नि:संशय नेतृत्वदायी

मल्टी-कॅप म्युच्युअल फंड हा एक इक्विटी म्युच्युअल फंडाचा एक प्रकार असून बजार भांडवला नुसार कंपन्यांच्या केलेल्या सर्व वर्गवारीत गुंतवणूक करतो. सेबीने ११ सप्टेंबर २०२० रोजी काढलेल्या एका परिपत्रकानुसार मल्टी-कॅप म्युच्युअल फंडाच्या एकूण गुंतवणुकीपैकी किमान ७५ टक्के गुंतवणूक समभाग आणि समभाग संलग्न साधनांमध्ये असावी तसेच किमान प्रत्येकी २५ टक्के गुंतवणूक लार्जकॅप मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांत करून उर्वरीत गुंतवणूक निधी व्यवस्थापकाला त्याच्या इच्छेनुसार करता येईल असे नियामकाने या परिपत्रकात नमूद केले आहे. मल्टीकॅप फंडांनी २५ टक्के स्मॉलकॅप मध्ये करूनही बाजारातील अस्थिरतेवर मात करत त्यांच्या मानदंड सापेक्ष अधिक परतावा दिला आहे. ‘अॅम्फी’ने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार मल्टी-कॅप फंड गटात १४ फंड असून हा फंड गट ६२४३५.११ कोटींच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करतो.
मल्टी कॅपफंड गटाचे निसंशय नैतृत्व निप्पॉन इंडिया मल्टीकॅप फंडाकडे असून या फंडाची सप्टेंबर अखेर मालमत्ता १३२२४.१९ कोटी होती. एखाद्या फंड गटाच्या एकूण मालमत्तेपैकी २० टक्के मालमत्ता एकाच फंडाकडे असण्याचा विरळ योग निप्पॉन इंडिया मल्टीकॅप फंडाच्या वाट्याला आला आहे. जुलै २० ते सप्टेंबर २०२२ दरम्यानच्या ‘फंड फ्लो अॅनॅलीसीस’ नुसार या फंड गटात झालेल्या गुंतवणुकीपैकी सर्वाधिक नवीन गुंतवणूक या फंडात झाली आहे. या कालावधीत कोटक मल्टीकॅप पेक्षा दुप्पट आणि आयसीआयसीआय पृडेनशीयल मल्टीकॅप पेक्षा तिप्पट गुंतवणूक निप्पॉन इंडिया मल्टीकॅप फंडात झाल्याची निष्कर्ष ‘फंड फ्लो अॅनॅलीसीस’वरून काढता येतो.
सेबीच्या फंडांच्या सुसूत्रीकरणापूर्वी हा फंड रिलायंस इक्विटी ऑपोर्च्यूनीटीज या नांवाने ओळखला जात असे. मागील १५ वर्षे या फंडाच्या निधी व्यवस्थापनाची धुरा शैलेश राज भान यांच्याकडे आहे. ते या फंड घराण्यांचे सर्वात अनुभवी निधी व्यवस्थापक असून फंड घराण्याचे डेप्युटी चीफ इंव्हेंस्टमेंट ऑफीसर (इक्विटी) आहेत. गुंतवणुकीसाठी कंपन्यांची निवड करण्यासाठी ‘ग्रोथ अॅट रिझनेबल प्राईस’ हे सूत्त्राचा अवलंब शैलेश राजभान करतात. नफ्यात मजबूत वाढीची शक्यता असणाऱ्या आणि किमान १२ -२४ टक्के आर ‘आरओई’ असलेल्या कंपन्यांची गुंतवणुकीसाठी निवड केली जाते. फंडाच्या गुंतवणुकीत लार्जकॅप मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्ये जवळजवळ समान प्रमाणात गुंतवणूक करून, हा फंड खऱ्या अर्थाने ‘ट्रु टू लेबल’ असलेला फंड आहे. निधी व्यवस्थापक नफा कमविण्यासाठी उदयोन्मुख कंपन्यांत गुंतवणूक करतांना कचरत नाहीत. मागील सहा महिन्यांचा विचार केल्यास निधी व्यवस्थापकांनी विजया डायग्नोसीस, चंबळ फर्टीलाय्झार फिनोलेक्स इंडस्ट्रीज अजंटा फार्मा, यांचा गुंतवणुकीत नव्याने समावेश केला तर ओरिएंट सिमेंट, जेके लक्ष्मी सिमेंट हिंदाल्को मदरसन सुमी,वायरिंग इंडिया, मॅक्स हेल्थकेअर यांना वगळले. गुंतवणुकीत लिंडे इंडिया आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक यांचे प्रमाण कमी केले, तर अॅक्सीस बँक इंडियन हॉटेल्स, इस्ट इंडिया हॉटेल्स कॅनामेटल इंडिया, शॉपर्स स्टॉप यांची प्रमाण वाढविले. निधी व्यवस्थापक कंपन्यांच्या निवडीसाठी बहुआयामी दृष्टीकोन अवलंबतात. तथापि, उदयोन्मुखक्षेत्रात गुंतवणूक करणे, ज्यात मुख्यत्वे नवीन व्यवसाय मॉडेल आणि नवीन मूल्यांकन पद्धत अवलंबणारे व्यवसाय आहेत, निधी व्यवस्थापकांनी या आधी मोठ्य ‘थीमॅटिक बेट्स’ घेतल्याचे दिसते. अश्या अयशस्वी कॉलमुळे फंडाची पीछेहाट झाल्याचे प्रसंग मागे उद्भवले आहेत. कोरोन आधी आतिथ्यसेवा क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली होती. कोरोन काळात हॉटेल्स बंद राहील्याचा फटका या गुंतवणुकीला बसला. परंतु सध्या फंडाचा १७ टक्के परतावा आतिथ्यसेवा क्षेत्रातून मिळत आहे. मल्टी-कॅप फंडांचा पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण असतो, म्हणून, हे फंड तुलनेने कमी धोकादायक असतात एखाद्या आर्थिक क्षेत्राची किंवा उद्योगाची कामगिरी ठराविक वेळी बदलू शकते. शिवाय, हे फंड उच्च-वृद्धीदर असलेल्या उद्योगांना त्यांचे मार्केट कॅपचा विचार न करता गुंतवणूक करतात. त्यामुळे अपवाद वगळता एखादा कॉल चुकण्याची शक्यता कमी असते. हे फंड परिस्थितीनुसार लार्ज, मिड आणि स्मॉल-कॅपमधील पोर्टफोलिओ रचना बदलण्याची लवचिकता निधी व्यवस्थापकाला देतात देतात. मल्टी-कॅप फंड परतावा मिळविण्यासाठी मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप समभागांवर जास्त अवलंबून असल्याने ते फ्लेक्झीकॅप फंडांच्या तुलनेत अस्थिर असू शकतात. अस्थिरता स्वीकारून परतावा मिळविण्यासाठी दिवाळी विशेष म्हणून या फंडाचा गुंतवणुकीसाठी नक्कीच विचार करावा.

तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:

Scroll to Top