तुका म्हणजे गुण चंदनाचे अंगी

एखाद्या राष्ट्राच्या आर्थिक उन्नतीमध्ये औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि राष्ट्रातील नागरिकांच्या दरडोई उत्पन्नातील बदल महत्वाचे घटक आहेत. या घटकातील बदल, त्या देशाच्या नागरिकांच्या उपभोग पद्धतीत परिणाम करतात. उपभोग आणि नागरिकांचे दरडोई उत्पन्न यांच्यात परस्पर सहसमंध (पोझीटीव्ह कोरिलेशन) आहे. जीवन जगण्यासाठी उपभोग हा सर्व मानवी भावनांचा अविभाज्य भाग आहे. आपण विविध वस्तू खरेदी करतो, विविध पदार्थांचा आस्वाद घेतो, आणि आपले जीवन कमीतकमी कष्टाचे व्हावे म्हणून विविध सेवांचा वापर करतो. उपभोग (कंझम्शन) हे लोकांचे जीवन समृद्ध करते. सामाजिक-आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक, मनोवैज्ञानिक उपभोगाच्या सवयींमुळे देशाची उपभोगाची सवय त्या त्या देशातील नागरिकांचे राहणीमान, मानवी विकासाचे चित्र प्रतिबिंबित करते.उपभोग हा सर्व अर्थव्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. सकल देशांतर्गत उत्पादनाचा एक प्रमुख भाग म्हणून अर्थशास्त्रात उपभोगाकडे पाहिले जाते.
मानवी इच्छांच्या बदलांमुळे उपभोगाच्या पद्धतीत बदल होतो. उपभोग ही व्यक्ती सापेक्ष बाब असली तरी इच्छा आणि समाधान त्या समाज घटकांवर अवलंबून असते. उपभोग हा देशाच्या विकासात सर्वात महत्वाचा घटक हा विविध वस्तू आणि सेवांसाठी आकारले जाणारे शुल्क आणि दरडोई उत्पन्न यांच्याशी संबंधित आहे. उपभोगाच्या पद्धती या दैनंदिन भौतिक जीवनाशी निअगडीत असतात. ग्राहक समूहाच्या वृत्ती, मूल्ये आणि हेतू यांचे यांच्यात विविधता, गुणवत्ता हे असे दर्शविते की ग्राहक त्यांच्या उत्पन्नाचे कसा वापर करतात. भारतात डिसेंबर भारतात इंटरनेट वापरकर्त्यांचा आकडा २०४० पर्यंत १.५ अब्ज वापरकर्त्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. देशातील एकूण इंटरनेट वापरकर्त्यांपैकी बहुसंख्य वापरकर्ते त्यांच्या मोबाईल फोनद्वारे इंटरनेट वापरतात. देशभरात इंटरनेट वापरकर्त्यांइतकेच स्मार्टफोन वापरकर्ते आहेत. स्वस्त इंटरनेट मोबाईल डेटाची उपलब्धता, देशात स्मार्टफोनचा वाढता वापर तसेच डेस्कटॉप आणि टॅबलेटच्या तुलनेत स्मार्टफोनची उपयुक्तता हे भारतातील मोबाइल आणि इंटरनेट हे ऑनलाइन बाजारपेठ म्हणून उदयास येण्यास कारणीभूत ठरली आहे. भारत ही जगभरातील अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकाची ऑनलाइन बाजारपेठ म्हणून उदयास आली आहे. इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात वेगाने वाढत आहे. भारत हा अर्थव्यवस्थेच्या आकारमानानुसार पाचव्या क्रमांकाची अर्थ व्यवस्था असली तरी दरडोई उत्पन्नाच्या क्रमवारीत भारताचा समावेश पहिल्या १०० देशात सुद्धा नाही. भारतात आर्थिक उदारीकरणाला सुरवात झाली तेव्हा भारताचे दरडोई उत्पन्न वार्षिक ३०० डॉलर्स होते. परंतु भारताचे दरडोई उत्पन्न वार्षिक २४०० डॉलर्स असून येत्या ३ ते ४ वर्षात ४५०० डॉलर्स होणे अपेक्षित आहे. बदलत्या दरडोई उत्पन्नानुसार उपभोगाचा ढाचा बदलत आहे. कमी दरडोई उत्पन असलेले ग्राहक उत्पन्नाचा मोठा भाग केवळ ग्राहकोपयोगी वस्तूंवर खर्च करतात. तर दरडोई उत्पन्नाच्या वरच्या स्तरातील ग्राहकांचा अल्प खर्च ग्राहकोपयोगी वस्तूंवर खर्च करतात आणि खर्चाचा मोठा हिस्सा विवेकी वस्तूंवर खर्च होतो. भारतात दरडोई उत्पन्न वाढत असून दरडोई उत्पन्नाच्या वरच्या स्तरातील वाढीचा वेग अधिक आहे. या बदलत्या ढाच्यामुळे गुंतवणुकीच्या अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत. भविष्यात या संधींचे रुपांतर मोठ्या संधीत होण्याची शक्यता असल्याने भविष्यात गुंतवणुकीची मोठी संधी उपलब्ध होणारी अनेक उत्पादने ‘प्रोडक्ट लाईफ सायकल’च्या सुरवातीच्या टप्प्यावर (इंट्रोडक्शन किंवा ग्रोथ) आहेत. ग्रामीण भारतात दरडोई उत्पन्नात शहरी दरडोई उत्पन्नापेक्षा वेगाने वाढ झाली. ग्रामीण भागातील भारतीय टिकाऊ वस्तू, आरोग्य आणि वैयक्तिक निगेसाठी वापरली जाणारी उत्पादने, तयार (किंवा अर्ध तयार) अन्न, विविध सेवा इत्यादींवर अधिक खर्च करत आहेत. उत्पन्नाची वाढती पातळी, बदलती जीवनशैली, पारंपारिक सवयीत झालेला बदल, चव, अर्थसाक्षरतेची वाढती पातळी आणि ग्रामीण ग्राहकांच्या वाढत्या उत्पन्नामुळे भारतीयांच्या उपभोग पद्धतीत (कंझम्शन पॅटर्न) मोठे बदल होत असल्याचे दिसत आहे.म्हणून बदलत्या उपभोग संकृतीचा गुंतवणुकीतून संपत्ती निर्मितीसाठी अवलंब करणारे कंझम्शन फंड गुंतवणुकीचा महत्वाचा घटक मानता येतील.
विश्लेषक आणि अर्थतज्ञांत एक व्यापक एकमत आहे, ग्रामीण भागात, उपभोगात पुनरुज्जीवन होण्याची आशा आहे. लोकसभा निवडणुकीत सत्तारूढ पक्षाच्या जागा कमी होण्यास अनेक घटक कारणीभूत आहेत. त्या पैकी एक घटक म्हणजे भारतात २०१४ पासून पायाभूत सुविधा उभारणीवर आणि भांडवली खर्चावर लक्ष केंद्रित केले गेले. सरकारने कल्याणकारी योजनांवर खर्च कमी करून पायाभूत सुविधा विकासाला प्राधान्य दिले. येत्या अर्थ संकल्पात कल्याणकारी योजनांसाठी मागील काही वर्षांपेक्षा अधिक तरतूद अपेक्षित आहे. याचा परिणाम लोकांच्या क्रय शक्तीत वाढ अपेक्षित असून याचा सकारत्मक परिणाम उपभोगावर होण्याची शक्यता आहे.
टाटा इंडिया कन्झुमर फंड हा या बदलाचा लाभार्थी ठरण्याची अपेक्षा आहे. उपभोगात पायाभूत सुविधा, स्थावर मालमत्ता, वैयक्तिक वापराची उत्पादने, आदरातिथ्य मनोरंजन यांसारख्या बहुविविध उद्योगांचा समावेश आहे. बाजारातील ग्राहकांच्या कृतींचा संदर्भ देणारी ग्राहकाची वागणूक एकसंघ नसते. उपभोग पद्धतीमध्ये उपभोगातील फरकांचा अभ्यास केला जातो. जसे की ग्रामीण आणि शहरी भागात शिक्षण आणि आरोग्य सेवा वाहतूक या गोष्ठींवर मोठा खर्च होत असतो. टाटा इंडिया कंझ्युमर फंड हा अशा कंपन्यांत गुंतवणूक करतो ज्या ग्राहकाभिमुख (‘बी२सी’) प्रकारच्या व्यवसायात आहेत. भारताच्या जीडीपी पैकी ६० टक्के जीडीपी हा खाजगी उपभोगांशी निगडीत आहे. हे उपभोगाचे प्रकार एक तर दैनंदिन जीवनाशी निगडीत आहेत जसे की तयार अन्न, वाणसामान, औषधे वैगरे किंवा एकदाच खरेदी होणारी उत्पादने, (वैयक्तिक वापरासाठी वाहन), आदरातिथ्य सेवा, आरोग्यसेवा इत्यादी.
सोनम उदासी हे टाटा इंडिया कंझ्युमर फंडाचे १६ सप्टेंबर २०२१ पासून निधी व्यवस्थापक आहेत. टाटा म्युच्युअल फंडाच्या ११ फंडांच्या मिळून १३८७१ कोटींच्या मालमत्तेचे ते व्यवस्थापन करतात. त्यांना एकूण २१ वर्षांचा मुलभूत संशोधन आणि पोर्टफोलीओ व्यवस्थापनाचा अनुभव आहे. टाटा इंडिया कंझ्युमर फंडाची मालमत्ता ३० मे २०२४ रोजी १९४२ कोटी होती. फंडाच्या गुंतवणुकीत आयटीसी, झोमेटो, मारुती सुझुकी, टाटा कंझ्युमर, नेस्ले इंडिया या सर्वाधिक गुंतवणूक असलेल्या कंपन्या आहेत. फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये ३५ कंपन्या असून आघाडीच्या दहा कंपन्या मिळून ५४.१७ टक्के गुंतवणूक आहे. फंडाच्या परिघात ‘एफएमसीजी’ व्यतिरिक्त वैयक्तिकवापरासाठी असणारी वाहने (मारुती, हिरो मोटोकोर्प, एस्कोर्टस), साखळी दालने (एव्हेन्यू सुपरमार्ट, ट्रेट, मेट्रो ब्रॅण्डस) मद्य (रॅडिको खेतान, युनायटेड स्पिरीट्स) तयार खाद्य पदार्थ (नेस्ले, बर्गरकिंग, टाटा कन्झ्युमर भिकाजी फुड्स), विवेकी खर्चाच्या वस्तू (टायटन, सेलो) इत्यादींचा समावेश होतो. एफएमसीजी कंपन्यांचे मुल्यांकन (पीइ) नेहमीच अधिक असते. नेस्ले, युनीलिव्हर, यांच्या सरासरी ‘पीइ’ ५० पेक्षा अधिक आहे. पोर्टफोलिओ व्यवस्थापित करणे म्हणजे गुंतवणूक असलेले प्रत्येक व्यवसाय व्यवस्थापित करणे होय. निधी व्यवस्थापकांनी पोर्टफोलिओमधील प्रत्येक व्यवसायाचा विचार केला पाहिजे कारण दीर्घकालीन गुंतवणूकीतून व्यवसायाचे मूल्य संवर्धन होत असते. उपभोग क्षेत्र गुंतवणुकीची एक चांगली संधी देत असले तरी गुंतवणूकदारांना काही आव्हानांचा सामना सुद्धा करायला लागू शकतो. उपभोग क्षेत्र हे आर्थिक आवर्तन संवेदनशील असून महागाई, व्याजदर आणि ग्राहकांचा आत्मविश्वास यासारखे घटक उद्योग क्षेत्राच्या नफा क्षमतेवर परिणाम करू शकतात. या क्षेत्राची कामगिरी ही नियामन, कर आकारणी धोरणे आणि ग्राहकांच्या खर्चाला चालना देण्याच्या उद्देशाने सरकारी धोरणांचे प्रतिबिंब आहे. या क्षेत्रातील कोणतेही बदल कंपन्यांच्या नफ्यावर थेट परिणाम करू शकतात. हा फंड भारतीय अर्थव्यवस्थेतील ग्राहक वस्तू आणि सेवा क्षेत्राच्या कामगिरीचे प्रतिनिधित्व करतो. खाद्या गुंतवणूकदाराने उपभोग क्षेत्राकडे वाजवी परताव्याच्या अपेक्षेने गुंतवणूक केल्यास हे क्षेत्र गुंतवणूकदारांना निराश करणार नाही. हा फंड दुरदर्शी व्यवस्थापनाद्वारे समर्थित असलेल्या योग्य समभाग गुंतवणुकीतून मूल्य संवर्धनातून संपत्ती निर्माण करण्याची संधी म्हणून पाहावे. चंदनासारखे गुण असलेल्या या क्षेत्राचे लाभार्थी होण्यासाठी गुंतवणूकदारांनी टाटा इंडिया कन्झुमर फंडाची निवड करावी.

तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:

Scroll to Top