शरदाचे चांदणे!

 

सामान्यपणे म्युच्युअल फंडात पहिल्यांदा गुंतवणूक करणारा लार्ज कॅप फंडांची निवड करतो. अथवा मागील एका वर्षांतील सर्वात चांगला परतावा पाहून फंडाची गुंतवणुकीसाठी निवड करतो. सर्वसाधारपणे ‘रिस्क प्रोफाइल’, ‘अ‍ॅसेट अलोकेशन’ हे शब्द अगम्य वाटतात. शास्त्रशुद्ध पद्धतीने वित्तीय ध्येयांशी सांगड घालणारी गुंतवणूक निश्चित करण्यापूर्वी द्यावा लागणारा वेळ आणि प्रसंगी गुंतवणूक सल्लागाराचे द्यावे लागणारे शुल्क वैगरे सोपस्कार करण्यापेक्षा मागील परतावा हाच फंड निवडीचा सुगम मार्ग आहे असे वाटणे साहजिक आहे. सुगामातून सहजतेकडे जाण्याचा प्रयत्न म्हणून ‘लोकसत्ता कर्ते म्युच्युअल फंड’ ही शिफारसप्राप्त म्युच्युअल फंडांची यादी प्रसिद्ध होते.

आदित्य बिर्ला सनलाइफ इक्विटी फंड या फंडाचा नव्याने ‘लोकसत्ता-अर्थ वृत्तान्त’च्या ‘कर्ते म्युच्युअल फंडा’च्या सुधारित यादीत समावेश झाला आहे. या फंडाची ‘अर्थ वृत्तान्त’च्या वाचकांना नव्याने ओळख करून देण्याची आवश्यकता नाही. या फंडाची शिफारस ९ ऑक्टोबर २०१६ रोजी पहिल्यांदा केली होती. त्या वेळी या फंडाची मालमत्ता ३,००० कोटी रुपयांच्या दरम्यान होती. तर ३० सप्टेंबर २०१८ रोजी या फंडाची मालमत्ता ९,४१९ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

आदित्य बिर्ला सनलाइफ इक्विटी फंड हा प्रमाणीकरणापूर्वी डायव्हर्सिफाइड इक्विटी फंड होता. फंड प्रमाणीकरणाच्या प्रक्रियेचा भाग म्हणून या फंडात २१ मे २०१८ पासून या फंड घराण्याच्या ‘आदित्य बिर्ला स्पेशल सिच्युएशन फंड’ या थीमॅटिक फंडाचे विलीनीकरण करण्यात आले. प्रमाणीकरणापश्चात या फंडाचे वर्गीकरण ‘मल्टीकॅप फंड’ प्रकारात करण्यात आले आहे.

अनिल शहा हे या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. आदित्य बिर्ला सनलाइफ इक्विटी फंड हा अर्थव्यवस्थेच्या सर्व उद्योग क्षेत्रातील लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप या तीनही प्रकारच्या समभागात गुंतवणूक करणारा फंड आहे. फंड संकल्पनेला अनुरूप ठरणाऱ्या समभागांची निधी व्यवस्थापक निवड करून गुंतवणूक करतात. फंड व्यवस्थापक लार्ज कॅप फंड प्रकारासाठी ‘टॉप डाऊन’ तर मिड कॅप आणि स्मॉल कॅपसाठी ‘बॉटम अप’ धोरण अनुसरून समभागांची निवड करतात.

सध्या फंडाच्या गुंतवणुकीतील एकूण लार्ज कॅप समभागांची टक्केवारी ६७.७९ टक्के, मिड कॅपची २४.८६ टक्के आणि स्मॉल कॅपची टक्केवारी १.४८ टक्के आहे. या व्यतिरिक्त अन्य गुंतवणुकीचे प्रमाण ५.८७ टक्के आहे. मागील वर्षभरात फंडाच्या गुंतवणुकीत कायम लार्ज कॅपचे वर्चस्व राहिले आहे. सध्या फंडाच्या गुंतवणुकीत खासगी बँका, माहिती तंत्रज्ञान, ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तू, गैर बँकिंग वित्तीय कंपन्या, धातू वगैरे सर्वाधिक गुंतवणूक असलेली उद्योग क्षेत्रे आहेत.

आदित्य बिर्ला सनलाइफ इक्विटी फंडांतून १० ते १२ उद्योग क्षेत्रांमधील ६० ते ६५ समभागात गुंतवणूक केली जाते. वाजवी मूल्यांकन असलेल्या वृद्धिक्षम कंपन्या (ग्रोथ अ‍ॅट रिझनेबल व्हॅल्यू -जीएआरव्ही) हे या फंडाचे तत्त्वज्ञान आहे. फंडाने सर्वाधिक गुंतवणूक बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्रात केली असून त्या खालोखाल ग्राहकांच्या पसंतीची उत्पादने असलेल्या मारुती, हिंदुस्थान युनीलिव्हर, पीव्हीआर, युनायटेड स्पिरीट्स, भारती एअरटेल, सेंच्युरी इंडस्ट्रीज, कॅस्ट्रॉल इंडिया, डाबर इंडिया, टायटन, कन्साई नेरॉलॅक, हीरो मोटोकॉर्प इत्यादी कंपन्यांचा समावेश आहे. निधी व्यवस्थापक कन्झ्युमर नॉन-डय़ुरेबल प्रकारच्या कंपन्यांत सरासरी १८ ते २० टक्के गुंतवणूक करतात. दोन एक वर्षांपूर्वी आरोग्य निगा क्षेत्रातील गुंतवणूक १५ टक्क्यांपर्यंत होती. मागील वर्षभरात ही गुंतवणूक कमी करीत ग्राहकाभिमुख कंपन्यांतून गुंतवणूक वाढली आहे. एरिस लाइफ सायन्स, डिशमान फार्मा, डॉ. रेड्डी या सारख्या कंपन्यांचे समभाग हा फंड नव्याने खरेदी करीत असल्याचे दिसत आहे. ‘सेक्टर रोटेशन’ ही या फंडाच्या यशाची गुरुकिल्ली आहे. मागील वर्षभरात फंडाने धातू कंपन्यांत गुंतवणूक वाढविली आणि लगेचच नफावसुली करून विकून टाकली.

पहिली ‘एनएव्ही’ २७ ऑगस्ट १९९८ रोजी जाहीर झालेल्या या फंडात १ हजाराच्या ‘एसआयपी’च्या २.४१ लाखांच्या गुंतवणुकीचे २४.०७ लाख रुपये झाले आहेत. वार्षिक १९.३२ टक्के नफा देणाऱ्या या फंडाचा समावेश मल्टीकॅप गटात ‘शिफारसप्राप्त फंड’ म्हणून झाला आहे. वर्तमानातील गुंतवणूकीवर भविष्यात १० ते १५ वर्षांच्या काळात हा फंड १२ ते १५ टक्के दराने वार्षिक नफा मिळवून देईल, अशी शक्यता वाटत असल्याने ही शिफारस करीत आहे.

अधिक माहितीसाठी खालील Form भरा:

[contact-form-7 id=”22″ title=”Contact Me”]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top