शब्दावाचुनी कळले सारे

 

आजच्या ‘लोकसत्ता’च्या मुंबई वृत्तांत मधील ‘म्हाडाच्या नव्या अॅपचे अनावरण’ ही बातमी आली आहे. एखाद्या अॅपच्या अनावरणाच्या गोष्टीला असलेले बातमी मूल्य वाढता डेटा वापर अधोरेखित करते. मोबाईल धारक रोज नवीन अॅप आपल्या स्मार्ट फोन मध्ये डाऊनलोड करून त्यांचा वापर करीत असल्याने जगाच्या डेटा वापरात मोठी वाढ होत आहे. डेटाचा वाढता वापर आणि कमी होणाऱ्या किंमतीचा स्मार्ट लाभार्थी असलेल्या आदित्य बिर्ला सन लाईफ डिजीटल इंडिया फंडाची ही ओळख आहे.

नव्या सह्स्त्रकाच्या उदायासोबत अलायन्स न्यू मिलेनियम नावाचा फंड गुंतवणूकीसाठी खुला झाला. समीर अरोरा निधी व्यवस्थापक असलेला हा फंड प्रामुख्याने टेक्नोलॉजी क्षेत्रात गुंतवणूक करणारा फंड होता. पुढे २००५ मध्ये  आलायंस फंड घराण्याच्या योजना बिर्ला म्युच्युअल फंडाने खरेदी केल्याबरोबर हा फंड बिर्ला मिलेनियम फंड म्हणून ओळखला जाऊ लागला. फंड सुसूत्रीकरणानंतर १६ एप्रिल २०१८ पासून या फंडाला आदित्य बिर्ला सनलाईफ डिजिटल इंडिया फंड अशी नवी ओळख मिळाली आहे. हा फंड बिर्ला घराण्याकडे आल्यावर गुंतवणूक धोरणात बदल होत हा फंड ‘टीएमटी’ (टेक्नोलॉजी, मिडिया, टेलिकॉम) क्षेत्रात गुंतवणूक करणारा फंड बनला. नव्या रुपात या फंडाच्या गुंतवणुकीच्या केंद्रस्थानी तंत्रज्ञान क्षेत्र राहिले आहे. उदाहरणादाखल सांगायचे तर भारती आयडिया सारख्या वायरलेस सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांऐवजी निधी व्यवस्थापकांनी गुंतवणुकीसाठी टेलीकॉम उद्योगासाठी ऑप्टीकल फायबर नेटवर्क व्यवसायात असलेल्या स्टरलाईट टेक्नोलॉजीला पसंती दिली आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘कंसल्टिंग’, ‘प्रोडक्ट’, ‘डिजिटल टेक्नोलॉजी’, या उपशाखांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एल अँड टी इन्फोटेक, माइंड ट्री, केपीआयटी टेक्नोलॉजी या कंपन्यांना गुंतवणुकीत स्थान देत  निधी व्यवस्थापक कुणाल संगोई यांनी आपले वेगळेपण दाखविले आहे. निधी व्यवस्थापक फंडाच्या गुंतवणूकीचे सक्रीय व्यवस्थापन करतात. ‘टेक्नोलॉजी फंडां’चा पोर्टफ़ोलिओ टर्नओव्हर रेशो’ अन्य फंडांच्या तुलनेत नेहमीच अधिक असतो. तसाच या फंडाचा सुद्धा आहे. गुंतवणुकीच्या कमाल २५ टक्के गुंतवणूक परदेशी कंपन्यांत करण्यास फंडाला भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’ने परवानगी दिली असून, फंडाच्या गुंतवणुकीत फेसबुक, अॅपल, सारख्या किंवा सिलिकॉन व्हॅलीतील सिस्को ओरॅकल, अँमेझोन, अल्फाबेट, गुगल, डेल टेक्नोलॉजी या सारख्या कंपन्यांना लवकरच स्थान मिळण्याची शक्यता आहे.

तंत्रज्ञानामुळे संवाद साधण्याची माध्यमे आणि पद्धतीत बदल होत आहेत. विशीतल्या युवकांची भाषा आणि तिशी ओलांडलेल्या पिढीच्या संवाद साधण्याच्या भाषेत (चिन्हात) मोठी तफावत आढळते. “घरी कधी येणार”? या आईच्या व्हॉटस अप वरील प्रश्नाला विशीतली युवती IDK असे उत्तर दिले जाते. तिशीतल्या तरुणाला हाच प्रश्न बायकोने विचार तर प्रश्नांकित चेहऱ्याची इमोजी पाठविली जाते. सोबत ‘मिस यु’ची इमोजी असते. स्मार्टफोनच्या तंत्रज्ञानामुळे चिन्हात्मक चित्रांचा वापर वाढू लागला आणि संवादाची भाषा बदलली. शब्दांची जागा चित्रांनी घेतल्याने ‘शब्दावाचून कळले सारे’ अशी परिस्थिती निर्माण झाली. भाव व्यक्त करण्यासाठी आवाजात चढ उतार करण्याएवजी इमोजीचा वापर होऊ लागला. जगभरात ‘फेस विथ टियर्स ऑफ जॉय’, ‘हार्ट’ ‘स्माईलिंग विथ हार्टशेप आईज’ ‘फेस ब्लोविंग किस’ हे जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे इमोजी आहेत. एक त्रितीयांश लोकसंख्या तिशीच्या आतील असलेल्या भारतात मोबाईल धारकांच्या मासिक सरसरी डेटा वापरात १४४ टक्के वाढ झाल्याचे ‘ट्राय’ची आकडेवारी सांगते. मागील सहा महिन्यातील वाढ २६ टक्के तर वर्षभरात १०० टक्के वाढ झाल्याचे आढळते तर एप्रिल जून २०१८ या तिमाहीतील सर्व मोबाईल धारकांचा मासिक एकत्रित डेटावापर ११ गिगाबाईट होता. एका अनुमानानुसार २०२३ मध्ये भारतातील मोबाईल धारकांचा मासिक सरासरी डेटावापर ३.९ जीबी तर एकत्रित डेटावापर २०२३ पर्यंत १.३ ईबी असेल.  संवादासाठी फेसबुक ट्विटर, व्हॉटस अॅप सारख्या समाजमाध्यमांचा वापर वाढत आहे आणि जगभरात डेटा स्वस्त होत आहे. रोजच्या समजमाध्यमांच्या वाढत्या वापरामुळे त्या अनुषंगाने गुंतवणुकीच्या नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. केंद्र सरकारचे या बाबतीतील धोरण सकारात्मक असून मुंबई महानगर पालिकेचे पाण्याचे किंवा मालमत्ता कराच्या देयकाची रक्कम महानगरपालिकेचे अॅप डाऊनलोड करून भरता येते. आजची पिढी फेसबुकवर ‘सेल्फी’ अपलोड करण्यासाठी डेटा वापरण्याबरोबर बँक, विमा, म्युच्युअल फंड व्यवहार या सारख्या रोजच्या वापरात मोठ्या प्रमाणावर डेटा वापरते. तंत्रज्ञानातील गुंतवणूक संधींचे सोने करणारा हा फंड असल्याने या फंडाला ‘लाईक’ देणे अनिवार्य आहे. हा फंड थिमॅटिक प्रकारात मोडणारा असल्याने अंगठा उंचावून ‘लाईक’ देतांना या फंडाची गुंतवणुकीतील मात्रा किती असावी या साठी गुंतवणूक सल्लागराची मदत घेणे आवश्यक आहे. हे भान बाळगले नाही तर अश्रूभरल्या डोळ्याची इमोजी व्हॉटस अप वर पोस्ट करावी लागेल.

अधिक माहितीसाठी खालील Form भरा:

[contact-form-7 id=”22″ title=”Contact Me”]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top