फलाटदादा फलाटदादा… सिग्नल पडला आली गाडी

भारतीय रेल्वेमध्ये ऑनलाईन प्रवासी तिकीट आरक्षण, प्रवाशांसाठी केटरिंग आणि बाटलीबंद पेयजल अशा व्यवसायातील एकाधिकारशाहीमुळे कंपनीला आपल्या उत्पादन आणि सेवांवर किंमत ठरविण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य आहे आणि दुसऱ्या कोणत्याही स्पर्धकाचा दबाव नाही. याचा फायदा गुंतवणूकदारांना कंपनीच्या सूचिबद्धतेवेळी नक्कीच मिळेल.

भारतीय रेल्वेच्या मालकीची इंडियन रेल्वे कॅटिरग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (आयआरसीटीसी) ही सार्वजनिक उपक्रमातील ‘मिनीरत्न’ दर्जा असलेली कंपनी आपल्या समभागांची प्रारंभिक सार्वजनिक विक्री आजपासून ३ ऑक्टोबपर्यंत करत आहे. कंपनीच्या समभागाचे दर्शनी मूल्य १० रुपये असून ३१५ ते ३२० रुपये हा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. सूचिबद्धतेतून प्रवर्तकांना भांडवली नफ्याचा लाभ घेण्यासाठी कंपनी २ कोटी समभागांची निर्गुतवणुकीतून विक्री करीत आहे. या विक्री प्रक्रियेतून समभाग विकत घेण्यासाठी किमान ४० समभागांसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी ३५ टक्के समभाग राखून ठेवले असून या गटातीलअर्जदारांना जर समभाग वितरित झाले, तर विक्री किमतीवर प्रति समभाग १० रुपये सूट मिळणार आहे. आयआरसीटीसी ही भारतीय रेल्वेसाठी कॅटिरग सेवा, ऑनलाइन रेल्वे तिकिटे आणि भारतातील रेल्वे फलाटांवर आणि गाडय़ांमध्ये ‘रेल नीर’ या नाममुद्रेने बाटलीबंद पिण्याचे पाणी पुरवठा या व्यवसायात असलेली सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. आयआरसीटीसी संपूर्णपणे भारत सरकारच्या मालकीची असून या कंपनीवर रेल्वेचे प्रशासकीय नियंत्रण आहे. आयआरसीटीसीचे संकेतस्थळ (www.irctc.co.in) हे जगातील सर्वात व्यस्त संकेतस्थळांपैकी एक असून मायाजालावर आशिया-खंडातील सर्वात जास्त व्यवहार असलेले संकेतस्थळही आहे. ३१ ऑगस्ट २०१९ रोजी संपलेल्या पाच महिन्यांच्या कालावधीत दरमहा २५ ते २८ दशलक्ष व्यवहारांची नोंद या संकेतस्थळावर झाली आहे. या व्यतिरिक्त ई-कॅटिरग, एक्झिक्युटिव्ह लाऊंज आणि बजेट हॉटेल्स यासारख्या रेल्वेशी संबंधित नसलेल्या सेवांवर आधारित व्यवसायात चांगला जम बसविला आहे.

आयआरसीटीसीला एकूण महसुलापैकी सर्वाधिक महसूल इंटरनेट तिकीट विक्रीतून मिळतो. भारतात ऑनलाइन रेल्वे तिकीट आरक्षणाचे प्रमाण प्रचंड असून दरमहा २५ दशलक्षाहून अधिक आणि दररोज ७.५ दशलक्ष संभाव्य प्रवासी या संकेतस्थळावर व्यवहार करतात. संकेतस्थळावर होणाऱ्या वर्दळीमुळे या संकेतस्थळावर जाहिरातदारांच्या जाहिरातीसाठी उडय़ा पडत असल्याने आयआरसीटीसीला व्यवहाराव्यतिरिक्त गैर व्यावसायिक उत्पन्नाचे हे संकेतस्थळ साधन झाले आहे. कंपनीच्या इंटरनेट तिकीट सेवेमुळे रेल्वेच्या तिकीट विक्रीसाठी वापरले जाणारे मनुष्यबळ, इमारती, वातानुकूलन, वीज, फर्निचर. इत्यादींवर होणाऱ्या खर्चात मोठी बचत झाली आहे. त्याच्या पायाभूत सुविधांवर भारतीय रेल्वेची बचत झाली आहे. क्रिसिलच्या मते, रेल्वेच्या इंटरनेट तिकीट आरक्षणात मोठी वाढ अपेक्षित आहे. इंटरनेटवरून आरक्षित केलेल्या तिकिटांची संख्या आर्थिक वर्ष २०१८-१९ मधील २८.४ कोटीवरून आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ४२.५-४३ कोटी रुपयांपर्यंत वाढणे अपेक्षित आहे. आयआरसीटीसीचे स्वत:चे आयआरसीटीसी ई-वॉलेट नावाचे स्वत:चे पेमेंट गेटवे प्लॅटफॉर्म आहे. या ई-वॉलेटवर आठ लाख वापरकर्त्यांनी नोंदणी केली आहे. ई-वॉलेट सेवा वापरकर्त्यांना आयआरसीटीसीकडे आगाऊ पैसे जमा करून तिकिटाचे देयक बँकेच्या व्यवहाराशिवाय पूर्ण करण्याची सुविधा देते. या प्रकारात वेळ आणि बँकिंग सेवा शुल्काची बचत होत असल्याने अनेक वापरकत्रे या सेवेचा लाभ घेत आहेत. आयआरसीटीसीने आय-मुद्रा आणि आय-पे सारखी अतिरिक्त देयक साधनेदेखील विकसित केली आहेत.

आयआरसीटीसीचे देशात बाटलीबंद पाण्याचे सध्या १० उत्पादन प्रकल्प असून आणखी सहा प्रकल्पांचे काम प्रगतिपथावर आहे. आयआरसीटीसीला दोन गाडय़ा ‘हॉलेज कॉन्सेप्ट’ तत्त्वावर चालविण्यास मान्यता मिळाली असून या गाडय़ांचे तिकीट दर आणि गाडय़ातील सेवांचे शुल्क ठरविण्याचे स्वातंत्र्य आयआरसीटीसीला आहे. आयआरसीटीसीने २०१७ मध्ये नवीन कॅटिरग धोरण सुनिश्चित केले असून संपूर्ण कॅटिरगची जबाबदारी भारतीय रेल्वेकडून पॅण्ट्री-कार सेवा असलेल्या सर्व मोबाइल युनिट्सवरील सेवा तसेच फलाटांवरील भारतीय रेल्वेच्या कॅटिरग सेवा आयआरसीटीसीकडे देण्यात आल्या आहेत. किमान दहा नवीन प्रकारच्या पॅण्ट्री-कार प्रस्तावित केल्या असून या पॅण्ट्री-कारचे आरेखन रेल्वे बोर्डाच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे. या पॅण्ट्री-कार सेवेत आल्यानंतर यातून मिळणाऱ्या महसुलाचे आयआरसीटीसी आणि रेल्वेमध्ये ८५:१५ या प्रमाणात वाटप करण्याचा करार उभयतांमध्ये झाला आहे. आयआरसीटीसीची खानपान सेवा मुख्यत्वे दोन क्षेत्रांमध्ये विभागली गेली आहे. मोबाइल कॅटिरग या व्यवसाय विभागात रेल्वे गाडय़ांमधील कॅटिरग सेवांचा समावेश आहे. यामध्ये राजधानी, शताब्दी, दुरांतो, गतिमान, तेजस, वंदे भारत गाडय़ा ज्या गाडय़ांच्या तिकिटात खानपान सेवेच्या शुल्काचा अंतर्भाव असतो. दुसऱ्या प्रकारात मेल आणि एक्सप्रेस गाडय़ा ज्यामध्ये पॅन्ट्री कार असलेल्या आणि नसलेल्या गाडय़ात विक्रेता बेस किचनमध्ये तयार झालेले पदार्थ विक्रीची सेवा देतो. तर स्थिर कॅटिरग या विभागात फास्ट फूड युनिट्स, फूड प्लाझा, जन आहार्स, रिफ्रेशमेंट रूम, बेस किचन आणि स्टेशन आवारातील एक्झिक्युटिव्ह लाऊंज आणि इतर सुविधा जसे की बजेट हॉटेल आणि रेल यात्री निवासांचे व्यवस्थापन यांचा समावेश होतो. ऑगस्ट ३१, २०१९ पर्यंत आयआरसीटीसीने नवी दिल्ली, जयपूर, आग्रा कॅन्टोनमेंट येथे एक्झिक्युटिव्ह लाऊंजची सेवा उपलब्ध करून दिली आहे.

वित्तीय कार्यक्षमता

गेल्या तीन आर्थिक वर्षांच्या आर्थिक कामगिरीच्या आकडेवारीवर नजर टाकली असता, आयआरसीटीसीने आर्थिक वर्ष २०१६-१७ ते २०१८-१९ दरम्यान एकूण उत्पन्न / निव्वळ नफ्याची आकडेवारी अनुक्रमे १,६०२.८५/ २२९.०८, १,५६९.५६/ २२०.६२, १,९५६.६६/२७२.६० (कोटी रुपये) नोंदविला आहे. या तीन वर्षांत कंपनीची विक्री १०.४९ टक्के तर निव्वळ नफ्यात १४ टक्के वाढ झाली. नोटाबंदीच्या नंतर डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी नोव्हेंबर २०१६ पासून आयआरसीटीसीचे सेवाशुल्क रहित केले होते. या महिन्यांच्या १ तारखेपासून गैर वातानुकूलित प्रवासी तिकिटांवर १५ रुपये आणि वातानुकूलित तिकिटांसाठी ३० रुपये सेवाशुल्क आकारण्यास पुन्हा सुरुवात झाली आहे. येत्या आर्थिक वर्षांत ही सेवाशुल्क आकारणी कंपनीच्या नफ्यात मोठी वाढ दाखवेल. कंपनीचे भागभांडवल १६० कोटी रुपयांचे असून कंपनीकडे ८८२ कोटींची गंगाजळी आहे. किंमतपट्टय़ाच्या कमाल किमतीवर, ३१ मार्च २०१९ च्या नफ्यानुसार कंपनीचे मूल्यांकन १८.२ पट तर पुस्तकी किमतीचे कमाल विक्री किमतीशी गुणोत्तर ४.९१ पट आहे. कंपनीच्या व्यवसायाशी साधम्र्य असलेली दुसरी कोणतीही कंपनी बाजारात सूचिबद्ध नसल्याने तुलनात्मक मूल्यांकन उपलब्ध नाही. आयआरसीटीसी कार्यरत असलेल्या इंटरनेट तिकीट, कॅटिरग, बाटलीबंद पाणी आणि पर्यटन यापैकी पहिल्या तीन व्यवसायात कंपनीची एकाधिकारशाही आहे. या एकाधिकारशाहीमुळे कंपनीला आपल्या उत्पादनांवर किंमत ठरविण्यास दुसऱ्या कोणत्याही स्पर्धकाचा दबाव नाही. याचा फायदा गुंतवणूकदारांना कंपनीच्या सूचिबद्धतेवेळी नक्कीच मिळेल. म्हणूनच अनौपचारिक बाजारात या समभागांना ५० ते ५५ रुपयांचे अधिमूल्य मिळत आहे.

पुलंनी जे काही वेगवेगळे प्रयोग केले त्यामध्ये निवडक कवींच्या कविता वाचनाचा कार्यक्रमसुद्धा केला. आरती प्रभू, बाकीबाब बोरकर, बाळ सीताराम मर्ढेकर यांच्या कवितांचे पुलं आणि सुनीताबाई वाचन करीत. सुसंस्कृत आईवडिलांमुळे चर्चगेट स्टेशनजवळच्या पाटकर सभागृहात या कविता वाचनाचा आस्वाद घेता आला. अशा कार्यक्रमात ‘मर्ढेकर हा मराठीतला एकमेव सुटाबुटातला कवी’ अशी सुनीताबाई मर्ढेकरांची ओळख करून देत असत. साधारणपणे साहित्यिक म्हटले की अतिशय साधी राहणी असे चित्र लोकांच्या डोळ्यासमोर येते त्या चित्राला छेद देणारे मर्ढेकरांचे व्यक्तिमत्त्व होते. आयसीएस होण्यासाठी इंग्लंडमध्ये राहिल्याने साहेबी थाटाच्या मर्ढेकरांनी कवितेत वापरलेली प्रतीकेसुद्धा तत्कालीन कवींच्या प्रतीकांपेक्षा खूपच भिन्न होती. ‘फलाटदादा, फलाटदादा’ या कवितेतील ‘बोल ना फलाटदादा’ ही ओळ सुनीताबाई अतिशय आर्जवाने वाचत. आजपासून आपल्या समभागांची प्रारंभिक सार्वजनिक विक्री सुरू करणारी ही कंपनी रेल्वेच्या मालकीची आणि फलाटावर फास्ट फूड, फूड प्लाझा, रिफ्रेशमेंट रूम, बेस किचन आणि स्टेशन आवारातील एक्झिक्युटिव्ह लाऊंजच्या व्यवस्थापनाच्या व्यवसायात असलेली. या निमित्ताने पुलं आणि सुनीताबाईंच्या कविता अभिवाचनाची आठवण झाली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top