संधी की सापळा?

सध्याचे स्वस्त मुल्यांकन सापळ्यात अडकवणारे आमिष ठरण्याची शक्यता अधिक आहे. ही गुंतवणुकीची अखेरची संधी नक्कीच नव्हे. सध्याची अस्थिरता जी दिवसेंदिवस वाढत्या नुकसानीस कारणीभूत ठरत आहे त्या अस्थिरतेवर मात करण्याचा प्रयत्न योग्य मालमत्ता विभाजनातून करता येईल. वर्षभरात पावसाळ्यात लिंब सर्वात स्वस्त असतात. लिंब स्वस्त झाली म्हणून घरातील गृहिणी साठवणीचे लोणचे किंवा लिंबाचे तत्सम पदार्थ पावसाळ्यातील स्वस्त लिंबांपासून बनवत नाही. लिंबाचे लोणचे वर्षभर टिकवायचे असेल तर नोव्हेंबर ते जानेवारी या मोसमातील लिंबे वापरतात. स्वस्त मुल्यांकन हे वाच्यार्थाने न घेता लक्षार्थाने घ्यायची गोष्ट आहे.

“भांडवली बाजारातील तेजीचा जन्म निराशावादावर होतो, तेजीचा विस्तार संभ्रमात होतो आणि आशावादावर तेजीचा अंत होतो. बाजारात सर्वाधिक निराशा असतांना खरेदी करण्याची ही सर्वोत्तम वेळ असते. सर्वाधिक आशादायक वातावरण असतांनाची वेळ विक्रीसाठी सर्वात चांगले वेळ असते.” – सर जॉन टेम्पलटन

गुंतवणूकदारांचा ई टपाल कप्पा म्युच्युअल फंडांकडून आलेल्या टपालांनी भरून गेला असेल. वरील सुभाषितवजा वाक्यांची पखरण आलेले ई टपाल फंड घराण्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा वलयांकित मुख्य गुंतवणूक अधिकाऱ्यांकडून गुंतवणूकदरांकडे नक्कीच पोहचले असेल. आपल्या गुंतवणूकदारांन दिलासा देतांना नवीन गुंतवणुकीसाठी समभाग गुंतवणूक करणारे फंड किती आकर्षक मुल्यांकानावर उपलब्ध असून शतकात अतिशय कमी वेळा अशी संधी उपलब्ध होते आणि या संधीचा का लाभ घ्यायला हवा या सारख्या मजकुरांनी गुंतवणूकदारांना उच्च परतावा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे भांडवली बाजारांनी बारा वर्षांनी ‘सब-प्राइम’नंतरची सर्वात मोठी आपटी मार्च महिन्यांत अनुभवल्याने सर्वच गुंतवणूकदारांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेत २५ ते ३५ टक्के घट झाली आहे. हवालदिल गुंतवणूकदारांना दिलासा देणे गरजेचे असल्याने असे उपाय करणे हा व्यावसायिक गरजेचा भाग आहे इतकेच .

गुंतवणूकदारांनी अशा संबोधनपर टपालांना प्रतिसाद देण्यापूर्वी आपला गृहपाठ चोख करणे आवश्यक आहे. समभाग मुल्यांकन हे  सरासरी निर्देशांकांच्या मुल्यांकनापेक्षा खूप कमी आहे हे सत्य असले तरी गुंतवणूक करण्यापूर्वी गृहपाठ चोख करणे गरजेचे आहे. टाळेबंदी संपल्यावर अर्थव्यवस्थेला लगेचच गती मिळेल असे नाही. टाळेबंदी काळात चाचणी सामुगी संचाच्या उत्पादनात वाढ, त्यांचे वितरण, चाचण्यांचा वेग वाढविणे, औषधे, व्हेंटिलेटरचा पुरवठा वाढविणे आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या सुरक्षिततेची काळजी यासारख्या गोष्टींवर सरकारचे लक्षकेंद्रित झाल्याने उत्पादनक्षम कामकाज होऊ शकलेले नाही. अकृषी मजुरांनी किमान ३० दिवसांचा रोजगार गमावला आहे. रोजगार गमावलेले हताश स्थलांतरित कामगार आपल्या खेड्याकडे जाण्यासाठी बसस्थानकात गर्दी करत होते कित्येक शंभर किलोमीटर पायी त्यांच्या खेड्यात जाण्याचा प्रयत्न करीत असल्याचे वृत्त भविष्यात वाढून ठेवलेल्या संकटाची तीव्रता दर्शवितो, जे लोक काही कारणांनी आपली रोजगाराचे ठिकाण सोडू शकलेले नाहीत त्यांच्यात तीव्र अस्वस्थता आहे. कृषी उत्पादनासहित उद्योगांची पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकीची नव्याने आखणी करणे गरजेचे आहे. उदाहरण द्यायचे तर औषध निर्मिती अत्यावश्यक सेवा असली तरी काचेच्या किंवा प्लास्टिकच्या बाटल्या त्यावर लावायची लेबले छापणारे छापखाने बंद आहेत. परिणामी पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे.

वर उल्लेख केलेली ई टपाल आले तरी कितीही आक्षार्षक मुल्यांकनाचा बिगुल वाजवीत असली तरी हा हे मुल्यांकन सापळ्यात अडकवणारे आमिष ठरण्याची शक्यता अधिक आहे. गुंतवणूकदरांकडे ५ वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीत गरज नसलेला पैसा समभाग गुंतवणुकीकडे वळवणे योग्य ठरेल. ही गुंतवणुकीची अखेरची संधी नक्कीच नव्हे. पुढील तीन वर्षे कालावधीत बाजारात गुंतवणुकीची संधी मिळणारच नाही असे नव्हे. सध्याची अस्थिरता जी दिवसेंदिवस वाढत्या नुकसानीस कारणीभूत ठरत आहे त्या अस्थिरतेवर मात करण्याचा प्रयत्न योग्य मालमत्ता विभाजनातून करता येईल. अल्ट्रा शॉर्ट किंवा मनी मार्केट फडांसारख्या रोकड सुलभ गुंतवणूक साधनांत गुंतवणूक करणारे फंडात किमान ५० टक्के गुंतवणूक असायला हवी. वर्षभरात पावसाळ्यात लिंब सर्वात स्वस्त असतात. लिंब स्वस्त झाली म्हणून घरातील गृहिणी साठवणीचे लोणचे किंवा लिंबाचे तत्सम पदार्थ पावसाळ्यातील स्वस्त लिंबांपासून बनवत नाही. लिंबाचे लोणचे वर्षभर टिकवायचे असेल तर नोव्हेंबर ते जानेवारी या मोसमातील लिंबे वापरतात. स्वस्त मुल्यांकन हे वाच्यार्थाने न घेता लक्षार्थाने घ्यायचे आहे. वाचकांनी त्यांच्या उपलब्ध रक्कमेचे कालावधीनुसार विभाजन करून फंडांची निवड करावी. गुंतवणूकदारांच्या वित्तीय गरजांची पूर्तता करण्यासाठी कालबद्ध आदर्श गुंतवणूक सोबतच्या कोष्टकांत दिली आहे. वाचक या आदर्श पोर्टफ़ोलिओचा गुंतवणूकीसाठी वापर करू शकतात.

जगभरात ‘डू इट युवरसेल्फ’ (डीआयवाय) संप्रदाय उदयास आला आहे. या सांप्रदायाचे अनुयायी अर्धा कच्चा माल, अर्धे कौशल्य वापरत एकाद्या वस्तुची पुनर्बांधणी करतात. गुंतवणुकीच्या क्षेत्रातसुद्धा या सांप्रदायाचे विपुल अनुयायी आढळतात. वैयक्तिक वित्तीय व्यवस्थापनात ‘डीआयवाय’ संज्ञा प्रचलित झाली आहे. समभाग किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतांना एखाद्या व्यावसायिक सल्लागाराची मदत न घेता ‘रोबो अॅडव्हायझरी’ किंवा मायाजालावर उपलब्ध माहितीचा आधार घेत आपला पोर्टफ़ोलिओ तयार करतात. आजचा लेख हा ‘डीआयवाय’ सांप्रदायीकांना नक्कीच मदत करेल.

कालबद्ध गुंतवणुकीसाठी आदर्श पोर्टफ़ोलिओ 

(कंसात हिश्श्याचा टक्का)

१ वर्षापेक्षा कमी (Mutual Fund for 1 year)

  • अॅक्सीस लिक्वीड Axis Liquid Fund (५०) 
  • निप्पॉन इंडिया फ्लोटिंग रेट Nippon India Floating Rate (२५) 
  • एल अॅण्ड टी मनी मार्केट फंड L & T Money Market Fund(२५)

 

१ ते ३ वर्षे (Mutual Fund for 1 to 3 years )

  • एल अॅण्ड टी बॅलंस्ड अॅडव्हांटेज L & T Balanced Advantage Fund(४०)
  • एचडीएफसी शॉर्ट टर्म डेट  HDFC Short Term Debt (४०)
  • निप्पॉन इंडिया लार्जकॅप Nippon India Large Cap Fund (२०)

 

३ ते ५ वर्षे (Mutual Fund for 3 to 5 years )

  • मिरॅ अॅसेट लार्जकॅप Mirae Asset Large Cap Fund (३०)
  • एचडीएफसी हायब्रीड इक्विटी HDFC Hybrid Equity Fund (३०)
  • एलआयसी एमएफ बँकिंग अॅण्ड पिएसयु डेट LIC MF Banking & PSU Debt (४०)

 

५ ते ७ वर्षे (Mutual Fund for 5 to 7 years )

  • पराग पारीख लॉंगटर्म इक्विटी Parag Parikh Long Term Equity Fund (४०)
  • मिरॅ अॅसेट इमर्जिंग ब्लूचीप Mirae Asset Emerging Bluechip Fund  (४०)
  • आदित्य बिर्ला सनलाईफ साव्हिंग्ज Aditya Birla Sunlife Savings Fund (२०)

 

७ वर्षांपेक्षा अधिक (Mutual Fund for more than 7 years )

  • पराग पारीख लॉंगटर्म इक्विटी Parag Parikh Long Term Equity Fund (४०)
  • मिरॅ अॅसेट लार्जकॅप Mirae Asset Large Cap Fund (४०)
  • एल अॅण्ड टी मिडकॅप L & T Mid cap fund (२०)
म्युच्युअल फंड विषयी अधिक माहितीसाठी खालील Form भरा:
[contact-form-7 id=”22″ title=”Contact Me”]

 

 

 

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top