पंत मेले राव चढले

जगातील सर्वात जुनी लोकशाही असलेल्या अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडीसाठी मतदान होऊन चार दिवस उलटून गेले.  हा लेख ‘लोकसत्ता’कडे पाठविण्यापर्यंत  अध्यक्षपदी कोन निवडून आले याचा निर्णय झालेला नव्हता. कदाचित लेख प्रसिद्ध होईल अमेरिकेत पुढील चार वर्षे अध्यक्षपदी ट्रम्प की बायडेन याचा निकाल बहुदा लागलेला असेल. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतातील लोकप्रतिनिधीसंख्येच्या निकषावर महत्वाचे राज्य असलेल्या बिहारच्या निवडणुकांची मत मोजणी उद्या आहे. सर्वात प्रगत असलेल्या अमेरिकेत आणि आर्थिक निकषांवर मागलेले राज्य असलेल्या बिहारच्या राजकीय क्षितिजावर  ‘पंत मेले राव चढले’ सारखी स्थिती आहे.

राजकीय जगतात खंदे पालट नेमकी केव्हा करावी हे निश्चित असते. फंड जगतात मात्र ‘पंत मेले राव चढले’सारखी स्थिती वारंवार अनुभवण्यास मिळते. प्रवर्तक एल अँड टी म्युच्युअल फंड घराणे विकण्यासाठी खरेदीदाराच्या  शोधात आहेत. एल अँड टी म्युच्युअल फंडाच्या ‘स्टार’ निधी व्यवस्थापकांनी राजीनामा दिला, डीएसपी फंड घराण्यातून गोपाल अग्रवाल बाहेर पडले.अशा प्रसंगी निधी व्यवस्थापक बदलतो तेव्हा माझी गुंतवणुकीचे काय होईल ? असा प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात येतो. बदल ही नेहमीच समस्या किंवा अप्रिय गोष्ट नसते. बरेचदा गुंतवणूकदार निधी व्यवस्थापकाच्या ‘एक्झिट’ला वाईट गोष्ट समजतात. एल अँड टी म्युच्युअल फंडाने आठ वर्षांपूर्वी फिडेलिटी फंड घराणे खरेदी केले तेव्हा सुद्धा अनेकांनी हा प्रश्न विचारला होता. प्रत्यक्षात फिडेलिटी या वलयांकित फंड घराण्याकडून नवख्या आणि कमी मालमत्ता असलेल्या फंड घराण्याकडे मालकी हस्तांतरित झाल्या नंतर एल अँड टी बहुतांश फंडांनी आधीपेक्षा सरस कामगिरी बजावल्याचे दिसते. कॅनरा रोबेको म्युच्युअल फंडातून कृष्णा संघवी बाहेर पडल्यानंतर फंड घराण्याच्या बहुतांश फंडांनी निमेश चंदन आणि श्रीदत्त भांडवलकर यांच्या नैतृत्वाखाली दमदार कामगिरी केल्याचे दिसते. कॅनरा रोबेकोचे चार फंड क्रिसिलच्या यादीत अव्वलस्थानी पोहचले. यूटीआय इक्विटी फंड मल्टीकॅप गटात एक अव्वल कामगिरी असणारा फंड समजला जात असला तरी जानेवारी २०१६ मध्ये जेव्हा फंड घराण्याने त्यांच्याकडे या फंडाची सूत्रे अजय त्यागी यांच्याकडे दिली तेव्हा ते युटीआय फ्लेक्झीकॅप या फंडाचे निधी व्यवस्थापक होते. त्यांनी आखलेल्या रणनीती मुळे मागील दीड दोन वर्षात त्यांना या फंडाने केवळ ओळख मिळवून दिली नाही तर त्यांची गणना एक वलयांकित निधी व्यवस्थापकांमध्ये होऊ लागली. युटीआय इक्विटी फंड हा युटीआयच्या ताफ्यातील सर्वात अधिक मालमत्ता असलेला फंड ठरला आहे.ही मालमत्ता कोण एका वितरकाने (प्रवर्तक बँकेच्या माध्यमातून) दिलेली नसून,बँका,’वेल्थ मॅनेजर्स’ फंड वितरक यांच्या एकत्रित शहाणपणातून आली आहे.फंडाची मालमत्ता तीन वर्षात दुप्पट झाल्याने ‘मार्केट रिवॉर्डस फोर पर्फोर्मंन्स’ हा बाजारातील  वाक्प्रचाराची प्रचीती या फंडाने फंड घराण्याला करून दिली आहे.

केवळ निधी व्यवस्थापकच नव्हे तर फंड घराण्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी बदलाल्यावर फंड कामगिरीत कसा फरक पडतो याची अगदी विरुद्ध टोकाची दोन उदाहरणे आहेत. पहिले उदाहरण आपल्या कारकीर्दीच्या शेवटच्या दिवशी राजीनामा द्यावा लागलेले युटीआय म्युच्युअल फंडाचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी लिओ पुरी यांच्या कारकिर्दीत फंड मालमत्तेत आणि फंड कामगिरीत कामगिरीत घसरणच झाली. देशातील पहिल्या फंड घराण्याची आघाडीच्या पहिल्या पाचातून गंच्छंती झाली. त्यांच्या पश्चात हंगामी मुख्य कार्यकारी अधिकारपदी आलेल्या आणि नुकत्याच कायम स्वरूपी नेमाणून झालेल्या आय रहमान यांनी फंड घराण्याची धुरा यशस्वीरित्या सांभाळली. या तिमाहीत मालमत्ता क्रमवारीत युटीआयने अॅक्सीस म्युच्युअल फंडाला मालमत्ता क्रमवारीत मागे टाकले. कोणाला तरी मागे टाकण्याचा योग युटीआयच्या नशिबात येण्यास तब्बल दहा वर्षे जावी लागली. दुसरे उदाहरण पीजीआयएम इंडिया हा म्युच्युअल फंड कोणाच्या खिजगणतीत सुद्धा नव्हता. अजित मेनन यांच्यासारखा कसबी मुख्य कार्यकारी अधिकारी आल्यावर वर्षभरात फंडांचे क्रिसिल क्रमवारीत मानांकन उंचावले. आज या लहान फंड घराण्याची परताव्याच्या मागे लागलेल्या वितरकांना दखल घ्यावी लागली.

‘कर्ते म्युच्युअल फंडा’च्या यादीतील फंड निवडण्यासाठी फंड कामागीरीचा मागोवा घेतांना फंडाची रणनीती गुंतवणुकीची मुलतत्वे आणि त्यातील गुंतवणूक प्रक्रियेचा सातत्याचा अभ्यास केला जातो. साधारणपणे फंड व्यवस्थापक बदलल्यामुळे फंडाची कामगिरी घसरण्याचा धोका कमी असतो. फंड व्यवस्थापक बदलल्यामुळे फंडाच्या गुंतवणूक प्रक्रियेत व्यापक बदल होण्याची शक्यता खूपच कमी असते. नवीन व्यवस्थापकालाही अशीच व्यापक रणनीती बदलणे शक्य नसते. नवीन निधी व्यवस्थापक आणि  विशेषत: त्याच फंड घराण्यातील नसल्यास त्याच्या शैलीनुसार गुंतवणुकीत थोडे फार फेरफार होतात. गुंतवणूक रणनीतीत फारच बदल केले असे कमीवेळा घडते. उदाहरण द्यायचे तर डीएसपी फोकस्ड फंडाच्या गुंतवणुकीत हरीश झव्हेरी यांच्या काळात बँका आणि वाहन तसेच वाहन पूरक उत्पादने यावर भर होता तर माहिती तंत्रज्ञान पूर्णपणे वागळले होते. त्यांच्या नंतर निधी व्यवस्थापक म्हणून आलेल्या गोपाल अग्रवाल वाहन उद्योग कमी करून माहिती तंत्रज्ञान आणि ग्राहकाभीमुख उद्योगांतील कंपन्यांना स्थान दिले. आता गोपाल अग्रवाल जाऊन या फंडांची धुरा विनीत सांबारे यांच्याकडे तात्पुरती आली आहे. ते याच फंड घराण्याचे समभाग गुंतवणूक प्रमुख असल्याने या फंडाच्या कामगिरीनुसार फंडाला वगळण्याचा किंवा कायम राखण्याचा निर्णय घेतला जाईल. निधी व्यवस्थापक न बदलता केवळ रणनीती बदलल्याने आयसीआयसीआय व्हॅल्यू डिस्कव्हरी फंडाला २०१५ मध्ये या यादीतून वगळण्यात आले आजतागायत हा फंड आपल्या २०१२ ते २०१५ मधील कामगिरीचे पुन्हा प्रदर्शन करू शकलेला नाही.

 एलआयसी म्युच्युअल फंडात सचिन  रेळेकर यांच्या जागी मुख्य गुंतवणूक अधिकारीपदी योगेश पाटील यांना समभाग गुंतवणूकीचे प्रमुख म्हणून  अस्थायी नेमणूक करण्यात आली आहे. विनीत सांबारे आणि योगेश पाटील   त्यांची कार्य पद्धती ते निधी व्यवस्थापक असलेल्या फंडांच्या कामगिरीतून सिद्ध झाली आहे.या दोन्हीही निधी व्यवस्थापकांचे फंड दीर्घ काळापासून लोकसत्ता कर्ते म्युच्युअल फंड यादीचा भाग असल्याने या फंडांचा नियमित मागोवा घेतला जातो. निधी व्यवस्थापकांचे विचार समजून घेण्यासाठी नियमित मागोवा घेऊन अतिरिक्त गुंतवणूक किंवा निधी दुसऱ्या फंडात वळविण्या बाबत आढावा घ्यावा. निधी व्यवस्थापकाची कामगिरी जोखण्यासाठी चलत सरासरी कामगिरी आणि पोर्टफोलिओ उलाढाल दोन्हीचा मागोवा सातत्याने घेत असतो.

यादीतून एखाद्या फंडाला वगळण्याचा किंवा फंडाचा समावेश करण्याचा  निर्णय केवळ निधी व्यवस्थापकावर न ठरता फंडाची सुधारित वर्गवारी आणि जोखीम बदलाच्या स्वरूपावर अवलंबून असतो. एखाद्या फंडाच्या गुंतवणुकीचा ढाचा बदलून फंडाचा समावेश नवीन फंड गटात करण्यात येतो. जसे की मिरॅ असेट इंडिया इक्विटी ऑपोरच्युनीटी, मिरॅ असेट इंडिया इक्विटी फंड आणि मिरॅअसेट लार्जकॅप ही एकाच फंडाची मागील पाच वर्षातील नांवे आहेत. डायव्हर्सीफाइड इक्विटी फंड, मल्टी-कॅप फंड आणि आता लार्जकॅप  फंड गटात असलेल्या या फंडाचा नवीन फंड गटात समावेश झाल्यावर देखील  जोखमीच्या पातळीत बदल न झाल्याने नामबदलानंतर देखील कर्तेम्युच्युअल फंडाच्या यादीत फंडाचा समावेश अबाधित राहिलेला आहे. तर कोटक लो ड्यूरेशन फंडाच्या प्रमाणित विचालानात वाढ झाल्याने आणि कामगिरीत अचानक सुधारणा झाल्याचे लक्षात आल्यावर शोध घेतला असता,  फंड व्यवस्थापनाने फंडाची अपेक्षित चौकटी बाहेर साहसी गुंतवणूक केल्याचे दिसून आले. गुंतवणूक असलेले पुढे रोखे  कलंकित झाल्याने या फंडातून त्वरित बाहेर पडण्याचा वाचकांना त्यावेळी दिलेला सल्ला योग्य  होता.  

एखाद्या वेळी एखद्या फंडाचे मंथन (पोर्टफोलीओ टर्नओव्हर) वाढल्याचे आढळते. एखाद्या फंडाची कामगिरी गचाळ होत असते तेव्हा फंडाच्या गुंतवणुकीत पूर्णपणे बदल करण्याचा तो / ती प्रयत्न करीत असते परिणामी पोर्टफ़ोलिओ मंथनात वाढ/होते. याचे ताजे उदारहण म्हणजे एल अँण्ड टी म्युच्युअल फंडांच्या गुंतवणुक समभाग  मंथन वाढल्याचे आकडेवारी सांगते. अशा परिस्थितीत निधी व्यवस्थापकांच्या कार्यपद्धतीनुसार एखाद्या फंडाचा लोकसत्ता कर्ते म्युच्युअल फंडाच्या यादीत नव्याने समावेश झाल्यास किंवा यादीतून वगळले गेल्यास लोकसत्ता वाचकांना नक्कीच सतर्क केले जाईल .अशा परिस्थितीत निधी व्यवस्थापकांच्या कार्यपद्धतीनुसार एखाद्या फंडाचा लोकसत्ता कर्ते म्युच्युअल फंडाच्या यादीत नव्याने समावेश झाल्यास किंवा यादीतून वगळले गेल्यास लोकसत्ता वाचकांना नक्कीच सतर्क केले जाईल. तोपर्यंत पंतांच्या मरणाचा किंवा रावांच्या पदोन्नतीचा परिणामाची चिंता वाहण्यास ‘कर्ते’ समर्थ आहेत.

म्युच्युअल फंड विषयी अधिक माहितीसाठी खालील Form भरा:

[contact-form-7 id=”22″ title=”Contact Me”]

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top