उभरती निधी व्यवस्थापिका

 

पुलंनी एका ठिकाणी लिहून ठेवले आहे ” आम्ही मिजासीने सांगतो की, आम्ही फैयाजखाँना ऐकलय, निवृत्तीबुवांना ऐकलय, वझे बुवांना ऐकलय, मल्लिकार्जुन ऐकलय. आज कुमारांना आणि व्यासांना ऐकतोय. इतक साठवलेल आहे आमच्या मनांमध्ये की कुठलं दार कधी उघडेल आणि आमची अंतरवीणा सुरु होईल, हे तुम्हाला कोणालाच सांगता येणार नाही.” न जाणो याच तालावर मी नक्कीच असे म्हणू शकेन की मी भारतातील दिग्गज निधी व्यवस्थापकांना भेटलोय, एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या प्रशांत जैन यांच्या बरोबर चर्चा केली आहे, एसबीआय म्युच्युअल फंडाच्या नवनीत मुनोत यांना मी भेटतो, या देशातील एकही फंड घराणे नसेल त्या फंड घराण्यातील समभाग किंवा रोखे गुंतवणूकीचे व्यवस्थापन पहाणाऱ्या एका तरी निधी व्यवस्थापकाशी लोकसत्तामुळे भेटायची संधी मिळाली नाही. म्युच्युअल फंड उद्योगात ज्या मोजक्या स्त्री निधी व्यवस्थापिका आहेत, त्यामध्ये ज्यांचे नांव भविष्यात आदराने घेतले जाईल अशा आयडीबीआय म्युच्युअल फंडाच्या निधी व्यवस्थापिका उमा वेंकटरामण.

महाराष्ट्राच्या एका मुख्यमंत्र्यांचा कोर्टातील पट्टेवाल्यापासून ते मुख्यमंत्री पदापर्यंत आणि पुढे भारताच्या गृहमंत्र्यांपर्यंतचा प्रवास कसा झाला याची कथा मधून मधून चर्चिली जाते. पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकत असतांना कधीकाळी चेन्नईत एका शेयर दलालाच्या कार्यालयात सहाय्यक म्हणून काम करणारी एक होतकरू तरुणीचा निधी व्यवस्थापिकेपर्यंतचा प्रवास रंजक आहे.

उमा वेंकटरामण यांचा जन्म एका मधमवर्गीय कुटुंबात झाला. वडील नौदलात तर आई शिक्षिका होती. दोन बहिणींतील त्या धाकट्या. मोठी बहिण शास्त्रज्ञ असून त्यांच्या बहिणीने नुकतेच एस स्टार्टअप सुरु केले आहे.  वडिलांची नोकरी बदलीची असल्याने त्या जरी वेगवेगळ्या ठिकाणी शिकल्या तरी माध्यमिक आणि नंतरचे महाविद्यालयीन शिक्षण चेन्नईत झाले. कॉलेजमध्ये शिकत असतांना एका वर्षी उन्हाळी सुट्टीत त्यांनी एका सनदी लेखापालाकडे तर दुसऱ्यावर्षी एका शेयर दलालाच्या कार्यालयात सहाय्यक म्हणून काम केले. या दोन कामांपैकी आयकराच्या रिटर्नसाठी आवश्यक असणाऱ्या उत्पनाची आकडेवारी तयार करून वरिष्ठांना देण्यापेक्षा बाजारातले चढउतार त्यांना भावले. पारंपारिक तमिळ कुटुंबातील असूनही तरुण वयात भांडवली बाजाराची आवड निर्माण झाल्याने त्यांनी सनदी लेखापाल होण्याऐवजी एमबीएची प्रवेश परीक्षा देणे पसंत केले. एक्सएलआरआय, जमशेदपूर सारख्या नामांकित व्यवस्थापन संस्थेत प्रवेश मिळाल्यावर आयुष्यात पहिल्यांदाच त्या कुटुंबांपासून दूर राहायला लागल्या.

एक्सएलआरआय, जमशेदपूर येथे शिकत असतानाचा काळ अतिशय सुखाचा होता. वेगवेगळ्या विषयांचे प्रोजेक्ट्स त्या प्रोजेक्ट्सच्या डेड लाईन्स यांनी टीमवर्क आणि डेडलाईन पाळण्याच्या शिस्तीचा धडा शिकविला. प्रत्येक वेळेला डेडलाईन गाठता यायचीच असे नाही परंतु डेडलाईन गाठण्यासाठी नेमके काय करावे लागते हे नक्कीच शिकता आले. त्यांचा समर प्रोजेक्ट मुंबईत त्यांनी मॉसेन्टोमध्ये केला. बहुराष्ट्रीय कंपन्या व्यवसायाकडे कशा पाहतात वेगवेगळ्या उत्पादनांची नफा क्षमता कशी ठरते. पुरेशी नफा क्षमता नसल्यास उत्पादन थांबविण्याचा निर्णय कुठल्या आधारावर घेतात या गोष्टी त्यांना समर प्रोजेक्ट मध्ये शिकता आल्या. मॉसेन्टोचे ऑफिस त्यावेळी बीकेसीत होते. बीकेसी त्यावेळी विकसित झाले नव्हते. कुटुंब न्यायालयाची इमारत, रिझर्व्ह बँकेच्या इमारती इतपतच व्याप्ती होती. दुपारी जेमतेम एक विक्रेता खाण्याचे पदार्थ विकायला यायचा. एखाद्या दिवशी डबा आला नाही तर आणि त्या विक्रेत्याकडे पोहचायला उशीर झाला त्या विक्रेत्याकडे काहीतरी  खायला मिळेलच याची खात्री नसायची. बसची वारंवारिता बेताचीच होती. संध्याकाळी सात वाजल्या नंतर सगळीकडे शुकशुकाट असायचा.

त्यांना एक्सएलआरआय, जमशेदपूर मधील कॅपस प्लेसमेंट मध्ये पहिली नोकरी युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया मध्ये मिळाले. तत्कालीन युटीआय मध्ये त्या क्रेडीट अॅनॅलिस्ट होत्या. सध्या युटीआयच्या स्थिर उत्पन्न गुंतवणुकांचे प्रमुख असलेले अमनदीप चोप्रा त्यांचे वरिष्ठ सहकारी होते. त्यांचे पती आणि त्या एकमेकाला युटीआय मध्ये भेटले. युटीआयमध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी म्हणून एकाच तुकडीत ते दाखल झाले होते. त्यांचे पती सध्या एचएसबीसी म्युच्युअल फंडात कार्यरत आहेत. युटीआय मधील तीन वर्षाच्या अनुभवानंतर त्यांनी अमेरिकेतील विद्यापीठात नोकरी सोडून प्रवेश घेतला. शिक्षण पूर्ण झाल्यावर तिथे काही काळ समभाग विश्लेषक म्हणून दोन वर्षे नोकरीही केली. दरम्यान त्यांच्या पतीने प्रतिष्ठीत लंडन स्कूल ऑफ एकोनोमिक्स मध्ये प्रवेश घेतल्याने त्या लंडन मध्ये आल्या व त्यांनी समभाग संशोधक म्हणून नोकरी पत्करली. पतीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या व त्यांचे पती भारतात परत आले. भारतात परत आल्यावर आयडीबीआय म्युच्युअल फंडात हेड रिसर्च म्हणून दाखल होण्यापूर्वी त्यांनी दोन दलाली पेढ्यातून काम केले. सप्टेंबर २०१७ पासून त्यांची निधी व्यवस्थापक म्हणून नेमणूक झाली. मागील अठरा महिने त्या निधी व्यवस्थापक म्हणून काम करीत असल्या तरी मागील आठ वर्षांपासून त्या आयडीबीआय म्युच्युअल फंडात कार्यरत आहेत. आशिया अमेरिका युरोप या तीन खंडातील अनुभवाचा त्यांना आयडीबीआय म्युच्युअल फंडात निधी व्यवस्थापन करतांना नक्कीच फायदा होत आहे. जगाच्या तीन खंडात काम केलेल्या त्या एकमेव निधी व्यवस्थापक असाव्यात. त्यांनी आयडीबीआयच्या फंडांची  धुरा स्वीकारल्या पासून फंडांच्या कामगिरीतील फरक जाणकारांच्या लक्षात येऊ लागला आहे. म्युच्युअल फंडांचे पत निर्धारण करणाऱ्या व्हॅल्यू रिसर्च ऑनलाईन आणि मॉर्निंगस्टारने त्यांच्या कामगिरीची दाखल घेत त्या निधी व्यवस्थापक असलेल्या फंडांची पत उंचावली आहे. निधी व्यवस्थापक या नात्याने फंडातील गुंतवणूकदारांच्या वित्तीय उद्दिष्टांची पूर्ती होत असल्या बद्दल त्यांना समाधान वाटतेच. म्युच्युअलफंड उद्योग हा उभारता उद्योग असल्याने नियंत्रक सुधारणा करतात अजून हा उद्योग प्रगल्भ होण्यास नक्कीच थोडा कालावधी लागेल त्यामुळे या उद्योगाला नवीन बदलांना सतत सामोरे जावे लागते दुर्दैवाने गुंतवणूकदारांना हे कोणी समजाऊन सांगत नसल्याबद्दल त्या खंत सुद्धा व्यक्त करतात. जगाच्या तीन खंडातील भांडवली बाजारांचा अनुभव घेतल्याचा फायदा त्यांना समभागाची गुंतवणुकीसाठी निवड करतांना होतो. भविष्यात त्या निधी व्यवस्थापक असलेल्या फंडाच्या कामगिरीतून त्या आपली ओळख नक्कीच प्रस्थापित करतील.

 

म्युच्युअल फंड  विषयी अधिक माहितीसाठी खालील Form भरा:

[contact-form-7 id=”22″ title=”Contact Me”]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top