तुमच्या मते पुढील वर्षी बाजारांचे वर्तन कसे असेल?

बाजाराच्या वर्तनाचा अंदाज लावणे कठीण असते. बाजाराच्या वर्तनाचा अंदाज लावत आम्ही आमच्या गुंतवणुकीत थोडेफार बदल करीत असतो. जागतिक आणि भारतीय बाजारांचा विचार केल्यास २०२३च्या पूर्वार्धात जागतिक समस्या अधिक तीव्र होतील. महागाई आणि व्याजदरात सध्याच्या पातळीपेक्षा चढेच राहतील.या गोष्टीमुळे देशांतर्गत अर्थव्यवस्थेवर परिणाम नक्कीच झालेला दिसेल. निर्यात प्रधान उद्योग क्षेत्रे जसे की माहिती तंत्रज्ञान, आभूषणे, वैद्यकीय सेवा, औषध निर्मिती या उद्योगांतील कंपन्यांच्या उत्सर्जनात घट झालेली दिसेल किंवा उसर्जानात फार वाढ अपेक्षित नाही तर देशांतर्गत अर्थव्यवस्थेशी समंधीत बँकिंग ऑटो, सिमेंट यांच्या उत्सर्जनात वाढ होण्याची आशा आहे. थोडक्यात सांगायचे तर नवीन कॅलेंडर वर्षाचा पूर्वार्धात बाजाराला वेगवेगळ्या घटनांना सामोरे जावे लागणार आहे. जसे की अर्थ संकल्प. त्यामुळे नवीन कॅलेंडर वर्षाचा पूर्वार्धात बाजारात टोकाची अस्थिरता असेल परंतु उत्तरार्धात म्युच्युअल गुंतवणूकदारांना नक्कीच दिलास मिळेल.
तुम्ही आयडीएफसी फ्लेक्झीकॅप आणि आयडीएफसी मिडकॅप हे दोन फंड व्यवस्थापित करता. या फंडांपैकी कोणता फंड अधिक परतावा देईल असे वाटते?
फंडाची निवड भविष्यातील अपेक्षित परताव्यावर न ठेवता गुंतवणूकदाराच्या जोखीमंकावर ठरायला हवी. कदाचित हे दोन्ही फंड एका वर्षात अपेक्षित नफा देणार नाहीत परंतु तीन ते पाच वर्षांचा विचार करता या दोन फंडांपैकी आयडीएफसी फ्लेक्झीकॅप फंड हा मिडकॅप फंडाच्या तुलनेने कमी अस्थिर असलेला फंड आहे. तर मिडकॅप हा अधिक अस्थिर म्हणून पाच वर्षात अधिक परतावा अपेक्षित असलेला फंड आहे . फ्लेक्झीकॅपफंडांच्या कामगिरीत सुधारणा झालेली दिसत आहे तर आयडीएफसी फ्लेक्झीकॅप फंड १७ वर्षे जुना फंड असून गुंतवणूकदारांच्या पसंतीला उतरलेला फंड आहे. मिडकॅप फंडाचा एनएफओ ऑगस्ट २०२२ मध्ये आला होता. आयडीएफसी फ्लेक्झीकॅप फंड संपती निर्मितीत सिद्ध तर मिडकॅप फंड अजून बाल्यावस्थेत असलेला फंड आहे. जोखीमांकानुसार फंड निवड केली तर निर्णय चुकला असे वाटणार नाही.

-सचिन रेळेकर
निधी व्यवस्थापक, आयडीएफसी म्युच्युअल फंड

तुमच्या मते पुढील वर्षी बाजारांचे वर्तन कसे असेल?

जागतिक आणि भारतीय बाजारांचा विचार केल्यास वर्ष २०२२ मध्ये जिन्नसांच्या (कमोडीटी) किंमती उच्चांकी पातळीवरून घसरू लागलेल्या आहेत. भारतीय कंपन्या या जिन्नसांच्या वापरकरत्या असल्याने जिन्नसांच्या किंमतीतील जागतिक घसरणीचा फायदा भारतीय कंपन्यांच्या नफ्यात प्रतिबिंबित होऊन नफ्यात वाढ होण्याची शक्यता आहे. आम्ही बँकिंग क्षेत्रा बाबत आशावादी आहोत. बँका आणि वित्त पुरवठा कंपन्यांचे ताळेबंद सुदृढ स्थितीत असल्याचे दिसते. मागील वर्षात कर्जांच्या मागणीत अभूतपूर्व वाढ झाल्याचे दिसून आले. आगामी वर्षातसुद्धा बँकांच्या कर्ज वितरणात वाढ संभवते. मागील वर्षात व्याजदर वाढीचा फायदा बँकांना उत्सर्जनात वाढ मिळवून देईल. पुढील वर्ष समभाग म्युच्युअल गुंतवणूकदारांना समाधानकारक असेल असा अंदाज आहे.
तुम्ही एचडीएफसी मल्टीकॅप आणि एचडीएफसी डिव्हिडंट यिल्ड हे दोन फंड व्यवस्थापित करता. या फंडांपैकी कोणता फंड अधिक परतावा देईल असे वाटते?
फंडाची निवड भविष्यातील अपेक्षित परताव्यावर न ठेवता गुंतवणूकदाराच्या जोखीमंकावर (रिस्क प्रोफाईल) ठरायला हवी. या दोन फंडांपैकी एचडीएफसी मल्टीकॅप फंड हा तुलनेने अधिक अस्थिर फंड आहे. जो साधारण वय वर्षे ३५ ते ४५ दरम्यानच्या गुंतवणूकदारांना साजेसा फंड आहे. तर एचडीएफसी डिव्हिडंट यिल्ड हा फंड कमी अस्थिर असल्याने साधारण वय वर्षे ५५ पुढील गुंतवणूकदारांना साजेसा आहे. तुमचा जोखीमांक समतोल असेल तर एचडीएफसी डिव्हिडंट यिल्ड आणि जोखीमांक थोडासा आक्रमक असेल तर एचडीएफसी मल्टीकॅपची निवड करणे योग्य ठरेल. दोन्ही फंड परताव्याच्या तालिकेत अव्वल कामगिरी करीत असल्याने जोखीमांकानुसार फंड निवड केली तर निर्णय चुकला असे वाटणार नाही.

गोपाल अग्रवाल
निधी व्यवस्थापक, एचडीएफसी म्युच्युअल फंड

पुढील कॅलेंडर वर्षात व्याजदरा बाबत तुमचा काय अंदाज आहे?

जागतिक स्तरावर सर्वच देशांच्या मध्यवर्ती बँका चलनवाढ रोखण्यासाठी व्याजदर वाढवत आहेत. प्रगत अर्थव्यवस्थांमध्ये चलनवाढ अनेक दशकांच्या उच्चांकी पातळीवर आहे. अर्थव्यवस्थांशी समंधीतांचे अलीकडील भाष्य आणि त्यांनी अर्थव्यवस्थे बाबत केलेले अंदाज असे सूचित करतात की व्याजदर वाढविण्यावाचून अन्य पर्याय उपलब्ध नाहीत. भविष्यात व्याज दर वाढीची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. भारताबद्दल बोलायचे तर रिझर्व्ह बँक व्याज दर वाढीच्या शेवटच्या टप्यात आहे असा आमचा अंदाज आहे. कॅलेंडर वर्ष २०२२ मध्ये रेपो दरात २.२५ टक्क्यांची वाढ झाल्याने रेपोदर ६.२५ टक्क्यांवर पोहचले आहेत. फेब्रुवारीत आणखी एक वाढ अपेक्षित असून रेपोदर ६.५० टक्क्यावर स्थिरावतील अशी अपेक्षा आहे. त्यानंतर, व्याजदर हळू हळू कमी होण्यास सुरवात होईल अशी आशा आहे. कॅलेंडर वर्ष २०२३ मध्ये पहिल्या तिमाहीत एखादी व्याजदर वाढ सोडल्यास तुलनेने व्याज दर स्थिर रहातील कॅलेंडर वर्ष २०२४ मध्ये व्याजदरात कपात संभवते.
चढ्या व्याज दराचा फायदा घेण्यासाठी (लॉक करण्यासाठी) ही योग्य वेळ आहे का?
भारतीय रोखे बाजार या वर्षी प्रगत अर्थव्यवस्थांइतके वाईट राहिले नाहीत. अपेक्षित सर्वोच्च पातळीपासून सध्याचे व्याजदर फार दूर नसल्याने, भारतीय रोख्यांसाठी सर्वात कठीण काळ संपला असे वाटते. गुंतवणूकदारांनी कालावधी-आधारित रणनीतींचा वापर करणाऱ्या (‘ड्युरेशन’ फंडात) गुंतवणूक केल्यास चांगला लाभ मिळू शकतो.

रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंड गटापैकी कोणत्या गटात गुंतवणूक केल्यास पुढील वर्षात जास्त परतावा मिळेल?

आम्हाला वाटते की डायनॅमिक बॉंड फंड हा एक ‘ड्युरेशन’ फंड आहे. मागील १० वर्षाच्या इतिहासात डोकावून पाहिल्यास असे दिसते कि जेव्हा जेव्हा भारतीय रोखे बाजार कठीण काळातून गेले जसे कि एप्रिल २०१३ ते मार्च २०१४ (तेलाच्या किंमतीतील वाढ) आणि एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ (आयएल अँण्ड एफएस) त्या नंतर या फंड गटातील फंडांनी मानदंड सापेक्ष (क्रिसिल डायनॅमिक डेट एआयआय इंडेक्स रिटर्न) १.५ टक्के अधिक परतावा दिला. सक्रीय व्यवस्थापित फंड नेहमीच ३ वर्षाच्या कालावधीत चांगला परतावा देतात. म्हणून निष्क्रिय व्यवस्थापित फंडांच्या तुलनेत ड्यूरेशन कॉल घेणारे फंड अधिक परतावा देतील.

विक्रांत मेहता
रोखे गुंतवणूक प्रमुख

तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:

Scroll to Top