दरवळतो पुरिया
आजच्या या सदराच्या मानकरी आहेत राधिका आणि स्वानंद कुलकर्णी. राधिका या पुण्यातील एका कायम विना अनुदानित शाळेत संगीत शिक्षिका आहेत. स्वानंद कुलकर्णी हे एका कारखान्यात लिपिक पदावर काम करतात. दोघांनी मिळून सात वर्षांपूर्वी संयुक्त रित्या २५ लाखांची धायरी फाटा येथे सदनिका घेतली असून त्याकरिता १५ लाखांचे वीस वर्ष मुदतीचे गृहकर्ज घेतले होते. या गृहकर्जा पैकी ३ लाखांची परतफेड झाली आहे. राधिका यांनी आर्थिक नियोजनासाठी संपर्क केला होता. कुलकर्णी कुटुंबियांची २ वित्तीय ध्येये निश्चित करण्यात आली. पहिले येत्या सात ते आठ वर्षात कर्जमुक्त होणे आणि दुसरे त्यांच्या निवृत्ती नियोजनासाठी तरतूद करणे. राधिका आणि स्वानंद कुलकर्णी यांच्याकडे ५ लाखांच्या मुदत ठेवी आहेत.
कृती योजना
राधिका यांना वित्तीय नियोजना बाबत अनेक प्रश्न पडले होते. या संगीत शिक्षिका असल्याने आहेत. त्यांना सांगीतिक परिभाषेत त्यांच्या प्रशनाची उत्तरे दिली. जशी एखाद्या मैफिलीची सुरवात मंद लयीतील आलापीने होते आणि मध्य लय आणि शेवटी द्रुत लयीतील एखाद्या बंदिशीने त्या रागाची सांगता होते तसेच वित्तीय नियोजनाची सुरवात मुदतीच्या विम्याने करायला हवी. मुदत विमा हा तुमच्या वित्तीय नियोजनाचा पाया असतो. मुदत विमा तुमच्या कुटुंबाचे आर्थिक भविष्य सुरक्षित करतो. मुदतीचा विमा मूलभूत आर्थिक गरजांपैकी एक आहे. विशेषतः आजच्या काळात टर्म इन्शुरन्स परवडणाऱ्या प्रीमियमपासून ते अतिरिक्त रायडर्सपर्यंत अनेक वैशिष्ट्ये आणि फायदे देखील घेता येतात. पॉलिसीधारकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास टर्म इन्शुरन्स योजना संपूर्ण कुटुंबासाठीला आर्थिक सुरक्षा देतात. पॉलिसी धारकाला गंभीर आजार किंवा अपघाती मृत्यू झाल्यास अतिरिक्त विमाछत्र घेता येते. आपल्या उपल्ध बचतीपैकी दरमहा तीन हजार खर्च करून दोघांनी प्रत्येकी ५० लाखांचा मुदतीचा विमा घ्यावा.
वित्तीय नियोजनाची दुसरी पायरी म्हणजे आरोग्य विमा. स्वानंद कुलकर्णी यांना नोकरीच्या ठिकाणाहून २ लाखांचे आरोग्य विम्याचे छत्र आहे. सध्याच्या काळात हे विमा छत्र पुरेसे नाही. मेडिक्लेम पॉलिसी पॉलिसीधारकांना कॅशलेस हॉस्पिटलायझेशन सुविधा किंवा दाव्याच्या रकमेची जवळ जवळ ८० टक्के इतक्या रक्कमेची परतफेड होते.
दोघांचा संयुक्त (फ्लोटर) ५ लाखांचा आरोग्य विमा छत्र असणारी पॉलिसी घ्यावी.
५ लाखांच्या मुदत ठेवी पैकी २ लाख तातडीच्या खर्चा साठी ठेवावे. उर्वरित ३ लाख खालील प्रमाणे गुंतविणे
१ लाख कॅनरा रोबेको फ्लेक्झीकॅप फंड
१ लाख निप्पॉन इंडिया मल्टीकॅप फंड
१ लाख फ्रँकलीन इंडिया फोकस्ड इक्वीटी फंड
प्रत्येकी ५००० ची एसायपी वरील तीन फंडात करावी.
जमा (हजार रुपये) | खर्च (हजार रुपये) |
---|---|
वेतन | घर खर्च २२ |
राधिका कुलकर्णी ३५ | गृहकर्जचा हप्ता २२ |
स्वानंद कुलकर्णी ३५ | आरोग्य विमा २ |
मुदतीचा विमा ३ | |
बचत २१ |