उमदा मल्टीकॅप

विविधतेत एकता असं  भारताच्या बाबतीत नेहमी म्हटलं जात. म्युच्युअल फंडात विविध गट सामावले असते, तरी पूर्व निश्चित जोखिमेसह वित्तीय ध्येय साध्य करणे  हे एकच लक्ष्य असते. प्रत्येक फंड गट समभागांमध्ये किंवा/आणि रोख्यांत गुंतवणूक करतो. तथापि, आपल्या म्युच्युअल गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ तयार करण्यापूर्वी सर्व घटकांचे काळजीपूर्वक मूल्यांकन करणे महत्त्वाचे आहे. जे गुंतवणूकदाराच्या आर्थिक उद्दिष्टांशी आपल्या गुंतवणुकीचा मेळ घालू शकतात त्यांची वित्तीय उद्धिष्टपूर्ती नक्कीच होते. समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडात महागाईपेक्षा अधिक परतावा मिळविण्याची क्षमता असल्याने दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यात यशस्वी झाल्याची अनेक उदाहरणे सापडतील. समभाग गुंतवणूक करणारे म्युच्युअल फंड उच्च जोखीम क्षमता असलेल्या गुंतवणूकदारांना वैविध्य आणि सर्वोत्तम परतावा देतात. लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप समभागांमध्ये गुंतवणूक करणारे मल्टीकॅप म्युच्युअल फंडांकडेगुंतवणूकदार आकर्षित झाले आहेत. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने ११सप्टेंबर २०२० रोजीच्या परिपत्रकाअन्वये मल्टी-कॅप फंडांच्या पोर्टफोलिओ रचनेत बदल केले. म्युच्युअल फंड उद्योगाकडून या परिपत्रकावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी टीका केली तर काहींनी या परिपत्रकाचे स्वागत केले. या परिपत्रकानुसार कौतुक केले तर काहींनी नवीन नियमाला विरोध केला. ‘सेबी’च्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, मल्टी कॅप फंडांना त्यांच्या मालमत्तेपैकी २५% मालमत्ता प्रत्येकी लार्जकॅप, मिडकॅप आणि स्मॉल कॅपमध्ये गुंतवावी लागते. उर्वरित २५% फंड कोणत्याही मार्केट कॅपमध्ये गुंतविण्याची मुभा व्यवस्थापकाला असते. जरी मल्टी कॅप आणि फ्लेक्सी कॅप फंड सारखे दिसत असले तरी त्यांच्या पोर्टफोलीओ बांधणीत मुलभूत फरक आहे. ‘सेबी’ द्वारे या फंडांचे वर्गीकरण हे गुंतवणूकदारांना त्यांच्या जोखीमांक आणि आर्थिक ध्येयानुसार फंड निवडण्यासाठी अधिक स्पष्टता देण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. वेगवेगळ्या गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या गरजा, जोखीम घेण्याची क्षमता, अनुभव आणि प्राधान्ये या नुसार मल्टी कॅप किंवा फ्लेक्सी कॅप फंडाची निवड करावी. फ्लेक्सी कॅप फंडांना एकूण मालमत्तेपैकी ६५ % मालमत्ता समभागात गुंतवावी लागते. (त्यांना मार्केट कॅपचे बंधन नाही) दोन्ही प्रकारचे फंड वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी योग्य आहेत. गुंतवणूकदारांनी त्यांच्या गरजा लक्षात घेऊन गुंतवणूकीसाठी फंड निवड करावी.

एलआयसी एमएफ मल्टी कॅप फंड २ फेब्रुवारी २०२४ रोजी १५ महिने पूर्ण करेल.फंडाने सुरवातीपासून (२ नोव्हेंबर २०२२ पर्यंत) ३०.८४ % वार्षिक तर एक वर्षाचा ३२.७५ %  परतावा देणारा फंड आहे. फंडाने त्याच्या मानदंड (निफ्टी ५०० मल्टीकॅप ५०:२५:२५ टीआर आय) सापेक्ष उत्कृष्ठ कामगिरी केली आहे. फंडाच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी १४ महिने  हा तुलनेने लहान कालावधी असला तरी, फंडाची गुंतवणूक रणनीती आणि त्याच्या भविष्यातील मजबूत कामगिरीची संभाव्यता सूचित करते. समभाग गुंतवणूक करणारे फंड वेगवेगळ्या मार्केट कॅपमध्ये गुंतवणूककरतात. ३१ डिसेंबर २०२३ रोजी समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडांची मालमत्ता २१.२१ लाख कोटी होती या पैकी १.०८ लाख कोटी मालमत्ता मल्टीकॅप फंड गटात आहे.   बाजाराच्या वेगवेगळ्या टप्प्यात लार्जकॅप मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक सारखीच कामगिरी करीत नाहीत. तेजीच्या सुरवातीच्या काळात लार्जकॅप मधल्या टप्प्यात मिडकॅप तर शेवटी स्मॉलकॅप चांगली कामगिरी करतात. मल्टीकॅप रणनीती अल्प मुदतीत जोखीम संतुलित करून निर्देशांकसापेक्ष दीर्घकालीन परतावा देण्याची क्षमता असते.

लार्ज कॅप पोर्टफोलीओला स्थैर्य तर मिडकॅप आणि स्मॉलकॅप वृद्धी प्रदान करतात. आज अनेक अशी उद्योग क्षेत्रे आहेत जी फक्त मिडकॅप आणि स्मॉलकॅप मध्ये उपलब्ध आहेत. अशी अनेक उद्योग क्षेत्रे आहेत ज्यात उच्च मागणीमुळे ही उद्योगक्षेत्रे वृद्धीक्षम आहेत. या उद्योगांत गुंतवणूक करण्याची संधी लार्जकॅप किंवा मिडकॅप मध्ये उपलब्ध नाहीत. ‘चायना प्लस वन’ या धोरणाचा सर्वाधिक फायदा मिककॅप आणि स्मॉलकॅपना होणार आहे. भारतातील अनेक उद्योग क्षेत्रे असंघटित क्षेत्रातून संघटित क्षेत्राकडे संक्रमित होत आहेत. मोठ्या संख्येने संक्रमित होणाऱ्या कंपन्या स्मॉलकॅप मधल्या आहेत. डिजिटलायझेशनचा सर्वाधिक फायदा स्मॉलकॅपना झालेला दिसत आहे. मल्टी कॅप फंडांच्या गुंतवणुकीचा परीघ लार्जकॅप (१०० कंपन्या) मिडकॅप (१५० कंपन्या) तुलनेत विस्तृत (५०० कंपन्या) आहे.  साहजिकच मल्टीकॅप फंड निधी व्यवस्थापकांना लार्जकॅप, मिडकॅपड आणि स्मॉलकॅप फंड निधी व्यवस्थापकांच्या तुलनेत गुंतवणुकीच्या अनेक संधी उपलब्ध असतात. निधी व्यवस्थापक योगेश पाटील, हे गुणात्मक आणि संख्यात्मक विश्लेषण करून गुंतवणुकीसाठी कंपन्यांची निवड करतात. गुणात्मक विशेल्षणासाठी कंपनीची उत्पादने, सेवा, व्यवस्थापनाचा दर्जा, प्रतिस्पर्धी कंपन्यांची रणनीती, बाजारात आपल्या उत्पादनाचे मूल्य ठरविण्याची क्षमता इत्यादींचा वापर केला जातो. निधी व्यवस्थापक उद्योग क्षेत्र आणि कंपनीवर तत्कालीन समष्टी अर्थव्यवस्थेचा होणाऱ्या परिणामाचा विचार त्या कंपनीची मात्रा वाढविण्याचा किंवा घटविण्याचा निर्णय घेतात. तर संख्यात्मक विशेल्षणासाठी निधी व्यवस्थापक उत्पन्न विवरण, ताळेबंद आणि व्यवसायाच्या परिचलनातून रोकड निर्माण करण्याची क्षमता यावर लक्ष केंद्रित करतात तसेच बाजारातील किंमत आणि आंतरिक मूल्य यांच्यातील संबंध सखोल अभ्यासतात. गुणात्मक विश्लेषण व्यवसायाची गतिशीलता आणि नफा क्षमता समजून घेण्यास मदत करते. योगेश पाटील हे ३१ डिसेंबर रोजी ५७१५ कोटींच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करीत होते. एलआयसी एमएफ इन्फ्रास्ट्रक्चर, एलआयसी एमएफ लार्ज अॅण्ड मिडकॅप, एलआयसी एमएफ लार्जकॅप, एलआयसी एमएफ स्मॉलकॅप (पूर्वीचा आयडीबीआय स्मॉलकॅप) आणि एलआयसी एमएफ मल्टीकॅप या फंडांचे निधी व्यवस्थापक आहेत. एलआयसी म्युच्युअल फंडात दाखल होण्यापूर्वी ते कॅनरा रोबेको म्युच्युअल फंडात निधी व्यवस्थापक होता. निधी व्यवस्थापक म्हणून त्यांचा इतिहास सर्व साधारण स्वरूपाचा आहे. ते व्यवस्थापित करीत असलेल्या फंडांचा पोर्टफोलिओ ओव्हरलॅप ८५ टक्के आहे. मागील १४ महिन्यांच्या कामगिरीवरून हा सर्वसाधारण कामगिरी करणारा मल्टीकॅप असेल असा कयास बांधता येतो. भविष्यात या फंडाच्या कामगिरी सुधारणेस मोठा वाव आहे इतकेच आजच्या घडीला म्हणता येईल.  

निधी व्यवस्थापक योगेश पाटील 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top