तुला पाहतो रे!

बाजारातील गुंतवणूक नेहमीच चक्रवाढ गतीने वाढते. चाळीस वर्षांत एक लाख गुंतवणुकीवर ४५० कोटी रुपयांचा भरभक्कम परतावा देऊन ‘सेन्सेक्स’ने हा विश्वास दृढ केला आहे. गेल्या आठवडय़ात मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४० वर्षांचा झाल्याचा व्हॉट्सअप संदेश मुंबई शेअर बाजाराकडून आला. पुलंनी लिहिल्यानुसार एखाद्या उदबत्तीचा सुगंध किंवा कोऱ्या छत्रीवर पडलेले पाणी मनाला मागे घेऊन जाते. सेन्सेक्स ४० वर्षांचा झाल्याचा हा मेसेजसुद्धा मनाला असाच मागे घेऊन गेला. ‘सेन्सेक्स’ या शब्दाची ओळख १९८४ साली झाली. तेव्हा सन्सेक्स होता पाच वर्षांचा आणि माझे वय होते १८ वष्रे. इंजिनीयरिंगचे शिक्षण सांभाळून बाजारात थोडी गुंतवणूक करायला सुरुवात केल्याचा तो कालखंड होता. मुंबई शेअर बाजाराच्या इमारतीत प्रवेश करणे आजच्यापेक्षा त्या काळी खूप सुलभ होते. त्या काळी बाजाराचे कामकाजसुद्धा १२ ते २ या वेळेपुरते सीमित होते. वर्ग भरताना जशी घंटा होत असे तशी ठीक बारा वाजता बेल वाजवली जाऊन कामकाजाला सुरुवात होत असे. जगभरात वेगवेगळ्या देशांच्या अर्थव्यवस्थांची रक्तवाहिनी समजले जाणारे निर्देशांक आहेत असेच आशियातील सर्वात जुन्या शेअर बाजाराची ओळख असलेलासुद्धा एक निर्देशांक असावा असे बाजारातील तत्कालीन धुरीणांना वाटल्याने सर्वाधिक सौदे होणाऱ्या ३० कंपन्यांचे एकत्रित भांडवली मूल्य १०० समजून १ एप्रिल १९७९ रोजी पहिल्यांदा ‘बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज सेन्सेटिव्ह इंडेक्स’ जाहीर झाला. त्या काळी दर पंधरा मिनिटांनी जाहीर होणारा सेन्सेक्स आता एका मिनिटात चार वेळा म्हणजे दर पंधरा सेकंदांनी नोंद होते. एक इंग्रजी वर्तमानपत्रात त्या दिवशीच्या शेअर बाजाराच्या तांत्रिक अंगावर सदर लिहिणाऱ्या दीपक मोहोनी यांनी ‘सेन्सेटिव्ह इंडेक्स’च्या इंग्रजी स्पेलिंगमधील पहिली तीन आणि शेवटची तीन अक्षरे निवडून ‘सेन्सेक्स’ असे नव्याने बारसे केले. मुंबई शेअर बाजार निर्देशांकाचे हे लघुरूप मूळ नावापेक्षा अधिक लोकप्रिय झाले.

सेन्सेक्सचा दर सहा महिन्यांनी आढावा घेतला जातो. काही कंपन्या वगळण्यात येतात, तर काही कंपन्यांचा नव्याने समावेश होतो. मूळच्या सेन्सेक्समध्ये १९७९ सालापासून असलेल्यांपकी हिंदुस्थान युनिलिव्हर, मिहद्र अँड मिहद्र, लार्सन अँड टुब्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी, टाटा स्टील्स, टाटा मोटर्स या सात कंपन्या आजसुद्धा दिमाखाने सेन्सेक्समध्ये मिरवत आहेत. मूळच्या ३० कंपन्यांपकी पाइको इलेक्ट्रॉनिक्स (फिलिप्स), हिंदुस्थान मोटर्स, प्रीमिअर ऑटो, इंडियन ऑरगॅनिक केमिकल्स लिमिटेडसारख्या कंपन्या काळाच्या ओघात गडप झाल्या. ऐंशीच्या दशकात देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात कृषी आणि उत्पादनाचा वाटा ९५ टक्के होता. सेवा क्षेत्राला विशेष स्थान नव्हते. उदारीकरणापश्चात सकल राष्ट्रीय उत्पन्नात सेवा क्षेत्र महत्त्वाचे क्षेत्र ठरले आहे. नेमके हेच चित्र आज सेन्सेक्समध्ये दिसते. सेन्सेक्समध्ये स्टेट बँक, एचसीएल टेक्नॉलॉजी, एचडीएफसी बँक, एचडीएफसी लिमिटेड, इन्फोसिस, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, येस बँक, इंडसइंड बँक, कोटक बँक, टीसीएस यांसारख्या सेन्सेक्सच्या उदयानंतर अस्तित्वात आलेल्या (एचडीफसी वगळून) आणि सेवा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कंपन्यांचा दबदबा दिसतो.

सेन्सेक्समध्ये सर्वाधिक ३३ टक्के प्रभाव बँक आणि वित्तीय सेवा क्षेत्राचा असला तरी सेन्सेक्स सुरू झाला तेव्हा स्टेट बँकेचा या यादीत समावेश नव्हता. याचे कारण स्टेट बँकच्या शेअरचे सौदे मोठय़ा संख्येने होत नसत. आर्थिक उदारीकरणापश्चात स्टेट बँकेच्या समभागांची खुली विक्री केल्यानंतर स्टेट बँकेच्या समभागात रोकडसुलभता आली. सेन्सेक्समध्ये कंपन्यांची निवड करण्याच्या पद्धतीत बदल करण्यात आले. ‘फ्री फ्लोट’ मॅकेनिझम हा निकषांवर कंपन्यांची निवड करण्याचे निश्चित झाल्याने प्रवर्तकांचा हिस्सा अधिक असल्याने अनेक कंपन्या सेन्सेक्समध्ये निवड होण्यास अपात्र ठरल्या.

सेन्सेक्सच्या आजवरच्या प्रवासातील काही घटनांचा साक्षीदार राहण्याचे भाग्य लाभले आहे. सेन्सेक्सला १,००० अंशांचा टप्पा गाठण्यास ११ वष्रे लागली; परंतु १,००० ते २,००० हा टप्पा दोन वर्षांत गाठला गेला. याच काळात हर्षद मेहता घोटाळा बाहेर आला. याच दरम्यान मुंबई शेअर बाजाराला राष्ट्रीय शेअर बाजाराच्या रूपाने एक स्पर्धक निर्माण झाला. बीएसई सेन्सेक्सला निफ्टीने स्पर्धा निर्माण केली; परंतु आजही सर्वाधिक म्युच्युअल फंडांनी मानदंड म्हणून सेन्सेक्सला पसंती दिल्याचे सांख्यिकी दर्शविते. परकीय गुंतवणूकदारांना आजही निफ्टीपेक्षा सेन्सेक्स जवळचा वाटत असल्याचे एका सर्वेक्षणात दिसून आले आहे. सेन्सेक्सने आजपर्यंत १२ पंतप्रधानांची कारकीर्द अनुभवली. सेन्सेक्सने सर्वाधिक ७२ टक्के वाढ विद्यमान पंतप्रधानांच्या कारर्कीर्दीत नोंदविली.

फेब्रुवारी ६, २००६ रोजी सेन्सेक्स पहिल्यांदा १० हजाराच्या वर बंद झाला. त्यानंतर दोन वर्षांच्या आत ११ डिसेंबर २००७ रोजी सेन्सेक्सने २० हजारांचा टप्पा गाठला. १० हजार ते २० हजार हा टप्पा २२ महिन्यांत पूर्ण केलेल्या सेन्सेक्सला नंतरच्या दहा हजार अंशांचा प्रवास करण्यास आठ वष्रे लागली. ४ मार्च २०१५ रोजी सेन्सेक्सने ३० हजारांच्या आकडय़ाला स्पर्श केला. २ एप्रिल २०१९ रोजी ३९,००० चा टप्पा गाठल्याने सेन्सेक्सप्रेमींना आता उत्सुकता आहे ती सेन्सेक्सच्या ४० हजारी टप्प्याची. हा ४० हजारांचा टप्पा निवडणूक निकालांच्या आधी लागेल की नंतर हे उत्कंठा वाढविणारे आहे. २२ हजार ते २५ हजार हा प्रवास सेंसेक्सने २४ मार्च २०१४ ते १६ मे २०१४ या निवडणूकदरम्यानच्या कालावधीत पूर्ण केला. निवडणूकदरम्यानच्या काळातील सेन्सेक्सचा पुढील प्रवास उत्कंठा वाढविणारा असेल याबाबत शंका नाही.

पुलंनी रेखाटलेल्या व्यक्तिरेखांपकी हरी तात्यांकडे इतिहासातील पुरावा असे. हल्ली राजकीय क्षेत्रातील मंडळी एकमेकांची उणीदुणी काढण्यासाठी अनेक गोष्टींचा पुरावा मागतात. चाळीस वर्षांत सेन्सेक्सने लाखाचे ३९० कोटी केल्याने बाजारातील गुंतवणूक हा लाखाचे बारा हजार करण्याचा व्यवहार असल्याचा समज असणाऱ्यांच्या समजाला तडा दिला गेला आहे. या गुंतवणुकीवर लाभांशाची पुनर्गुतवणूक जमेस धरली तर ही रक्कम ४५० कोटी रुपये होते (टोटल रिटर्न इंडेक्स). बाजारातील गुंतवणूक नेहमीच चक्रवाढ गतीने वाढते. सेन्सेक्सने चाळीस वर्षांत हा विश्वास दृढ केला आहे. भविष्यातसुद्धा हा विश्वास अभंग राहील याबाबत शंका नाही.

म्युच्युअल फंड विषयी अधिक माहितीसाठी खालील Form भरा:

[contact-form-7 id=”22″ title=”Contact Me”]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top