परीघाबाहेरचा फंड – डीएसपी इक्विटी फंड

म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करून संपत्ती निर्माण करण्याचे दोन मुख्य टप्पे आहेत. पहिला टप्पा योग्य फंड निवडून त्या फंडात नियमित गुंतवणूक करणे, आणि दुसरे नियमित अंतराने आपल्या गुंतवणूकींचे पुनरावलोकन करणे. ‘लोकसत्ता कर्ते’ म्युच्युअल फंड यादीसाठी निकष निश्चित असून त्या निकषांत बसणाऱ्या फंडाची शिफारस होत असते. तिमाही फंडाच्या कामगिरीचा आढावा घेतांना एखादा फंडाच्या सुधारलेल्या कामगिरीचा सुळका लक्ष वेधून घेतो. बाजारातील अस्थिरतेचा फायदा घेत आपल्या गुंतवणूकीत अधिकाधिक जोखीम समायोजित परतावा मिळविण्यास अशा सुळक्याकडे दुर्लक्ष करणे हिताचे असते. ‘टाटा पीइ’ फंडाची कामगिरी अचानक सुधारली आणि अचानक खालावली हे उदाहरण देता येईल. परंतु एखाद्या फंडाच्या बाबतीत हे सातत्याने घडत असेल तर यादीत समावेश झाला नसला तरी परिघाबाहेरील एखादा फंड लक्षवेधी ठरतो. आजची शिफारस असलेला डीएसपी इक्विटी फंड हा असाच परिघाबाहेरचा फंड आहे. यादीत नसला तरी दखल घेण्याजोगा वाटल्याने सणासुदीच्या दिवसांतील खरेदीची संधी म्हणून ही शिफारस.

फंड घराण्यांचा अभ्यास करतांना गुंतवणूक पद्धती व्यक्ती सापेक्ष बदलतांना दिसते. एखादा फंड त्या व्यक्तीच्या नांवावर (एचडीएफसीचे फंड) विकला जातो. व्यक्ती आणि गुंतवणूक पद्धती यांच्यात व्यक्ती श्रेष्ठ की फंडाच्या गुंतवणुकीसाठी समभाग निवडीमागचे व्यक्तीसापेक्ष न बदलणारे निकष श्रेष्ठ हा नेहमीच वादाचा मुद्दा असतो. गुंतवणुक पद्धती (इन्व्हेस्टमेंट फिलोसॉफी) का महत्वाच्या असतात हे समजून घ्यायचे असेल तर डीएसपी फंड घराण्याच्या गुंतवणूक निकषांचा अभ्यास करायला हवा. मागील काही वर्षात डीएसपीच्या गुंतवणूक व्यवस्थापनात अनेक बदल झाले. गेल्या काही वर्षांत एस नागनाथ (मुख्य गुंतवणूक अधिकारी) , अनुप माहेश्वरी (नागनाथ यांच्या नंतरचे मुख्य गुंतवणूक अधिकारी) , हरीश झवेरी आणि अगदी अलीकडेच गोपाल अग्रवाल यासारखे निधी यशस्वी व्यवस्थापनामागचे मोहरे गमावून सुद्धा डीएसपी फोकस्ड सारख्या फंडाची कामगिरी खालावण्याचा अपवाद वगळता अन्य फंडांच्या कामगिरीत विशेष घसरण झालेली नाही. डीएसपी इक्विटी फंडाच्या निधी व्यावस्थापकांत मागील पाच वर्षांत दोन वेळा बदल झाले. भूतपूर्व निधी व्यवस्थापक अपूर्व शाह, जुलै २०१५ मध्ये डीएसपी फंड घराण्यातून बाहेर पडले. विद्यमान निधी व्यवस्थापक अतुल भोळे फंड घराण्यात दाखल होण्यापूर्वी या फंडाची तात्पुरती जबादारी संयुक्तपणे हरीश झवेरी आणि विनित सांबरे यांच्यावर सोपविली होती. २०१६ पासून या फंडाची जबादारी अतुल भोळे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. हा मल्टीकॅप फंड असून अतुल भोळे यांची शैली गुंतवणूकीसाठी खूपच पोषक ठरते. ते मानदंड सापेक्ष -अज्ञेयवादी निधी व्यवस्थापक आहेत. त्यांचे समभाग निवडीचे निकष कठोर असल्याने वृद्धीक्षम समभागांची निवड करताना मुल्यांकानाला कायम केंद्र स्थानी ठेवलेले दिसते. निधी व्यवस्थापन चमूत बदल होणे आणि सेबीने फंडांचे सुसूत्रीकरण केल्या पश्चात फंडाची मल्टी-कॅप गुंतवणूक पध्दतीत बदल झालेला नाही. बदल आहे तो विद्यमान आणि भूतपूर्व निधी व्यवस्थापकांच्या शैलीत. अतुल भोळे यांची गुंतवणूक शैली अपूर्व शहापेक्षा पूर्णपणे भिन्न आहे. मूलभूत संशोधन हे अतुल भोळे यांच्या गुंतवणूकीच्या केंद्रस्थानी आहे. निधी व्यवस्थापक होण्यापूर्वी अतुल भोळे यांनी बराच कालावधी मुलभूत संशोधक म्हणून व्यतीत केलेला असल्याने त्यांना बाजारातील भावना, बातम्या आणि वेगवेगळे प्रवाह यांच्यापासून फंड गुंतवणुकीला अलिप्त ठेऊन आपल्या संशोधन कौशल्याच्या बळावर गुंतवणूकीसाठी समभाग निवडणे (किंवा विकणे) या साठी होत असतो. तर अपूर्व शहा हे गुंतवणुकीचे काही निर्णय बाजारातील प्रवाहांनुसार (मुमेंटम) घेत असत.

विद्यमान निधी व्यवस्थापकांच्या निधी व्यवस्थापनाखाली फंडाची कामगिरी एप्रिल २०१७ ते सप्टेंबर २०१८ हा कालावधी वगळता, समाधानकारक असल्याचे दिसत आहे. फंडाची कामगिरीत एप्रिल २०१७ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत घसरण झाली असली तरी, वेळीच साहसी गुंतवणुकीला वेसण घातल्याचे प्रतिबिंब जानेवारी २०१९ पासून दिसायला लागले. परिघाबाहेरील (मानदांडाबाहेरील) बजाज फायनांस, अॅव्हेन्यू सुपरमार्ट्स सारखे उच्च मुल्यांकन असलेले परंतु वृद्धीक्षम समभागांच्या समावेशाने जानेवारी २०१९ पासून फंडांच्या कामगिरीत कमालीचा फरक दिसून आला. तर मानदंडात समावेश असलेले रिलायन्स, इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, एचडीएफसी आणि इन्फोसिससारख्या समभागांनी कामगिरीत योग्य वाटा उचलला. मागील पाच वर्षात १ ऑक्टोबर २०१५ ते ३० सप्टेंबर २०२० या कालावधीतल ३ वर्षाच्या चलत सरसरीत फंडाने निर्देशांकापेक्षा सरस कामगिरी करण्याची टक्केवारी ६२ टक्के आहे. तर मागील एक वर्षातील, १ ऑक्टोबर २०१९ ते ३० सप्टेंबर २०२० या एकवर्षातील ३ वर्षाच्या चलत सरासरीची निर्देशांकापेक्षा सरस कामगिरी करण्याची टक्केवारी १०० टक्के आहे. बाजार १ ऑक्टोबर २०१५ ते ३० सप्टेंबर २०२० या पाच वर्षातील घसरणीच्या टप्प्यात मुद्दलाची सुरक्षितता राखण्यात (डाऊनसाईड कॅप्चर रेशो) या फंड गटात पराग पारीख लॉंगटर्म इक्विटी, आणि पीजीआयएम इक्विटी डायव्हर्सीफाइड फंड पुढे आहेत. तर तेजीच्या कालावधीत निर्देशांकापेक्षा अधिक परतावा देण्याच्या क्रमवारीत (अपसाईड कॅप्चर रेशो) डीएसपी इक्विटी हा फंड चौथ्या क्रमांकावर आहे. मागील दोन तिमाहीत क्रिसिल क्रमवारीत (सीपीआर) हा फंड ‘अपर मिडल क्वारटाईल’मध्ये राहिला असून या आठवड्यात जाहीर होणाऱ्या क्रिसिल क्रमवारीत फंडाच्या क्रमवारीत एका पायरीने सुधारणा अपेक्षित आहे. कदाचित या फंडाचा समावेश पुढील तिमाहीत ‘कर्त्यां’च्या यादीत होण्याची शक्यता वाटल्याने फंड गुंतवणुकीची ही आगाऊ शिफारस आहे.

निधी व्यवस्थापन खर्चाचा विचार केल्यास हा फंड, फंड गटातील एक महागडा फंड आहे. अधिक व्यवस्थापन शुल्क आकारणाऱ्या फंडात गुंतवणूक करणे म्हणजे गुंतवणुकीवरील कमी परताव्याला आमंत्रण देणे होय. मल्टीकॅप फंड गटातील अन्य फंडांच्या जोखीम परतावा गुणोत्तराचा विचार करता महाग व्यवस्थापन खर्चाचे (रेग्युलर ग्रोथ २.०४ %) समर्थन करता येत नाही. फंड घराण्याने पुढील तिमाहीसाठी व्यवस्थापन खर्चात किमान दोन दशांश टक्यांनी (०.२०) कपात केली तरच फंडाच्या जवळपास कामगिरी असलेल्या फंडाच्या व्यवस्थापन खच्या तुलनेत सुसाह्य पातळीवर असेल. गुंतवणूकदारांनी गांभीर्याने स्पर्धकांपेक्षा अधिक व्यवस्थापन खर्च असल्याचे विचारात घेऊन हा खर्च समर्थनीय वाटल्यास गुंतवणूकीचा निर्णय घ्यावा.

म्युच्युअल फंड विषयी अधिक माहितीसाठी खालील Form भरा:

[contact-form-7 id=”22″ title=”Contact Me”]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top