मधुरा खरे

रत्नागिरीच्या ‘अंतूशेट’च्या पिढ्या ह्याच मातीत उगवल्या आणि विस्तारल्या. अंतूच्या वंशातली एक शाखा गुहागरात समृद्धीत नांदत आहे. अंतुच्या पणतीला गुहागरातल्या वरल्या पाटातल्या खऱ्यांकडे दिली आहे. पाच फुटांच्या आतबाहेर उंची, तांबूस गोरा वर्ण, आणि घारे डोळे सानुनासिक पण सुस्पष्ट आवाजाच्या मधुराची आणि माझी ओळख एका कार्यक्रमा निमित्ताने झाली. पणजोबांच्या नशिबात जरी अश्वथामाच्या दुधाची वाटी असली तरी पणती मात्र सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेली. अंतूला दसरा दिवाळीला मनीऑर्डरीतून पितृप्रेमाचे पोस्त मिळाले की अंतू मिशीला कोकम लावून तुप म्हणून सांगत फिरायचा आणि चार दिवस खिशातील खुर्दा खुळखुळवत असायचा. पणती मात्र ‘कॅशलेस’ सांस्कृतीची प्रतिनिधी असल्याने दिखाव्यासाठी तिला नाणी वाजवावी लागत नाहीत. पर्समध्ये असलेल्या क्रेडीट आणि डेबिट कार्डामुळे चारपाच लाखांची खरेदी ती सहज करू शकते. मधुरा चित्तपावनकुलोत्पन्न असल्याने आणि डोक्यावर पिढ्यानपिढ्या थापलेल्या खोबरेल तेलामुळे परंपरेने मिळालेल्या तैलबुद्धीला तिने व्यवहार कुशलतेची जोड दिली आहे. ‘लोकसत्ता अर्थवृत्तांत’ नियमित वाचनाची जोड दिल्याने व्यवहारकुशलतेला अर्थसाक्षरतेचे कोंदण लाभले आहे. तिने पंचक्रोशीतील एकही विमा विक्रेत्याला आपल्या घराचा उंबरा ओलांडून दिलेला नाही. मनीबॅक किंवा एनडॉन्मेंट पॉलीसी खरेदी करणे म्हणजे त्या पैशाचा ‘अण्णू गोगट्या करणे असे तिचे ठाम मत आहे. घरातल्या कमावत्या व्यक्तींचा टर्मप्लान हवाच अशी तिची आग्रही भूमिका आहे. टर्मप्लान व्यतिरिक्त कोणताही विमा खरेदी करू नये असे तिचे सगळ्यांना सांगणे असते. मधुराचा जन्म रत्नागिरीत झाल्याने तिथल्या लाल चिऱ्याचे, खाजऱ्या अळवाचे आणि फट म्हणताच प्राण कंठाशी आणणाऱ्या ओल्या सुपारीचे गुण तिच्यात ओतप्रेत भरलेले आहेत. गुहागरला एका वर्षी महाशिवरात्र उत्सवाच्या निमित्ताने श्री देव व्याडेश्वर देवस्थानच्या वतीने झालेल्या कार्यक्रमात वित्तीय नियोजनावरील भाषणाला गेलो असतांना मधुराचा परिचय झाला

मधुराने केलेले आदरातिथ्य वाखाणण्याजोगे होते. कोकणातल्या ओल्या काजूची उसळ, फणसाची भाजी आणि गोडीत साखरेला मागे सारण्याऱ्या गुहागरच्या नारळापासून केलेले उकडीचे मोदक असा जेवणाचा फक्कड घाट मधुराने घातला होता. अन्नपूर्णेचा तिच्यावर वरदहस्त होता. मधुरा मुंबईत आली असल्याने काल भेट झाली.

“काका, रिटायरमेंट फंडात गुंतवणूक करावी का? काल आंजर्ल्याहून प्रमोद नित्सुरे आले होते. आम्ही त्यांच्या मार्फत गुंतवणूक करतो. त्यांनी आदित्य बिर्लाचा एनएफओ सुरु असलेला रिटायरमेंट फंड सुचविला आहे. या फंडात ‘एसआयपी’ करा असे म्हणत होते.”

“तुझ्या खरे आडनांवाला शोभेल असेच तु बोलतेस म्हणून मी सुद्धा तुझ्या खऱ्या प्रश्नांना खरी उत्तरे देतो.”

‘सेबी’ने म्युच्युअल फंडांचे १ एप्रिलपासून वर्गीकरण केले आहे. या वर्गीकरणात ‘सोल्युशन ओरीएंटेड फंड्स’ असा एक फंड प्रकार आहे. व्यवसाय वृद्धीसाठी नवीन फंड उपलब्ध करून देणे हे फंड घराण्यांची गरज आहे. ज्या फंड घराण्या कडे जो फंड नाही तो फंड प्रकार ‘एनएफओ’च्या माध्यमातून उपलब्ध फंड घराणी करून देत आहेत.”

“काका, रिटायरमेंट फंड आणि अन्य इक्विटी फंड या मध्ये नेमका काय फरक आहे आणि सेवानिवृत्तीनंतरच्या उदरनिर्वाहासाठी रिटायरमेंट फंड का सुचविला जातो”?

“काही वर्षांपूर्वी ‘सेबी’ने गुंतवणूकदारांचा एक सर्व्हे केला होता. या सर्व्हेच्या निष्कर्षानुसार मुलांचे शिक्षण आणि वाढत्या वयातील उदारनिर्वाह ही बचत करण्यामागील ही सर्वाधिक पसंतीची कारणे आहेत. गुंतवणूकदाराची या वित्तीय उद्दिष्ठांसाठी नियोजनबद्ध गुंतवणूक हे साधन होते तर मुलांचे शिक्षण आणि वाढत्या वयातील उदारनिर्वाह हे साध्य होते. सामान्य माणसाच्या या वित्तीय उद्दिष्ठांच्या पूर्ततेसाठी गुंतवणूकदारांना ‘एसआयपी’ ही गुरुकिल्ली वाटू लागल्याने म्युच्युअल फंडात ‘एसआयपी’मार्फत गुंतविल्या जाणाऱ्या रक्कमेने जानेवारी महिन्यांत ८ हजाराचा टप्पा पार केला. हे आर्थिक वर्ष संपेल तेव्हा या रक्कमेने साडेआठ हजार कोटींचा टप्पा गाठला असेल.”

“बारमाही या वाहत्या गंगेत हात धुवायला कोणाला आवडत नाहीत? मालमत्ता व्यवस्थापन हा सुद्धा एक व्यवसाय आहे, आणि कोणत्याही व्यवसायाचा हेतू हा नफा कमविणे हा असतो. आंजर्ल्याहून प्रमोद नित्सुरे तुझी सेवानिवृत्तीनंतरच्या उदरनिर्वाहासाठी सोय व्हावी म्हणून नक्कीच आले नव्हते. तु केलेल्या गुंतवणुकीवर चार पैसे मिळाले तर कमवावे या उद्देशाने ते आले होते. रत्नागिरीत जन्मलेल्या आणि गुहागरमध्ये वास्तव्यास असलेल्या तुझ्यासारख्या सुज्ञास मी हे सांगण्याची गरज नाही.”

“फंड घराण्यांची मालमत्ता जितकी अधिक तितका नफा अधिक हे गणित असते. ‘सोल्युशन ओरीएंटेड फंड्स’ हे लोकांच्या वेगवेगळ्या गरजांवर उपाय सुचविणारे असल्याने हा नवीन फंड गुंतवणूकदारांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या उदरनिर्वाहाच्या गरजेवर उपाय सुचविणारा फंड आहे.”

“जसे की, ‘ईएलएसएस’ फंडांचा परतावा हा अन्य फंडांपेक्षा अधिक असतो कारण या फंडातून तीन वर्षे पैसे काढता येत नाहीत. रिटायरमेंट फंडात वयाच्या साठी पर्यंत किंवा किमान गुंतवणूक केल्यापासून किमान पाच वर्षे गुंतवणूक काढता येत नाही.”

“एक यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी, ‘टाईम इन द मार्केट इज ऑल्वेज बेटर दॅन टायमिंग द मार्केट’ रिटायरमेंट फंड नेमक्या याच तत्वावर आधारलेले आहेत. यात गुंतविलेले पैसे पाच वर्षे काढता येणार नसल्याने या फंडाच्या गुंतवणुकीवर अधिक नफा मिळेल. टाटा म्युच्युअल फंडाचा एकही फंड दखल घ्यावी इतका नफा देत नाही परंतु त्यांचा रिटायरमेंट फंड अपवादात्मक चांगला परतावा देतो याचे कारण गुंतवणूकदार दीर्घकाल या फंडात गुंतवणूक करतो.”

“तथाकथित गुंतवणूक सल्लागारांनी कधी आपल्या अशिलांना कधी ‘एनपीएस’चा आग्रह धरल्याचे ऐकलेस काय? अनेक बँका ‘एनपीएस’ ऐवजी पेंशनसाठी ‘एलआय’ विकणे का पंसत करतात याचा शोध तु घे. ‘एनपीएस’मध्ये वयाच्या साठीपर्यंत एक नवा पैसा काढता येत नाही. ‘एनपीएस’मध्ये करबचत आणि वयातील उदारनिर्वाहाची तरतूद हे दोनही हेतू साध्य होत असल्याने मी कायम ‘एनपीएसचा पुरस्कर्ता राहिलो आहे”.

” बिर्लाच्या रिटायरमेंट फंडाची आणखी एक गमंत आहे ती अशी की, साथ वर्षे पुर्ण होईपर्यंत किंवा पाच वर्षे या फंडातून रक्कम काढता येणार नाही. समज जानेवारी २०२२ मध्ये मी साठ वर्षे पूर्ण केली तर डिसेंबर २०२१ पर्यंत गुंतविलेली सर्व रक्कम जानेवारी २०२२ मध्ये मिळेल. माझ्यासारख्या साठ वर्षे पूर्ण होण्यास सहा सात वर्षे शिल्लक असलेल्यांसाठी हा फंड गुंतवणुकीचे एक आदर्श साधन आहे.”

“रिटायरमेंट फंडात गुंतवणूक केली म्हणजे निश्चिंत व्हावे अशी परिस्थिती आज नाही. तु किती वर्षे जगणार हे त्या देव व्याडेश्वरा शिवाय कोणालाहि छातीठोक पणे सांगता येणार नाही. सेवा निवृत्ती नंतर अधिक वर्ष जगल्यास पुरेसा पैसा गाठीला असणे गरजेचे आहे. मुद्दलाची सूरक्षितता आणि विमा पॉलीसीची मुदत संपल्यावर मिळणारी निश्चित रक्कम यापेक्षा महागाईमुळे साठवलेल्या पैशाची क्रायशक्ती गमविण्याचा धोका अधिक आहे. सेवानिवृत्त होतांना माझ्याकडे पुरेसा पैसा आहे हा भ्रम आहे. कॉस्ट ऑफ लिविंग इंडेक्स’चा अजिबात विचार न करणे, रिटायरमेंट प्लानिंग निष्फळ होण्याची ही मुख्य करणे आहेत. ‘रिटायरमेंट फंडांचा एक्स्पेन्स रेशो आणि ‘एनपीएस’च्या मालमत्त व्यवस्थापन खर्चाचा विचार केल्यास ‘एनपिएस मध्ये मध्ये १०० टक्के इक्विटी गुंतवणुकीचा पर्याय नसणे आणि सक्तीची पेन्शन घ्यावी लागणे हे दोष गृहीत धरून देखील माझ्या नियोजनात मी ‘एनपीएस’ला प्राथमिकता देईन. ‘एनपीएस’मधील गुंतवणूक करून पैसे उरले तर रिटायरमेंट फंडात गुंतवणूक करेन. माझ्या नियोजनात ‘एनपीएस’ नंतर रिटायरमेंट फंडांना स्थान असेल”. मागील पिढीतील भारतीय रिटायरमेंट प्लानिंगपेक्षा मुलांच्यावर अधिक निर्भर होते. आर्थिक साक्षरतेमुळे भारतीयांच्या मानसिकतेत बदल होतांना दिसत असल्याने बाजारात रिटायरमेंट फंडांचा सुकाळ झालेला दिसतो.” तुझ्या वित्तीय ध्येयांशी सांगड घालणारा हा फंड असल्यास तु या फंडात जरूर ‘एसआयपी’ कर”.

1 thought on “मधुरा खरे”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top