दरवळे इथे सुवास...

Flexi cap mid cap small cap fund
म्युच्युअल फंडांची कार्यक्षमता निश्चित करण्यासाठी ट्रेलिंग रिटर्नस (अनुगामी परतावा) आणि रोलिंग रिटर्नस (चलत सरासरी) हे दोन निकष आहेत. सामान्य गुंतवणूकदार एका निश्चित कालावधीसाठी जसे की, १ वर्ष , २ वर्षे ३ वर्षे ५ वर्षे किंवा सुरवातीपासून कालावधीचा अनुगामी परतावा पाहून फंड निवड करीत असतात. या परताव्यांना पॉइंट-टू-पॉइंट रिटर्न असेही म्हणतात. तर चलत सरासरी रोलिंग रिटर्नला पीरियड रिटर्न असेही म्हणतात, ते विविध कालावधीतील परताव्यांची गणना सक्षमपणे करतात. जेसे की पाच वर्षे कालावधीतील तीन वर्षाचा चलत परतावा हा निर्धारित वेळेतील (तीन वर्षे) पाच वर्षांसाठी (जुलै २०१७ ते जून २०२२) कालावधीत मोजता येतो. विशिष्ट कालावधीत परतावा मोजला जात असल्यामुळे परताव्याचा पूर्वाग्रह दोष टाळता येतो. चलत परतावा बघून, गुंतवणूकदार हे समजू शकतात की फंडाचा परतावा एखाद्या विशिष्ट टप्प्यावर (तेजीच्या किंवा मंदीच्या कालावधीत) कसा होता. जर एखाद्या गुंतवणुकीने १० वर्षांच्या कालावधीत ९% वार्षिक परतावा दिला असेल तर दहा वर्षात दर वर्षी -५%, २०% ७% -३२% …. या सारखा परतावा मिळाला असण्याची शक्यता आहे. दहा वर्षात ४ वर्षे नफा आणि ६ वर्षे तोटा झाला असण्याची शक्यता आहे. एखाद्या वर्षी गुंतवणुकीत ३५ टक्के वाढ झाली असेल तर एखाद्या वर्षी १२ टक्के घट झाली असण्याची शक्यता आहे. तर चलत परताव्याचे विश्लेषण केल्यास वार्षिक कामगिरी फंड कामगिरी १ जानेवारीपासून सुरू होऊन ३१ डिसेंबरला संपत नाही. या परताव्यात सातत्य असते. एकाद्या गुंतवणुकीच्या १० वर्षांच्या कालावधीतील चलत परतावा या स्वरूपात गुंतवणुकीचे सर्वोत्तम तीन वर्षे आणि सर्वात वाईट तीन वर्षे दर्शवतो.
भविष्यात चांगला परतावा देणारे फंड शोधण्यासाठी ‘एफीशीऐंट फ्रोंटीएर’ थेअरी वापरली जाते. निश्चित नोबेल पारितोषिक विजेते हॅरी मार्कोविट्झ यांनी ‘एफीशीऐंट फ्रोंटीएर’ थेअरी पहिल्यांदा १९५२ मध्ये मांडली. आधुनिक पोर्टफोलिओ थिअरीचा (एमपीटी) ‘एफीशीऐंट फ्रोंटीएर’ हा एक आधारस्तंभ आहे. पोर्टफोलीओचा वार्षिक चक्रवाढ दर (सीएजीआर) वाय-अक्षावरआणि जोखीम एक्स-अक्षावर मांडून जो आलेख तयार होतो त्याला ‘एफीशीऐंट फ्रोंटीएर’ म्हणतात. जोखीम निश्चित करून जास्तीत जास्त वार्षिक नफा देणारा पोर्टफोलिओ बनविता येतो. ही थिएरी फ्लेक्झीकॅप फंड गटातील प्रत्येक पोर्टफोलिओसाठी लावली असता जोखीम परतावा गुणोत्तरात कॅनरा रोबेको फ्लेक्झीकॅप, एचडीएफसी फ्लेक्झीकॅप, फ्रॅकलीन इंडिया फ्लेक्झीकॅप, पराग पारीख फ्लेक्झीकॅप, आणि आयडीबीआय फ्लेक्झीकॅप या फंडांचा परतावा त्यांच्या मानदंड सापेक्ष अधिक आहे.
प्रत्येकाच्या दीर्घकालीन गुंतवणुकीत फ्लेक्सी कॅप फंड असायला हवेत. फ्लेक्सी कॅप फंड हा एक तुलनेने नवीन फंड गट आहे. प्रकारचा म्युच्युअल फंड आहे जो त्याच्या फंड मालमत्ते पैकी ६५ टक्के मालमत्ता समभाग गुंतवणूक हवी. फ्लेक्झीकॅप फंड गट मालमत्ता क्रमवारीत लार्जकॅप फंड गटानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. मागील आठवड्यात जाहीर झालेल्या फंड आकडेवारीनुसार ३० जून रोजी या फंड गटाची मालमत्ता २ लाख १० हजार हजार कोटी होती. या फंड गटातील फंडांचे निधी व्यवस्थापक लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप समभागात गुंतवणूक करतात. परिणामी, फ्लेक्सी कॅप फंडातील गुंतवणुकीमुळे तुम्हाला बाजाराच्या सर्व भांडवली गटात गुंतवणूक होत असते.
जेव्हा शेअर बाजाराचा विचार केला जातो तेव्हा गुंतवणूकदारांना काही संज्ञा आणि संकल्पना अमाजून घेण्याची गरज आहे. ‘रिस्क फ्री रेट ऑफ रिटर्न’ ही अशीच एक संकल्पना आहे. सरकारी रोख्यांवरील व्याज दर म्हणजे रिस्क फ्री रेट ऑफ रिटर्न’. जोखीम-मुक्त दर म्हणजे दिलेल्या कालावधीत, शून्य जोखमीसह, गुंतवणुकीवरील परताव्याचा दर. जेव्हा आपण जोखीम-मुक्त गुंतवणुकीचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर बँकांच्या मुदत ठेवी येतात. बँकांच्या मुदत ठेवी जोखीम-मुक्त नसतात. सरकारी रोख्यांतील गुंतवणूक जोखीम मुक्त समजली जात असली तरी, या गुंतवणुकीत पुनर्गुंतवणूक जोखीम असते. भारतात रिस्क फ्री रेट ऑफ रिटर्नसाठी केंद्र सरकारच्या १० वर्षे मुदतीच्या (६.५४ % जीएस२०३२) रोख्यांवरील परतावा मानदंड समाजाला जोतो. फंडांची कार्य क्षमता मोजण्यासाठी जोखीम-समायोजित परतावा, (रिंक अॅडजस्ट रिटर्न्स) ही एक संकल्पना वापरली जाते. दिलेल्या कालावधीत गुंतवणुकीने जोखीम मुक्त परताव्यापेक्षा किती अधिक परतावा मिळविला, आणि हा परतावा मिळविण्यासाठी किती जोखीम घेतली याचे गुणोत्तर फंडाची कार्य क्षमता निश्चित करते. दीर्घ कालावधीतील ( ५ वर्षे आणि १० वर्षे) वर उल्लेख केलेल्या दोन्ही पद्धती वापरून कॅनरा रोबेको फ्लेक्झीकॅप, फ्रॅकलीन इंडिया फ्लेक्झीकॅप, पराग पारीख फ्लेक्झीकॅप, आणि आयडीबीआय फ्लेक्झीकॅप या फंडांची गुंतवणुकीसाठी शिफारस करावीशी वाटते. एचडीएफसी फ्लेक्झीकॅप फंडाची सध्याची कामगिरी आकर्षक असली तरी फंडांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव असल्याने या फंडातील गुंतवणुक टाळावी असे सुचवावे वाटते.

तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:

Scroll to Top