वंचितांची मांदियाळी

भांडवली बाजार नियंत्रक सेबीने दिनांक ६ ऑक्टोबर २०१७ रोजी एका परिपत्रकाद्वारे म्युच्युअल फंडांचे प्रमाणीकरण केले. हे परिपत्रक १ एप्रिल २०१८ पासून लागू झाले. अस्तित्वात असलेले म्युच्युअल फंडांच्या गुंतवणूकीच्या परिघाचे प्रमाणीकरण झाले. हे परिपत्रक लागू झाल्याला चार वर्षे पूर्ण झाल्या पश्चात सक्रीय व्यवस्थापित फंडांच्या कामगिरीचा आढावा घेतल्यास अनेक धक्कादायक निष्कर्ष काढता निघतात. ‘एस अॅण्ड पी इंडायसेस व्हर्सेस एक्टीव्हली मॅनेज्ड फंड्स’ हा अहवाल गुंतवणूकदारांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे.

या अहवालातील लार्जकॅप फंडांच्या कामगिरीच्या भागाचा अभ्यास केल्यास धक्कादायक चित्र समोर येते. १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत ३१ पैकी केवळ ५ फंड (२.२२ लाख कोटी पैकी ५२.९० हजार कोटी ) मालमत्ता असलेले फंड मानदंडापेक्षा सरस कामगिरी करू शकले. याचा अर्थ केवळ २३.८३ टक्के मालमत्तेने ‘एस अॅण्ड पी बीएसई १००’ने दिलेल्या परताव्यापेक्षा सरस परतावा दिला आहे. ‘एस अॅण्ड पी बीएसई १००’ निर्देशांकाच्या तुलनेत मागील चार वर्षात आयडीबीआय टॉप १००, कॅनरा रोबेको ब्लूचीप इक्विटी, अॅक्सीस ब्लूचीप, युटीआय मास्टरशेअर आणि आयसीआयसीआय पृडेंशीअल ब्लूचीप हे फंड कामगीरीत सातत्य राखू शकले. सर्वाधिक मालमत्ता असूनही गचाळ कामगिरी करणारे एचडीएफसी टॉप १००, फ्रॅक्लीन टेम्पलटन ब्लूचीप, आणि डीएसपी टॉप १०० हे फंड असून, तळाच्या ५ फंडात इंडिया बुल्स ब्लूचीप आणि टोरस लार्जकॅप इक्विटी या फंडांचा समावेश आहे.

लार्ज-कॅप म्युच्युअल फंडांना त्यांच्या मालमत्तेपैकी किमान ८० टक्के मालमत्ता बाजार भांडवलानुसार शीर्ष १०० कंपन्यांमध्ये गुंतवावी लागते. याचा अर्थ या सर्व फंडांच्या ८० टक्के गुंतवणुकीसाठी गुंतवणुकीचा परीघ एकसमान आहे. या उपलब्ध परिघाचा निधी व्यवस्थापक कसा वापर करतो या वर फंडाची कामगिरी ठरत असते. जर फंडाने ३, ५ ७ वर्षे कालावधीत चांगली कामगिरी केली असेल, तर तो विशेषत: तो फंड नक्कीच कामगिरीत सातत्य राखतो. उदाहरणार्थ, एखाद्या फंडाच्या कामगिरीत गेल्या एक किंवा दोन वर्षांत लक्षणीय सुधारणा झाली असेल. तर या फंडाचा अल्पकालीन परतावा आकर्षक दिसेल. त्यामुळे, फंडाने यापूर्वी चांगली कामगिरी केली नसली तरीही, नजीकच्या कालावधीतील कामगिरीचा प्रभाव दीर्घ कालावधीच्या कामगिरीत दिसून येतो. (उदाहरण युटीआय मास्टर शेअर) एखाद्या फंडाची नजीकच्या कालावधीत कामगिरी खालावली असेल तरीही दीर्घकालीन चांगल्या कामगिरीच्या जोरावर हा फंड कामगिरीच्या यादीत अग्रस्थानी राहू शकतो. (उदाहरण मिरॅ असेट लार्जकॅप) मिरॅ असेट लार्जकॅप हा ३१ हजार कोटी मालमत्तेचे व्यवस्थापन करतो. अलीकडच्या काळात ३ वर्षे आणि ५ वर्षे काळात फंडाची कामगिरी ‘काप गेली भोक राहिली’ अशी झाली आहे. परंतु दहा वर्षे कालावधीचा विचार केल्यास हा फंड अजूनही अग्र्रस्थानी आहे.

विविध कालावधीतील कामगिरी तपासण्याचा ‘क्वारटाइल रँकिंग’ एक चांगला पर्याय उपलब्ध आहे. पत मापन संस्था ‘क्रिसिल’ फंडांच्या दीर्घकालीन कामगिरीचा अभ्यास करून फंडाचे त्रैमासिक ‘क्वारटाइल रँकिंग’ प्रसिद्ध करत असते. प्रत्येक तिमाहीत मागील ३ वर्षाच्या कामगिरीनुसार ‘टॉप क्वारटाइल रँकिंग’ मिळविलेले फंड गुंतवणुकीसाठी निवडावे. व्यापक पर्याय हवा असल्यास ‘टॉप क्वारटाइल रँकिंग’ आणि अपर मिडल क्वारटाइल’ मधील फंडांचा विचार करावा. सर्व साधारणपणे गुणवत्तेत सातत्य राखणारे फंड या दोन गटात असतात. उदाहरणार्थ, पाच वर्षांपूर्वी टॉप क्वारटाइल रँकिंग’ मिळविलेल्या १० फंडांपैकी आज केवळ ५ फंडाच‘टॉप क्वारटाइल रँकिंग’मध्ये आपले स्थान अबाधित राखून आहेत. आर्थिक वर्ष १८ च्या पहिल्या तिमाहीत ‘टॉप क्वारटाइल रँकिंग’मध्ये असलेले एचडीएफसी टॉप १००, फ्रॅक्लीन टेम्पलटन ब्लूचीप, आणि डीएसपी टॉप १०० हे ‘बॉटम क्वारटाइल’मध्ये आहेत. आर्थिक वर्ष १५ च्या पहिल्या तिमाहीत पहिल्यांदा ‘टॉप क्वारटाइल रँकिंग’मध्ये जागा मिळविलेला आणि आजपर्यंत ‘टॉप क्वारटाइल रँकिंग’मध्ये आढळपदी असलेला केवळ कॅनरा रोबेको ब्लूचीप इक्विटी आणि तर आर्थिक वर्ष १७ मध्ये ‘टॉप क्वारटाइल रँकिंग’मध्ये स्थान मिळविलेला अॅक्सीस ब्लूचीप, हे दोन फंड आपले स्थान अबाधित राखून आहेत.

लार्जकॅप फंड गटात मालमत्ता क्रमवारीत अॅक्सीस ब्लूचीप (३५.७० हजार कोटी) एसबीआय ब्लूचीप (३१.९३ हजार कोटी) मिरॅ असेट लार्जकॅप (३१.९२ हजार कोटी) आयसीआयसीआय पृडेंशीअल ब्लूचीप (३१.६८ हजार कोटी) आदित्य बिर्ला सन लाईफ फ्रंट लाईन इक्विटी (२१.६७ हजार कोटी) आघाडीवर असून हे फंडांचा एकूण मालमत्तेत एकत्रित वाटा ६८ टक्के आहे. परंतु या पैकी केवळ अॅक्सीस ब्लूचीप आणि आयसीआयसीआय पृडेंशीअल ब्लूचीप हे ५ वर्षे कालावधीत कामगिरीत सातत्य राखू शकले.

माझी मुलगी नुकतीच सज्ञान झाली. म्युच्युअल फंड केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्याने आजपर्यंत माझ्या छत्रछायेत असलेल्या मुलीला स्वत: एसआयपीसाठी फंड निवडावासा वाटला. तिला देत असलेल्या पॉकेट मनी मधून बाबा कोणत्या लार्जकॅप फंडात एसआयपी सुरु करू असा प्रश्न विचारला तिला सुचविलेले कॅनरा रोबेको ब्लूचीप इक्विटी, अॅक्सीस ब्लूचीप, युटीआय मास्टरशेअर निप्पॉन इंडिया लार्जकॅप आणि आयसीआयसीआय पृडेंशीअल ब्लूचीप हे फंड आहेत. गुंतवणूकदार आयडीबीआय टॉप १००, युनियन लार्जकॅप आणि महिंद्रा मॅन्यूलाईफ लार्जकॅप प्रगती या फंडांचा एसआयपीसाठी विचार करू शकतील.

आर्थिकवर्ष २२ मधील लार्जकॅप फंडांचा आढावा घेतांना “हंस श्वेतः बकः श्वेतः, को भेदः बकहंसयोः । नीरक्षीरविवेके तु हंसो हंसः बको बकः ॥ या संकृत श्लोकाची आठवण झाली. प्रसिद्ध नाममुद्रा आणि मोठी मालमत्ता असलेले फंड परताव्यापासून वंचित राहिलेले दिसतात. हे फंड पुरेशी संपत्ती निर्मिती करू शकतीलच याची खात्री देता येत नाही. आपली गुंतवणूक असलेला फंड परताव्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी आपणच घ्यायला हवी.

तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:

Scroll to Top