वित्तीय नियोजनाद्वारे कुटुंबाची सुरक्षितता

गेल्या दशकात आपण मानसिक, शारीरिक किंवा सामाजिक स्वातंत्र्याबद्दल बोलत असू; हे दशक आर्थिक स्वातंत्र्याचे दशक आहे. म्हणूनच या वर्षीच्या अर्थब्रम्हसाठी वित्तीय स्वातंत्र्य हा विषय घेण्याचे निश्चित केले आहे. वित्तीय नियोजन ही पहिल्या पगारापासून करायची गोष्ट असली तरी सेवानिवृत्तीच्या वर्षांपर्यंत पोहोचेपर्यंत वित्तीय नियोजनाला प्राथमिकता दिली जात नाही. वित्तीय नियोजनात संचय (अक्यूम्यूलेशन) आणि उपभोग (डीसट्रीब्यूशन) हे दोन टप्पे आहेत. कमावत्या वयात वित्तीय नियोजन करायला हवे. परंतु प्रत्यक्षात कमवते वय मागे पडल्यानंतर माणस नियोजनाचा विचार करतात. या वयात मागे वळून पाहतांना असे दिसते की आम्ही अजूनही खर्चाचे गुलाम आहोत. सेवानिवृत्ती जवळ आलेली असतांना आणि उत्पन्न्नाला ओहटी लागायची वेळ जवळ आल्यावर वित्तीय नियोजन करायला घेणे म्हणजे बैल गेला आणि झोप केला असे आहे. 

वित्तीय स्वातंत्र्याची व्याख्या व्यक्तीसापेक्ष बदलू शकेल. कमावत्या वयात आपण पैशासाठी काम करतो सेवा निवृत्तीवेळी पैशाने आपल्यासाठी काम करण्याची गरज असते. हाच खरा वित्तीय स्वातंत्र्याचा अर्थ म्हणता येईल. सेवानिवृत्ती  हा असा टप्पा आहे ज्या टप्प्यात आपण नोकरी किंवा व्यवसायासारख्या उत्पन्न मिळविण्यासाठी व्यस्त न राहता स्वतःचे छंद जोपासायला हवेत. या वेळी आपल्याला आपल्या नियमित खर्चाची काळजी करण्याची गरज वाटायला नको त्यावेळी तुमची बचत तुमच्यासाठी काम करत आहे असे समजत येईल. ही अशी अवस्था असेल तर आपण आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आहोत असे समजता येईल. 

वित्तीय स्वातंत्र्य कसे प्राप्त होते?

वित्तीय स्वातंत्र्य हे वित्तीय ध्येय असायला हवे. हे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही कमावत्या वयात प्रत्येक खर्च होणाऱ्या रुपयाचे गरज आणि चैन या मध्ये विभागणी करायला हवी. तुम्ही तुमच्या वित्तीय सवयी बदलल्यात तर तुमचा पैसा तुमच्यासाठी अधिक परिश्रम (परतावा) मिळवू शकतो. हे सर्व शक्य आहे का, असा प्रश्न तुम्हाला कदाचित पडेल, परंतु या प्रश्नाचे उत्तर ठानपणे होय असेच आहे. योग्य आर्थिक नियोजन करून आर्थिक स्वातंत्र्य मिळवणे शक्य आहे.

आर्थिक नियोजन म्हणजे काय?

आर्थिक नियोजन म्हणजे तुमची सद्य आर्थिक परिस्थिती आणि भविष्यातील उद्दिष्टे आणि गरजा यांचे मूल्यमापन करून ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि तुमच्या भविष्यातील गरजांसाठी तुमच्या वर्तमानातील गुंतवणूकीचे नियोजन करणे. वित्तीय नियोजनात तुमच्यासाठी दीर्घकालीन भांडवली नफा किंवा उत्पन्न निर्मिती (जसे की लाभांश आणि व्याज इ.) स्वरूपात गुंतवणुकीतून रोकड निर्माण करण्याच्या उद्देशाने गुंतवणूक करणे होय. गुंतवणुक साधने जसे की समभाग रोखे म्युच्युअल फंड, बँकांच्या मुदत ठेवी, भाड्याने दिलेल्या मालमत्तेचे मिळणारे भाडे इत्यादींचा समावेश करता येईल. आर्थिक स्वतंत्र्य मिळविण्यासाठी तसेच तुमच्या मासिक खर्चासाठी तसेच वैद्यकीय उपचारांच्या  बिलांसारख्या आकस्मिक खर्चासाठी गुंतवणुकीतून रोकड निर्माण करणारी मालमत्ता तुमच्याकडे असणे अत्यावश्यक आहे. महागाईमुळे तुमचे खर्च वाढतच जातील. त्यामुळे, तुमच्या मालमत्तेतून निर्माण होणारा रोकडीचा स्त्रोत देखील कालांतराने त्याच गतीने वाढला पाहिजे. या गुंतवणुकीतून तुम्हाला पुन्हा गुंतवणुकीसाठी काही अतिरिक्त उत्पन्नही मिळायला हवे, कारण तुम्हाला खरे आर्थिक स्वातंत्र्य हवे असल्यास तुमची मालमत्ता कमी होऊन चालणार नाही. गुंतवणूक करताना हे लक्षात घेतले पाहिजे की सर्व प्रकारच्या गुंतवणुकीमुळे रोकड निर्माण होत नसते. जसे की निवासी मालमत्ता  स्वत:च्या वापरासाठी वाहन खरेदी, राहत्या घराव्यतिरिक्त घर खरेदी या गोष्टी तुमच्या आर्थिक नियोजनाचा एक भाग असल्या तरी ही गुंतवणूक साधने तुमच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आवश्यक असणारी रोकड निर्माण करू शकत नाहीत. या गोष्टी तुमच्या सोयीसाठी असल्या तरी ही साधने पुरेशी रोकड उत्पन्न करणार नाहीत. 

तुमच्या सेवानिवृत्तीची योजना कशी करावी?

लिखित रुपात वित्तीय नियोजन तयार करणे आणि या लिखित नियोजननुसार त्याची अंमलबजावणी केली तरच नियोजित यश प्राप्त होईल. आर्थिक योजना तयार करण्यासाठी तुमच्या स्वतःच्या वित्तीय सवयींची सखोल माहिती असणे आवश्यक आहे. आर्थिक नियोजनाचा संबंध असेल तेथे कोणतीही एक योजना दोन व्यक्तींना अनुकूल नसते. तुमचा जोखीमांक आणि तुमचे आर्थिक व्यक्तिमत्व हे दुसऱ्यापेक्षा वेगळे असल्याने तुमचे आर्थिक नियोजन सुद्धा वेगळे असायला हवे. कोणत्याही कृतीची पहिली पायरी म्हणजे कृतीसाठी ‘का’. सोप्या भाषेत सांगायचे तर, याचा अर्थ असा की कोणताही पैसा खर्च करण्यापूर्वी  तुम्ही तो पैसा का खर्च करीत आहात हे स्वतःला विचारले पाहिजे. त्याचप्रमाणे, आर्थिक नियोजन तयार करण्यापूर्वी तुम्हाला योजनेची गरज का आहे हे मोजणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. आपण काय साध्य करण्याचा प्रयत्न करीत आहात? तुमची गरज तुमच्या मित्राच्या गरजेपेक्षा पूर्णपणे वेगळी असू शकते. म्हणून, पहिली पायरी म्हणून, तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या स्थितीशी जुळणारी तुमची वित्तीय उद्दिष्टे ओळखा. वित्तीय ध्येय ओळखल्यानंतर, तुमच्या प्रत्येक उद्दिष्टासाठी किती रोकड आणि केव्हा मिळणे गरजेचे आहे

जोखीमीचे मूल्यमापन : पुढील पायरी म्हणजे तुम्ही अपेक्षित परतावा मिळविण्यासाठी किती जोखीम घेऊ शकता याचे मूल्यांकन करणे. जोखीम प्रोफाइल एखाद्या व्यक्तीने तयार केलेल्या आणि स्वीकारण्यास सक्षम असलेल्या धोक्याची स्वीकार्य पातळी ओळखते. कॉर्पोरेशनचे ‘रिस्क प्रोफाइलिंग’ हे निश्चित करते की जोखीम घेण्याची (किंवा जोखीम टाळणे) या बाबत निर्णय घेण्याचा तुमच्या गुंतवणुकीवर कसा परिणाम करेल. रिस्क प्रोफाइलिंग त्या व्यक्तीची जोखीम घेण्याची इच्छा आणि क्षमता निर्धारित करते. या अर्थाने जोखीम म्हणजे पोर्टफोलिओची अस्थिरता सहन करण्याची क्षमता. 

रिस्क प्रोफाइलिंग’ तुमचे आर्थिक व्यक्तिमत आणि गुंतवणुकीवरील अपेक्षित परतावा यांच्यात समतोल साधते. ज्याचा अर्थ उच्च परतावा मिळविण्याच्या प्रयत्नात नजीकच्या कालावधीत तुमच्या पोर्टफोलिओचे मुल्यांकन कमी होण्याची शक्यता असते. अल्पावधीत पोर्टफोलिओ मूल्य गमाविल्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल याचे मोजमाप म्हणजे तुमचा जोखीमांक. एखाद्या व्यक्तीची पोर्टफ़ोलिओचे बाजार मूल्य कमी होऊ नये अशी तीव्र इच्छा व्यक्त केली असेल तर ते साध्य करण्यासाठी संभाव्य भांडवली लाभ कमी स्वीकारण्याची तयारी असायला हवी. याउलट, जर एखाद्या व्यक्तीने जास्तीत जास्त संभाव्य परताव्याची इच्छा व्यक्त केली असेल – आणि ते साध्य करण्यासाठी अल्पावधीत पोर्टफोलिओ मूल्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऱ्हास सहन करण्यास तयार असेल तर त्या व्यक्तीची जोखीम घेण्याची उच्च इच्छाशक्ती आहे असे मानले जाते. जोखीम घेण्याच्या क्षमतेचे मूल्यांकन एखाद्या व्यक्तीच्या मालमत्ता आणि दायित्वांच्या पुनरावलोकनाद्वारे केले जाते. अनेक मालमत्ता आणि काही दायित्वे असलेल्या व्यक्तीकडे जोखीम घेण्याची उच्च क्षमता असते. याउलट, कमी मालमत्ता आणि उच्च दायित्व असलेल्या व्यक्तीची जोखीम घेण्याची क्षमता कमी असते. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीकडे चांगले निधी असलेले सेवानिवृत्ती खाते, पुरेशी आपत्कालीन बचत आणि विमा संरक्षण आणि अतिरिक्त बचत आणि गुंतवणूक (कोणतीही तारण किंवा वैयक्तिक कर्ज नसलेली) जोखीम घेण्याची उच्च क्षमता असते.

हा टप्पा तुमचे अतिरिक्त (डिस्पोजेबल) उत्पन्न किती आहे हे ठरवण्यासाठी नाही. उलट, या टप्प्यावर तुम्ही तुमच्या गुंतवणुकीमध्ये किती जोखीम पत्करू शकता, तुमच्यावर अवलंबित असलेल्या आणि त्यांच्याप्रति असलेल्या तुमच्या आर्थिक कर्तव्यांवर नजर ठेवून मूल्यांकन करणे आवश्यक आहे. तुमच्यावर अवलंबून असलेली पत्नी, मुले आणि वृद्ध आई-वडिल असल्यास, हे उघड आहे की तुमची जोखीम घेण्याची क्षमता कमी आहे. तुमच्या पोर्टफ़ोलिओमध्ये  कर्जरोखे सदृश्य साधनांचे प्रमाण अधिक असायला हवे.  तुम्ही किती जोखीम पत्करू शकता याचे आकलन जसे महत्त्वाचे आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य मिळविण्यासाठी किती वेळ लागेल हे देखील समजून घेणे आवश्यक आहे. तुमच्या उद्दिष्टांचे मूल्य साध्य करण्यासाठी तुमच्याकडे किती वेळ शिल्लक आहे हे निश्चित केल्याने तुम्हाला कळेल की तुमचे वित्तीय ध्येय साध्य करण्यासाठी किती बचत करणे आवश्यक आहे. शेवटी जाता जाता तुकाराम महाराजांच्या एक अभंग मनात ठसतो.  

जोडोनियां धन उत्तम वेव्हारें । उदास विचारें वेच करी ॥१॥

उत्तम चि गती तो एक पावेल । उत्तम भोगील जीव खाणी ॥ध्रु.॥

परउपकारी नेणें परनिंदा । परस्त्रीया सदा बहिणी माया ॥२॥

भूतदया गाईपशूचें पालन । तान्हेल्या जीवन वनामाजी॥३॥

शांतिरूपें नव्हे कोणाचा वाईट । वाढवी महत्त्व वडिलांचें ॥४॥

तुका म्हणे हेंचि आश्रमाचें फळ । परमपद बळ वैराग्याचें ॥५॥

जो मनुष्य उत्तम उद्योग धंदा करून धन कमवितो आणि त्याचा विनियोग चांगला, उत्तम करतो त्याचं मनुष्याला उत्तम गती मिळेल .आणि तो उत्तम जन्माला येऊन पुन्हा सुख भोगेल. जो मनुष्य केव्हाही परनिंदा करत नाही आणि परस्त्री व परनारी यांना आई ,बहीण यांच्या समान मानतो व सर्वांवर परोपकार करतो ,तसेच जो सर्व प्राणिमात्रांवर नेहमी दया करतो, गायी सारखेच इतर प्राण्यांचे पालन पोषण करतो आणि आडराणी तहानलेले जीवांना पाणी पाजतो ,जो शांत राहून कोणाचे मन दुखवत नाही कोणाशीही वाईट वागत नाही तो आपल्या वाडवडिलांचे महत्त्व वाढवितो .तुकाराम महाराज म्हणतात आदर्श युक्त गृहस्थाश्रमा साठी हेच फळ आहे आणि वैराग्याचे हेच परम बळ आहे. गुंतवणुकीत वैराग्य हे आर्थिक स्वातंत्र्याची गुरुकिल्ली आहे असेच म्हणावे लागेल. 

भालचंद्र जोशी 

(भालचंद्र जोशी हे ‘३६० वन’ या वित्तीय समुहाचे समूह मुख्य परिचालन अधिकारी आहेत.)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top