आकांक्षापुढति जिथे गगन ठेंगणे !

 

 गेल्या मंगळवारी कन्साई नेरोलॅक पेंट्सचे तिमाही निकाल लागले. निकाल पाहतांना हरीश भरुका यांची आठवण झाली. शाहरुख खान या कंपनीची जाहिरात करीत असल्याने टीव्ही दर्शकांच्या परिचयाची असलेली. कन्साई नेरोलॅक पेंट्स लिमिटेड ही भारतातील सर्वाधिक रंग उत्पादन क्षमता असलेली असलेली कंपनी आहे. गृह सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या रंगाची भारतातील ही तिसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. हरीश भरुका हे कन्साई नेरोलॅक पेंट्सचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकिय संचालक आहेत. जगभरात रंग उद्योग हा गृह सजावट आणि औद्योगिक वापरासाठी अशा दोन गटात विभागाला आहे. कन्साई नेरोलॅक पेंट्स ही भारतातील एक प्रमुख रंग उत्पादक आहे. भारतात तयार होणाऱ्या रंगापैकी २५ टक्के बाजारपेठ ही औद्योगिक वापरासाठीच्या रंगांची आहे. कन्साई पेंट्स कंपनी ही औद्योगिक वापरासाठीच्या रंगांची सर्वात मोठी उत्पादक आहे. कंपनी आहे. एक गिरणी कामगाराचा मुलगा ते रंग उद्योगाचे जागतिक नैतृत्व करणाऱ्या कंपनीच्या आंतरराष्ट्रीय संचालक मंडळाचा सदस्य हा त्यांचा प्रवास कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या कुणालाही आदर्श वाटावा असा आहे.

शिक्षणाने व्यय लेखपाल असलेले भरुका, १९८५ मध्ये  कन्साई नेरोलॅक पेंट्समध्ये लेखा व्यवस्थापक म्हणून दाखल झाले. बढतीचा एक एक टप्पा पार करीत सन २००१ मध्ये त्यांची कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक झाली. २०११ मध्ये संचालक मंडळाने त्यांना व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष म्हणून पदोन्नती दिली. मोदी सरकारने तरुणांसाठी कौशल्य विकास हे सरकारचे एक धोरण बनविले. रंग उद्योगांत कौशल्य विकासाचे महत्व हरीश भारुकांनी कधीच ओळखले होते. रंग कितीही चांगला असला तरी कुशल रंगाऱ्याच्या कौशल्याने रंग खुलून दिसतो. या साठी स्थानिक पातळीवर कौशल्य विकसित होणे गरजेचे आहे हे जाणून हरीश भरुका यांनी कुशल मनुष्यबळाचा तुटवडा जाणवणार नाही या साठी कायम पाठबळ पुरवले.

 रंग आणि रसायन उद्योग जगभरात पर्यावरणाचा नाश करणारा उद्योग म्हणून ओळखला जातो. चीन मध्ये हजारो कारखाने पर्यावरणास बाधा पोहोचणारे असल्याने बंद करण्यात आले. महाराष्ट्रात सुद्धा प्रदूषण नियंत्रण महामंडळ प्रदूषणकारी औद्योगिक अस्थापनांवर कारवाईचा बडगा उगराल्याच्या बातम्या वाचायला मिळतात. एका बाजूला रंग रसायन उद्योग औद्योगीकरण तसेच मोठ्या प्रमाणावर अप्रत्यक्ष रोजगार तयार करणारा आहे तर दुसऱ्या बाजूला पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी करणारा म्हणू पर्यावरणवाद्यांच्या रोषास पात्र ठरलेला उद्योग आहे. म्हणूनच सर्वच देशांतील सरकारे, रंगांच्या कारखान्यातून विसर्ग होणाऱ्या घन आणि द्रवरूप कचऱ्यांबद्दल विशेष दक्षता बाळगतात. भरुका हे रंग उद्योगाचे प्रतिनिधी असले तरी त्यांची ओळख एक पर्यावरणप्रेमी अशी आहे. चिपळूण आणि रोहा परिसरातील रंग रसायन कारखाने त्यांच्या पाण्याच्या विसर्गामुळे रत्नागिरी रायगड जिल्ह्यातील नद्या प्रदूषित करीत असतांना, कन्साई नेरोलॅक पेंट्सच्या महाराष्ट्रातील लोटे येथील कारखान्यातून होणारा पाण्याचा विसर्ग पिण्याच्या पाण्याच्या योग्यतेचा असल्याची नोंद प्रदूषण खात्याकडून केली. पर्यावरणाची हानी न करता रंग आणि रसायन उद्योगातील कंपनी उत्तम नफ्यात चालविता येतो हे भारुका यांनी दाखऊन दिले. त्यांचे हे पर्यावरण प्रेम कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा सतत जागृत राहील याच्यासाठी ते दक्ष असतात. कर्मचाऱ्याचा कुठलाही हलगर्जीपणा खपवून न घेणारे हरीश भरुका एखादा कामगार अडीअडचणीत असेल तर जमेल तितकी त्याला मदत करायला कायम तत्पर असतात. त्यांच्यातील कठोर प्रशासक आणि त्यांच्यातील संवेदनशील माणूस एकाच वेळी कर्मचाऱ्यांना अनुभवण्यास मिळतो. व्यवस्थापनाचे उच्च शिक्षण घेतले तरी व्यवस्थापकाने मानवी संवेदना विसरून चालणार नाही असे ते नेहमीच कंपनीत नव्याने दाखल होणाऱ्या तरुणांना सांगत असतात. केवळ नफा हे व्यवसायाचे उद्दिष्ट नसून कर्मचारी हे सुद्धा कंपनीच्या उत्कर्षातील प्रमुख वाटेकरी असल्यचे ते मानतात.

हरीश भारुका यांचे वडील मुंबईतील श्रीनिवास मिल्समध्ये गिरणी कामगार होते. भरुका यांचे बालपण कुर्ला चेंबूर भागातील कामगारबाहूल एका सामान्य कुटुंबात गेले. भरुका मुंबईत आई, पत्नी आणि विवाहित मुलगा आणि सून यांच्या सोबत रहात असले तरी त्यांना कामानिमित्त देश विदेशांत सतत प्रवास करावा लागतो. सततच्या कामामुळे कुटुंबियांना वेळ देता येत नाही अशी त्यांना खंत आहे. दुसरा मुलगा नोकरी निमित्त परदेशात असला तरी त्यांच्यातील प्रेमळ पिता आपल्या पत्नी कडून परदेशांतील मुलाची विचारपुस करत असतो. अनेकदा त्याची पत्नी एखादा चित्रपट जोडीने बघण्याचा आग्रह धरते आणि आधी वेळ ठरवून देखील ते ठरलेला सिनेमा पाहू शकत नाहीत ही गोष्ट त्यांना खुपते. पत्नी सोबत एखादा चित्रपट पहायला वेळ मिळेत तो त्यांच्या लेखी आनंदाचा दिवस असतो.

कन्साई पेंट्स कंपनी लिमिटेड ही जपानी कंपनी भारतातील कंपनीची प्रवर्तक आहे. मागील वर्षी हरीश भरुका यांची कन्साई पेंट्स कंपनी लिमिटेड जपानच्या संचालक मंडळावर झालेली नेमणूक भारतीयांसाठी अभिमान वाटावा अशी घटना आहे. कन्साई पेंट्स कंपनी लिमिटेड जपान ही कंपनी जगातील ४० देशात रंग उत्पादन करणारी रंग रसायन उद्योगातील एक प्रमुख कंपनी आहे. जगभरात कन्साईसाठी व्यवसाय वृद्धीच्या संधी शोधणे आणि त्या संधीचे रुपांतर व्यवसायात करण्यासाठी कंपन्यांचे अधिग्रहण करणे ही त्यांची नवीन नेमणूकीनंतर मुख्य जबाबदारी आहे. भारतीय रंग आणि रसायन उद्योगापुरते सिमित असलेले कर्तृत्व कन्साईसाठी जगभरातील रंग उद्योगातील व्यवसाय विस्ताराच्या संधी हुडकतांना जागतिक पातळीवर रंग भारत आहे.

त्यांच्या भेटीची वेळ मागितल्यावर पंधरा वीस दिवसांनी भेटीचा दिवस ठरल्याचा निरोप मिळतो. ठरलेल्या वेळी लोअर परेल येथील कार्यालयात दाखल झाल्यावर पुढचा एक तास त्यांच्या व्यवसायाशी निगडीत अनेक गोष्टींवर ते त्यांची मते मांडत असतात. या संवादातून त्यांच्यातील संवेदनशील उद्योग व्यावसायिक या संवादातून प्रत्येक वेळी नव्याने अनुभवण्यास मिळतो. “रंग उद्योग मागील अनेक दशके ३५ टक्यांनी वाढत आहे. त्यांच्या कंपनीने गुंतवणूकदारांच्या पदरात भरभरून भांडवली वृद्धी दिली आहे. भविष्यात सुद्धा हा उद्योग चांगला वृद्धीदर राखणारा उद्योग असेल” हे त्यांचे नेहमीच सांगणे असते.     

म्युच्युअल फंड  विषयी अधिक माहितीसाठी खालील Form भरा:

[contact-form-7 id=”22″ title=”Contact Me”]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top