असेल कोठे रुतला काटा तळपायाला..

 

आमच्या गावात एक अर्थसाक्षर मंडळ आहे. संस्थेच्या घटनेनुसार ही संस्था सामान्य गुंतवणूकदारांना अर्थसाक्षर करण्यासाठी विविध उपक्रम राबवते. संस्थेच्या कार्यकारिणीत गोडबोले अध्यक्ष, परांजपे उपाध्यक्ष आणि काणे कुलोत्पन्न श्रीयुत माधव बापू काणे सचिव आहेत. गावातील कुळाचारानुसार संस्थेच्या कार्याध्यक्षपदी काणे कुलोत्पन्नच असतो. माधवच्या तीर्थरूपांनी आमच्या गावाला दिलेला हा वारसा आहे. माधव हा सनदी लेखापाल असून त्याची स्वत:ची फर्म आहे. गाव लहान असले तरी अर्थसाक्षर आहे आणि याचे श्रेय नि:संशय माधवला जाते. कार्याध्यक्षपद माधवकडे बापूकडून परंपरेने आले असले तरी माधव बापूसारखा तोंडफटकळ नाही. शिक्षणाने आणि व्यवसायामुळे त्याला शिष्टाचाराची उत्तम जाण आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक क्षेत्रात्रील महान मंडळी व्याख्यानाच्या निमित्ताने आमच्या लहान गावात येतात ती माधवमुळे. माधव अर्थसाक्षरतेसाठी करीत असलेल्या परिश्रमांची त्यांना जाण आहे.

काल या अर्थसाक्षर मंडळाची मीटिंग होती. कार्यक्रमपत्रिकेवरील विषयांवर चर्चा होऊन जे काही निर्णय व्हायचे ते झाले. मीटिंग संपता संपता संस्थेच्या कार्यकारिणी सदस्य वर्षां जोगळेकर यांनी माधव काणेला प्रश्न केला. ‘सर, मंगळवारी बाजारातील लार्ज कॅप निर्देशांकांनी महिन्याभरात दुसऱ्यांदा नवीन उच्चांक गाठला. पण माझ्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीवरील परतावा आठ-साडेआठ टक्क्यांपेक्षा अधिक का नाही?’

वर्षां ही माधवकडे आर्टकिलशिप करायची. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने गावातल्या कॉलेजात नोकरी पत्करली. ती कॉलेजात कॉमर्स विषयाची व्याख्याती आहे.

‘तुझं म्हणण खरं आहे वर्षां, तुलाच नव्हे तर जवळजवळ प्रत्येक म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराला पडलेला हा प्रश्न आहे. मंगळवारच्या बंद निर्देशांकानुसार लार्ज कॅप निर्देशांकांनी वार्षकि १२ टक्के परतावा दिला आहे. निफ्टी किंवा सेन्सेक्स मानदंड असलेल्या म्युच्युअल फंडांच्या एकूण ८२ योजना आहेत. यांपकी ४८ योजना या ईटीएफ किंवा इंडेक्स फंड या प्रकारात मोडणाऱ्या आहेत. या इंडेक्स ईटीएफ किंवा इंडेक्स फंड गटात सर्वाधिक वार्षकि परतावा १५.३८ टक्के (एचडीएफसी सेन्सेक्स ईटीएफ) तर सर्वात कमी १२.६२ टक्के (आदित्य बिर्ला सनलाइफ निफ्टी ईटीएफ) असा आहे. याच फंड घराण्यांच्या सक्रिय व्यवस्थापन असलेल्या फंडाचा परतावा अनुक्रमे १२.९४ टक्के (एचडीएफसी टॉप १००), तर सर्वात कमी ५.०६ टक्के (आदित्य बिर्ला सनलाइफ फ्रंटलाइन इक्विटी) या फंडांनी दिला आहे. याचे मुख्य कारण निफ्टी आणि सेन्सेक्समधील मागील एका वर्षांतील वाढीत रिलायन्स, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, टीसीएस, आयसीआयसीआय बँक आणि अ‍ॅक्सिस बँक यांचे ९१ टक्के योगदान आहे. मागील एका वर्षांत रिलायन्स ४३ टक्के, अ‍ॅक्सिस बँक ४० टक्के, आयसीआयसीआय बँक ३७ टक्के, टीसीएस ३३ टक्के, इन्फोसिस २८ टक्के आणि एचडीएफसी बँक १७ टक्के वधारले आहेत.’

‘मागील वर्षभरातील तेजी मोजक्या समभागांपुरती मर्यादित होती. तेजी सर्वव्यापी नसल्याने या तेजीचा फायदा सक्रिय व्यवस्थापन असलेल्यापेक्षा ईटीएफ किंवा इंडेक्स फंड गटातील फंडांना अधिक झाला. ज्या फंडाच्या गुंतवणुकीत वर उल्लेख असलेल्या समभागांची मात्रा अधिक होती त्या फंडांना या तेजीचा फायदा झाल्याचे दिसत आहे. दुसऱ्या बाजूला सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि वाहन क्षेत्रातील मारुती, टाटा मोटर्स, आयशर मोटर्स, हिरो मोटोकॉर्प या समभागांच्या किमतीत १० ते १२ टक्के घसरण झाली. सर्वसाधारणपणे फंडांच्या गुंतवणुकीत ४० ते ६० समभागांचा समावेश असल्याने तेजी सर्वव्यापी होऊन अन्य समभागांच्या किमतीत घसघशीत वाढ जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याचा फायदा सर्वसामान्य म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना होणार नाही. तुमच्या त्या ‘म्युच्युअल फंड सही है’ मुळे गेल्या तीन वर्षांत गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडांमध्ये मोठय़ा प्रमाणावर आपली पुंजी भरभरून रिती केली. म्युच्युअल फंडांना मोठय़ा प्रमाणावर निधी मिळाला. फंडांचा आकार वाढल्याने फंड व्यवस्थापकांची जोखीम स्वीकारून नफा कमावण्याची क्षमता कमी होते,’ माधव म्हणाला.

‘उदाहरणादाखल सांगायचे तर एमआरएफ, हनीवेल, थ्री एम या समभागांच्या भविष्यातील कामगिरीबद्दल कुणास शंका असण्याचे कारण नाही. परंतु हे समभाग रोकडसुलभ नाहीत. या समभागांना साधारण ५०० कोटींच्या आतील फंड मालमत्ता असणाऱ्या फंडाच्या गुंतवणुकीत स्थान असते. यापेक्षा अधिक मालमत्ता असणाऱ्या फंडाच्या गुंतवणुकीत यांचा समावेश करता येत नाही. समभागाची रोकड सुलभता जशी वाढत जाते तसे समभागाचा बाजारभाव वर जाऊन भविष्यात नफा होण्याची शक्यता कमी होते.’

‘निधी व्यवस्थापकाला जोखीम आणि परतावा यांचा समतोल साधायचा असतो. सामान्य गुंतवणूकदारांना फक्त परताव्याचा आकडा दिसतो. त्यामागचे गणित कळत नाही. नेमका हाच धागा पकडून मागील आठवडय़ात आíथक वार्ताकन करणाऱ्या एका वृत्तपत्राने समाजमाध्यमांवरून एक चाचणी केली. म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना निधी व्यवस्थापकाच्या कामगिरीचे मूल्यमापन ५ म्हणजे अव्वल आणि १ म्हणजे सुमार या पट्टय़ात करण्यास सांगितले. या चाचणीत भाग घेतलेल्यांपकी ८६ टक्के गुंतवणूकदारांनी निधी व्यवस्थापकांच्या कामगिरीला २ पेक्षा कमी गुण देत आपण निधी व्यवस्थापकांच्या कामगिरीबाबत अमाधानी असल्याचे मत नोंदविले. ‘म्युच्युअल फंड सही है’ मुळे जनजागृती झाली पण गुंतवणूकदार अर्थसाक्षर झाले नाहीत. विकसित देशांत गुंतवणूकदार आपल्या सल्लागारांसाठी वेळ काढतात आणि सल्लागारसुद्धा एखाद्या फंड गुंतवणुकीमागची भूमिका मांडतात. आपल्याकडे गुंतवणूकदाराला अधिक परतावा देणारा फंड हवा असतो तर फंड घराणी आणि सल्लागार ‘एयूएम’च्या (मालमत्ता) मागे लागलेले असतात. परंतु हे चित्र थोडय़ाफार फरकाने बदलताना दिसत आहे. इंडेक्स फंड गुंतवणुकीवरील नफा सक्रिय व्यवस्थापन असणाऱ्या फंडांपेक्षा अधिक असल्याने सक्रिय व्यवस्थापन असलेल्या फंडांना ०.५ टक्के ते ३.०० टक्के सालाना शुल्क का द्यावे, असा प्रश्न सजग गुंतवणूकदार आपल्या सल्लागारांना विचारात आहेत. हा प्रश्न एका अर्थाने योग्यसुद्धा आहे. गुरुवारी आदित्य बिर्ला सनलाइफ म्युच्युअल फंडाने आपल्या एमएनसी फंड, टॅक्स रिलीफ, टॅक्स प्लान, बाल भविष्य आणि रिटायर्मेट फंडाचे ३० आणि ४० असे दोन विकल्प मिळून सहा फंडांच्या गुंतवणुकीत असलेले पंख गमावलेल्या जेटचे १३ कोटी मूल्याचे ७.५९ लाख समभाग विकले. फंड घराण्यातील गळेकापू स्पध्रेमुळे निधी व्यवस्थापक काही वेळा अधिक परतावा देण्याच्या उद्देशाने असे धोकादायक निर्णय घेतात. जेटचा गेल्या काही महिन्यांतील एका दिवसाचा तोटा २१ कोटी रुपये इतका आहे. जेट किती अव्यावसायिक पद्धतीने चालविली जात होती ते यावरून लक्षात येईल. या सहा फंडांपकी बाल भविष्य आणि रिटायर्मेट फंड बाजारात येऊन तीन-चार महिनेसुद्धा झालेले नाहीत. जेट जितकी अव्यावसायिक पद्धतीने चालवली जात होती तितकाच ‘बिर्ला’चा नवीन फंडांच्या गुंतवणुकीत या कंपनीचा समावेश करण्याचा निर्णयसुद्धा अव्यावसायिकच म्हणायला हवा. अशा वेळी बाजार नियंत्रक, गुंतवणूकदार आदींनी आपल्या निधी व्यवस्थापकांना असल्या अव्यावसायिक निर्णयाचा जाब विचारायला हवा आणि त्याचा पाठपुरावा करायला हवा. निधी व्यवस्थापकाला इंडेक्स ईटीएफ किंवा इंडेक्स फंड गटात अशा मनमानीला वाव नसतो. फंड निवडणे हे सल्ल्लागाराचे काम आहे आणि चांगला सल्लागार निवडणे हे गुंतवणूकदाराचे काम आहे. परंतु ‘म्युच्युअल फंड सही है’मुळे अतिशिक्षित झालेले गुंतवणूकदार फंड निवडायला लागल्याने असे होते,’ माधव म्हणाला.

म्युच्युअल फंड विषयी अधिक माहितीसाठी खालील Form भरा:

[contact-form-7 id=”22″ title=”Contact Me”]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top