नको मनधरणी ‘अर्था’ची…

 

सक्रिय पोर्टफ़ोलिओ व्यवस्थापन असलेल्या सगळ्याच फंडात मागील वर्षभरात नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या गुंतवणुकीचा परतावा नकारात्मक आहे. त्यातही मल्टीकॅप गटातील फंडाचा परतावा त्यांच्या मानदंड असलेल्या निर्देशांकाच्या परताव्यापेक्षा किमान दीड ते तीन टक्के कमी आहे. परंतु एका वर्ष ऐवजी पाच वर्षाच्या परताव्याची तुलना केल्यास फंडाचे मानदंड असलेल्या निर्देशांकाच्या परताव्यापेक्षा चार ते सहा टक्के अधिक आहे. बाजाराच्या मुख्य निर्देशांकापैकी निफ्टी आणि सेन्सेक्स वरखाली होत वर्षभरापूर्वी जिकडे होते त्याच पातळीवर असून देखील मल्टीकॅप फंड परिघातील उपलब्ध तीन पैकी एका फंडाने नकारात्मक परतावा दिलेला आहे.

दीर्घकालीन परताव्याचा विचार केल्यास आयडीएफसी मल्टीकॅप फंडाची कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. या फंडाला खऱ्या अर्थाने बहार आला तो सप्टेंबर २०१० नंतर म्हणजे फंडाने चार वर्ष पूर्ण केल्या नंतरच. या फंडाला नेत्रदीपक कामगिरी पर्यंत नेणारे निधी व्यवस्थापक केनेथ अॅड्र्यू हे जून २००६ ते सप्टेंबर २०१५ पर्यंत या फंडाचे निधी व्यवस्थापक होते. मार्च २०१६ पासून आयडीएफसी मल्टीकॅप फंडाच्या निधी व्यवस्थापनाची धुरा अनुप भास्कर सांभाळत आहेत. अनुप भास्कर हे मिड अॅड स्मॉलकॅप फंडातील यशस्वी निधी व्यवस्थापक आहेत. फंडातील गुंतवणूक केवळ नियोजनबद्ध पद्धतीने (एसआयपी) कधीकाळी स्वीकारणारा हा मुच्युअल फंड विश्वातील एकमेव फंड होता. निधी व्यवस्थापक बदलल्याने अनेक गुंतवणूकदारांनी आपणहून किंवा सल्लागारांच्या सांगण्यावरून सुरु असलेली आणि समाधानकारक परतावा देणारी एसआयपी बंद केली.

फंड घराण्याने निधी व्यवस्थापनाची धुरा अनुप भास्कर यांच्याकडे दिल्यावर फंडाच्या गुंतवणूक धोरणांत बदल झाले. हा फंड खऱ्या अर्थाने मल्टीकॅप प्रकारचा झाला आहे. अनुप भास्कर यांच्या कारकिर्दीत या फंडाचे संक्रमण मिडकॅप घाटणीच्या फंडाकडून मल्टीकॅप फंडाकडे झाले. फंडाच्या विद्यमान गुंतवणुकीत ४५.८४ टक्के लार्जकॅप, ३९.१७ टक्के मिडकॅप १२.०९ टक्के स्मॉलकॅप व २.९ टक्के रोकड आभासी गुंतवणुका आहेत. हा फंड एकूण मालमत्तेपैकी ७५ टक्के मालमत्ता उपभोग्य वस्तू तसेच या वस्तूंसाठी वित्त पुरवठा करणाऱ्या कंपन्या  व २५ टक्के मालमत्ता धोरणात्मक बाबींशी निगडीत प्रकारात गुंतविली जाते. फंडाचे सहनिधी व्यवस्थापक म्हणून कार्तिक मेहता यांची एप्रिल २०१८ पासून नेमणूक झाली आहे. अनुप भास्कर यांनी गुंतवणुकीत केलेल्या बदलाचे परिणाम दिसू लागले आहेत. दीर्घकाळापासून सुरु असलेल्या नियोजनबद्ध पद्धतीने गुंतवणूकीवरील नफ्याच्या टक्केवारीत सुधारणा होऊ लागलेली दिसत आहे.

विद्यमान निधी व्यवस्थापकांनी फंडाच्या गुंतवणुकीत केलेल्या बदलांचे झालेले परिणाम दिसण्यास दीड दोन वर्षाचा कालावधी जावा लागतो. सक्रिय पोर्टफ़ोलिओ व्यवस्थापन असलेल्या फंडांपैकी ज्या निवडक फंडांनी आपल्या मानदंड असलेल्यानिर्देशांकाच्या परताव्यापेक्षा तीन आणि पाच वर्षे कालावधीत अधिक नफा गुंतवणूकदारांना दिला आहे. मल्टीकॅप फंडाचा ‘अल्फा’ (मानदंड  निर्देशांकापेक्षा अधिक परतावा) लार्जकॅप फंडापेक्षा अधिक असेल. सोबतच्या दिलेल्या कोष्टकात दीर्घकालीननियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या गुंतवणूकीवरील नफ्याची टक्केवारी वाढत्या कालावधीप्रमाणे वाढत असल्याचे दिसून येते.  पुढील तीन चार वर्षाचा विचार केल्यास अनुप भास्कर आणि कार्तिक मेहता या निधी व्यवस्थापकांनी बदललेल्या रणनीतीमुळे आयडीएफसी मल्टीकॅप फंड हा मानदंड निर्देशांकापेक्षा उजवी कामगिरी असलेल्या फंडापैकी अग्रक्रमावर असलेला एक फंड असेल या बद्दल खात्री बाळगावी अशी परिस्थिती आहे. फंडाच्या मालमत्ते पैकी मोठा हिस्सा नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या गुंतवणुकीतून उभा राहिला आहे. दीर्घकालीन नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या गुंतवणूकीवरील समाधानकारक परतावा असलेला हा फंड सध्या एक रक्कमी गुंतवणुकीसाठी खुला आहे. या फंडात आपल्या वित्तीय ध्येयाशी सुसंगत गुंतवणूक केल्यास एका अर्थी ‘नको मनधरणी ‘अर्था’ची’ असे म्हणण्याची गुंतवणूकदारांवर वेळ येणार नाही.

अधिक माहितीसाठी खालील Form भरा:

[contact-form-7 id=”22″ title=”Contact Me”]

 

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top