गुंतवणुकीचा वार्षिक आढावा : कारणे आणि पद्धती

financial portfolio review 2022

अनुत्पादक फंड वगळणे

पोर्टफोलिओचे पुनरावलोकन केल्याने तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओमधील समाधानकारक परतावा न मिळणाऱ्या गुंतवणूका ओळखण्यास मदत होते. तुमच्या गुंतवणूकीपैकी कोणता फंड पुरेसा परतावा देत नाही हे तुम्ही ताडून पाहू शकता. जेणेकरून गरज पडल्यास तुम्ही तुमची एसआयपी बंद करू करण्याची सुधारणा करू शकता.आपण आपल्या पोर्टफोलिओचे आपल्याला पाहिजे तितक्या वेळा पुनरावलोकन करू शकता, अनेक वेळा गुंतवणूकदार त्यांच्या पोर्टफोलिओवर समाधानकारक परतावा मिळाल्याने निराश होतात. साधारण २०१९-२० दरम्यान अशीवेळ होती कि मोजके फंड वगळता बहुतांश फंड समाधानकारक परतावा देत नव्हते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या कारणांमुळे तुम्ही फंड निवड केली त्यात बदल झाला आहे का. गुंतवणूकदार मुख्यतः स्पर्धक फंडांची कामगिरी आणि त्याचा मानदंड, खर्च या दृष्टीने किती वाजवी आहे आणि वेगवेगळ्या बाजार चक्रात कशी कामगिरी करीत आहे या नुसार फंड निवडायला हवा. परंतु बहुतांश गुंतवणूकदार गत काळातील फंडांच्या कामगिरीनुसार फंड निवडतात.

तथापि जोखीम/परतावा गुणोत्तर हा फंड निवड करतांना वापरावयाचा महत्वाचा निकष आहे. फंडाची अस्थिरता मोजण्यासाठी प्रमाणित विचलन (स्टॅडर्ड डेव्हिएशन) वापरले जाते. तर वृद्धीदर मोजण्यासाठी वार्षिक परतावा हा निकष वापरला जातो. ते तथापि जोखीम/परतावा गुणोत्तर २:१ हे आदर्श समजले जाते. तीन वर्ष आणि पाच वर्षे कालावधीचा विचार केल्यास पाच वर्षे कालावधीत जोखीम/परतावा गुणोत्तर हे तीन वर्षे कालावधीतील जोखीम /परतावा गुणोत्तरापेक्षा कमी असते. समभाग गुंतवणूक हा आशा निराशेचा खेळ आहे. जोखीम/परतावा गुणोत्तर हे तुम्हाला अति आशावादी किंवा निराशावादी गुंतवणूकदार न होता वास्तववादी गुंतवणूकदार होण्याची तुमची मानसिकता तयार करते.

पोर्टफोलिओचे पुन:र्संतुलन

तुमच्या पोर्टफोलीओत रोखे आणि समभाग संलग्न गुंतवणुका परकीय चलनातील गुंतवणुका, मौल्यवान धातू हे ढोबळ मालमत्ता वर्ग असतात. जर दोन मालमत्ता गटातील सहसमंध (कोरिलेशन) -१ ते +१ दरम्यान असतो. जोखीम कमी करण्यासाठी परस्पर सहसमंध नसलेले मालमत्ता वर्ग गुंतवणुकीतील जोखीम कमी करतात. पोर्टफ़ोलिओ तयार करतांना या मालमत्तांची मात्रा निश्चित केलेली असते. जसे की संतुलित जोखीमांक असलेल्या आणि ५० वर्षे वय असलेल्या गुंतवणूकदारासाठी १० टक्के परकीय चलनातील गुंतवणुका ३० टक्के रोखे संलग्न गुंतवणुका रोखे आणि ५० टक्के समभाग संलग्न गुंतवणुका आणि १० टक्के मौल्यवान धातू हे प्रमाण निश्चित केले होते. मार्च २०२० मध्ये सोन्याच्या भावाने उच्चांक गाठला तर भांडवली बाजार निर्देशांकात मोठी घसरण झाली परिणामी मौल्यवान धातूची मात्रा वाढली तर समभाग संलग्न गुंतवणुकांची मात्रा कमी झाली. पोर्टफोलिओ संतुलन करण्यासाठी मौल्यवान धातू विकला आणि समभाग संलग्न गुंतवणुकांची मात्रा वाढवली. याच काळात रिझर्व्ह बँकेने व्याज दर कपात केली आणि अर्थव्यवस्थेत रोकड सुलभता वाढविली परिणामी रोख्यांच्या किंमतीत वाढ झाली. साहजिकच पोर्टफ़ोलिओत रोखे सलग्न गुंतवणुकीचा हिस्सा वाढला. हा हिस्सा कमी करून नफा कमवत समभाग संलग्न गुंतवणुकांची मात्रा वाढवली. सक्रीय पुन:र्संतुलनामुळे मागील दोन वर्षातील शेअर बाजारातील तेजीने पोर्टफ़ोलिओचा परतावा समभाग गुंतवणुकीकडे कललेला असल्याने पोर्टफोलीओ वरील परतावा समाधानकारक आहे.

बहुसंख्य गुंतवणूकदार आपल्या पोर्टफोलिओचे बाजार मूल्य किमान एकदा तरी पाहतात. गुंतवणुकीचे बाजार मूल्य पहाणे त्याचे पुनरावलोकन करणे यात फरक आहे. जिज्ञासेपोटी तुमचा पोर्टफोलिओ पाहणे ही वेगळे आणि चुकीच्या निकषांवर एखाद्या फंडातून बाहेर पडणे किंवा एसआयपी बंद करून नवीन एसआयपी सुरु करणे या सारखे निर्णय घेणे वेगळे. गुंतवणुकीचा (म्युच्युअल फंड पोर्टफोलीओचे) वार्षिक पुनरावलोकन करणे निश्चितच हिताचे असते. मागील दोन वर्षातील शेअर बाजारातील तेजी पहाता आर्थिक वर्ष आर्थिकवर्ष २०२२ संपत असताना, तुमच्यापैकी बहुतेकांचा पोर्टफ़ोलिओ समभाग गुंतवणुकीकडे कललेला असेल. बहुतेक गुंतवणूकदार त्यांचे वित्तीय ध्येय साध्य करण्यासाठी संकलित करायची रक्कम नियोजन केल्यानुसार वाढत आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी वर्षातून एकदा तरी त्यांच्या गुंतवणुकीचे पुनरावलोकन करणे गरजेचे असते. वित्तीय ध्येय कोणतेही असले जसे की सेवानिवृत्ती किंवा मुलांचे शिक्षण- प्रत्येक गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओचे वर्षातून किमान एकदा तरी पुनरावलोकन केले पाहिजे जेणेकरून आपण नेमके कुठे आहोत हे कळून येते. वर्षातून किमान एकदा तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओचे पुनरावलोकन का करावे याची मुख्य कारणे अशी आहेत.

पोर्टफोलीओची कर कार्यक्षमता वाढविणे

गुंतवणुकीचा वार्षिक आढावा घेतल्याने कर कार्यक्षमता वाढते.
म्युच्युअल फंडातून मिळणाऱ्या लाभाचे दोन प्रकार आहेत अल्प कालीन आणि दीर्घ कालीन. दीर्घ कालीन भांडवली नफा म्हणजे गुंतवणुकीपासून एका वर्षानंतर विक्री केल्या नंतर होणारा लाभ. समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडाची एका वर्षानंतर विक्री केल्यावर होणारा लाभ दीर्घकालीन भांडवली लाभ समजला जातो. समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडावरील एक लाखावरील दीर्घकालीन भांडवली लाभावर १० टक्के कर भरावा लागतो. मागील दहा वर्षाचा इतिहास तपासाला असता, निर्देशांकाने वर्षागणित ०.४७ ते ३३.९८ परतावा दिला आहे. या कालावधीतील सरासरी वार्षिक परतावा ८.९५ टक्के आहे. दहा लाखांच्या गुंतवणूकीवर सरासरी मागील वर्षात दोन ते अडीच लाखांचा दीर्घकालीन भांडवली लाभ झाला आहे. हा नफा सद्य आर्थिक वर्षात काढून घेतल्यास दिड लाखाच्या दीर्घकालीन भांडवली लाभावर १५ हजार रुपये कर भरावा लागेल. गुंतवणुकीचा नियमित आढावा घेतल्याने पोर्टफोलीओचा कर पश्चात परतावा वाढतो.

क्वार्टाइल रँकिंग

अनुत्पादक फंड वगळणे हा गुंतवणुकीचा आढावा घेण्याचा मुख्य उद्देश असायला हवा. क्वार्टाइल रँकिंग पद्धती ही म्युच्युअल फंडांची पत निश्चित करण्याची जगमान्य पद्धती आहे. फंड गटातील इतर सर्व फंडांच्या तुलनेत एखाद्या फंडाने किती चांगली कामगिरी केली आहे याचे क्वार्टाइल रँकिंग हे मोजमाप आहे. त्या फंड गटातील फंड विशिष्ठ कालावधीतील कामगिरी नुसार टॉप क्वार्टाइल अपर मिडल क्वार्टाइल मिडल क्वार्टाइल लोअर मिडल क्वार्टाइल आणि बॉटम क्वार्टाइल या श्रेणींमध्ये विभागले जातात. निवडलेल्या कालावधीत सर्वाधिक परतावा देणारे २० टक्के फंड टॉप क्वार्टाइलमध्ये त्या नंतर २० टक्के फंड अपर मिडल क्वार्टाइलमध्ये त्या नंतरचे २० टक्के फंड मिडल क्वार्टाइलमध्ये त्या नंतरचे २० टक्के फंड लोअर मिडल क्वार्टाइलमध्ये आणि उर्वरित फंड बॉटम क्वार्टाइलमध्ये विभागले जातात. भारतात क्रिसिल म्युच्युअल फंड रँकिंग ही मान्यताप्राप्त पद्धती आहे जून २०२० पासून पत निश्चिती कंपनी क्रिसिल समभाग रोखे आणि हायब्रीड फंड गटातील फंडांची पत निश्चित करीत असते. जोखीम-समायोजित परतावा, मालमत्तांचे धृवीकारण, रोकड सुलभता आणि मालमत्तेची गुणवत्ता यासारख्या प्रमुख बाबी विचारात घेऊन म्युच्युअल फंडांची विभागणी केली जाते. तीन वर्षे पूर्ण केलेल्या आणि किमान मालमत्ता असलेल्या सर्व फंडाची पत १ ते ५ (सीपीआर -१ ते सी पीआर -५) विभागणी केलेई जाते. तुमचे फंडांची पत सीपीआर १ किंवा सीपीआर -२ असेल तर विशेष काळजी करण्याचे कारण नाही. तुमची गुंतवणूक असलेला फंड त्याव्यतिरिक्त अन्य पत गटात असेल तर गुंतवणूक काढून घ्यायला हवी.

पोर्टफोलिओ एक्स रे

दुसऱ्या पद्धतीत पोर्टफ़ोलिओचा रिस्क/रिवॉर्ड स्कॅटरप्लॉट काढतात. रिस्क/रिवॉर्ड स्कॅटरप्लॉट मानदंड सापेक्ष एकूण पोर्टफोलिओ आणि त्यातील घटकांच्या हा आलेख असतो. आलेख जोखीम (प्रमाणित विचलन) आणि मागील तीन वर्षांच्या कालावधीसाठी प्रत्येक फंडांचा परतावा आलेखात मांडले जातात. ‘क्ष अक्षावर’ प्रमाणित विचलन आणि य अक्षावर परतावा मांडून एकूण पोर्टफोलीओ जोखीम आणि परतावा यांच्यातील समंध प्रस्थापित केला जातो. दुसऱ्या आणि तिसऱ्या (म्हणजे क्ष अक्षाच्या खालील बाजूस असलेले फंड वगळावे, असा संकेत आहे. पोर्टफोलिओचे आदर्श स्थान क्ष अक्षाच्या वरच्या बाजूस डाव्या बाजूला असावे. जे पोर्टफोलिओ कमी जोखीम किंवा कमी अस्थिरतेसह मानदंड सापेक्ष जास्त परतावा दिलेला असतो.

विश्लेषक पत निश्चिती. ( अॅनॅलिस्ट रेटिंग)

जरी जागतिक स्तरावर गुंतवणूकदारांना वर उल्लेख केल्या नुसार फंडांची एक ते पाच या क्रमवारीत विभागणी करून फंडाच्या मागील जोखीम-समायोजित कामगिरीकडे पाहण्याचा आणि समजून घेण्याचा एक सुलभ मार्ग बनला असला तरी म्युच्युअल फंडांचे विश्लेषक अनेक दशकांपासून फंड विश्लेषक या निष्कर्षावर पोहोचले की म्युच्युअल-फंडाच्या कामगिरीला खरोखर चालना देणारे घटक ते ‘फाईव्ह पी’ महत्वाचे असतात. निधी व्यवस्थापक (पिपल) प्रवर्तक (प्रमोटर) प्रक्रिया (प्रोसेस), कामगिरी (पेर्फोर्मंस) आणि किंमत (प्राईस). मागील दशकात २०११ पासून विश्लेषक गोल्ड सिल्व्हर ब्राँझ न्यूट्रल आणि नकारात्मक अशी पत निश्चीती करीत असतात. गोल्ड रेटिंग असलेल्या फंडाचा अर्थ हे फंड फंड गटातील अन्य फंडांपेक्षा ‘फाईव्ह पी’च्या तुलनेत सर्वोत्तम आहेत. सिल्व्हर फंडामध्ये काही तीन किंवा चार ‘पी’ अन्य फंडांपेक्षा चांगले आहेत. विश्लेषकांची ब्राँझ फंड एक किंवा दोन ‘पी’ समाधान कारक आहेत. न्युट्रल रेटिंग असलेल्या फंडाच्या भविष्यातील कामगिरी बाबत दृष्टीकोन काहीही बदललेला नसून ‘निगेटिव्ह-रेट’ केलेल्या फंडांची भविष्यातील कामगिरी घसरू शकते असे फंड अन्य फंड गटातील फंडाच्या तुलनेत तुलनेत निकृष्ट मानले जातात आणि टाळावे असा संकेत विश्लेषक देत असतात. एकदा रेटिंग प्रसिद्ध केल्यावर, विश्लेषक फंडातील घडामोडींवर लक्ष ठेवतो आणि फंडाबाबतचा त्याचा दृष्टिकोन बदललेल्या कोणत्याही घटनेनंतर रेटिंगमध्ये सुधारणा किंवा रेटिंग खालावू शकतो. स्टार रेटिंग आणि अॅनॅलिस्ट रेटिंग या मध्ये मुलभूत फरक आहे. स्टार रेटिंग हे भूतकाळातील कामगिरीवर अवलंबून असते तर अॅनॅलिस्ट रेटिंग भविष्यातील कामगिरी बाबत अंदाज व्यक्त करणारे असते. गुंतवणुकीबाबतची विचारसरणी पाहता, विश्लेषक रेटिंग दीर्घकालीन असते आणि पुढील काही महिन्यांत किंवित नाही गोलंद फंड किमान पाच वर्षे विविध आवर्तन चक्रात सरस कामगिरी करीत असल्याचे दिसते. सर्व साधारण पणे केवळ ५ टक्के फंडांना गोल्ड रेटिंग मिळते. शक्यतो ज्या फंडांचे ‘गोल्ड रेटिंग’ आहे अशाच फंडांचा गुंतवणुकीत अंतर्भाव असावा.

आजकाल तंत्रज्ञानाची व्याप्ती वाढली असून ते कोणत्याही व्यावसाया साठी तंत्रज्ञान हा अनिवार्य घटक आहे. तंत्रज्ञानाने सक्षम केले आहे. गुंतवणूक किंवा पोर्टफ़ोलिओ व्यवस्थापनात तंत्र ज्ञानाचा प्रभावी वापर करत येतो. गुंतवणुकीत तंत्रज्ञान दिवसेंदिवस प्रभावी अस्त्र बनले आहे. के फिंटेक आणि कॅम्स यांच्या संकेत स्थळावर तुमच्या गुंतवणुकी समंधी तुम्हाला माहित नसलेल्या अनेक बाबी तपासता येतात. या संकेत स्थळावर तुमच्या गुंतवणुकीसमंधी तपशील तुम्ही मागवू शकता. तुम्हाला तुमचा पोर्टफोलीओ अद्यवत ठेवायचा असेल आणि बाजारपेठेतील प्रवाहांचा तुमच्या गुंतवणुकीवर होणारा परिणाम तपासायचा असेल तर, या आधुनिक युगात तंत्र ज्ञान साक्षर व्हावे लागेल. म्युच्युअल फंड घराण्यांची शिखर संघटना असलेल्या अँम्फीच्या ताज्या अहवाला नुसार एकूण वैयक्तिक गुंतवणूकदारांच्या मालमत्तेपैकी ७९ % (रु. १६.४८ लाख कोटी) वितरकांमार्फत गुंतविण्यात आले आहेत. या एकूण मालमत्ते पैकी ५५ % (रु. ३७.९२ लाख कोटी) वैयक्तिक वितरकांमार्फत गुंतविण्यात आले आहेत. मागील वर्षभरात वैयक्तिक वितरकांच्या मालमत्तेत वाढ झाली असून ही मालमत्ता डिसेंबर २०२० मधील १६.१७ लाख कोटींवरून डिसेंबर २०२१ मध्ये २०.८६ लाख कोटींवर पोहचली आहे. पोर्टफ़ोलिओची कार्य क्षमता वाढविण्यासाठी चांगल्या वितरकाचा शोध घेणे उचित ठरेल.

तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:

Scroll to Top