बालदिनाच्या निमिताने

महागाई म्हटल्यावर तुमच्या मनात सर्वप्रथम कोणती गोष्ट येत असेल तर इंधन फळे, भाज्यांचे भाव वैगरे. लिंबू, टोमॅटो आणि कांदा बटाट्याच्या किमतीपलीकडे महागाईची चर्चा होत असताना देशात नाही. अशी काही क्षेत्रे आहेत जिथे काळानुरूप महागाई सातत्याने वाढत आहे. आरोग्य विषयक महागाई आणि शैक्षणिक महागाईचा दर सर्वात अधिक आहे. शिक्षणाचा खर्च हे असेच एक क्षेत्र आहे ज्यावर सततच्या किमतीत वाढ झाली आहे. आणि, दुर्दैवी वास्तव हे आहे की लिंबू आणि इतर खाद्यपदार्थांप्रमाणे, शिक्षणाच्या वाढत्या खर्चाबद्दल कोणीही बोलत नाही.शैक्षणिक महागाई तुमच्या पाल्याच्या भविष्याला हानी पोहचवू शकते. केंद्र सरकारकडून जाहीर होणाऱ्या महागाईच्या अधिकृत आकड्यांपेक्षा पालकांच्या शैक्षणिक खर्चात मोठी वाढ होत असल्याचा अनुभव अनेकांना या वर्षी आला असेल. मागील दोन वर्षे शैक्षणिक शुल्कात वाढ न करता आलेल्या अनेक खाजगी शैक्षणिक संस्थांनी अनेक छुपी दरवाढ केली. शैक्षणिक शुल्काव्यतिरिक्त अनेक शुल्के जी अंदाजीत शैक्षणिक शुल्कापेक्षा कितीतरी अधिक असल्याने मूळ शुल्कापेक्षा अधिक रक्कम पालकांना खर्च करावी लागली.
तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी बचत आणि नियोजन करणे हे अनेक पालकांसाठ सहज साध्य राहिलेले नाही. वित्तीय जबाबदारी आणि पैशाची बचत त्याच्या जोडीला गुंतवणूक करण्यासाठी वित्तीय साधन चातुरपणे निवडणे गरजेचे आहे. आजच्या बालदिनाच्या निमित्ताने मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक नियोजन करण्याची गरज आणि म्युच्युअल फंड हे मुलांच्या शिक्षणासाठी लागणारा निधी उभा करण्यासाठी उत्तम वित्तीय साधन आहे ते जाणून घेऊ. जसे म्हणतात कि तुमचे निवृत्ती नियोजन तुमच्या पहिल्या पगारापासून करायला हवे. तसेच मुलांच्या शैक्षणिक खर्चाची तरतूद करायला बाळाची चाहूल लागल्यालागल्या करायला हवी. तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी नियोजन करण्यासाठी पुरेसा वेळ आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, समभाग सलग्न फंडाचा विचार करावा. तुम्हाला तुमच्या मुलाची स्वप्ने सत्यात उतरवायची असतील तर सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यांच्या शिक्षणासाठी लवकरात लवकर बचतीस सुरवात करणे. कदाचित तुम्हाला ही अतिशोयोक्ती वाटत असेल परंतु एक वित्तीय नियोजक म्हणून असा अनुभव येतो की पालकांना शिक्षणासाठी किती खर्च येणार याची कल्पना नसते.
विद्याशाखासध्याचा खर्च३ वर्षांनतर येणारा खर्च५ वर्षांनतर येणारा खर्च७ वर्षांनतर येणारा खर्च
वाणिज्य१.००१.३३१.६२१.९४
आयआयटी१०.००१३.००१६.००१९.५०
अभियांत्रिकी७.००९.००११.००१२.८८
व्यवस्थापन८.००१०.६४१२.८८ १५.५८
बी. एससी (आयटी)१.५०२.००२.४१३.००
लवकरात लवकर वित्तीय ध्येयाचा मागोवा घेतल्यास कमी गुंतवणुकीवर मोठा निधी जमविता येतो. सध्या परदेशात पदव्युत्तर शिक्षण घेणे ही एक जीवन शैली झाली आहे. परवडत असो अथवा नसो अनेक मुलांची परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असते आणि पालक या इच्छेपुढे मान तुकवितात. लवकर गुंतवणुकीचे महत्त्व समजून घेण्यासाठी, आपण दोन परिस्थितींचा विचार करू या. पहिल्या परिस्थितीमध्ये, तुमचे मुल तीन वर्षांचे असताना तुम्ही गुंतवणूक करता आणि दुसऱ्या स्थितीत ती दहा वर्षांची असताना तुम्ही गुंतवणूकीला सुरवात करता. आपण असे गृहीत धरले की तिला वयाच्या २३ व्या वर्षी पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी ३ टक्के चलनवाढीचा दर आणि चलन अवमुल्यनाचा दर ५ टक्के लक्षात घेता, तुम्हाला रु. २.४१ कोटी जमविण्यासाठी तुमच्याकडे अनुक्रमे २० वर्षे आणि १३ वर्षे उपलब्ध आहेत. कोणत्याही विशिष्ठ फंडाचा विचार न करता १० टक्के वृद्धीदर पकडल्यास ही रक्कम जमविण्यासाठी अनुक्रमे ७५ हजार आणि ३१ हजार गुंतविणे आवश्यक आहे. ती तीन वर्षांची असताना तुम्हाला मासिक एसआयपी सुमारे ३१ हजाराची करून भागणार आहे कारण चक्रवाढीची परिणाम आहे. म्हणूनच तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक कराल तितके चांगले. परदेशात शिक्षणाचा खर्च भारतातील शिक्षणापेक्षा जास्त असतो, विद्यापीठ, स्थान आणि शैक्षणिक सत्राचा कालावधी यासारख्या घटकांवर अवलंबून असल्याने खर्च कमी अधिक होऊ शकतो. सध्या अमेरिकेत दोन वर्षांचे पदव्युत्तर शिक्षण घेण्यास ६० लाख ते १ कोटी पर्यंत खर्च येतो. या कारणास्तव, आपल्या बजेटला अनुरूप अशी विद्यापीठे निवडणे महत्त्वाचे आहे. वित्ताकडे पाहण्याचा दुसरा मार्ग म्हणजे खर्चाच्या दृष्टिकोनातून नाही तर गुंतवणूकीच्या दृष्टिकोनातून दीर्घकालीन परतावा. जर तुम्ही तुमचे मुलांच्या शैक्षणिक ध्येयासाठी आर्थिक नियोजन व्यवस्थित केले असेल तर तर तुम्हाला शैक्षणिक खर्चाचा बोजा वाटणार नाही. इतकी बचत करायची तर अनावश्यक खर्च टाळायला हवा. याव्यतिरिक्त, परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्धवेळ किंवा तासिका स्तरावर पूरक उत्पन्न म्हणून विद्यापीठाच्या आवारात नोकऱ्या, अध्यापन सहाय्य, संशोधन सहाय्य किंवा इतर अर्थार्जनाची सोय उपलब्ध असते. अर्धवेळ काम करून, पूर्ण वेळ शिक्षण घेण्याची सुविधा अमेरिकेत उपलब्ध आहे. तुम्हाला कामाचा मौल्यवान अनुभव देखील मिळतो. तुमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, बहुतांश प्रकरणांमध्ये, विद्यार्थी त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर पहिल्या एक दोन वर्षात शैक्षणिक कर्ज फेडू शकतात.
दर्जेदार खाजगी शिक्षणाचा खर्च पूर्वीपेक्षा खूपच जास्त आहे. महागाईसह अनेक घटकांमुळे शैक्षणिक खर्चात दिवसेंदिवस वाढ होत आहे. ज्या पालकांना आपल्या मुलांसाठी चांगल्या शिक्षणाची हमी द्यायची आहे त्यांना पूर्वीपेक्षा जास्त खर्च करावा लागणार आहे. यामुळे कुटुंबांच्या मर्यादित संसाधनांवर मोठा आर्थिक ताण येतांना दिसत आहे. मुलांच्या शिक्षणासाठी सुरुवातीपासूनच गुंतवणूक केल्याने उच्च शिक्षणाच्या उंबरठ्यावर असतांना खरोखर पैशांची गरज लागेल तेव्हा ‘आता कुठून पैसे उभे करू अशी चिंता निर्माण होणार नाही. शेवटी ती बचत आहे. शैक्षणिक ध्येयाने गुंतवणूक केली आणि पाल्याने परदेशात शिक्षण घेतले नाही तरी ती रक्कम त्याला एखादा व्यवसाय सुरु करण्यास वापरता येईल. आजच्या बालदिनाच्या निमित्ताने मुलांच्या शैक्षणिक खर्चाची तरतूद म्हणून शक्य असेल तितक्या रक्कमेची एसआयपी सुरु केली तरी पुरे.

तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:

Scroll to Top