विजयी वीर

व्यवसायातील वृद्धी आणि गुणवत्ता या दोहोंचा संगम असलेल्या कंपन्यांत गुंतवणूक करताना मोठे अधिमूल्य द्यावे लागते. जे मोजके निधी व्यवस्थापक या अधिमूल्याची किंमत जाणतात त्यात यांचा समावेश आहे.

अर्थव्यवस्था मंदावली असताना आपल्या फंडातील गुंतवणूकदारांचे मुद्दल शाबूत ठेवून त्यावर नफा मिळविण्यासाठी निधी व्यवस्थापकांना रात्रीचा दिवस करावा लागतो. समभाग गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापक मालमत्तेच्या सुरक्षेसाठी कठोर परिश्रम करीत असतात. अलीकडच्या काही वर्षांत देशातील आणि जागतिक आघाडीवर कठीण परिस्थिती आणि अभूतपूर्व अस्थिरता पाहता हे सोपे नव्हे.

मुद्दल शाबूत ठेवणे हे सोपे काम नसते. भांडवलावर नफा कमावणे हे तर त्याहून कठीण आहे. काही फंड व्यवस्थापक कमी धोका पत्करून परतावा देण्यास यशस्वी झाले आहेत. म्युच्युअल फंडांची क्रमवारी (रँकिंग) ठरविणाऱ्या संस्था फंडाचे तिमाही प्रगतिपुस्तक जाहीर करतात. वर्षांतून एकदा गुंतवणूकदारांसाठी सर्वाधिक संपत्ती निर्माण करणाऱ्या निधी व्यवस्थापकांचा वर्षांतून एकदा सन्मानही केला जातो. मागील दोन वर्षे अ‍ॅक्सिस ब्लूचिप या लार्ज कॅप फंडासाठी सन्मानास पात्र ठरलेल्या श्रेयस देवलकर यांना या वर्षी अ‍ॅक्सिस ब्लूचिप आणि अ‍ॅक्सिस मिड कॅप या दोन फंडांसाठी गौरविण्यात आले. ओळीने तीन वर्षे एखाद्या निधी व्यवस्थापकास एकाच फंडाच्या कामगिरीबद्दल गौरवण्याचा योग विरळाच.

त्यांच्या या हॅट्ट्रिकची तुलना वेस्ट इंडीज दौऱ्यातील पहिल्या कसोटीतील दुसऱ्या डावातील जसप्रीत बुमराच्या हॅट्ट्रिक मिळवून देणाऱ्या स्पेलशी करता येईल. क्रिकेटशी संबंधित सांख्यिकी देणाऱ्या एका साइटवरील आकडेवारीनुसार, २०१८ मध्ये बुमराने चक्क ५० चेंडू ताशी १५० किलोमीटरच्या वेगाने टाकले आहेत. यासाठी आजचे वेगवान गोलंदाज चेंडू टाकल्याबरोबर स्पीडगनच्या आकडय़ाकडे पाहतात. बुमराची अ‍ॅक्शन, स्विंग, वेग, चेंडूचा टप्पा आणि दिशा यांच्या अचूकतेमुळे आयसीसीच्या दिवसीय सामन्यांच्या क्रमवारीत तो पहिल्या क्रमांकावर आहे. वेगवेगळ्या फंड गटांत ज्यांची ज्यांची सर्वश्रेष्ठ निधी व्यवस्थापक म्हणून निवड झाली आहे त्या निधी व्यवस्थापकांनी गुंतवणुकीचे तंत्र मेहनतीने जोपासले आहे.

अ‍ॅक्सिस ब्लूचिप या लार्ज कॅप फंडाचे निधी व्यवस्थापन करताना श्रेयश देवलकरही कंपनी व्यवस्थापनाचा दर्जा महत्त्वाचा मानतात. व्यवसायातील वृद्धी आणि गुणवत्ता या दोहोंचा संगम असलेल्या व्यवसायात गुंतवणूक करताना मोठे अधिमूल्य द्यावे लागते. जे मोजके निधी व्यवस्थापक या अधिमूल्याची किंमत जाणतात त्यात श्रेयस देवलकर यांचा समावेश आहे. या मंदीमध्ये अ‍ॅक्सिस ब्लूचिपबाबत सांगायचे झाल्यास त्यांचा दृष्टिकोन गुणवत्तापूर्ण उद्योगांचा गुंतवणुकीत समावेश वाढवण्यावर राहिला आहे. त्यांच्या मते, ‘‘कमकुवत व्यवसाय असलेल्या कंपन्या बाजाराच्या रोषास सामोरे गेल्या. परिणामी त्यांच्या समभागांच्या किमतीत घसरण झाली. स्वस्त व्यवसायात गुंतवणूक करण्यात नेहमीच तोटा असतो.’’ तर अ‍ॅक्सिस मिडकॅपसारख्या फंडांचे निधी व्यवस्थापन पूर्णत: वेगळ्या पद्धतीने केले जाते. मिडकॅपसारख्या फंडांत गुंतवणूक करताना एखाद्या लहान उद्योगक्षेत्रात नेतृत्व करणाऱ्या किंवा दुसऱ्या क्रमांकावरील कंपन्यांना त्यांनी प्राथमिकता दिली आहे. मिडकॅप गुंतवणूक करताना विस्तार योजनांची अंमलबजावणी यशस्वीरीत्या करणाऱ्या प्रवर्तकांच्या कंपन्यांचा त्यांनी गुंतवणुकीत समावेश केला आहे. गुंतवणूक करताना दर्जा हा निकष ठेवल्यामुळे स्पर्धक फंडांच्या तुलनेत या फंडाला कठीण काळात सर्वात कमी घसरणीला सामोरे जावे लागले.

साधारण मे-जून २०१८ पासून अर्थव्यवस्था मंदावत असल्याची लक्षणे आम्हाला दिसू लागली. प्रवासी वाहनांचा खप, मग महिन्यागणिक विकलेल्या दुचाकींच्या घटणाऱ्या संख्येने मंदावलेल्या मागणीवर शिक्कामोर्तब केले. जानेवारीपासून विवेकाधीन उपभोगांच्या वस्तूंचा खप घसरू लागला. अशा पद्धतीने मंदीची व्याप्ती वाढत चालल्याचे निदर्शनास येत होते. सामान्यत: व्यापारचक्राचे चार भाग केले, तर तिसरा भाग हा अन्य टप्प्यांपेक्षा मोठय़ा कालावधीचा टप्पा असतो. अनेक निधी व्यवस्थापकांसाठी हा अस्थिर कालावधी असतो. या टप्प्यात अर्थव्यवस्थेतील उद्योग क्षेत्रे मंदीतून बाहेर पडण्याच्या प्रयत्नांत असतात, तर काही उद्योगांत मंदीची व्याप्ती वाढते. भारताची अर्थव्यवस्था आज नेमकी या तिसऱ्या टप्प्यात आहे. या टप्प्यात व्याजदर संवेदनशील उद्योगात सुधारणेची लक्षणे सर्वात आधी दिसून येतात. ‘अर्ली रिकव्हरी सेक्टर्स’ अजून तरी सुधारणेचे संकेत देत असल्याचे दिसून येत नाही. सध्याच्या सरकारकडून होणाऱ्या वेगवेगळ्या आर्थिक हस्तक्षेपाच्या पार्श्वभूमीवर आम्हाला दोन तिमाहीनंतर कंपन्यांच्या उत्सर्जनात वाढ होण्याची आशा वाटते.

अर्थव्यवस्थेच्या या टप्प्यात आम्ही नवीन गुंतवणूक अतिशय काळजीपूर्वक करीत आहोत. आमच्याकडे गुंतवणुकीत दर्जेदार आणि समाधानकारक वृद्धी राखणाऱ्या समभागांचा समावेश आहे. गेल्या वर्षभरात चांगली कामगिरी करणाऱ्या उद्योग क्षेत्रांची संख्या कमी झाली आहे. उदाहरणार्थ, मिडकॅप गुंतवणुकीत वाहन उद्योगासाठी पूरक उत्पादक क्षेत्र मंदीच्या सावटाखाली आले आहेत. गैरबँकिंग वित्तीय कंपन्यांची वाढ मंदावली आहे. म्हणूनच आम्ही अशा क्षेत्रांमध्ये आणि कंपन्यांकडे अधिक लक्ष केंद्रित करीत आहोत. तुलनेने ज्यांच्या उत्सर्जनात नजीकच्या काळात वाढ दिसून येईल. आमच्यासाठी उपभोगाच्या वस्तू ही विस्तृत संकल्पना असून आम्ही उपभोगाच्या वस्तूंसाठी होणारा वित्तपुरवठा हासुद्धा घटक समजतो. साहजिकच आम्ही खासगी बँका वाजवी मूल्यांकन असलेल्या गैरबँकिंग वित्तीय कंपन्या यांना गुंतवणुकीत प्राधान्य दिले आहे. अन्य उद्योग क्षेत्रे आणि कंपन्यांचा विचार करता आमची प्राथमिकता सर्वाधिक घसरण झालेल्या उद्योग क्षेत्रे आणि कंपन्यांपेक्षा सर्वात कमी घसरण झालेल्या कंपन्यांना आहे. ज्या उद्योगांना मंदीची कमी झळ पोहोचली आहे अशा उद्योग क्षेत्रातील वाजवी मूल्यांकन असलेल्या कंपन्यांचा आम्ही नव्याने गुंतवणूक करताना अधिक विचार करतो.

सध्या व्यापारचक्र ज्या टप्प्यात आहे तो टप्पा संचयाचा टप्पा समजला जातो. बाजारातील सुधारणांची वाट बघून गुंतवणूक करण्यापेक्षा ‘एसआयपी’च्या माधमातून गुंतवणूक करून म्युच्युअल फंडांच्या युनिट्सचा संचय करणे फायद्याचे ठरेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top