नवभूमी दाविन मी …

कंपनीच्या स्थापनेनंतर जवळपास पाच दशकांनंतर, अॅपलही जगातील सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी एक बनली आहे. अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेच्या आकारापेक्षा जास्त बाजारमूल्य असलेल्या या कंपनीने एकविसाव्या शतकातील समाज आणि संस्कृतीलाही आकार दिला आहे. मॅकबुक ते आयफोन या प्रवासात, अॅपलने तंत्रज्ञान आधारित उत्पादनांमुळे जगातील भावी पिढ्यांचा मार्ग प्रशस्त केला आहे. गेल्या काही वर्षांतील अॅपलच्या उत्पादनांपैकी सहा उत्पादनांनी त्या त्या क्षेत्रात क्रांती केली. ही उत्पादने त्या क्षेत्रातील नवकल्पना होत्या. व्यवसाय जगतात नावीन्य हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. ‘इनोव्हेशन’ किंवा शोध याला व्यवसायात खूप महत्व असते. संशोधन उच्च दर्जाचे असले किंवा नसले तरीही ते व्यवसाय वृद्धीला खूप फायदेशीर ठरते. संशोधनात संस्कृती बदलाचे आणि परिस्थितीला आव्हान देण्याचे सामर्थ्य असते. व्यवसायांना स्पर्धात्मक राहण्यासाठी उत्पादने आणि सेवा सतत विकसित होण्यास संशोधन भाग पाडते. नवोन्मेषक विद्यमान बाजारपेठांना आव्हान देतात किंवा पूर्णपणे उत्पादनांची नवीन श्रेणी तयार करतात, तांत्रिक आणि उत्पादन प्रक्रियेतील बदलांद्वारे या कंपन्या बाजारपेठेतील आपला हिस्सा वाढवतात. म्हणूनच भारतात ‘आयफोन सिक्स्टीन’ विकत घेण्यासाठी लागलेल्या लांब रांगा बातम्यांचे मथळे होतात. नावीन्याच्या अशा असंख्य कथा आहेत ज्यांनी व्यवसायांना वेगळ्या पातळीवर नेण्यास मदत केली आहे. अॅपल आणि गुगल या दोन्ही कंपन्या स्टार्टअप म्हणून लहानशा जागेत सुरु झाल्या आणि काळाच्या ओघात संशोधना उत्पादन विकासाच्या बळावर जगातल्या सर्वाधिक मार्केटकॅप असलेल्या विशाल कंपन्यांच्या यादीत पोहचल्या. म्हणूनच कंपन्यांच्या विस्तारात संधोधन (इनोव्हेशन) हे महत्वाचे असते. या पार्श्वभूमीवर, टाटा इंडिया इनोव्हेशन फंडाच्या ‘एनएफओ’ला ११ नोव्हेंबर रोजी सुरवात झाली असून ‘एनएफओ’ २५ नोव्हेंबर पर्यंत खुला असेल. या फंडाचा मानदंड निफ्टी ५०० टीआरआय हा निर्देशांक असून मिता शेट्टी या फंडाच्या नियुक्त निधी व्यवस्थापिका आहेत. या आधी, एक्सिस, कोटक बंधन, बडोदा बीएनपी परिबा, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल, निप्पॉन इंडिया आणि यूटीआय आणि एसबीआय या फंड घराण्यांनी ‘इनोव्हेशन’ या नावीन्यपूर्ण संकल्पनेवर आधारित फंड गुंतवणूकदारांना उपलब्ध करून दिले आहेत. टाटा इंडिया इनोव्हेशन फंड हा नाविन्यपूर्ण रणनीती आणि संकल्पनेवर आधारित कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून भांडवली लाभ मिळविणारा फंड आहे. या फंडाचा उद्देश उद्देश गुंतवणूकदारांना विविध क्षेत्रातील नाविन्यपूर्ण धोरणे आणि संकल्पांनी प्रेरित झालेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन भांडवल लाभ मिळविणे हा आहे. हा फंड धोरणात्मकदृष्ट्या परिवर्तनशील आणि नाव कल्पना अवलंबीणाऱ्या कंपन्यांत गुंतवणूक करेल. ज्या कंपन्या संशोधन आणि विकास आणि मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन यांसारख्या तंत्रज्ञानाचा उपयोग उत्पादन प्रक्रिया आणि विकासासाठी करतात अशा कंपन्यांचा गुंतवणुकीत समावेश असेल. भारताच्या वित्तीय सेवा उद्योगाने डिजिटल युगात प्रवेश केला असून डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचा उपयोग केला आहे, देशव्यापी आर्थिक समावेशाचा लक्षणीय विस्तार झाला असून भारताचे इलेक्ट्रिक वाहन (EV) क्षेत्र, बॅटरी तंत्रज्ञान आणि अक्षय ऊर्जा विभाग त्याच वेळी, औषध आणि आरोग्य सेवा क्षेत्रातील संशोधन आणि विकासावरील खर्चात मोठी वाढ झाली आहे. भारतीय कंपन्यांनी केलेली ही गुंतवणूक भारताला संशोधन आणि उत्पादनासाठी जागतिक केंद्र म्हणून ठसा उमटवत आहे. फंडाचा पोर्टफोलीओ फ्लेक्झीकॅप घाटणीचा परंतु स्मॉलकॅपकडे न झुकलेला असेल. पोर्टफोलीओत बॉटम-अप रणनीतीनुसार आठ ते दहा उद्योगातील ३५ ते ४० कंपन्यांचा समावेश असेल. हा फंड विविध क्षेत्रांमध्ये आणि मार्केट कॅपमध्ये गुंतवणूक करेल. हा फंड प्रामुख्याने देशांतर्गत कंपन्यांत गुंतवणूक करेल. सर्व ‘इनोव्हेशन फंड अलिकडच्या काळात लॉन्च करण्यात आले आहेत. ‘इनोव्हेशन’ या संकल्पनेवर आधारित फंडांचा २० महिन्यांपेक्षा कमी कालावधीचा मागोवा पुरेसा नाही. कोटक इनोव्हेशन फंड, हा डिसेंबर २०२० मध्ये सुरु झाला होता, हा तुलनेसाठी सर्वात दीर्घ कालावधी उपलब्ध असलेला फंड आहे. फंड गटात तुलनेसाठी या फंडाचा सुमारे पावणे चार वर्षांहून अधिक कालावधी उपलब्ध आहे. या फंडाची मानदंड सापेक्ष कामगिरी खराब असून हा फंड मानदंडाला मागे टाकण्यास पूर्णपणे अयशस्वी ठरला आहे. तीन वर्षांच्या रोलिंग रिटर्न्सच्या आधारावर फंडाच्या सुरवातीपासून तपासले असता, फंडाने निफ्टी ५०० टीआरआय सापेक्ष १९.५ टक्क्यांच्या तुलनेत १५.६ टक्के परतावा मिळविला आहे. अन्य उपलब्ध फंडांच्या परताव्याची त्यांच्या मानदंड सापेक्ष तुलना केली असता, अयसीआयसीआय प्रुडेन्शियल इनोव्हेशन फंड आणि निप्पॉन इंडिया इनोव्हेशन फंड यांनी मानदंड सापेक्ष चांगली कामगिरी केली आहे. तर यूटीआय इनोव्हेशन फंड मानदंडसापेक्ष सातत्याने खराब कामगिरी करीत आहे. बडोदा बीएनपी परिबास इनोव्हेशन फंड आणि बंधन इनोव्हेशन फंड यांची कामगिरी मध्यम स्वरूपाची आहे. दोन्ही फंड एप्रिल २०२४ मध्ये सुरू झाले असल्याने ऊपलब्ध कालावधी निष्कर्ष काढण्यास पुरेसा नाही. बहुतेक इनोव्हेशन फंड हे स्मॉलकॅप केंद्रित आहेत. टाटा इंडिया इनोव्हेशन फंडाची शिफारस का केली? या फंडाचे निधी व्यवस्थापन मिता शेट्टी करणार आहेत. मिता शेट्टी या टाटा डिजिटल इंडिया, टाटा फोकस्ड एक्वीटी फंड टाटा लार्ज अॅण्ड मिडकॅप फंड आणि टाटा निफ्टी इंडिया डीजीटल इटीएफ या फंडांच्या नियुक्त निधी व्यवस्थापिका आहेत. त्यांनी या आधी टाटा इंडिया फार्म फंडाचे निधी व्यवस्थापन केले आहे. विकसित अर्थ व्यवस्थांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी निधी व्यवस्थापाकाची कामगिरी तपासली जाते. एखाद्या निधी व्यवस्थापकाच्या कामगिरीची मानदंड सापेक्ष तुलना करतांना ‘इक्वल वेट’ आणि एयुएम वेट’ अशा दोन पद्धतीने केली जाते. मिता शेट्टी व्यवस्थापित करीत असलेल्या सर्व फंडाची मानदंड सापेक्ष कामगीरी ‘एयुएम वेट’ पद्धतीने सोबतच्या कोष्टकात दिली आहे. म्युच्युअल फंडाच्या निधी व्यवस्थाकांची कामगिरी तपासण्यासाठी अलीकडच्या दशकात अनेक पद्धती विकसित झाल्या आहेत. या संशोधनात म्युच्युअल फंडाच्या मागील परताव्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. म्युच्युअल फंड एकतर वैयक्तिक व्यवस्थापकांद्वारे किंवा व्यवस्थापकांच्या चमूद्वारे व्यवस्थापित केले जातात. व्यवस्थापकांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये त्यांनी व्यवस्थापित केलेल्या फंडांची कामगिरी बाजाराच्या वेगवेगळ्या आवर्तनांच्या टप्प्यात किंवा एकाच फंडाची कामगिरी वेगवेगळ्या निधी व्यवस्थापकांच्या काळात तपासली जाते. त्याचप्रमाणे, व्यवस्थापकाच्या कारकिर्दीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर निर्देशांक सापेक्ष कामगिरी बदलत असते. ‘स्टार’ व्यवस्थापकांची कामगिरी देखील नियमितपणे तपासली जाते. अलीकडच्या काळात बिर्लाचे फंड थोडे मागे पडलेले दिसतात तर एचडीएफसी आणि निप्पॉनच्या फंडांनी सातत्य राखलेले दिसते. २०१७ ते २०२० दरम्यान नेमकी उलट परिथिती होती. एचडीएफसी निप्पॉनचे फंड शर्यतीत मागे होते तर बर्लाचे महेश पाटील हे स्टार परफॉर्मर होते. काही वेळेला निधी व्यवस्थापकाची गुंतवणूक शैली त्या वेळच्या बाजाराच्या आवर्तानला पोषक असते. मिता शेट्टी यांची कामगिरी तपासली असता त्या कामगिरीच्या शिखराच्या जवळ आहेत (शिखर गाठून कामगिरी किंचित घसरली आहे). संस्थात्मक आणि किरकोळ गुंतवणूकदारांचे त्या कामगिरीमुळे लक्ष वेधून घेत आहेत. म्युच्युअल फंडांचा डेटा उपलब्ध करून देणारी संकेतस्थळावरून व्यवस्थापकाची वैशिष्ट्ये आणि, व्यवस्थापकाची कामगिरी, व्यवस्थापकाची शैली, वेगवेगळ्या आवर्तनात त्याचे वर्तन आणि जोखीम घेण्याची क्षमता आणि दिलेला परतावा यांच्यातील संबंध तपासता येतो. व्यवस्थापकाची वैशिष्ट्ये आणि व्यवस्थापकाची कामगिरी यांच्यातील संबंध तपासतो. यासाठी वैयक्तिक व्यवस्थापकांची माहिती गोळा करून वय, गुंतवणुकीचा अनुभव, फंडाचा कार्यकाळ, त्याची क्षमता, कौशल्य, ज्ञान, प्रयत्न, हे सर्व तपासता येतात. एखाद्या ‘एनएफओ’ची शिफारस करण्यापूर्वी या गोष्टी म्युच्युअल फंड विश्लेषक या भूमिकेतून तपासल्या जातात. अनुभवी व्यवस्थापकांना त्या अनुभवाचा फायदा होतो का? तरुण व्यवस्थापक अधिक धोका पत्करतात का ? ही वैशिष्ट्ये त्या निधी व्यवस्थापकाचे प्रगती पुस्तक भविष्यातील वाटचालीं बाबात संकेत देत असतात. व्यवस्थापकाच्या कामगिरीचे अंशतः श्रेय जोखीम घेण्याच्या आणि गुंतवणूक शैलीला दिले जाते. मिता शेट्टी यांना कंपन्या ओळखण्यात त्यांना अनुभवाचा फायदा होतो. सध्याच्या महाग बाजारात कंपन्या शोधणे सोपे काम नाही. काही अपवाद वगळता सक्रिय फंडांना अल्फा निर्मिती कठीण झाली आहे. थीमॅटिक फंड हा इक्विटी फंडांचा सर्वात मोठा गट उदयास येत असताना, गुंतवणूकदार पारंपारिक फंड सोडून या थीमॅटिक फंडांकडे वळतांना दिसत आहेत. मिता शेट्टी यांच्या सध्याच्या संख्यात्मक आणि गुणात्मक कामगिरी मुळे या फंडाची शिफारस करीत आहे.

तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा: