुकांवरचा विश्वास उडालेला नाही. स्वातंत्र्योत्तर भारताच्या १९५२ च्या पहिल्या निवडणुकीत उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर उभे होते. त्यांच्या विरोधात डॉ. आंबेडकरांचे दीर्घकाळ स्वीय साहाय्यक राहिलेले नारायण सदोबा काजरोळकर यांना काँग्रेस पक्षाने उभे केले होते. काँग्रेस पक्षाच्या वतीने पंडित नेहरूंनी डॉ. आंबेडकरांच्या विरोधात जाहीर सभा घेऊन काजरोळकरांचा प्रचार केला होता. या निवडणुकीत ‘कुठे ते घटनाकार आंबेडकर आणि कुठे हा लोणीविक्या काजरोळकर’ अशी घोषणा उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघात प्रसिद्ध होती. तरी आंबेडकरांसारख्या सत्त्वशील माणसाचा एका सत्त्वहीन माणसाने पराभव केला. काजरोळकरांना याचे बक्षीस म्हणून काँग्रेस सरकारने १९७० साली त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार दिला. २००९च्या निवडणुकीत ईशान्य मुंबई मतदारसंघात मेधा पाटकर यांच्यासारख्या उभे आयुष्य चळवळीत घालविणाऱ्या सत्त्वशील उमेदवाराचा पराभव त्यांच्या तुलनेत सामान्य असलेल्या उमेदवाराकडून झाला. तरीही लोकांचा निवडणुकांवरून विश्वास उडाला नाही. अशा घटना घडतात तेव्हा पुलंनी आपल्या सासूबाईंबद्दल लिहिलेल्या एका विधानाची हटकून आठवण येते, पुलं लिहितात, ‘‘सध्याचे पुढारी या विषयावर वकिलीणबाईंना (सासूबाईंना) ऑनररी डी. लिट. द्यायला हरकत नाही. ढुंगणाखालची खुर्ची काढून घेतली तर यापकी एकालाही रत्नागिरीच्या धक्क्यावर हमाल म्हणून कोणी आपला बोजा देणार नाही, ते राष्ट्राचा भार घ्यायला निघाले आहेत. असा त्यांच्या थिसीसचा थोडक्यात सारांश आहे.’’ (गणगोत: आप्पा-पृष्ठ क्रमांक १६९).

म्युच्युअल फंडात देखील अशी काही मंडळी आहेत ज्यांचे बोलणे पुन्हा पुन्हा तपासून घेणे गरजेचे आहे. म्युच्युअल फंड वर्तुळात या ‘सीईओं’ची ओळख बोलका पोपट अशी आहे. तर काही मंडळी यांचा उल्लेख ‘ग्यानी’ असाही करतात. कारण यांचे बोलणे नेहमीच पंतोजी थाटाचे दुसऱ्याला शिकविणारे असते. अशाच एका कार्यक्रमात या माणसाने आपले ‘ग्यान’ पाजळायला प्रारंभ केला. ‘‘आमच्या अमुक तमुक फंडाने मागील दहा वर्षांत कायम दोन आकडय़ांत परतावा दिला आहे.. आमच्या फंडांची कामगिरी गुंतवणूक गुरु वॉरेन बफे यांच्यापेक्षा सरस आहे. आमच्या कंपनीत बफे असते तर त्यांची नोकरी गेली असती.’’ (जिज्ञासूंनी हा व्हिडीओ जरूर पाहावा.) कोणत्याही देशातील शेअर बाजार हे त्या देशातील अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर अधिक त्या देशातील महागाई इतका परतावा देतात. १९६५ ते २०१८ या चौपन्न वर्षांच्या कालावधीत ‘बर्कशायर हॅथवे’ या बफे यांच्या कंपनीने २०.९ टक्के दराने त्यांच्या गुंतवणूकदारांना नफा मिळवून दिला. या कालावधीत एस अ‍ॅण्ड पी ५०० या निर्देशांकाने ९.९ टक्के परतावा दिला आणि या ५४ वर्षांत कंपनीच्या पुस्तकी मूल्यात १९ टक्के वाढ झाली. शुक्रवारच्या बंद भावानुसार ‘बर्कशायर हॅथवे’चा एक शेअर खरेदी करण्यास दोन कोटी रुपये (न्यूयॉर्क शेअर बाजारातील शुक्रवारचा बंद भाव ३२७७६५.६३ डॉलर) मोजावे लागतील. उद्या ‘बर्कशायर हॅथवे’ची वार्षकि सर्वसाधारण सभा आहे. बफे यांनी दरवर्षी लिहिलेल्या ‘लेटर टू शेअरहोल्डर्स’ची कितीही पारायणे केली तरी समाधान होत नाही, हेच खरे! बफेंचे कर्तृत्व थोर आहे याबाबत साशंकता नाही.

असेच एका फंड घराण्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे वक्तव्य पुन्हा पुन्हा तपासून घ्यायला हवे. ‘‘आमच्या कंपनीत १३ क्रेडिट अ‍ॅनालिस्ट आहेत. असे सांगत या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने त्या कंपनीची रोखे विश्लेषणाची पद्धत आणि आम्ही गुंतवणूकदारांच्या हिताला किती प्राधान्य देतो हे सांगायला सुरुवात केली. ही गोष्ट आहे साधारण सहा महिन्यांपूर्वीची. म्हणजे कलंकित रोख्यांच्या प्रश्न बाहेर फुटायच्या आधीची ही गोष्ट आहे. जेव्हा कलंकित रोख्यांचा मुद्दा ऐरणीवर आला तेव्हा असे दिसून आले की सर्वाधिक कलंकित रोख्यांतील गुंतवणूक ही म्युच्युअल फंडांच्या शिखर संघटनेचे माजी अध्यक्ष राहिलेल्या याच ‘सीईओं’च्या फंडांची आहे.

या सीईओने आपल्याकडे १३ क्रेडिट अ‍ॅनालिस्ट असल्याचा दावा करणे हे केवळ संख्यात्मक झाले, गुणात्मक नव्हे! ‘आमच्याकडे इंडस्ट्रीत सर्वात मोठी टीम आहे’ (म्हणून आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत) या दाव्यातील फोलपणा दोन महिन्यांतच दिसून आला. व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) हा या इंडस्ट्रीचा प्राण आहे आणि ज्याला त्याला याची भुरळ पडते. व्यवस्थापनाखालील मालमत्ता वाढविण्यासाठी असे दावे-प्रतिदावे केले जातात.

सध्या दर आठवडय़ाला एक नवीन फंड (एनएफओ) विक्रीसाठी खुला होत आहे. नवीन येणारा प्रत्येक फंड हा फंड घराण्यांची मालमत्ता वाढविण्यासाठीच असतो. सर्वच फंड गुंतवणूकदारांना फायद्याचे असतातच असे नाही. म्हणूनच मतदान करताना किंवा गुंतवणूक करताना भावनेपेक्षा व वास्तवाला स्मरून मतदान आणि गुंतवणूक करणे योग्य असते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top