सण दिवाळीचा… दिवस धनत्रयोदशीचा

 

जानेवारीपासून लार्जकॅप निर्देशांकाच्या तुलनेत मिडकॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकात अधिक घसरण झाली. सध्याचे मिडकॅप मुल्यांकन नव्याने गुंतवणुकीचा विचार करण्याच्या पातळीवर आले आहे. ‘लोकसत्ता कर्ते म्युच्युअल फंडाच्या सुधारित यादीत’ नव्याने समाविष्ट झालेल्या एचडीएफसी  मिडकॅप ऑपोरच्युनीटी फंडाची ही ओळख. वटवृक्षाच्या छायेत अन्य झाडे रुजत नाहीत. प्रशांत जैन नावाच्या कर्तृत्वसंपन्न व्यक्तीमत्वाच्या छायेत असल्याने फंडाची लखलखित कामगिरी असून देखील चिराग सेटलवाड हे फारच कमी म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना माहित आहेत. एचडीएफसी फंड घराणे देखील चिराग सेटलवाड यांचे एचडीएफसी मिडकॅप ऑपोरच्युनीटी आणि एचडीएफसी स्मॉलकॅप फंडांची फारशी जाहिरात करत असल्याचे दिसत नाही. म्युच्युअल फंडांशी समंधीत वेगवेगळ्या मंचावर किंवा दूरदर्शनच्या वाहिन्यांवर एचडीएफसी फंड घराण्यांचे प्रतिनिधित्व प्रशांत जैन करीत असतात. चिराग सेटलवाड हे मिडकॅप गुंतवणुकीतील कसबी निधी व्यवस्थापक म्हणून जाणत्या गुंतवणूकदारांत ओळखले जातांत. एचडीएफसी  मिडकॅप ऑपोरच्युनीटी फंडाची पहिली एनएव्ही १५ जून २००७ रोजी जाहीर झाली. या फंडात सुरवाती पासून दरमहा १००० रुपयांच्या नियोजनबद्ध गुंतवणूकीच्या १.३७ लाखाचे १ नोव्हेंबरच्या रेग्युलर ग्रोथ एनएव्ही नुसार ४.१५ लाख झाले आहेत.

निधी व्यवस्थापक म्हणून समभाग निवडण्यात चिराग सेटलवाड हे अत्यंत चोखंदळ आहेत. समभाग निवडीसाठी निधी व्यवस्थापकांचा भर प्रामुख्याने समभाग संशोधन, कंपनीचा ताळेबंद, व्यवसाय वृद्धीची आणि उत्सर्जनाची शाश्वतता या वर आहे. एखाद्या कंपनीत गुंतवणूक करून दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करण्यावर निधी व्यवस्थापनाचा भर आहे. सुंदरम् फास्टनर्स बालकृष्ण इंडस्ट्रीज या आघाडीच्या गुंतवणुका निधी व्यवस्थापकांच्या दूर दृष्टीची  प्रचिती देतात. ‘ग्रोथ अॅट रिझनेबल व्हॅल्यू’ हे फंडाच्या यशाचे सूत्र आहे. मिडकॅप फंड असल्याने मानदंड निर्देशंकाहून वेगळ्या प्रकारे गुंतवणूक करण्याचे धारिष्ट्य निधी व्यवस्थापकांनी दाखविल्याचे दिसून येते. रिलायंस निप्पोन लाईफ इन्शुरन्स सारख्या आपल्या नजीकचा स्पर्धक असलेल्या म्युच्युअल फंडाला गुंतवणुकीत स्थान देण्याचा उमदेपणा निधी व्यवस्थापकांनी दाखविला आहे. एचडीएफसी फंड घराण्याला असलेले सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे आकर्षण या फंडाच्या गुंतवणुकीत सुद्धा दिसून येते. युनियन बँक आणि पंजाब नॅशनल बँक मागील दहा वर्षांपासून या फंडाच्या गुंतवणुकीत आहेत. मागील वर्षभरातील बालकृष्ण इंडस्ट्रीज आणि अरविंद लिमिटेड अपोलो टायर्स सारख्या गुंतवणुकांनी आपली कामगिरी चोख बजावली आहे.  फंडाचा मानदंड निर्देशांक ‘निफ्टी मिडकॅप  १०० टीइआर’ आहे. सेबीच्या फंड प्रमाणिकरणा नंतर फंडाच्या गुंतवणुकीत लार्जकॅपचे प्रमाण कमी होऊन मिडकॅप गुंतवणुकीच्या प्रमाणांत वाढ झाली आहे. फंडाने दिलेल्या परताव्याची चलत सरासरी पराताव्यातील सातत्य आणि मिडकॅप गटातील अन्य फंडाच्या तुलनेतील कामगिरीचा अंदाज बांधता येतो. फंडाच्या ३,५  आणि ७ वर्षाची चलत सरासरी वरून फंडाची कामगिरी अन्य मिडकॅप फंडांपेक्षा उजवी असल्याचे दिसून येते. फंडाची पाच वर्षाची सर्वाधिक चांगली कामगिरी फंडाने १० मार्च २००९ ते ९ मार्च २०१४ या कालावधीत केली आहे. या कालावधीत फंडाने ३५ टक्के वार्षिक परतावा दिला आहे. तर ७ जनेवारी २००८ ते ६ जनेवारी २०१३ या कालावधीत सर्वात सुमार कामगिरीची नोंद केली या कालावधीत फंडाने केवळ ७.१४ % वार्षिक परतावा दिला. चिराग सेटलवाड यांच्या निधी व्यवस्थापनाच्या कालावधीत २५ जून २००७ रोजी केलेल्या १ लाखाच्या गुंतवणुकीचे लाखाचे १ नोव्हेंबरच्या रेग्युलर ग्रोथ एनएव्ही नुसार ५.१५ लाख झाले आहेत. या कालावधीत फंडाने १५.२२ टक्के वार्षिक परतावा दिला आहे. याचा दुसरा अर्थ असा की दर ४.५ वर्षात फंडात गुंतविलेली रक्कम दुप्पट झाली आहे.

वेगवेगळ्या निकषांच्या आधारावर या फंडाचा समावेश नव्याने तयार केलेल्या ‘लोकसत्ता कर्ते म्युच्युअल फंडाच्या सुधारित यादीत’ केला आहे. या फंडाची निवड करण्यामागे फंडाने परताव्यात राखलेले सातत्य आणि जोखीम परतावा गुणोत्तर (शार्प रेशो) ही समावेशाची महत्वाची कारणे आहेत. मिडकॅप गुंतवणूकीत समभाग गुंतवणुकीतील सर्वाधिक जोखीम असते. परंतु कमी कालवधीत गुंतवणूक दुप्पट करण्याची क्षमता मिडकॅप फंडातच असते.  योग्य फंड निवड करून मिडकॅप गुंतवणुकीतील जोखमीची तीव्रता कमी करता येते. मिडकॅप फंडाची एकूण गुंतवणुकीत मात्रा किती असावी हे गुंतवणूकदाराच्या जोखीमांकावर ठरते. मात्रा कितीही असली तरी कामगिरीच्या बळावर या फंडाचा नवीन गुंतवणुकीसाठी प्राधान्याने विचार करावयाचा आहे.

अधिक माहितीसाठी खालील Form भरा:

[contact-form-7 id=”22″ title=”Contact Me”]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top