तव स्मरण संतत स्फुरणदायी

‘ज्याच्याकडे डेटा त्याचा मोठा वाटा’ ही आधुनिक म्हण असली तरी ‘डेटा’ आणि ‘सॅम्पलिंग’चे महत्त्व स्वातंत्र्यपूर्व काळात प्रशांत चंद्र महालनोबिस यांनी ओळखले होते. आपले आयुष्य ‘डेटा’ आणि ‘सॅम्पलिंग’साठी वेचलेल्या आणि देशाचे पहिले मुख्य सांख्यिकी अधिकारीपदी राहिलेल्या महालनोबिस त्यांचा आज जन्मदिन. हा दिवस राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून साजरा होतो. राष्ट्रीय सांख्यिकी दिनाच्या निमित्ताने या संख्या शास्त्रज्ञाचे स्मरण..

फारच कमी लोकांना माहिती असेल की आजचा दिवस राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून साजरा होतो. रोजच्या जीवनात सांख्यिकीय माहिती किती उपयुक्त असते याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी, २९ जून म्हणजे प्राध्यापक प्रशांत चंद्र महालनोबिस यांचा जन्मदिन हा २००७ पासून राष्ट्रीय सांख्यिकी दिन रूपात साजरा करण्याचे ठरले. दर वर्षी दिल्लीत एका मुख्य समारंभात सांख्यिकी क्षेत्रात काम करणाऱ्या एका शास्त्रज्ञाचा त्याच्या योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते प्राध्यापक सी. आर. राव पारितोषक देऊन सत्कार करण्यात येतो. इंडियन स्टॅटेस्टिकल इंस्टिटय़ूटचे संस्थापक असलेल्या महालनोबिस यांचे देशात आकडेवारीतील असंख्य आदर्श पद्धती विकसनातील योगदानाबद्दल त्यांच्या १२७ व्या जन्मदिनानिमित्ताने दखल घेणे सयुक्तिक ठरेल.

महालनोबिस यांचा जन्म कोलकाता शहरात बिधान सारणी या भागात झाला. त्यांचे आजोबा गुरु चरण आणि वडील प्रबोध चंद्र यांची त्या काळच्या कोलकाता शहरातील धनाढय़ व्यक्तींमध्ये गणना होत असे. सुरुवातीचे शालेय शिक्षण आजोबांनी स्थापन केलेल्या ब्राम्हो बॉइज स्कूलमध्ये झाले. मॅट्रिकच्या वर्गात असताना, वयाच्या १४ व्या वर्षी त्यांना मातृवियोग झाला. कुटुंब मोठे असल्याने तसे हाल जरी झाले नसले तरी एकाकीपण त्यांच्या वाटय़ाला आले. मातृवियोग होऊनदेखील त्या वर्षी मॅट्रिकची परीक्षा ते पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. शास्त्र शाखेत प्रवेश घेऊन १९१२ साली भौतिकशास्त्रात पदवी घेतली. पदव्युत्तर अभ्यासासाठी ते १९१३ साली केम्ब्रिज विद्यापीठात दाखल झाले. सर्वसाधारण विद्यार्थ्यांला ट्रायपॉसची परीक्षा पास होण्यास पाच वर्षांचा कालावधी लागतो तो अभ्यासक्रम त्यांनी दोन वर्षांत पूर्ण केला. याच दरम्यान त्यांची गाठ प्रसिद्ध गणितज्ञ रामानुजन यांच्याशी पडली. प्रज्ञावान रामानुजन आणि भौतिकशास्त्राचे विद्यार्थी असलेल्या महालनोबिस यांच्या मनात संख्याशास्त्र प्रेमाचा अंकुर फुलला. सुट्टीत भारतात परत आलेले महालनोबिस पहिल्या महायुद्धामुळे इंग्लंडला परत जाऊ शकले नाहीत.

महालनोबिस १९२२ मध्ये कोलकात्यातील प्रेसिडेंसी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून दाखल झाले आणि १९४८ पर्यंत त्यांनी प्राध्यापकी केली. शेवटची तीन वर्षे ते महाविद्यालयाचे प्राचार्य होते. सेवानिवृत्तीनंतर विद्यापीठाने त्याच्या अनुभवाचा लाभ तरुण विद्यार्थ्यांना मिळावा म्हणून मानद प्राध्यापक म्हणून नेमणूक केली. तरुण प्रशांत चंद्र महालनोबिस १९२२ ते १९२६ या दरम्यानच्या काळात अलिपूर वेधशाळेत संचालक म्हणूनही कार्यरत राहिले. हा काळ भारताच्या राजकीय आणि आर्थिक संक्रमणाचा काळ होता. अलिपूर वेधशाळेत काम करीत असताना प्रसिद्ध संख्या शास्त्रज्ञ सर गिल्बर्ट वॉकर हे भारतातील हवामान खात्याचे प्रमुख आणि वेधशाळांचे संचालक होते. आज अनेकदा भारताच्या दीर्घकालीन सरासरीपेक्षा अमूक टक्के अधिक पर्जन्यमान असेल, असे भाकीत आपण वाचतो. हा दीर्घकालीन सरासरीचा पाया रचण्याचे श्रेय महालनोबिस यांना जाते. प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना प्रेसिडन्सी महाविद्यालयात भौतिकशास्त्र शाखेच्या अंतर्गत देशातील पहिली संख्याशास्त्र प्रयोगशाळा स्थापण्याचे श्रेय महालनोबिस यांना जाते. आज देशात आयआयटीच्या तोडीच्या समजल्या जाणाऱ्या इंडियन स्टॅटेस्टिकल इंस्टिटय़ूटचा पाया ही संख्याशास्त्र प्रयोगशाळा मानण्यात येते. २८ एप्रिल १९३१ रोजी संस्थेची सरकारदरबारी नोंदणी करण्यात आली. या संस्थेला आज जी मान्यता लाभली आहे त्याची अनेक कारणे सांगता येतील, त्यापैकी एक म्हणजे भारतातील विकास प्रकल्पांसाठी आकडेवारी जमा करण्याचे काम या संस्थेने केले.

सुरुवातीच्या वर्षांत महानदी नदीवर वसलेला हिराकुड धरण हा असाच एक प्रकल्प आहे. महानदी, ब्राह्मण आणि बैतरणी नद्यांमधून उडिसा राज्यातील नदी डेल्टा परिसर पूरप्रवण क्षेत्र होता. ब्राह्मणी नदीच्या भयंकर पुरानंतर महालनोबिस यांना यावर उपाय सुचविण्याची विनंती केली गेली. अभियंत्यांच्या तज्ज्ञ समितीने असे सूचित केले की नदीकाठेत आपत्तीजनक घटना घडल्या आहेत आणि तटबंदीची उंची वाढवण्याची शिफारस केली गेली. तथापि, महालनोबिस यांनी युक्तिवाद केला की नदी काठेत असा कोणताही बदल झाला नव्हता. ६० वर्षांंच्या आधार बिंदू (डेटा)च्या अभ्यासानंतर ते या निष्कर्षांपर्यंत पोहोचले. महालनोबिस यांनी असा निष्कर्ष काढला की नदीच्या वरच्या भागात धरणे बांधणे हे पूर नियंत्रणासाठी एक प्रभावी उपाय असेल. या अभ्यासादरम्यान त्यांची गणना ही महानदी नदीवरील जलविद्युत प्रकल्पाचा आधार होती. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर ओरिसाचे तत्कालीन मुख्यमंत्री नित्यानंद कानुगो यांनी महालनोबिस यांच्या योगदानाची प्रशंसा केल्याचे त्यांच्या चरित्रात नमूद आहे.

महालनोबिस यांच्या नेतृत्वाखाली इंडियन स्टॅटेस्टिकल इंस्टिटय़ूटने या काळात इतर अनेक नावीन्यपूर्ण सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणांसाठी आधुनिक पद्धती, सिद्धांत आणि सर्वेक्षण नमुने विकसित केले. महालनोबिस यांच्या कार्याबद्दल आदरांजली म्हणून, पीटर हॉलने ‘बूटस्ट्रॅप’ तंत्राचा वापर आपल्या प्रबंधात सिद्धांतासाठी वापरला. याच सिद्धांतामुळे ‘ऑन लार्ज-स्केल सम्पलिंग सव्‍‌र्हे’साठी महालनोबिस यांनी विकसित केलेली पद्धती निर्दोष असल्याने महालनोबिस सिद्धांतासाठी रॉयल सोसायटीचे मानद सदस्यत्व (फेलो) बहाल करण्यात आले. शेती उत्पादनांचा अंदाज बांधण्याची पद्धत महालनोबिस यांच्या नेतृत्वाखाली इंडियन स्टॅटेस्टिकल इंस्टिटय़ूटने १९४४ ते १९४६ दरम्यान विकसित केली. आज केंद्र सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयातर्फे ‘कृषी उत्पादन निर्देशांक’ पद्धत ही याच सिद्धांतावर आधारित आहे.

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना स्वतंत्र भारताच्या विकासामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे महत्त्व यावर ठाम विश्वास होता. इंडियन स्टॅटेस्टिकल इंस्टिटय़ूटने अंदाज वर्तविण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्वेक्षणाच्या क्षेत्रात मोठी मजल मारली आहे. स्वतंत्र भारतासाठी पाश्चात्त्यांच्या सिद्धांतावर अवलंबून राहण्यापेक्षा भारताला सर्वेक्षण नमुना पद्धती स्वत:च्या भविष्यासाठी विकसित करणे गरजेचे आहे याविषयी ते ठाम होते आणि या दृढ विश्वासातून ही संस्था जन्माला आली. सुदैवाने इंग्रजी राजवटीत महालनोबिस यांना सर रोनाल्ड फिशर या महान सांख्यिकी शास्त्रज्ञाकडूनच नव्हे तर बऱ्याच ब्रिटिश आणि भारतीय प्रशासकांकडून सहकार्य लाभले. स्वातंत्र्योत्तर काळात चिंतामणराव देशमुख यांनी या संस्थेच्या विकासासाठी कायम सहकार्याचा हात दिला. संस्थेच्या तत्कालीन आर्थिक समस्यांचा आणि भविष्यातील आर्थिक हमीसाठी देशमुखांनी नेहमीच तत्परता दाखविली. नेहरू यांना अभिप्रेत असलेल्या स्वतंत्र भारताच्या विकासाचा पाया पहिल्या आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून चिंतामणराव देशमुख आणि महालनोबिस यांनी घातला. सांख्यिकीच्या क्षेत्रातील त्यांचे योगदान लक्षात घेऊन सरकारने पद्मविभूषण हा दुसऱ्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार देऊन त्यांना गौरविले. भारत सरकारने त्यांचा जन्मदिवस २००७ पासून दरवर्षी राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. भारतीय तरुणांमध्ये सांख्यिकीच्या क्षेत्राविषयी आणि देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल जनजागृती करण्याची यामागे कल्पना होती. त्यांनी वयाच्या ७९ व्या वर्षी २८ जून १९७२ रोजी या जगाचा निरोप घेतला. रोजच्या जीवनांत अनेक निर्देशांक आणि आकडेवारीचा उल्लेख करताना ही पद्धती विकसित करणाऱ्या प्रशांत चंद्र महालनोबिस यांचे स्मरण केले पाहिजे. आकडय़ांच्या जगात वावरणाऱ्या माझ्यासारख्या अनेकांना महालनोबिस हे प्रात:स्मरणीय वाटतात ते यामुळेच.

म्युच्युअल फंड विषयी अधिक माहितीसाठी खालील Form भरा:

[contact-form-7 id=”22″ title=”Contact Me”]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top