सहृदयी विमाव्रती

 

एखाद्या माणसाची आणि आपली वेव्हलेंग्थ का जमावी आणि एखाद्याची का जमू नये, याला उत्तर नाही. पंधरा-पंधरा, वीस-वीस वर्षांच्या परिचयाची माणसे असतात पण शिष्टाचारांची घडी थोडीशी मोडण्यापलीकडे त्यांचा आणि आपला संबंध जात नाही. त्यांच्या घरी जाणे येणे होते. भेटणे बोलणे होते.. पण भेटी झाल्या तरी मनाच्या गाठी पडत नाहीत आणि काही माणसे क्षणभरात जन्मजन्मांतरीचे नाते असल्यासारखी दुवा साधून जातात. वागण्यातला बेशुद्धपणा क्षणार्धात नष्ट होतो. तिथे स्थलभिन्नत्व आड येत नाही, पूर्वसंस्कार, भाषा, चवी, आवडी-निवडी कशाचाही आधार लागत नाही. सूत जमून जाते आणि गाठी पक्क्या बसतात..

पुलंनी हा अनुभव रावसाहेबांच्या बाबतीत नमूद केला आहे. नीलेश साठे यांच्याशी ओळख झाली तेव्हा असेच विचार मनात आले. ‘लोकसत्ता’मध्ये ‘नियोजन भान’ या सदरासाठी तो लेख लिहिताना, विमा एजंटांच्या बाबतीत जरा अधिकच कठोर शब्द वापरले. त्या शब्दांनी किती तरी विमा विक्रेत्यांच्या मनावर आघात केले असतील. हा लेख प्रसिद्ध झाल्यावर विमा विक्रेत्यांच्या ई-मेलबरोबरच नीलेश साठे यांची दोन ओळींचा मेल आला. ‘‘आपण मोकळे असाल तेव्हा सवडीने फोन करा.’’ इतकेच त्यात लिहिले होते आणि सोबत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक दिला होता.

सुरुवातीचे जुजबी बोलणे झाल्यावर एकदा चहाला या असे निमंत्रण दिले. फार तर दोन मिनिटांचा हा संवाद होता. या दोन मिनिटांच्या संवादाने आमच्या आजपर्यंत सुरू असलेल्या संवादाची रुजुवात केली. साठे सर, तेव्हा एलआयसी नोमुरा म्युच्युअल फंडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्या भेटीत सरांनी त्यांच्या ३० वर्षांच्या विमा उद्योगातील अनुभवांच्या जोरावर अत्यंत नम्रपणे परंतु ठोस शब्दांत माझी विमा विक्रेत्यांच्या बाबतीतील निरीक्षणे आणि वास्तवता यांच्यातील तफावत दाखवून दिली. विमा एजंट मुदतीचा विमा विकत नाहीत आणि विमा खरेदीइच्छुक मुदतीचा विमा सहजसहजी घेत नाहीत आणि घेतलाच तर त्या विम्याचे शेवटपर्यंत हप्ते भरले जाण्याचे प्रमाण अतिशय कमी असल्याचे त्यांनी आकडेवारीसकट दाखवून दिले.

‘‘आमच्या एलआयसीत अध्यक्षांशिवाय माध्यमांशी कोणी बोलत नाही. अध्यक्षसुद्धा क्वचितच संवाद साधतात. तेसुद्धा वर्षांतून एकदा किंवा दोन वेळाच. माध्यमांतील प्रसिद्ध झालेल्या पण तथ्यांश नसलेल्या बातम्यांचे ना कोणाकडून खंडन होते किंवा तथ्यांश असलेल्या बातम्यांवर मत व्यक्त करण्यास कोणी उत्सुक नसते. एलआयसीकडून काहीच प्रतिक्रिया व्यक्त होत नसल्याने चांगल्या कामगिरीची दखलही घेतली जात नाही,’’ सरांनी एलआयसीची कार्यपद्धती सांगितली. आमची पहिली भेट ही अशी झाली.

असाच सरांचा एकदा फोन आला. ‘लोकसत्ता’च्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाचे औचित्य होते. ‘‘तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये या. आपण एकत्र चहा घेऊ आणि नंतर कार्यक्रमाला जाऊ,’’ असे त्यांनी कळविले. अशी आमच्या ओळखीची सुरुवात झाली. आम्ही एकत्रच या कार्यक्रमाला गेलो. त्यांच्या अशा आपुलकीच्या वागण्यामुळे आमचे सूत जमून गेले आणि गाठी पक्क्या झाल्या. सर मुंबईत असताना चर्चगेट परिसरात काही कामानिमित्ताने जाणे झाले किंवा त्यांच्या कार्यालयातील निधी व्यवस्थापक सचिन रेळेकर, तत्कालीन स्थिर उत्पन्न योजनांचे मुख्य गुंतवणूक अधिकारी असलेले रामासामी, विक्री विभागातील मुंबई विभागीय प्रमुख कल्पेश परमार, त्यांच्या बरोबर काम करणारे हरीश पोवार यांना कामानिमित्ताने त्यांच्या कार्यालयात भेटायला गेलो तर सरांची भेट हा एक रिवाज बनला.

एलआयसीच्या अनेक अपत्यांपकी एलआयसी म्युच्युअल फंड हे तसे दुर्लक्षित अपत्य. एलआयसीतून नेमणूक होणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याला ही बदली एक तर शिक्षा (पनिशमेंट ट्रान्स्फर) वाटते किंवा सुट्टी (हॉलिडे ट्रान्स्फर). सर या प्रघाताला अपवाद ठरले. या फंड घराण्याचा सरकारी तोंडवळा बदलून या फंड घराण्यात कॉर्पोरेट कल्चर रुजवण्याचे श्रेय साठे सरांना जाते. कार्यालयीन वेळ वाढविण्यापासून ते ‘एयूएम’ (व्यवस्थापनाखालील मालमत्ता) वाढविण्यासाठी सर्व प्रयत्न सरांनी केले. या फंड घराण्याला मोठे करायचे असेल तर निधी व्यवस्थापक एलआयसीतून डेप्युटेशनवर आलेला नसावा, तर भांडवली बाजारातील अनुभवी, व्यावसायिक हवा, हे सरांनी एलआयसीच्या उच्च अधिकाऱ्यांना समजावले. आणि एलआयसी म्युच्युअल फंडात व्यावसायिक निधी व्यवस्थापकाचा प्रवेश झाला. ‘एयूएम’ म्हणजे प्रत्येक फंड घराण्याचा प्राण. जो तो आपापला एयूएम वाढविण्यामागे लागलेला असतो. सरांच्या कारकीर्दीत या फंड घराण्याची मालमत्ता ५,८०० कोटींवरून १२,००० कोटींवर पोहोचली.

सरांचे शिक्षण एम.कॉम., सीएआयआयबी झाले आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे शैक्षणिक गुणवत्ता असूनही सरांना स्थापत्य अभियंता किंवा स्थापत्यकार होता आले नाही. अशीच एक दिवस बातमी आली. सरकारने विमा उद्योगाचे नियमन करणाऱ्या ‘आयआरडीए’वर सरांची सदस्य म्हणून नेमणूक केल्याची. या नवीन नेमणुकीनंतर सरांचे वास्तव्य हैदराबादमध्ये असणार होते, म्हणून सरांचे अभिनंदन करण्यास आणि निरोप घेण्यासाठी सरांच्या कार्यालयात दाखल झालो. सरांची भेट घेऊन अभिनंदन करायला माणसांची रीघ लागली होती. थोडा वेळ थांबावे लागले. भेटायला आलेले लोकच इतके होते, त्यांनी दिलेले पुष्पगुच्छ ठेवायला कार्यालयात जागा नव्हती. भेट झाल्यावर त्यांनी नेहमीच्याच अगत्याने हैदराबादला आलात तर घरी या असे अगत्याचे निमंत्रण दिले. पण तो योग काही आला नाही. सर हैदराबादला गेल्यावर भेटी जवळजवळ थांबल्याच. व्हॉट्स अप आणि मेलच्या माध्यमातून संवाद मात्र सुरू राहिला.

विमा, गुंतवणूक या विषयावरच्या अनेक शंका सरांना विचारल्या त्यांनी समाधान होईल अशा पद्धतीने शंकांचे निरसनही केले. उदाहरणाने सांगायचे तर टर्म प्लानच्या प्रत्येक प्रीमियमवर १८ टक्के आणि विमा अधिक गुंतवणूक असलेल्या विमा योजनेच्या प्रीमियमवर पहिल्या वर्षी ४.५ टक्के आणि त्यानंतर दर वर्षी २.५० टक्के वस्तू आणि सेवा कर का आकारतात? अशी दरभिन्नता का असावी या शंकेचे विमा क्षेत्रातील परिचितांपकी कोणालाही निरसन करता आले नाही. शेवटी सरांना मेल लिहिला. मेल पाठवला तेव्हा सर परदेशात एका विमाविषयक परिषदेनिमित्ताने गेले होते. भारतात ते परत आल्यावर एक दिवस त्यांचा फोन आला. आणि त्यांनी तात्त्विक विवेचन केले. ज्या विमा पॉलिसीचा प्रीमियम गुंतवणुकीसाठी किती आणि विमा छत्रासाठी किती असा भेद करता येतो त्या पॉलिसी प्रीमियमवर पहिल्या वर्षी ४.५ टक्के आणि पुढील दर वर्षी २.५० टक्के वस्तू आणि सेवा कर आकाराला जातो. टर्म प्लानचा सगळा हप्ता विमा छत्रासाठी वापरला जात असल्याने त्यावर १८ टक्के अशी कर रचना असल्याचे सरांनी सांगितले. सरकारने टर्मप्लानच्या प्रीमियमवरील हप्ता कमी करायला हवा अशी त्यांनी जाहीर भूमिका एका वर्मानपत्राच्या व्यासपीठावरून मांडली. हॉटेलच्या बिलावर ५ टक्के, तर टर्म प्लानच्या प्रीमियमवर १८ टक्के वस्तू आणि सेवा कराची आकारणी हा अन्याय आहे. असे त्यांचे मत त्यांनी सरकारला कळवून टाकले. जीएसटी कौन्सिलने अजून हा बदल केलेला नाही हा भाग वेगळा. त्यांच्या ‘आयआरडीए’मधील कारकीर्दीत विमा कायदा १९३१ मध्ये सुधारणा झाली. हे शिवधनुष्य त्यांनी नेटाने पेलले. या कायद्यातील कालबाह्य़ कलमे वगळून त्याला कालसुसंगत करण्याचे काम सरांनी नेटाने केले. विमा आणि आर्थिक क्षेत्रातील अनेक गहन वाटणाऱ्या प्रश्नांची उत्तरे सरांकडून विनासायास मिळत आली आहेत. उद्या सरांचा ‘आयआरडीए’च्या सेवेतील शेवटचा दिवस आहे. ते वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. कालच त्यांच्या ‘साठे’ उत्तराची कहाणी या पुस्तकाच्या प्रकाशानाचा दिमाखदार सोहळा पुण्यात झाला. ‘संस्कारक्षम वयात चांगली माणसे मिळणे हेच तुम्हाला आयुष्याच्या चांगल्या प्रवासाकडे घेऊन जाते’ या उक्तीवर ठाम विश्वास असल्याने विमा नियामकाच्या उच्च स्थानापर्यंत पोहचून सेवानिवृत्त होत आहेत. आहेत. त्यांना निवृत्तीपश्चात आरोग्यमय आयुष्यासाठी शुभेच्छा!

 

म्युच्युअल फंड विषयी अधिक माहितीसाठी खालील Form भरा:

[contact-form-7 id=”22″ title=”Contact Me”]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top