घरोघरी तिरंगा घरोघरी एसआयपी

Indipendence day har ghar tiranga
आज भारतात स्वातंत्र्याचा अमृतमोहोत्सव साजरा करीत आहोत. एकोणीसाव्या शतकात आता स्वराज्य आले आहे, पण आपले आर्थिक स्वातंत्र्य टिकवायचे असेल तर आर्थसाक्षर होणे गरजेचे आहे. राजकीय सुधारणा आधी की, सामाजिक सुधारणा आधी हा वाद एकोणीसाव्या शतकात गाजला होता. आजही या वादाकडे पाहणे आवश्यक आहे. एक असा की ब्रिटिश सत्तेमुळे देशाचे वाटोळे झाले आहे. त्यांना आधी बाहेर काढले पाहिजे असा टिळक अनुयायांचे म्हणणे होते तर आपल्याच समाजातील जातीभेद आणि कुप्रथांमुळे देशाला ही स्थिती प्राप्त झाली आहे. ब्रिटिशांच्या मदतीने त्या कुप्रथांचे उच्चाटन करून एकसंध समाज निर्माण करणे आवश्यक आहे असे गोपाळराव आगरकर यांच्या अनुयायांचे म्हणणे होते. आजच्या दिवशी राजकीय सुधारणा आधी की आर्थिक सुधारणा आधी याचा विचार होणे आवश्यक आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सामाजिक कुप्रथा होत्या तशा आज आर्थिक कुप्रथांचे उच्चटन होणे आवश्यक आहे.
भारतातील व्यापारी आणि व्यावसायिकांचा एक मोठा वर्ग करपात्र उत्पन्न पाच साडेपाच लाख दरम्यान असल्याचे दाखवतो. कर चोरी करण्याच्या उद्देशाने जाणूनबुजून उत्पन्न कमी दाखवणे किंवा खर्च वाढवणे यासारख्या युक्त्याकरून कर दायित्व कमी करण्याचा मार्ग आहे. कराचा बोजा कमी करण्याचा हा बेकायदेशीर प्रयत्न आहे. कराचा बोजा टाळण्यासाठी कमी नफा दाखवण्याच्या उद्देशाने कर चोरी केली जाते. यात संबंधित कागदपत्रे लपवणे, व्यवहारांचे लेखे न ठेवणे, उत्पन्न लपवणे, नसलेल्या कर परताव्याचा (क्रेडिटचा) वापर करणे किंवा वैयक्तिक खर्च व्यवसायीक खर्च म्हणून सादर करणे यासारख्या बेकायदेशीर पद्धतींचा समावेश आहे. उत्पादनाच्या अनिश्चिततेमुळे कृषीउत्पन्न कर मुक्त केले आहे. परंतु बहुतेक श्रीमंत जमीन मालक कृषी उत्पादन विकून लाखो कमावतात परंतु कर देत नाहीत. व्यापारी देखील हे करतात, ते सर्व शेतजमिनीचा एक छोटा तुकडा घेतात, ते त्यांच्या जमिनीवर लहान पिके घेतात किंवा काहीही करत नाहीत परंतु कर भरताना ते त्यांची कमाई कृषी उत्पन्न म्हणून घोषित करण्यात येते.
भारत हा एकमेव देश असू शकतो जिथे प्रत्येक वस्तूवर कर आकारला जातो. जीवनावश्यक अन्नधान्यापासून ते विलासी जीवनशैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या घरगुती वापराच्या उपकरणा पर्यंत प्रत्येक वस्तूंवर करा आकारणी होते. ज्यांचे उत्पन्न आयकराच्या कक्षेत येत नाही ते सुद्धा वर्ष भरात किमान पन्नास हजाराचा कर सरकारला देतात. एक लिटर इंधनावर ६० रुपयांपेक्षा जास्त कर सरकार वसूल करते. कराच्या अतिरेकामुळे सामान्य माणसाचा कल करचोरीकडे आहे. कर चोरीपेक्षा योग्य कर नियोजन करायला हवे. हे सुद्धा अर्थ निरक्षरतेचे लक्षण आहे.
शालेय अभ्यासक्रमात संपत्ती निर्मितीचे महत्व बिंबवले जात नाही. वेगवेळ्या गुंतवणूक साधनांचा वापर करून विविध माध्यमातून संपत्ती निर्माण करायला हवी हे शालेय अभ्यासक्रमातून शिकवायला हवे. आर्थिक उत्पादनांमध्ये दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करता तेव्हा तुमचा परतावा परताव्याची हमी देणाऱ्या परताव्यापेक्षा अधिक असतो. जो तुम्हाला तुमचे स्वप्नातील घर, तुमच्या मुलाचे शिक्षण आणि अनेक दीर्घमुदतीनंतर साध्य करायची तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आवश्यक ठरतो. यासाठी संपत्ती निर्माण करण्याचे महत्त्व शालेय वयात बिंबवणे आवश्यक आहे. संपत्ती निर्मितीत खात्रीशीर परताव्याच्या लोभाने रोकड सुलभतेकडे दुर्लक्ष करणे हे सुद्धा अर्थनिराक्षरतेचे लक्षण आहे. आपल्या पाच वर्षे किंवा त्यापुढील आर्थिक उद्दिष्टांसाठी बचत करूत असतांना एसआयपी सारख्या सुलभ साधनांचा वापर करून बाजार जोखीमेशी मैत्री करायला शिकणे हे अर्थसाक्षर होण्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल असेल. एसआयपीच्या फायद्यांचा लोकसत्ता वाचकांसाठी नव्याने आढावा घेण्याची आवश्यकता नाही. एसआयपीच्या माध्यमातून संपत्ती निर्मिती करणे हे आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने टाकलेले पाउल आहे. म्हणूनच घरोघरी तिरंग्या सोबत एसआयपीची पताका फडकवायला हवी.अस्थिर परतावा असलेल्या कोणत्याही गुंतवणूक साधनांचा वापर टाळण्याकडे बहुसंख्य गुंतवणूकदारांचा कल असतो. बाजार जोखमीशी निगडीत परताव्याचा दर हा खात्रीशीर परताव्यापेक्षा अधिक असतो. हे माहित नसणे हे सुद्धा मोठ्या प्रमाणावर अर्थनिरक्षरतेचे द्योतक आहे.
भारत अर्थसाक्षरतेच्या यादीत तळाला आहे. जगाच्या लोकसंख्येचा २१ टक्के हिस्सा असलेला भारत आर्थसाक्षरतेच्या क्रमवारीत ७१ व्या क्रमांकावर आहे. वर्तमान शिक्षण पद्धतीत आर्थसाक्षरता विषयाचा समावेश करणे अत्यावश्यक आहे. महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमात मुलभूत अर्थसाक्षरता अभ्यासक्रमाचा समावेश मागील वर्षी झाला. समष्टी अर्थशास्त्रीय बदलाच्या संबंधांचा अभ्यास करण्यासाठी सरकारकडे तज्ञ विश्लेषक असतात. आजही भारतात चढे व्याजदर चांगले असा मानणारा एक वर्ग आहे. सरकार व्याजदर कमी करून सामान्यांच्या बचतीवर मिळणाऱ्या उत्पन्नात कपात करीत आहे. हे अन्यायकारक आहे असे या बचत कर्त्यांचे मानणे आहे. परंतु चढ्या व्याजदरामुळे अंतरराष्ट्रीय बाजार पेठेत भारतीय उत्पादने स्पर्धेत मागे पडतात या कडे हा वर्ग सोयीस्कर दुर्लक्ष करतो. व्याजदर हे जागतिक बदलांशी निगडीत असतात. भारतीय चलनाचे मूल्य हे मागणी पुरवठ्यासोबत स्थानिक महागाई आणि अर्थव्यवस्थेतील व्याजदरावर ठरत असते हे समजवून घ्यायला अर्थसाक्षर होणे आवश्यक आहे. अशी अर्थ निरक्षर कुटुंब व्याजदर कपातीला संकट आणि चढ्या व्याजदरांना संधी समजत असतात. आज भारतात अशी कुटुंबे आहेत जी अभिमानाने “मी फक्त मुदत ठेविंमध्ये माझ्या बचतीची गुंतवणूक करतो.” अशा लोकांनी अर्थ साक्षर होणे आवश्यक आहे.
Har ghar tiranga image

तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:

Scroll to Top