स्मार्ट लॅडरिंग (SMART Laddering in Mutual Funds)

Smart Laddering in Mutual Fund

तज्ञांचे असे सांगणे असते कि गुंतवणुकीतील जोखीम टाळू नका त्या जोखीमेचे व्यवस्थापन करा. व्याज दर आणि रोख्यांच्या किंमती यांच्यात व्यस्त प्रमाण असते जेव्हा व्याज दर वाढू लागतात तेव्हा रोख्यांच्या किंमती कमी होतात. अशा परिस्थितीत सामन्य गुंतवणूकदरांनी नेमके काय करावे या विषयावर एडलवाईज म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राधिका गुप्ता यांच्याशी नुकतेच बोलणे झाले या संवादाचा हा संक्षिप्त गोषवारा.

टार्गेट मॅच्युरिटी फंड हे ओपन-एंडेड इंडेक्स फंड आहेत जे एका निर्देशांकाच्या अधीन गुंतवणूक करतात. हे निष्क्रिय व्यवस्थापित फंड आहेत. या प्रकारचे फंड प्रामुख्याने सरकारी रोख्यांत, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे रोखे आणि राज्य विकास कर्ज (एसडीएल) मध्ये गुंतवणूक करतात आणि योजची मुदतपूर्ती होईपर्यंत ही गुंतवणूक बदलत नाही. योजनेच्या मुदतपूर्तीपर्यंत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हे फंड काही प्रमाणात परताव्याचा अंदाज देतात. उदाहरणार्थ, भारत बाँड इटीएफ डिसेंबर २०१९ मध्ये मध्ये उपलब्ध केला गेला. ‘ट्रिपल ए’ रेटिंग केलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील रोख्यांत निफ्टी भारत बाँड इंडेक्स-एप्रिल २०२३ मध्ये गुंतवणूक केली जाते आणि त्याचे त्यावेळी वायटीएम ७.०३ टक्के होता. याचा अर्थ, आता फंडात त्यावेळी गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला एप्रिल २०२३ मध्ये ७.०३ टक्के दराने परतावा मिळेल. डिसेंबर २०१९ ते आज पर्यंत व्याजदर निच्चांकी जाऊन पुन्हा वाढू लागले आहेत. तरी एका वर्षा नंतर मुदतपूर्ती होईल तेव्हा गुंतवणूकदारांना ७.०३ टक्के परतावा मिळेल.

वाढते व्याजदर हे अर्थ व्यवस्थेतील एका घटकाला समाधान देणारे असले तरी विस्तृत अर्थव्यवस्थेसाठी वाढणारे व्याजदर हे काही चांगले लक्षण नाही. वाढणारे व्याजदराचा वेगवेगळ्या मुदतीच्या रोख्यांच्या किंमतीवर परिणाम करीत असतात. व्याजदरात वाढ झाल्याने रोख्यांच्या किमतीत घसरण होते. दीर्घमुदतीचे रोखे हे अधिक संवेदनशील असतात. म्हणजे अल्प मुदतीच्या रोख्यांच्या किंमतीत दीर्घ मुदतीच्या रोख्यांच्या किंमतील घसरण कमी असते. काही गुंतवणूकदार अशा परिस्थितीत कमी कालावधीच्या रोख्यांत गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युल फंडांची निवड करतात. परंतु तुम्ही अल्प-मुदतीच्या रोख्यांत गुंतवणूक करता तेव्हा व्याजदराची जोखीम कमी होत असली तरी उत्पन्न देखील कमी असते. तुम्ही दीर्घकालीन बाँडमध्ये गुंतवणूक केली तर तुम्ही उच्च उत्पन्न मिळवू शकता परंतु तुम्हाला व्याजदरातील जोखीम सहन करावी लागते. याचा मध्यम मार्ग म्हणजे ‘बॉंड लॅडरिंग’.

लॅडरिंग म्हणजे काय?

सोप्या भाषेत सांगायचे तर, लॅडरिंग म्हणजे वेगवेगळ्या मुदतीच्या रोख्यांत गुंतवणूक करणे. गुंतवणूकदार एक वर्ष ते दहा वर्षे किंवा त्याहून अधिक मुदतीच्या रोख्यांमध्ये गुंतवणूक करणे. समजा तुमच्याकडे रोख्यांत गुंतवणूक करण्यासाठी १० लाख रुपये असल्यास आणि तुम्हाला दर वर्षी २ लाखांची गरज असल्यास प्रत्येक वर्षी मुदतपूर्ती होणाऱ्या रोख्यांत २ लाख गुंतवणे. म्युच्युअल फंडांनी देखील वेगवेळ्या वर्षी मुदतपूर्ती असलेल्या ‘टार्गेट मॅच्युरिटी प्लान’ (टीएमएफ) उपलब्ध करून दिले आहेत. आमच्या फंड घराण्याने २०२३ ते २०३२ पर्यंत मुदत पूर्ती असलेले ‘टार्गेट मॅच्युरिटी प्लान’ उपलब्ध करून दिले आहेत.

तुमच्या गरजेनुसार तुम्ही पाच, सात आणि दहा वर्षांनी मुदतपूर्ती होणाऱ्या फंडात गुंतवणूक केली तर तुम्हाला गुंतवणूक करतांना जितका ‘वायटीएम’ आज दिसतो तितका परतावा तुमच्या गुंतवणुकीवर मिळू शकतो. यामुळे  व्याजदर जोखीम नियंत्रित करता येते. प्रत्येक फंडातील गुंतवणूक त्या फंडाची मुदतपूर्ती होई पर्यंत गुंतवणूक ठेवली तर व्याजदर वाढीमुळे होणाऱ्या घटणाऱ्या रोख्यांच्या किंमतींवर नियंत्रण राखता येते. तुम्हाला तुमची मुल गुंतवणूक (मुद्दल) नफ्यासहित मुदतपूर्ती पश्चात परत मिळेल. व्याजदर वाढत असल्यास उपलब्ध उत्पन्न जास्त असेल, ज्याचा फायदा गुंतवणूकदारांना होतो. व्याजदर कमी झाल्यास, गुंतवणूकदाराला कमी परतावा मिळतो परंतु त्याच्या विद्यमान गुंतवणुकीवर तुलनेने अधिक परताव्याचा दर मिळतो. निश्चित उत्पन्न गुंतवणुकीत पुनर्गुतवणूक जोखीम असते. ( रिइंव्हेस्टमेंट रिस्क’) प्रत्येक वेळी बाँड परिपक्व झाल्यावर, गुंतवणूकदाराला वेगळ्या व्याजदरावर गुंतवणूक करावी लागते. व्याज दर वाढत असतील तर पुनर्गुतवणूक अधिक व्याजदरावर आणि व्याज दर जर कमी होत असतील तर पुनर्गुतवणूक कमी व्याज दरावर होते. ‘टार्गेट मॅच्युरिटी प्लान’मध्ये पैसे हवे असल्याचा कालावधी आणि रोख्यांची मुदतपूर्ती यांचा मेळ घालता येत असल्याने  पुनर्गुतवणूकीचा घोका टाळता येतो.

लॅडरिंग तुम्हाला निश्चित मुदतीचा आणि निश्चित परताव्याचा पोर्टफोलिओ तयार करण्यात मदत करते. हे फंड एफएमपी प्रकारचे असले तरी या फंडात रोकड सुलभता असते. दर वर्षी तुमची एक गुंतवणूक परिपक्व होते. मुदतपुर्तीए नंतर रोकड तुमच्या बँक खात्यात जमा होते. वेगवेळ्या मुदतीच्या आर्थिक उद्दिष्टांसाठी नियोजन करण्याची ही एक उत्तम पद्धत आहे.

लॅडरिंग का?

लॅडरिंग व्याजदर वाढत असतांना एक आकर्षक रणनीती आहे. जेव्हा व्याजदर वाढू लागतात तेव्हा तुम्हाला तुमचे पैसे कमी व्याजदरात दरात दीर्घ कालावधीसाठी लॉक करणे टाळण्यास लॅडरिंग मदत करू शकते, तरीही तुमची आर्थिक उद्दिष्टे उपलब्ध होणारी रोकड यांचा व्याजदरातील अस्थिरता टाळून मेळ घालता येतो. जर तुम्ही तुमचा उपलब्ध निधी १० वर्षांपर्यंतच्या वेगवेगळ्या मुदतींमध्ये गुंतवला आणि तुम्हाला नजीकच्या काळात पैशांची गरज असेल, तर तुम्ही कधीही पैसे काढून घेऊ शकता.

नजीकच्या काळात टार्गेट मॅच्युरिटी फंडांची बाजारपेठ विकसित होत जाईल. आज स्मार्ट गुंतवणूकदारांचा पैसा या फंडात येऊ घातलेला दिसत आहे. कधी काळी बँकिंग अॅण्ड पीएसयु डेट फंड फारसे लोकप्रिय नव्हते.परंतु आज रोखे गुंतवणूक फंडाच्या परिघातील मोठा हिस्सा बँकिंग अॅण्ड पीएसयु डेट फंडांनी व्यापलेला दिसत आहे. आज ८० जहार कोटी टार्गेट मॅच्युरिटी फंडांनी व्यापला आहे. भविष्यात हे फंड मोठा हिस्सा काबीज करतील याची खात्री वाटते.

तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:

Scroll to Top