नभि नक्षत्रे बहुत एक परि प्यारा

 

मागील आठवड्यात कोटक महिंद्रा बँकेने भांडवली मूल्यात देशाच्या सर्वाधिक शाखा असलेल्या स्टेट बँकेला मागे टाकले. बँकिंग क्षेत्रात कोटक बँक ही एचडीएफसी बँकेनंतर दुसऱ्या क्रमांकाचे भांडवली मूल्य असलेली बँक ठरली आहे. चार पाच वर्षापूर्वी बँकिंग उद्योगात मिडकॅप समजला जाणाऱ्या कोटक महिंद्रा बँकेसारख्या भांडवली मूल्यात वाढ अनेक दर्जेदार मिडकॅप समभागांची झाली आहे. मागील पाच वर्षात मिडकॅप फंडाची कामगिरी लार्जकॅप किंवा डायव्हर्सीफाइड फंडांतील गुंतवणुकीवरील परतावा मिडकॅप फंडातील गुंतवणुकीवरील परताव्यापेक्षा अधिक आहे. मिडकॅप फंड गटातील ५ वर्षाच्या गुंतवणुकीचा विचार केल्यास केवळ ४२ टक्के मिडकॅप फंडांनी आपआपल्या संदर्भ निर्देशांकांपेक्षा सरस कामगिरी केली आहे. पाच वर्षाच्या चलत सरसरीच्या आकडेवारीत ९८ टक्केवेळा एल अँड टी मिडकॅप फंडाने संदर्भ निर्देशांकापेक्षा सरस कामगिरी केली आहे. ‘निफ्टी मिडकॅप १०० टीआरआय हा या फंडाचा संदर्भ निर्देशांक आहे. एखाद्या समभागाची निवड गुंतवणुकीसाठी करतांना त्या समभागाचे भांडवलीमूल्य या निर्देशांकातील समभागांच्या किमान आणि कमाल भांडवलीमूल्यांच्या दरम्यान असणे आवश्यक असते.

फंडाचे समभागांच्या गुंतवणुकीसाठी ‘७०:३०’ धोरण आहे. फंडाच्या ७० टक्के गुंतवणुका दीर्घकालीन परंतु गुंतवणूक करतांना उचित भांडवली मूल्य असलेल्या असतांत तर ३० टक्के गुंतवणुका समभागांचे मुल्य गुंतवणूक करतेवेळी त्यांच्याअंतर्निहित किंमतीपेक्षा खूपच कमी असलेल्या असतांत. गुंतवणुकीच्या ७० टक्के भाग असलेल्या कंपन्यांत मुख्यत्वे तीन प्रकारच्या कंपन्यांचा समावेश होतो. पहिल्या प्रकारात, वितरणाचे जाळे असलेल्या ग्राहकाभिमुख कंपन्या, नामामुद्रांकित उत्पादने विशिष्ट उत्पादनाचे पेटंट असलेल्या कंपन्यांचा समावेश होतो उदाहरणार्थ,:बर्जरपेंट्स, थरमॅक्स, काजरीया सीरॅमिक्स, व्होकार्डस इत्यादी. दुसऱ्या प्रकारात, व्यवसाय विस्ताराच्या संधी असलेल्या (पाच वर्षात विक्री दुप्पट , तिप्पट करू शकणाऱ्या) उदारणार्थ (सुंदरम फास्टनर्स, एमआरएफ टीव्हीएस श्रीचक्र टायर्स, क्रिसिल.) तिसऱ्या प्रकारात गुंतवणूक करतेवेळी अत्यंत आकर्षक मुल्यांकन असलेल्या कंपन्या ,यात प्रामुख्याने नव्याने समावेश करण्यात आलेल्या कंपन्या (उदारणार्थ कॅस्ट्रोल इंडिया, सिटीयुनीयन बँक) ३० टक्के गुंतवणूक असलेल्या समभागांच्या गटात  अंतर्निहित किंमतीपेक्षा खूपच कमी बाजारभाव असलेल्या कंपन्यांचा समावेश होतो. या फंडाला गुंतवणुकीसाठी कुठलेही उद्योग क्षेत्र वर्ज्य नाही. अर्थचक्राच्या दिशा बदलानुसार आकर्षक वाटणाऱ्या उद्योग क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश योग्य वेळी गुंतवणुकीत होत असतो. सध्या संदर्भ निर्देशांकापेक्षा सरकारी बँकांतील प्रमाण कमी तर जिन्नस विशेषत: सिमेंट कंपन्यांत अधिक गुंतवणूक केली आहे. व्यवसाय करण्याच्या पद्धतीबाबत तसेच व्यावसायीक धोरणांच्या आदर्श प्रथांचे पालन न करणाऱ्या कंपन्या निधी व्यवस्थापकांनी टाळल्या आहेत. या फंडाचे सौमेंद्रनाथ लाहिरी निधी व्यवस्थापक तर विहंग नायक सहनिधी व्यवस्थापक आहेत.

नव्याने गुंतवणुक करण्यासाठी मिडकॅप आकर्षक नाहीत असे मानणारा गुंतवणूकसल्लागारांचा एक वर्ग आहे. मिडकॅप निर्देशांकाचे मुल्यांकन धडकी भरविणारे असले तरी अनेक निर्देशांकाबाहेरील कंपन्या आकर्षक मुल्यांकानाला उपलब्ध आहेत. नेमक्या या कंपनी हुडकून त्यांचा समावेश गुंतवणुकीत करण्यात एल अँड टी फंड घराण्याचे मुख्य गुंतवणूक अधिकारी (समभाग) सौमेंद्रनाथ लाहिरी हे माहीर आहेत. एल अँड टी फंड घराण्याच्या अपवाद वगळता बहुतेक योजना क्रिसिल रँकिंगमध्ये टॉप क्वारटाइलमध्ये स्थान अबाधित राखून आहेत. हा फंड ३, ५ १० आणि १२ वर्षे कालावधीतील परताव्याच्या निकषावर या फंडाचा समावेश पहिल्या पाचात झालेला आहे. सर्व कालावधीत पहिल्या पाचात असलेला हा एकमेव फंड असल्याने या फंडाची शिफारस करण्याचे कारण आहे. संदर्भ निर्देशांकापेक्षा अधिक परतावा दिलेल्या सर्वच मिडकॅप फंडाची मागील कालावधीतील कामगिरी अपवादात्मक असल्याने मागील परताव्याचा दर पाहून मिडकॅप फंडात गुंतवणूक करण्याचा निर्णय न घेता १० वर्षात मिडकॅप फंड गुंतवणूकदाराच्या पदरात परताव्याचे घसघशीत माप टाकतात हे लक्षात घेऊन आपल्या जोखीमांकानुसार एसआयपीत योग्य त्याप्रमाणात मिडकॅप फंडाचा समावेश करावा.

अधिक माहितीसाठी खालील Form भरा:

[contact-form-7 id=”22″ title=”Contact Me”]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top