शिफारसप्राप्त फंडांचा पुनर्वेध – थकलेल्यांना निरोप आणि नव्यांची शिफारस

मागील वीस तिमाहीत जानेवारी मार्च २०२० ही सर्वात अस्थिर तिमाही ठरल्यानंतर हळूहळू अस्थिरता कमी होत असल्याचे दिसत आहे. सप्टेंबर अखेरीस भारतीय म्युच्युअल फंड उद्योगातील मालमत्ता (एयूएम) २६.८५ लाख कोटींवर पोचली असतांना सलग तीन महिने सातत्याने समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडांची मालमत्ता कमी होत असल्याचे दिसत आहे. जुलै सप्टेंबर या तिमाहीचे तीनही महिन्यांत समभाग गुंतवणुकीला गळती लागली हे या तिमाहीचे वैशिष्ठ्य म्हणायला हवे. सप्टेंबर २०१९ मधील २५.६० लाख कोटींवरून सप्टेंबर २०२० मध्ये एकूण फंड मालमत्ता २६.८५ लाख कोटींवर पोहचली. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स  इन इंडियाने (अॅम्फी) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सप्टेंबरमध्ये समभाग आणि समभाग संलग्न फंडातून गुंतवणूक दारांनी ७३४ कोटी काढून घेतले. काढून घेतलेल्या फंडामध्ये ईएलएसएस फंडांचा मोठा वाटा होता. मार्च २०१७ मध्ये अॅम्फीने ‘म्युच्युअल फंड सही है मोहिमेला सुरवात केल्यापासून फंड गुंतवणुकीत निधीचा ओघ वाढला. योग्य फंडा बाबत शहानिशा न केल्याने चुकीच्या फंडात गुंतवणूक केली गेली परतावा न मिळालेले निराश गुंतवणूकदार तीन वर्षाचा कालावधी संपताच बाहेर पडते झाले. थोड्या फार फरकाने अन्य फंड गटात हेच चित्र दिसते. मोठ्या संख्येने बाहेर पडणारे गुंतवणूकदार तोट्यातील गुंतवणुका नफ्यात येताच बाहेर पडते होत असल्याचे दिसते.. म्युच्युअल फंडांची सप्टेंबर अखेरीस सर्वाधिक गुंतवणूक बँका आणि वित्तीय सेवा, वैयक्तिक वापराच्या ग्राहकोपयोगी वस्तू , माहिती तंत्रज्ञान, आरोग्य निगा आणि पेट्रोलियम उत्पादने या उद्योग क्षेत्रात होती. मागील दोन तिमाहीत जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जुन म्युच्युअल फंडांनी सर्वाधिक खरेदी केलेला रिलायंस इंडस्ट्रीजची केली तर जुलै सप्टेंबर तिमाहीत म्युच्युअल फंडांनी सर्वाधिक रिलायंसच्या समभागांची विक्री केली. रिलायंसची सर्वाधिक विक्री एचडीएफसी आणि एसबीआय या फंड घराण्यांनी केली. तर रिलायंसच्या समभागांचा अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंड सर्वात मोठा खरेदीदार होता. रिलायंसच्या समभागाची खरेदी त्या खालोखाल खरेदी करणाऱ्यांत आयआयएफएल म्युच्युअल फंड, एस्सेल म्युच्युअल फंड, एलआयसी एमएफ,  एचएसबीसी आणि पीजीआयएम इंडिया यांचा समावेश आहे. निधी व्यवस्थापकांनी रिलायंसमध्ये नफा वसुली करण्याची जी कारणे आहेत, त्यातील पहिले करण, मार्च मधील (१६ मार्च) निच्चांकापासून सप्टेंबर (१६ सप्टेंबर) उच्चांकी पातळी गाठल्याने १७३ टक्के भांडवली वृद्धी रिलायंस इंडस्ट्रीजने गुंतवणूकदारांना दिली. जुलै महिन्यांत अनेक फंडाच्या एकूण मालमत्तेच्या १० टक्के मालमत्ता रिलायंस इंडस्ट्रीज मध्ये असल्याने गुंतवणुकीची कमाल मर्यादा गाठल्याने निधी व्यवस्थापकांना सक्तीची विक्री करावी लागली. जुलै महिन्यात फंड घराण्यांनी विक्री केली असली तरी ऑगस्ट महिन्यांत त्यापेक्षा दुपट्टीने खरेदी केल्यामुळे सर्वच समभाग गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीत रिलायंस पहिल्या दहा कंपन्यांपैकी एक आहे. त्याखालोखाल म्युच्युअल फंडांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेला सर्वाधिक खरेदीसाठी पसंती दिली. जुलै सप्टेंबर या कालावधीत सर्वाधिक विकलेल्या समभागांमध्ये एचडीएफसी बँक आणि एचडीएफसीचा समावेश होता. या तिमाहीत युटीआय एएमसीने केलेली प्राथमिक विक्री ही दखल घेण्यासारखी गोष्ट आहे. युटीआय एएमसी आज बाजारात सूचीबद्ध होणार आहे.

१ जुलै २०१५ ते ३० सप्टेंबर २०२० या पाच वर्षांतील फंडांच्या कामगिरीनुसार ‘कर्त्यां’च्या यादीतील झालेल्या बदलांपैकी नोंद घेण्याजोगा बदल म्हणजे २०१४ पासून  मागील सहा वर्षे या यादीचा भाग राहिलेल्या एसबीआय फोकस्ड इक्विटी फंडाला या यादीतून वगळावे लागले. एसबीआय इमर्जिंग बिझनेसेस फंड अर्थात नवीन रूपातील एसबीआय फोकस इक्विटी फंड ‘लोकसत्ता कर्ते’ म्युच्युअल फंड यादीचा प्रदीर्घ काळ भाग राहिले आहे. एसबीआय म्युच्युअल फंडाने मे २०१८ मध्ये एसबीआय इमर्जिंग बिझनेसेस फंडाचे एसबीआय फोक्सड फंड असे नामकरण केले. ‘सेबी’ने निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार फोकस्ड फंड गटासाठी कमाल ३० समभाग आणि किमान ६५ टक्के गुंतवणूक मिड आणि स्मॉल कॅप कंपन्यांत असणे आवश्यक असते. जोखीम परतावा गुणोत्तरात फंडांच्या गुंतवणुकीवर परतावा सोडाच पण ज्या फंड घराण्यांचे बहुतांश फंडांनी मुद्दल सुरक्षित राखले नाही, अशा फंड घराण्यात एसबीआय म्युच्युअल फंड आघाडीवर आहे. कधीकाळी कर्त्यांच्या यादीत ५ पेक्षा अधिक फंडांना स्थान मिळवत वर्चस्व असलेल्या या फंड घराण्याचा केवळ एकच फंड यादीत उरला आहे. या फंड घराण्याच्या फंड मालमत्तेत संख्यात्मक वाढ झाली असली तरी फंड घराण्याची गुणात्मक अधोगती झाली आहे. मागील तीन वर्षाच्या कामगिरीनुसार मानदंडापेक्षा अधिक परतावा मिळविणारे केवळ तीन फंड असणे हे मालमत्तेच्या निकषावर पहिला क्रमांक मिरविणाऱ्या फंड घराण्यास भूषणावह नक्कीच नाही. एसबीआय फोकस्ड इक्विटी फंडाच्या १ सप्टेंबर २०१० ते ३० सप्टेंबर २०२० या कालावधीत या वार्षिक ५ वर्षांच्या चलत परताव्याची वार्षिक सरासरी १६.६१ टक्के असली तरी २८ महिन्यांपूर्वी हा फंड नव्या रुपात सदर झाल्यापासून फंडाच्या अलीकडील कामगिरीत सातत्याने घसरण होतांना दिसत आहे. या फंडाच्या कामगिरीत सप्टेंबर २०१७ पासून सातत्याने घसरण होत असल्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. एसबीआय फोकस्ड इक्विटी फंडाने गेल्या तीन वर्षाच्या चलत सरासरीवर मागील १० वर्षात सरासरी ८ टक्क्यांपेक्षा अधिक परतावा दिल्याची टक्केवारी २८ टक्के असली तरी अलीकडील पाच वर्षातील १० वर्षाच्या चलत सरासरीत ८ टक्यांपेक्षा अधिक परतावा मिळालेल्या आधार बिंदूंचे प्रमाण १५ टक्क्यांवर आले आहे. एसबीआय म्युच्युअल फंडांच्या निधी व्यवस्थापकांच्या कर्तृत्वावर पूर्ण भरवसा ठेऊन या फंडांचे कर्त्यांच्या यादीत पुनरागमन होईल असा आशावाद असला तरी सद्य परिस्थितीत या फंडाला वगळण्यात आले आहे. दुसरा महत्वाचा बदल म्हणजे लार्ज अ‍ॅण्ड मिडकॅप फंड गटात एडेल्वाईज लार्ज अ‍ॅण्ड मिडकॅप फंडाला वगळण्यात आले असून त्याची जागा प्रिंसिपल इमर्जिंग ब्लूचीप’ने घातली आहे. मिडकॅप फंड गटात एल अ‍ॅण्ड टी मिडकॅप फंडाला वगळण्यात आले असून डीएसपी मिडकॅप फंडाचा तीन तिमाही नंतर पुन्हा समावेश झाला आहे. लोकसत्ता कर्ते म्युच्युअल फंडांच्या यादीत समावेश होण्यासाठी किमान फंड तीन वर्ष अस्तित्वात असावा लागतो. एडेल्वाईज युएस टेक्नोलॉजी फंडाला तीन वर्षांचा इतिहास नाही म्हणून कर्त्यांच्या यादीत समावेश नसला तरी जोखीमप्रेमी गुंतवणूकदारांनी अंतरराष्ट्रीय गुंतवणुकीसाठी या फंडाचा विचार नक्कीच करायला हवा. 

 

शिफारसयोग्य फंडांची यादी

ईएलएसएस

*   बीओआय अ‍ॅक्सा टॅक्स अ‍ॅडव्हान्टेज

*   अ‍ॅक्सिस लाँग टर्म इक्विटी

*   कॅनरा रोबेको इक्विटी टॅक्स सेव्हर

फोकस्ड

*   अ‍ॅक्सिस फोकस्ड २५

*   प्रिन्सिपल फोकस्ड मल्टीकॅप

*   आयडीएफसी फोकस्ड

लार्ज कॅप

*   अ‍ॅक्सिस ब्लूचीप

*   युटीआय मास्टरशेअर युनिट स्कीम

*   आयडीएफसी लार्जकॅप

लार्ज अ‍ॅण्ड मिडकॅप

*   एलआयसी लार्ज अ‍ॅण्ड मिडकॅप

*   प्रिंसिपल इमर्जिंग ब्लूचीप

*   कॅनरा रोबेको इमर्जिंग इक्विटीज

मिड कॅप

*   अ‍ॅक्सिस मिडकॅप

*   डीएसपी मिडकॅप

*   पीजीआयएम इंडिया मिडकॅप अपॉच्र्युनिटिज

मल्टी कॅप

*   पराग पारीख लाँग टर्म इक्विटीज

*   पीजीआयएम इंडिया डायव्हर्सिफाईड इक्विटी

*   यूटीआय इक्विटी फंड

स्मॉल कॅप

*   अ‍ॅक्सिस स्मॉलकॅप

*    डीएसपी स्मॉलकॅप

*   निप्पॉन इंडिया स्मॉलकॅप

आंतरराष्ट्रीय

*   निप्पॉन इंडिया यूएस इक्विटी

*   पीजीआयएम इंडिया ग्लोबल इक्विटी

 

म्युच्युअल फंड विषयी अधिक माहितीसाठी खालील Form भरा:

[contact-form-7 id=”22″ title=”Contact Me”]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top